दान
दान
ती उन्हे उतरली अलगद
झाडांच्या छायेखाली
वाटेवर लावून डोळे
मी निजलो संध्याकाळी
मन पाचोळा पाचोळा
संवेदन गेले गोठून
मी जिथे थांबलो तेथे
हे उठले वारूळ कोठून
हा शाप म्हणावा मी की
वरदान लाभले समजू
ह्या काठावरूनी दिसते
क्षितीजाची एकच बाजू
ही बुडते संध्याछाया
ह्या काळोखाच्या डोही
मज गहिवर आला पण मी
ते दान टाकले नाही
