धन्यवाद शिक्षक!
धन्यवाद शिक्षक!
"गुरुजी.... गुरुजी...चला लवकर त्या चंदाची घरचे लोकं तिचं लग्न लावायला निघाले.मुलगा बी आलाय तिला बघायला!!"
खालच्या आळीतला विष्णू पळत पळत आला आणि गुरुजींच्या दारात उभा राहुन धापा टाकत बोलत होता.रवीवारची शाळेला सुट्टी म्हणून दुपारी गुरुजींचा जरा डोळा लागला होता. विष्णुच्या आवाजाने ते झडपडुन जागे झाले.
खुंटीवर टांगलेला सदरा घाईघाईने अंगावर चढवून विष्णु सोबत ते ही पळतच निघाले चंदाच्या घराकडे.
चंदाच्या घरी पोहोचले तर खरोखरच तिथे बरीच मंडळी जमली होती.गुरुजींना पहातच सर्वांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले.
"गुरुजी आले,गुरुजी आले." म्हणत एकच गोंधळ उडाला. गुरुजी सरळ घरात प्रवेश करतात.
त्यांना पाहून चंदाचे आईवडील दचकतात.
गुरुजी आता दोघांनाही चांगलेच धारेवर धरतात.
"चंदाचे बाबा हे काय करताय तुम्ही?? अवघ्या बारा वर्षांची चिमुरडी लेक आहे तुमची आणि तिचं लग्न करायला निघालात तुम्ही? आत्ताच्या आत्ता हा पोरखेळ थांबवा.. नाहीतर पोलीसांना बोलावेल मी."
"नाही, नाही गुरुजी.तुमचा काही तरी गैरसमज होतो आहे.चांगले मागणे आले होते म्हणून आता फक्त लग्न ठरवुन ठेवणार आहोत.लग्न तर नंतरच दोन चार वर्षांनी करणार आहोत.."
गुरुजी -"चंदा कुठे आहे बोलवा तिला , तिच्याशी बोलणार मी." चंदा आतल्या खोलीतून बाहेर येते.
गुरुजी -"हे तुझे आईवडील काय करताय तुला माहित आहे का बाळा? काय बोलताय ते खरं आहे का?"
चंदा- "नाही गुरुजी माझे वडील लगेचच दोन दिवसात लग्न लावायच्या गोष्टी करताय.म्हणुनच मी विष्णू ला तुम्हांला बोलवायला पाठवलं."
गुरूजी मुला कडच्या लोकांना तिथुन पिटाळून लावतात.चंदाच्या आईवडिलांना चांगला दम देऊन घरी परत येतात..
घरी आल्यावर त्यांच्या पत्नीचा पारा मात्र चढलेला असतो.तिची लगेच बडबड सुरु होते.
"सुट्टीच्या दिवशी देखील हे गावचे लोकं तुम्हांला जरावेळ आराम करु देत नाही ना?? गुरुजी नाही तर गावचे सरपंच झालात जणु तुम्ही?? गावाच्या प्रत्येक
अडचणी तुम्हांलाच सोडवायच्या असतात.काय गरज होती तुम्हांला लगेच धावपळ करत जायची? आपण फक्त आपली मास्तरकी करायची..पण नाही तुम्हांला तर गावच सुधरायचे आहे ते..जरा कुठे डोळा लागला होता तुमचा..तर लगेच हे मध्येच काय तर चंदाच्या घरी चला म्हणे.."
गुरुजी- "अगं नंदा असं कसं बोलतेस तु? असं डोळे बंद करून झोपेचे सोंग घेऊन नाही पडु शकत आपण. एका लहानशा मुलीच्या भविष्याचा प्रश्न होता."
नंदा- "पण तुम्हांलाच काय एवढं सर्वांचं पडलेलं आहे?? तिच्या आईबापाला नाही कळत का?"
