आयुष्य
आयुष्य
पवित्र पण कर्मकठिण
अवघड शिवधनुष्य असतं
दुसर्यांदा ते मिळत नाही
असं आपलं आयुष्य असतं
सात जन्म वगैरे फक्त
कल्पनेपुरतंच असतं
कोणीही कितीही काहीही म्हटलं
तरी आयुष्य एकुलतंच असतं
जगण्याने छळलं म्हणून
सरणावर चढायचं नसतं
मृत्यूच्या दाराबाहेर येऊन
आयुष्याशी लढायचं असतं
एवढं मोठं आकाश पण त्याला
क्षितिजासमोर झुकावंच लागतं
जीवन जगणार्या प्रत्येकाला
आयुष्याला मुकावंच लागतं
वेड्या माणसाला दु:खाशी
करता येत नाहीत हात दोन
म्हणून निसर्गापुढे जाऊन
स्वतःला मारणारा आपण कोण?
छोट्या छोट्या गोष्टींत आनंद
शोधता येत नाही कोणाला
आपली माणसंच जवळ नाहीत
सांगावं कोणाला, दुःखी मनाला?
जगात दुःख कमी नाही पण
आपण चिंतित व्हायचं नसतं
आपण फक्त आनंदाने
आपलं आयुष्य जगायचं असतं
