जायचे ना घरी
जायचे ना घरी
गरजता पुन्हा हीच मेघावली
कडकता अशी वीज भूमीवरी
बरसता धबाबा धबाबा सरी
परतुनी कसे जायचे मी घरी ?
अजुनही तुझा हट्ट चालूच रे.
कधितरी शिकावी सख्या लाज रे !
हरखतेच मी ही, खरे हे, तरी,
परतुनी कसे जायचे मी घरी ?
हरवल्याविना काय शोधीत मी ?
गवसल्या तुला काय सांडेन मी ?
मिसळतात लाटा पुन्हा सागरी
परतुनी मला जायचे ना घरी.

