मी सांग कसे परतावे
मी सांग कसे परतावे
1 min
226
थकलेल्या देहावरती
निष्पर्ण तरुची छाया
कुठल्या देशीचा वारा वाही
कुठली वेडी माया
शोधात कशाच्या आलो
ह्या सात समुद्रापार
ह्या लख्ख प्रकाशामागे
हा गूढ मूका अंधार
हाताशी वैभव सारे
पण एक व्यथा हृदयाशी
हा जीव कसा रुजवावा
शोभेच्या खिन्न फुलांशी
संवेदन रुधिरामधले
मी सांग कसे मारावे
तोडून शृंखला साऱ्या
मी सांग कसे परतावे
