बाई गं...
बाई गं...
बाई गं कधी होणार तू माणूस
पूर्वी स्वयंपाकघराच्या आणि माजघराच्या वेशीत
चूल आणि मुलाच्या परिघात राहायचीस
मग आलीस ओटीवर मामंजींच्या झोपाळ्याशी
वाड्याची चौकट ओलांडून शिरलीस थेट सावित्रीच्या शाळेत
तू कुठे तिथे थांबायला, गेलीस सातासमुद्रापार आनंदी बनून
कधी बहिणाच्या रूपात शिकवलंस जगाला न शिकताही
कधी आई झालीस अनाथांची मदर टेरेसा होऊन
तर कधी कल्पना होऊन अंतराळात भरारलीस
सिंधू अन् सायनाच्या रूपात फुलराणीही बनलीस
पण आजही एका श्वासासाठी लढतेयस, जन्मायच्याही आधी
चुकून आलीसच या जगात तर अर्धपोटी जगतेस
पुन्हा एकदा मोठी होऊन आई बनू पाहतेस, लेकीला वाचवू पाहतेस
पण बाई गं, वाट बघतेय तुझी
एकदा तरी जन्मशील का माणूस म्हणून?
