ही कविता फक्त तुझ्यासाठी
ही कविता फक्त तुझ्यासाठी
आज वट सावित्री.
विसरून गेला असेल कदाचित,
बांधावया तव लग्नाची गाठ
म्हणूनच दिली अभागिनीस या
देवाने तुझ्या प्रेमाची साथ
लौकिक अर्थाने जरी मी
नाही चालले सप्तपदी तरीही
पालन करेन सात वचनांचे,
आजमावून तू बघ कधीही
नाही भाग्य मज तुझ्या कुंकवाचे,
मी रोज कुंकू स्पर्शते तरीही
तू जिथे ठेवशील पाऊले तुझी,
ती धूळ कपाळी लावते आजही
काळे मणी गळ्यातले माझ्या,
निरंतर तुझा स्पर्श मज देती
तुझ्या नावाच सौभाग्य लेणं,
ऱ्हदये आपली जोडून ठेवती
तुझ्या माझ्या दरम्यान आहेत,
सख्या परंपरांची कवाडे उभी
तुझे प्रेम लाभले असे मज,
जसे पसरते इंद्रधनुष्य नभी
तुझ्या चेहऱ्यावर सख्या, मज
नको एकही उदास लेकर
तुझे नाव ओठी असावे अन,
कुशीत तुझ्या जीवनाची अखेर
ही एकच शेवटची आस,
अन शेवटचेच शब्द माझे।
माझ्या अंतयात्रेला तरी निदान,
लाभावेत आधाराचे खांदे तुझे
दिवसरात्र ही प्रेमवेडी बघ,
तुझ्या दीर्घायुष्याची कामना करते
या जन्मी न मिळाली साथ तुझी
पुढच्या प्रत्येक जन्मी फक्त तुलाच मागते
फक्त तुझ्याच कुंकवाच दान मागते!

