अवचित भेटी ....अभंग रचना
अवचित भेटी ....अभंग रचना
अवचित भेटी। आला पांडुरंग
सावळ्याचा संग।मोहवितो।।1।।
सावळा स्वरूप।उभा विटेवरी
तुजसी अंतरी।पाहतसे।।2।।
विठूच्या राऊळी। जीव विसावला।
भक्त जो निमाला।दर्शनाने।।3।।
पंढरीचा नाथ।कर कटावरी।
सुखवी संसारी। भक्तासीया।।4।।
चराचरातूनी। विठ्ठलाचे रूप।
निस्सीम स्वरूप। दिसतसे।।5।।
वारकरी भक्त।दर्शनासी जाती
टाळचिपळी ती। आनंदली।।6।।
विठूचा गजर।वारीत चालला ।
भक्त सुखावला।नामाने या।।7।।
ऐक बा सावळ्या।भेट अंतरीची।
तुझ्या पंढरीची।होऊ दे गा।।8।।
तुझी ओढ जीवा।प्राणही व्याकूळ।
हिच तळमळ। निजानंदी।।9।।
तुच माझा सखा।पंढरी माहेर
प्रेमाचा आहेर।स्विकारूनी।।10।।
