केशरी भात... (रंग केशरी)
केशरी भात... (रंग केशरी)
" आज मीनल आपल्या घरी पहिल्यांदा येते आहे. सर्व कसं व्यवस्थित असले पाहिजे.आणि हो वातावरण गंभीर करण्यची गरज नाही.मीनला ला या गोष्टीची खात्री वाटली पाहिजे .ज्या घरात ती लग्न करुन येणार आहे.त्या घरातील लोकं मनमोकळी आहेत. आणि हे घर तिचंच आहे हे सुद्धा तिला वाटलं पाहिजे.कळला का? तरच ती आपल्या सर्वांमध्ये मिक्स होऊ शकते.बरोबर ना?".
आजीच्या सकाळ पासून काही ना काही सुचना चालु होत्या.आणि का नाही असणार आज त्यांची होणारी नातसुन पहिल्यांदा त्यांच्या घरी येणार होती.म्हणुन त्या खुप आनंदी ही होत्या. त्यांचा नातु अमेय आणि मिनलचे गेल्या महिन्यात लग्न जमले. सारं काही व्यवस्थित बघुन, ऐकुन, पडताळुन मगच आजीने अमेय साठी मिनलची निवड केली होती. अगदी रीतसर कांदे पोहे, बघण्याचा कार्यक्रम गुण आणि कुंडली मिलन सर्व काही जमवुन अरेंज मॅरेज होणार होते अमेय आणि मिनलचे. अमेयच्या बाबतीत आजी जरा जास्तच हळवी होती. कारण अमेय त्यांचा एकुलता एक नातु.
इकडे मिनलच्या घरी सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. मिनल पहिल्यांदा आपल्या होणाऱ्या सासरी जातेय म्हटल्यावर आईने तिच्यावर सुचनांचा जणु वर्षावच केला होता.
"हे बघ मिनु गेल्या बरोबर सर्वांना नमस्कार करायचा.सर्वात आधी आजींच्या पाया पडायचा त्या घरातल्या मोठ्या आहेत. जोरात बोलयचे नाही,जोरात हसायाचे नाही आणि हो
पद्धतशीर पणे चालायचे,बोलायचे धसमुसळेपणा अजिबात करायचा नाही ठीक आहे."
मिनुचे बाबा मध्येच बोलतात "अगं किती त्या सुचना ?मिनु टेन्शन नको घेऊस बेटा मनावर दडपण घेऊन नाही.मनमोकळेपणाने जा तुझेच घर आहे ते.."
असे बोलून बाबांनी तिची हिंमत वाढवली.
मुळातच शांत असलेली मिनु मात्र आतुन खुपचं घाबरली होती आणि तिला जास्त भिती होती ती आजींची.
"आजीचा स्वभाव जरा कडक आहे." हे तिने अमेय कडुन ऐकले होते.
पहिल्यांदा जाते म्हणून काही तरी घेऊन जायला हवे असे आईला वाटले होते म्हणून तिने मिनलला केशरी भात बनवायला सांगितला.
"मिनु तु एक काम कर केशरी भात बनव तुला छान जमतो ना, तुझ्या हातची चव ही कळेल की, तुझ्या सासरच्या लोकांना..".
आज नवरात्रीची सातवी माळ होती.आणि आजचा रंग ही केशरी म्हणून मिनुने छान फिकट केशरी रंगाची बारीक सोनेरी काठ असलेली साडी परिधान केली होती.जी तिच्या वर खुपच छान दिसत होती. मिनल अमेय च्या घरी पोहचली. आणि तिथे तिचे जंगी स्वागत झाले. थोड्या फार गप्पा झाल्या..आणि मिनलने हळुच पर्स मधुन डबा काढत आजींसमोर ठेवला.
"मी केशरी भात बनवुन आणलाय . तुम्हां सर्वांसाठी." आजीने डबा उघडला आणि भाताच्या घमघमाटानेच आजीला त्याची चव कळली. आजीने डब्यातुन एक चमचा भात घेऊन खाल्ला. मिनलच्या मनात धास्ती होती. कसा झाला असेल? आवडेल की, नाही अनेक प्रश्न होते.तिचे ते टेन्शन आता चेहऱ्यावर दिसत होते.अमेय त्याचे आई बाबा सर्वांच्या ही नजरा आजीवर खिळल्या होत्या. आजी म्हणाली.
"अमेय तुला सुंदर,सुशील बायको मिळाली हे तर माहित आहेच सर्वांना.पण हो आता मी खात्रीने हे सुद्धा सांगते की,तुला सुगरण बायको भेटली आहे आमच्या सुनबाईच्या हाताला चव आहे.हो.. आणि मिनल अजुन एक गोष्ट केशरी भात माझा आवडता आहे बरका."
अमेय,आजी आणि घरातील सर्व खुश तर होतेच पण आता मिनल लाही जरा बरं वाटलं होतं.आजीचे मन तिने जिंकले होते चविष्ट केशरी भाताच्या मदतीने .
मनातल्या मनात ती देवीचे आभार मानत होती.
