काटकसर
काटकसर
जीवनात काटकसर खुप महत्वाचे आहे. त्या शिवाय जीवनात प्रगती कधीच शक्य नाही. आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया असेल तर त्या घराचा विकास तरी कसा होईल. म्हणून मराठीत एक म्हण आहे की, अंथरण पाहून पाय पसरावे. याचा विचार केल्यास काटकसर किती महत्वाचे आहे ते कळते. घरात सर्वात जास्त काटकसर कोण करतात पुरुष की स्त्री ? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी प्रत्येक घरात थोडा वेळ डोकावून पहावे लागेल.
अमोल एका छोट्या कंपनीमध्ये काम करीत होता. कुटुंबाला पोटभर खायला मिळेल एवढेच त्याला वेतन मिळत होते. घरापासून ऑफिस दूर असल्यामुळे रोज ये-जा करणे त्याला त्रासदायक होते मात्र त्याच्या समोर पर्याय देखील नव्हता. ऑटोला जास्त भाडे द्यावे लागते म्हणून सकाळी तो पायी चालत जायचा तेवढेच हाता-पायाची हालचाल व्हायची आणि सायंकाळी बसने यायचा म्हणजे रोज वीस एक रूपयाची बचत करायचा आणि महिन्याकाठी पाच-सहाशे रूपयाची बचत करून काटकसर करीत तो जीवन जगयाचा. सुखाचा संसार करण्यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करून होईल तेवढी बचत करायचा आणि त्याची बायको सुजाता मात्र त्याच्या उलट वागत होती. तिला पैशाची अजिबात बचत करण्याची सवय नव्हती. तिला चैनीत ऐशोआरामात जीवन जगण्याची सवय होती. घरातल्या वस्तूची तिने कधी ही काळजी घेतली नाही त्यामुळे बहुतांश वेळा घरातील वस्तू खराब होण्यावरुन दोघांचे वाद होत असत. दिवसा लाईट चालू ठेवणे, नेहमी टीव्ही पहाणे, दिवसभर पंखा चालूच ठेवणे यामुळे विजेचे बिल भरमसाठ येत होते. त्यात ती कधी ही काटकसर करीत नव्हती. दर पंधरा वीस दिवसांनी चित्रपट पाहायला जाणे सोबत हॉटेलात जाऊन खाण्याचा तिचा हट्ट कायम असायचा. यामुळे तो पुरता वैतागला होता. एवढेच नाही तर एखादे सण किंवा कोणाचे कार्यक्रम म्हटले की दागदागिने आणि साड्या यावर खुप दंगल व्हायची आणि त्यात तिचाच जय व्हायचा. घरात किती ही साड्या असतील तरी प्रत्येक महिन्याच्या पगाराच्या वेळी ती साडी साठी रुसून बसत असे तिच्या अश्या वागण्याचा त्याला खुप त्रास होत असे मात्र तो काही ही बोलत नव्हता, काही करू शकत नव्हता. कारण ती एका चांगल्या घरातील मुलगी होती. भरपूर हुंडा आणि मानपान करून तिच्या बापानी लग्न लावून दिलं होतं. लग्नात त्याला बऱ्यापैकी हुंडा मिळाला होता पण लाडक्या बहिणीच्या लग्नावर तो पूर्ण खर्च झाला होता. याच गोष्टीचा सुजाताला राहून राहून राग येत असे. त्यामुळे त्या घरात लक्ष्मी कधी थांबलीच नाही तर घराची प्रगती तरी कशी होईल. त्यादिवशी अमोल ऑफिसमधून थकून भागून घरी आला होता. घरी आलेल्या नवऱ्याचे हसतमुखाने स्वागत करण्याऐवजी, घरी आल्याब
रोबर सुजाताचा एकच तगादा होता की, आज चित्रपट पाहून बाहेर जेवण करू या. पण अमोलची अजिबात ईच्छा होत नव्हती. शेवटी स्त्री हट्टापुढे कोणाचेही चालत नाही. अमोल चित्रपट पाहण्यासाठी जाण्यास तयार होतो. हात पाय धुतले की ते दोघे चित्रपट पाहायला बाहेर पडतात. रस्त्यात दूरवर कुठे ही सिटी बस दिसत नव्हतं. रिक्षा केल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून एका रिक्षेवाल्याला आवाज देऊन थांबवितो आणि सिनेमाघराकडे जातात. थोडा उशीर झालेला असतो, त्यांना सिनेमाची तिकीट मिळण्याची शक्यता कमी होती. शेवटी दाम दुप्पट दराने एका पोरांकडून तिकीट मिळवितात आणि चित्रपटाचा आनंद घेतात. त्या चित्रपटात अमोलचा काही रस नसतो. खूर्ची वर बसल्या ठिकाणी खर्चाची बेरीज करत असतो. आत्ता पर्यंत पाचशे रुपये खर्च झाले अजून पाचशे रुपये खर्च होऊ शकतात असा अंदाज तो बांधत होता. चित्रपट संपला.
सुजाता चित्रपटाचे गुणगान गाऊ लागली आणि अमोल मात्र फक्त हुं हुं करत तिच्यासोबत चालत होता. जवळच असलेल्या रेस्टोरांटमध्ये जेवण्यासाठी गेले. जेवण्याची ऑर्डर दिली. अमोलच्या चेहऱ्यावर कसल्याच प्रकारची हावभाव दिसत नव्हते. शेवटी एकदाचे जेवण आटोपून ते घरी जाण्यास परत निघाले होते. रात्रीचे अकरा वाजले होते. रिक्षा करूनच घरी जावे लागत होते, त्याशिवाय पर्याय नव्हता. घरी आल्यावर अमोलला खूप वेळ झोप लागलीच नाही. सुजाता मात्र ढाराढुर झोपी गेली. मध्यरात्री एक वाजता अचानक अमोलच्या छातीत दुखायला होतं. अमोल सुजाताला आवाज देऊन उठवितो. रिक्षा करून लगेच कसेबसे दवाखान्यात जातात. डॉक्टर संपूर्ण तपासणी करून हार्टअटॅक येऊन गेल्याची कल्पना देतात. अमोलला एक दिवस पूर्णपणे डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्या जाते. एका दिवसांचा डॉक्टराचा, औषधपाण्याचा दवाखान्यातील बिल पंचवीस हजारच्या वर जाते मात्र अमोलच्या बँकेत शिल्लक फक्त पाच हजार रुपयेच असतात. सुजाताजवळ देखील काही शिल्लक नसते. अमोलचा एक मित्र ऐनवेळी त्याच्या मदतीला धावून येतो आणि त्याचे दवाखान्याचे संपूर्ण बिल देऊन त्याला घरी घेऊन जातात. सोबत मित्राची बायको देखील असते. घरी गेल्यानंतर ती सुजाताला काटकसर करण्याचा उपयोगी मंत्र सांगते. या घटनेमुळे सुजाताचेही डोळे उघडतात. त्यानंतर ती कधीही वायफळ गोष्टीवर पैसा खर्च केला नाही. शिवाय घरातल्या घरात करता येण्यासारखे काम शिकून चार पैसे देखील कमाई करू लागली. कमावलेले पैसे खर्च करतांना कसा त्रास होतो याची जाणीव पैसे कमावते झाल्यावर सुजाताला कळू लागले. अमोल देखील काही दिवसांनी कामावर रुजू झाला. दोघेही काटकसर करीत आनंदात संसार करू लागले.