अंतस्थ बोल
अंतस्थ बोल




अवकाश मार्गे येऊन
चिटपाखरू सांगते
सोड संदर्भाच्या कुबड्या
नको जाऊ वंशात
बांडगुळांच्या
ऐकून आकाशवाणी
अन् बिथरतो मी
शक्यतांच्या पडताळणीत
सपशेल हरतो मी
एकतर्फी सामन्यासारखा
नवीन वाट चोखळण्याचा
चाटून जातो विचार
तो पर्यंत ते निरोप्या
चिटपाखरू माघारी फिरते
जातांना एवढेच सांगते
'आता तुझे तू ठरव'
प्रशांत महासागराच्या
प्रचंड ढवळाढवळीत
मनाच्या सुकाणूला
आटोपण्यात खर्चिल्या
घटकांचा ताळेबंद नसतो
पुन्हा एखादा महाकाय जटायू
येतो निरोप्या बनून माझ्यासाठी
आयुष्याची उतराई मोजलीस का?
एवढा एकच प्रश्न विचारायला
किती सायास घेतले त्याने
मीही मिटून घेतो मजला
पंचेंद्रियांच्या आक्रोशाला
तसेच ठेवतो बोंबलत
बुडी घेतो खोल डोहात
तळाच्या नीरव शांततेत