गुरुजी -"पाच वर्षे झाली आपल्याला इथे येऊन पाहते आहे ना तु एकही माणूस शिकलेला नाही या पाड्यावर.. यांच्या कडुन कुठल्याही शहाणपणाची अपेक्षा नाही करु शकत आपण..पण यांच्या पिढ्यान् पिढ्या या नरकात नको जायला.म्हणुन आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत ना? शिक्षक हा समाजाचा आरसा असतो.देशाचे नागरिक घडवितात शिक्षक आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही करु शकत नंदा...तु सुध्दा डि. एड. झालेली आहेस.तु असा विचार कसा करु शकतेस? अगं या पाड्याचे लोकं पण आपल्याला त्यांचं समजतात.म्हणुन आल्या काही अडचणी तर हक्काने येतात आपल्याकडे.खरे गुरुजी, खरे गुरुजी करत करत..पहातेस ना तु?"
खरे गुरुजी होतेच हे खरे गुरुजी असे. मुळचे खान्देशातले.. पण शिक्षकाची नोकरी मिळाली आणि त्यांना पहिली पोस्टींग मिळाली सरळ तळकोकणात.
मिळाली.एक अशा पाड्यावर जिथे गावापर्यंत पोहचण्यासाठी डोंगर चढून जावे लागत असे.शहरीकरणाचा लवलेशही त्या पाड्यापर्यंत पोहचला नव्हता.शिक्षणाचा अभाव, पारंपरिक भात शेती करणारी माणसं, फक्त पन्नास कुटुंबाचं गाव.
स्थानिक भाषा तेवढी चांगली बोलायचे.मराठी तुटक तुटक एखाद दोन व्यक्तींना आली तर आली.
शाळा ती काय तर? दोन खोल्या त्यातच पहिली ते चौथी वर्ग घ्यायचे ..तिसरी चौथी चे वर्ग सकाळी तर पहिली दुसरी चे वर्ग दुपारच्या सत्रात. एकच शिक्षक तोच मुख्याध्यापक,तोच शिपाई..
खरे गुरुजी या पाड्यावर आले तेव्हा पासून त्यांनी मोठ्या लोकांसाठी रात्रशाळा ही घेण्यास सुरुवात केली..शाळेत एक ही विद्यार्थी येत नसे.प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांशी बोलुन जमेल तसं समजावून मुलांना त्यांनी शाळेपर्यंत आणले.
स्वच्छता, गणवेश, वेगवेगळ्या कला सर्व काही खरे गुरुजींनी शिकवले. याआधी जे शिक्षक यायचे ते जेमतेम एक महिना टिकायचे ही सर्व परिस्थिती पाहुन कुठलाही शिक्षक या पाड्यावर शिकवायला तयार होत नसे..पण खरे गुरुजींनी पळ न काढता या संपूर्ण गावाला सुधारण्याचा प्रयत्न केला.फक्त शिक्षणाच्या बाबतीत नाही तर या पाड्याच्या प्रत्येक अडचणीत त्यांनी जातीने लक्ष घालून या पाडण्याची प्रगती केली होती. हायस्कूल चे शिक्षण ही मुलांना घेता यावे म्हणून पाचवी ते दहावी चे वर्ग सुरू करण्यासाठी ही त्यांची बरीच खटाटोप चालु होती. त्यामुळेच त्यांनी पाड्यातील सर्व लोकांचा विश्वास संपादन केला होता. गावात कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी खरे गुरुजींचा सल्ला घेतला जाई.
त्यांनी दिशा दाखवल्या शिवाय कुठलेही काम होत नसे. गुरुजींनी गावातील बालविवाह थांबवले होते.मुलींना शेतातल्या कामावरुन शाळेच्या वर्गापर्यंत आणले होते.लोकांच्या विचारसरणीत ही बराच बदल केला होता. एकुणच पाड्याचा आणि तेथील नागरींचा बऱ्यापैकी विकास ही केला होता. त्याचसाठी खरे गुरुजींना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता.
पण सर्वात आधी पाड्यातील सर्व लोकांनी, विद्यार्थ्यांनी मिळुन गुरुजींसाठी मोठ्या आभार प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते.आपल्या परीने छोटेखानी समारंभ गुरुजींसाठी आयोजित करुन त्यांनी खरे गुरुजींचे आभार मानले होते.. फक्त शाळेतील धडे गिरवायला न शिकवता आयुष्याचे धडे शिकवणाऱ्या खरे गुरुजींसारख्या अष्टपैलू शिक्षकांना तर नक्कीच सर्वांनी म्हटले पाहिजे.."धन्यवाद शिक्षक."
