दिवे लागले--
दिवे लागले--




हा स्नेह फुले,
मनात आपोआप-
लागती दीप.
ज्योतिचे तेज,
हीणचि सारे जळे -
दीप उजळे.
संकेत मुका,
उजळो ठायी ठायी-
दीपमालिका.
चमक किती !
नेत्रांमधले दिवे-
काय सांगती ?
या लाडकीचे,
येणे अमुच्या घरी,
दिवाळी खरी.
उजळविते,
लेकच माझी खास,
दोन घरांस.
दिसेना कुठे,
अंबरातला दिवा,
उत्सवी हवा.
नसेना चंद्र,
आकाशातिल ज्योती,
चमचमती.
आरोग्यमयी,
देहच सारा दीप-
मोद अमाप.
ज्योतिने ज्योत,
एकापुढती एक-
जगाची रीत.
नभी चांदवा,
असा कसा हा दिवा-
मलाही हवा.
अंधार आत,
झुरे ज्योत एकटी-
दिव्यासोबत.
वादळी हवा,
अंतरात अंकुरे-
आशेचा दिवा.
दिवटीच खरी-
प्रकाशती जीवने,
ज्ञानमंदिरी.
ज्ञानमंदिरी,
ज्ञानदीप सजले-
झगमगले.