रंग तिचा सावळा!! (रंग-करडा)
रंग तिचा सावळा!! (रंग-करडा)
" रेखा ताई काय ही मोना अजिबात ऐकत नाही बाई, तिच्या सावळ्या रंगावर तो करडा रंगाचा ड्रेस शोभुन दिसत नाही, तिला म्हटलं मी नको घेऊन पण ऐकेल तर खरी ही तुझी पोर."
रेखाची लहानी जाऊ शीला तिची मुलगी मोना विषयी बोलत होती. "अगं शीला राहुदे तिला तो रंग आवडतो ना? घेऊ दे मग .तिचा आनंद महत्वाचा शेवटी." शीला आणि रेखा दोन्ही जावा. दोघींच्या मुली जवळजवळ सारख्याच वयाच्या.. एखाद वर्षा चे अंतर असेल.लहानी शीलाची मुलगी आरती तर रेखाची मुलगी मोना. आरती रंगाने जरा उजवी होती.तर मोना जरा सावळी होती. रेखा मोठी जाऊ असली तरी स्वभावाने शांत आणि सहनशील होती.
त्याऊलट शीला लहान सुन असुनही प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे करणारी आणि मी पणा मिरवणारी.
आपलंच घोडं पुढे नाचवणारी, दुसऱ्यांना नेहमीच कमी लेखण्याचा आणि फटकळ पणे बोलण्याचा तिचा स्वभाव होता. आणि तिच्या या स्वभावाची पहिली शिकार नेहमीच मोना असायची.
चालता बोलता ती मोनाला तिच्या सावळ्या रंगावरून ऐकवत राहायची. "मोना चेहऱ्याला जरा बेसन,हळद लावत जा बाई .पोरीची जात आहे. एवढा बसलेला रंग चांगला नाही गं." सततचे तिचे असे बोलणे ऐकून ऐकून मोनाचा आत्मविश्वास हळुहळु कमी होत होता. चारचौघात जाण्यास ती जरा घाबरु लागली.
रेखा मात्र शीलाला नेहमीच असे बोलण्यापासुन थांबवायची. पण शीला होती ती कुणाचं ऐकेल तर खरी. "अहो असं काय ताई मोना माझी पण मुलगी आहे. तिची काळजी वाटते म्हणुनच तर बोलते ना मी? तिच्यात चांगल्यासाठी." पण रेखा आणि मोनाला माहितच होते शीलाला दरवेळी फक्त आरतीचे कौतुक दाखवायचे असते.माझी मुलगी कशी सुंदर, गोरीपान
मोनाच्या प्रत्येक गोष्टीत शीला आणि आरतीला नाक खुपसायचे असत .हाच ड्रेस घे,तोच नाही. इकडे जाऊ नकोस तिकडे जाऊ नकोस.
पण मोना आईप्रमाणे शांत आणि संस्कारी होती कधीही तिने आपल्या काकुला उलट उत्तर दिले नाही.लहानपणापासुनच शीला मोनाला कमी लेखत असे.
मोनासाठी एका चांगल्या घराचे मागणे आले.
मुलगा , घरातील लोकं एकुणच सर्वच गोष्टी चांगल्या होत्या. रवीवारी मुलाकडचे मुलीला पाहण्यासाठी येणार होते.रेखाची धावपळ चालू होती. घरात आनंदी आनंद वातावरण होते.शीलाला मात्र तेवढा आनंद नव्हता. कारण एवढे चांगले स्थळ तेही एका सावळ्या मुलीला कसे काय? याचेच तिला जणु वाईट वाटले होते.
मुलाकडची मंडळी आली. मोना छान तयार झाली होती.शीला आणि आरती आजही तिला काही नाही काही वाकडे बोलुन, बोलुन तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. पण रेखाने मात्र आपल्या मुलीला
आज तिच्या आवडीच्या करड्या रंगाची साडी नेसवली होती. मोना चहाचा ट्रे घेऊन मुलाकडच्यांना चहा देण्यासाठी गेली. तर शीला मध्येच बोलली.
"अगं काय हे मोना किती वेळा सांगितलं तुला असे काही बाही तुला शोभत नाही त्या कलरच्या साड्या नको घेत जाऊ. हा करडा रंग तुझ्या सावळ्या रंगाला शोभत नाही गं.. असे रंग ना माझ्या आरती सारख्या गोऱ्यापान मुलीवर खुलुन दिसतात. किती वेळा सांगितलं तुला."
"काकु तुलाही चांगलच माहितीये की,करडा रंग मला किती आवडतो ते? सावळ्या रंगाच्या मुलीने हा रंग घ्यावा,गोऱ्या रंगांच्या मुलीने त्या रंगांचा ड्रेस घालावा असे कुठे नियम आहेत का? आणि सावळी,सावळी काय गं ?? काळीच आहे मी पण मला माझ्या आई बापाला या गोष्टीने काही फरक पडत नाही.आणि मी आहे तशीच मला पुर्ण मनाने जो स्वीकारेल त्याच्याशीच मी लग्न करणार.म्हणुन तुला असं वाटत असेल की,या आलेल्या पाहुण्यांसमोर तु माझ्या रंगामुळे मला अपमानीत करशील हे आलेले लोकं किंवा हा मुलगा मला नकार देईल. आणि मला माझ्या आईला या गोष्टीचे दुःख होईल.तर असे अजिबात होणार नाही."
आज मोनाच्या सहनशक्ती चा अंत झाला आणि आपल्या काकुला तिने चांगलेच धारेवर धरले होते.मोना बोलत होती.आणि सर्वजण अवाक् होऊन ऐकत होते.
त्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम बऱ्यापैकी पार पडला होता. त्यामुळे मुलाकडुन होकार येईल या गोष्टीची अपेक्षा कुणीही ठेवली नव्हती.पण झाले नेमकेच उलटे मुलाकडच्यांकडुन मोना साठी होकार आला.मुलाला मोनाचा स्पष्टवक्तेपणा आवडला होता.
लवकरच साखरपुड्याची तारीख निघाली.आणि विशेष गोष्ट म्हणजे मोना साठी मुलाकडच्यांनी करड्या रंगाची पैठणी आणली होती. साडी हातात देतांना मुलाची आई बोलली
"मोनाला आवडतो म्हणून करड्या रंगाची पैठणी आणली आहे. आणि हो अजुन एक गोष्ट सावळा किंवा गोरा असा वर्णभेद मानणाऱ्या विचारसरणीचे आंम्ही अजिबात नाही"
या करड्या रंगानेच मोनाच्या आयुष्यात आज सप्तरंग भरले होते.
