धुकं
धुकं
सगळीकडे धुकं पसरलंय. दाट.
आणि मी एकटाच चाललोय.
एखादा येवून धडकतो, निघून जातो.
एखादा थोडा वेळ सोबत चालतो.
पुन्हा तो त्याचा रस्ता शोधतो, मी माझा.
मागे काय गेलं हे आठवतो,
पुढे काय येईल याची कल्पना करतो,
आणि यातच बराच रस्ता संपून जातो.
आता धुकं खूपच दाट झालंय,
मग मी अधिक शोध घेतो
आणि अधिक हरवत जातो.
अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो,
आणि अर्थहीन होऊन जातो.
फक्त चालत राहणं हेच खरं मानतो,
मग चालत जातो, चालत जातो, आणि चालतच राहतो.
