आस आजपण आहे !
आस आजपण आहे !
माळलेल्या त्या फुलांची
ती रास आजपण आहे।
भेटलो ज्या माळरानी
ते कास आजपण आहे।
जोग्याप्रमाणे जीणे
अन् फिरणे बंजा-यागत
जीवघेण्या स्वप्नांचा
प्रवास आजपण आहे।
भिजल्या चोचीने स्वछंद
पावसात चिंब भिजावे
पावसाची आस ज्याला
तो तास आजपण आहे।
वाढली बांडगुळे अशी
झाडावर चौफेर कशी
त्या पारंब्यांची भीती
पारास आजपण आहे।
गेले दिन ते भुर्रकन
राहिल्या त्या आठवणी
कुपीतल्या सुगंधाची
ती आस आजपण आहे।
मिटल्या जरी चांदण्या
संपूनी प्रहर तिसरा
श्रुंगार पटावर गुंजतो
खमाज आजपण आहे।
घालू नको स्वप्नांना
वास्तवतेचे कुंपण
पंखांना आकाशाचा
ध्यास आजपण आहे।

