छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज


मायभूमी होती तिमिरात,
नव्हता कोणताही आशेचा किरण,
माय भवानी मातेच्या कृपेनं,
शिवनेरीवर जिजाऊंना लाभले पुत्ररत्न...
तेहतीस कोटी देवाहून प्रिय,
आम्हास मिळाले शिवराया,
घेतली शपथ रायरेश्वर राऊळात,
अखंड स्वराज्य निर्माया...
हाती घेतला शेतीचा नांगर,
घडावया शेतकऱ्यांचं राज्य,
नाही आत्महत्या छत्रपती शासनात,
शेतकरी स्वराज्याचा घटक अविभाज्य...
आया बहिणींच्या रक्षणाचं काम,
स्त्री अत्याचारावर नाही सुट,
परस्त्री मानली मातेसमान,
राजांचं राज्य विना गालबोट...
शिवगर्जना होताच येतो,
अंगावर सर्ररकन काटा,
रक्त सळसळते नसानसांत,
उसळतात शरीरात सागरी लाटा...
जनता, मावळ्यांची घेतली काळजी,
केला सत्कार, सन्मान, बक्षिसे बहाल,
सगळ्यांची मनं अचूक जाणणारा,
शत्रुंच्या प्रत्युत्तरात मात्र जहाल...
बुद्धिमत्ता, संयम, निर्णय क्षमता,
युद्धाची आखणी, सह्याद्रीशी दोस्ती,
भारतीय आरमाराचे अन् पालखीचे जनक,
महाकाय यवनांना त्यांची कायमची धास्ती...
विश्वात राजांचा आदर सन्मान,
नाही होणे असा राजा रयतेस,
सर्वोत्तम राज्यकर्ता हेवा जगास,
रयत सर्वस्व जाणत्या राजास...
दिले दुसरे छत्रपती स्वराज्यास,
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज,
शोभले धर्मवीर सिंहाच्या छाव्यास,
मानाचा त्रिवार मुजरा स्वीकारावा महाराज...