ग्रंथ ज्याला विश्व वंदे..
ग्रंथ ज्याला विश्व वंदे..
ग्रंथ ज्याला विश्व वंदे; अर्पितो सन्मानही
संविधानच आण आहे, भारताची शानही!
विसरुनी मतभेद सारे, एक व्हावे संकटी
वेळ येता संगराची, आहुती दे, प्राण ही..
या जगाला दान देऊ, पर्व शांतीचे अता
उन्नतीचे पंख देऊ, जाण देऊ, भान ही..
देशभक्ती राग व्हावा, बोल व्हावे शब्दही
सूर क्रांतीचे स्फुरावे, थरथरावे गान ही
वाद ही संवाद होई, एकमेका मान ही..
तीच भाषा संविधानी, आमुचे अवधान ही
न्याय, समता, बंधुताही आज नांदू लागली
ती गुलामी सोडली मी, पांगळे अज्ञान ही
शब्द देती प्रेरणा जे, आत्मभाना जागवी..
लेखणीचे त्या करावे, ध्यान ही गुणगान ही
शिक्षणाच्या मशाली, पेटवू चल अंतरी
जाळती अंधार अन्, साधती उत्थान ही
नाळ ज्याची गौतमाशी, तोच बाबा भीम हा
आदराने शीष नमितो, या उरी अभिमान ही
