गर्दी
गर्दी
बाहेर चिक्कार ‘लोकं’ आहेत... ‘गर्दी’ आहे...
पण बरं झालं आपण त्यात नाही...
त्या लोकांची वेग-वेगळी अशी ‘मतं’ आहेत...
कुणाच्या ‘मते’ त्या ‘मतांना’ भरपूर किम्मत आहे...
तर काहींच्या ‘मते’ त्या मतांना काडीमात्र किम्मत नाही...
पण बरं झालं, आपलं मत त्यात नाही...
कारण आपण त्यात नाही...
‘मतां’ वरून वाद आहेत... ‘वादां’ वरून भांडण...
भांडणातून ‘गट’ निर्माण होत आहेत...
आणि प्रत्येक गटाचा एक ‘म्होरक्या’ आहे...
गटांमध्ये वाद आहेत... पण म्होरक्यां मध्ये वाद ‘नाही’...
पण बरं झालं, आपण कोणत्याच गटात नाही...
कारण आपण त्यात नाही...
म्होरक्यांचं सारं साठं-लोठं आहे... बरं का...
अगदी नवरा-बायको सारखं नातं आहे...
दिवसा भांडले जरी, तरी रात्री सारं ठीक होतं आहे...
पण हे अंतरूणातलं राजकारण, त्या अनुयायांना काळतच नाही...
पण बरच झालं... आपण काही अनुयायी नाही...
कारण आपण त्यात नाही...
कारण आपण असतो...
आकाशात रचलेल्या त्या ढगांच्या चित्रा मध्ये रमलेलो...
नैराश्याच्या गदारोळा पासून दूर कुठेतरी नमलेलो...
दुखांना विसरण्यासाठी... आनंद वेचण्यासाठी...
त्या स्वप्नांच्या झाडा खाली जमलेलो...
आपण असतो...
ते फक्त आठवणी पुन्हा जगण्यासाठी मारलेल्या गप्पांमध्ये...
आपण असतो...
ते हृदयाच्या आत कुठेतरी जपून ठेवलेल्या कप्प्यांमध्ये...
आपण आभाळातही असतो... निसर्गाच्या गाभार्यातही असतो...
वार्यावर स्वैर आपण, चांदण्यांच्या खळ्यातही असतो...
अरे असं म्हणा ना... आपण तळ्यातही असतो आणि मळ्यातही असतो...
पण आपण कधीच त्या लोकांमध्ये नसतो...
कारण गर्दीत जरी त्या चिरडलो तरी... आपण त्या गर्दीतले नसतो...
