STORYMIRROR

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Romance Tragedy Inspirational

4  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Romance Tragedy Inspirational

उजळल्या अंधाऱ्या वाटा..!

उजळल्या अंधाऱ्या वाटा..!

3 mins
637

रमेश आणि लक्ष्मीच्या वाढत्या जवळीकेमुळे चर्चेला अधिकच उधाण आलेलं होतं. लोकं आपापसात कुजबुजत होते. या सगळ्याला कुठेतरी पुर्णविराम लागावा म्हणुन लक्ष्मी आणि रमेशनी निवारा केंद्रातल्या जवळजवळ पन्नास लोकांसमोर आम्ही दोघे लग्न करणार असल्याचं जाहीर करुन टाकले आणि त्या सगळ्या लोकांच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांना लग्नाचे वचन देऊन चाललेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.


रमेश आणि लक्ष्मी मुंबईच्या एका शाळेत लॉकडाऊनमुळे बनवण्यात आलेल्या बेघर निवारा केंद्रात राहत होते. या निवारा केंद्रात जवळपास पन्नास लोकानां ठेवण्यात आले होते. एकमेकांचा फारसा अथवा अजिबातच परिचय नसलेले वेगवेगळ्या गावातील, प्रांतातील, राज्यातील वेगवेगळ्या भाषेचे काही महिला आणि पुरुष लॉकडाउनमुळे शाळेच्या छताखाली एकत्र रहायला आले होते.


इथेच रमेश आणि लक्ष्मीची ओळख झाली. रमेश जवळपास चाळीशीच्या आसपासचा मुळचा नागपुरचा तर लक्ष्मी कर्नाटकातील कुठल्यातरी गावातील होती. वय तिशीच्या आसपासचं असावं. मागील दोन महिन्यापासुन दोघे या निवारा केंद्रात रहात होते. या शाळेतील सहवासातच दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले, जवळीक वाढली, बोलणं चालणं वाढलं. एकमेकांची सुखदुःखे वाटून घेऊ लागले.


मूळचा नागपूरचा असलेला रमेश हा मुंबईत मागील दहा वर्षापासुन मिळेल ते बिगारी काम करत आयुष्य जगत होता. रोजचं हातावरचं पोट, मुंबईतल्या एका रेल्वे स्टेशनमध्येच रहायचा. सध्या स्वतःच म्हणावं असं जगात कोणी नाही. बायको दहा वर्षांपूर्वीचं मुलं बाळ होत नाही म्हणुन नैराश्येच्या गर्तेत हरवली. वांझोटपणाचं दुःख ती सहन करू शकली नाही आणि एक दिवस याच नैराश्येतून तिने विहरीत उडी घेतली आणि त्याला कायमचं एकटं टाकून निघुन गेलीे. बायकोच्या मृत्यूनंतर आलेल्या वैमनस्यातून त्याने गाव सोडलं ते आज पर्यंत कधी मागे वळून बघितलं नाही. 


लक्ष्मीचा नवरा तिला सतत मारहाण करायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायचा. दारूच्या व्यसनामुळे रोज शिवीगाळ करायचा. या सगळ्या होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळुन तिने लग्नानंतर पाच वर्षातचं दोन वर्षांच्या बाळासहित घर सोडलं. आधारासाठी माहेरी आली. तिथेही थोड्याच दिवसात आपण सगळ्यांच्या नजरेत खुपतोय हे तिला जाणवू लागलं. आपली माहेरच्या लोकांच्या नजरेत एक अडगळीत टाकलेल्या वस्तुपेक्षा जास्त किंमत नाही हे तिला कळून चुकलं. दरम्यान नवरा येऊन जबरदस्तीने मुलाला घेऊन गेला. तुला काय करायचं ते कर पण परत माझ्या घरी फिरकायचं नाही हे बजावायला मात्र तो विसरला नाही. तिला कळतं नव्हतं आता नक्की तिचं घर कोणतं ? माहेर, जिथे तिची किंमत नवऱ्याने टाकलेल्या बाईपेक्षा जास्त नव्हती की सासरं जिथे तोंड दाबुन बुक्यांचा मार मुकाट्यानं खायचा आणि आवाज ही करायचा नाही आणि जर स्वतःची बाजू मांडायचा प्रयत्न केलाच तर घरातुन निघुन जा!!!!ही धमकी.


