हिरवळीची जादु (रंग हिरवा)
हिरवळीची जादु (रंग हिरवा)
"उषा अगं उषा उठ आता आठ वाजलेत बघ, किती तो आळशीपणा आजकाल तु जरा जास्तच आळशी होत चालली आहेस बरका." सुभानराव पेपर वाचत वाचत आपल्या पत्नीला आवाज देतात.
"उठते हो खरंच समजलंच नाही बघा आठ वाजुन गेलेत ते.आणि आळस तसा नाही रात्री पण नऊ वाजेलाच झोपली होती मी.पण कळत नाही सारखं कसं झोपुन रहावं वाटतं मला?"
"अगं म्हणून तर सांगतो तुला पहाटे उठुन जरा फिरायला येत जा माझ्यासोबत फ्रेश वाटेल तुला."
उषाताई उठुन हळुहळु घरातली सर्व कामे पुर्ण करतात. बारा वाजेपर्यंत सर्व कामे आटोपून झाली.पुन्हा त्यांना सारखं झोपावे वाटु लागले.आज दुपारी सुभानराव मिनाताई
कडे गेले होते.मिनाताई उषाताईंची मैत्रिणी एकमेकींना भेटल्या शिवाय दोघी एक दिवसही राहु शकत नव्हत्या.पण आता तीन महिने झाले दोघींची भेट नाही.मिनाताई जेव्हा जेव्हा उषाताई ला फोन करत त्या काहीना काही बहाण्याने भेटणे टाळुन देत असत.
आज मात्र सुभानराव मीनाताई ला आपल्या सोबत घरीच घेऊन आलेत. उषाला नेमका काय त्रास आहे ती अशी अबोल आणि शांत का झाली , एकलकोंडी का झाली हे फक्त मीनाताई त्यांना आग्रहाने विचारू शकतात हे त्यांना माहीत होते.
मीना ताई उषाताईंच्या रुम मध्ये गेल्या तर तेव्हा ही उषा ताई झोपलेल्या होत्या. मीना ताई खिडकीचे पडदे बाजूला सारत उषाताईला आवाज देतात.
"उषा अगं ये उषा काय गं हे सायंकाळचे पाच वाजले आणि हे काय झोपली आहेस अजुन, ऊठ ऊठ."
"मीना तु कधी आलीस आणि अशी अचानक?"
"मग काय करणार तुला भेटायला बोलावते,तु तर काहीना काही कारणं सांगून फक्त टाळुन देते , म्हटलं चला आज आपणच जाऊन भेटावे..काय झालंय तुला, तब्येत बरी आहे ना तुझी? आणि काही त्रास असेल तर सांगना मला,हे बघ उषा काहीही अगदी काहीही प्रॉब्लेम असेल ना? सांगुन टाक. मन हलकं होईल गं तुझं."
"मीना काय सांगू ?काही सांगण्यासारखे नाही. तुला तर माहीतच आहे तीन महिन्यांपूर्वी हे रीटायर्ड झाले.
विलास पण सहा महिन्यांपूर्वी च अमेरीका गेला
आधी कसं यांच हॉपीस, हॉपीसची वेळ,डबा सर्व कसं वेळेवर लागायचं रवीवारी मग काहीना काही नवनवीन पदार्थ, सगळं कसं वेळेवरच लागायचं आता काय
मुलगा नाही, नातवंडे नाही, यांच्या कामाची घाईगडबड नाही की, आयुष्यात उत्साह नावाचं काही राहिलंच नाही. सारखं आपलं झोपुन रहावं, काही काम करु नये, कुणाला भेटु नये,बोलु नये असं उदासीन वाटायला लागले आहे.काय करावे काही कळत नाही बघ.."
मीनाताई ला आता उषा ताईची नेमकी तगमग कळली होती.आणि म्हणुनच त्यांनी सुभानरावांना सुचवले होते "आंम्ही काही दिवसांसाठी आमच्या कोकणातल्या गावी जातोय.तुम्ही आणि उषा सुद्धा आमच्या सोबत चला, उषाला थोडा चेंज पण मिळेल.
ठरल्याप्रमाणे उषाताई,सुभाषराव, मीनाताई आणि त्यांचे यजमान शामराव चौघैही गावी पोहचले.
गावातील बायकांचा घोळका, गप्पाटप्पा, एकत्र जेवण या सर्व गोष्टीत उषाताईंना अगदी मनमोकळे वाटत होते. त्यांना सर्वात जास्त आनंद मिळाला तो हिरव्या गार शेत शिवारात, कौलारू घर,पायाला थंडगार ओल्या मातीचा स्पर्श, सुगंध, डोलणारे हिरवेगार शेत,
रानवारा सर्व,सर्व. अगदी अल्हाददायक, प्रसन्न करणारे वातावरण. उषाताईंच्या मनावरील सगळी मरगळ दुर झाली होती.आणि त्यांच्यातील उत्साह, आनंद सर्व पहिल्या प्रमाणे परतही आले होते.सुभानराव पुन्हा, पुन्हा मीनाताईं चे आभार मानत होते.
"अहो सुभानजी ही सर्व कमाल माझी नाही या हिरव्या गार, प्रसन्न वातावरणाची आहे.आणि ही सर्व जादु या हिरवळीची आहे."
