‘ गट्टीचे गुपित’
‘ गट्टीचे गुपित’
तुही भलता संधीसाधू
पहात असतो वाट टपून
दिसते का मी कधी एकटी
आसपास बसतोस लपून
थंडी म्हणजे तुला पर्वणी
किती इशारे खुणा किती
खरे सांगते आज तुला रे
मलाही ते आवडे अती
उब मिठीची तुझ्या साजणा
गोडी नाहीच जगी तशी
मीही धावते तुझ्या दिशेने
खुशाल होऊन वेडीपिशी
माझ्या देही विसावतो तू
आणिक तुझिया कणात मी
समरस होते दोन जीवांच्या
शृंगाराच्या क्षणात मी
तुझे रंग अन ढंगही माझे
दोघे आपण पट्टीचे
प्रणयातच या दडलेले रे
गुपित आपल्या गट्टीचे !