अशी सगळ्या बाजूने कोंडी झालेल्या आणि ढासळलेल्या मानसिक अवस्थेतच ती एका रेल्वेत चढली. आपण कुठे चाललोय, काय करतोय काहीही ठाऊक नसताना तिने दिसेल ती वाट धरली होती. एकदम अनोळखी!!! कारण ओळखीच्या वाटा तिला कधीच विसरून गेल्या होत्या. 


मुंबईत आल्यानंतर ती रेल्वेस्टेशनवर राहू लागली. थोडे दिवस ती लोकांकडे मागुन पोट भरू लागली. नंतर ती मिळेल ती छोटी मोटी कामं करू लागली आणि स्टेशनवरच जागा भेटेल तिथे झोपू लागली. रेल्वेस्टेशनच आता तिचं घर बनलं होतं.


काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सगळी कडे टाळेबंदी झाली. लोकांचे व्यवसाय बंद झाले. हातावर पोटं असणाऱ्यांचे रोजगार गेले. गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली. शासनाने बेघर लोकांसाठी निवारा केंद्र स्थापित केली. रमेश आणि लक्ष्मी बेघर असल्याकारणाने त्यांना निवारा केंद्रात आणण्यात आलं.


इथे त्या दोघांची ओळख झाली, जवळीक वाढली, दोघांनी आपला गतकाळातील इतिहास एकमेकांना सांगितला. दोघांची मनं एक झाली आणि दोघांनी लग्न करून पुन्हा नव्यानं आयुष्य जगण्याचं स्वप्न बघितलं. मुख्य म्हणजे दोघांनीही आयुष्यात बरेच चटके सहन केलेले असल्यामुळे एकमेकांची दुःखे त्यांना कळतं होती आणि नात्यांची किंमत त्यांना ठाऊक होती. 


दोन दिवसापूर्वीच बेघर निवारा केंद्रातील सगळ्या लोकांना साक्षी ठेवत या दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या आणि लॉकडाऊननंतर रीतसर लग्न करून संसार थाटण्याचं जाहीर करून त्यांच्याबद्दल चाललेल्या चर्चेला दोघांनी पूर्णविराम दिला.


लक्ष्मीला तिचं मन जाणून घेणारा कोणीतरी भेटला होता. तिच्या मनाचे तार आज पुन्हा नव्याने छेडले होते. लक्ष्मी आणि रमेश या दोघांनी आयुष्यात आलेल्या कटु अनुभवांना तिलांजली देत नव्या उमेदीने सुखी आयुष्याची स्वप्ने बघत नव्या वाटेवर पुढे पाऊल टाकलं होतं.


आयुष्य कधी कोणतं रूप घेईल सांगता येत नाही, कधी शुष्क पानगळ तर कधी हिरवं सळसळत तारुण्य. कधी मातीचा ओला सुवास तर कधी तप्त लाही. जीवनाची पाऊलवाट चालत असताना, मातीत दडलेल्या असतात अनेक ओळखी, अनोळखी पाऊलखुणा. काही नव्या तर काही विरत चाललेल्या. रानावनांतून, काच खळग्यातून, काट्याकुट्यातून वाट काढत चालू असतो प्रवास, निरंतर!!! दूर क्षितिजापलीकडे दिसणाऱ्या सप्तरंगी इंद्रधनुष्याकडे.


आज याच रंगहीन अंधाऱ्या वाटेवर चालतं आज रमेश आणि लक्ष्मीला गवसलं होतं त्यांचं सप्तरंगाने सजलेलं इंद्रधनुषी आयुष्य!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance