होय माझा अंत झालेला अता..
होय माझा अंत झालेला अता..
1 min
348
मुक्त लिप्ताळ्यातुनी साऱ्याच पाही ,
मीच माझा संत झालेला अता .
त्यागिता मी सर्व माझ्या वैभवाला ,
मज दिसे श्रीमंत झालेला अता .
स्वच्छ दृष्टी जाहली ; सृष्टीहि सारी ,
मोकळा आसमंत झालेला अता .
आस नाही ; ना तशी ती वासनाही ,
जीवनी हेमंत झालेला अता .
तो पुराणा देह माझा संपला अन् ,
मी पुन्हा जीवंत झालेला अता .
साहवेना सुख म्हणोनी नेत्र मिटले ;
श्वाससुद्धा मंद झालेला अता .
मी निघालो दूर , माझ्या मैफलीचा
सूर देखील संथ झालेला अता .