Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratibha Tarabadkar

Fantasy

4.6  

Pratibha Tarabadkar

Fantasy

फॅंटमची भारतभेट

फॅंटमची भारतभेट

6 mins
670


फॅंटम आपल्या 'कवटी गुहेत' आराम करीत होता. गेले चार दिवस सतत प्रवास करून तो दमला होता. हत्तींच्या कळपाची प्रमुख हत्तीण मुरुंडी त्याच्याकडे निवेदन घेऊन आली होती.तिच्या पन्नास हत्तींच्या कळपाला पुरेसे पाणी मिळत नव्हते. म्हणून फॅंटम तिच्यासाठी विशाल तळे शोधण्याच्या मोहिमेवर गेला होता.त्याचा खबऱ्या 'फार्का' या बहिरी ससाण्याने बातमी आणली होती की पूर्वेला शंभर किलोमीटरवर एक विशाल तळे आहे. ते बघण्यासाठी फॅंटम आपल्या 'हिरो'अश्वावर स्वार होऊन निघाला होता. सोबतीला अर्थात 'डेव्हिल' लांडगा होताच. फार्काने आकाशातून उडत घनदाट जंगलातून मार्ग दाखवित त्या विशाल तळ्याकडे नेले होते.

  'म्वांबा 'वानराने तुझ्या साठी टपाल आणले आहे.' गुरनने, त्याच्या सहाय्यकाने फॅंटमच्या हातात एक लिफाफा दिला. फॅंटमचा भारतातील मित्र मानसिंग याच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका आणि आग्रहाचे निमंत्रण होते. फॅंटमने गुरनकडे संभ्रमाने पाहिले. 'तू जरुर जा लग्नाला. मी आपले 'बागालिया राज्य' व्यवस्थितपणे सांभाळेन'.गुरनने फॅंटमला आश्वस्त केले. बांडार या पिग्मी जमातीचा गुरन हा फॅंटमचा बालपणीचा मित्र व आता विश्वासू सहाय्यक असल्याने फॅंटमला राज्याच्या देखभालीचा प्रश्न नव्हता.

 फॅंटमने त्याच्या अंगावर घट्ट बसणाऱ्या वेषावर ओव्हरकोट चढविला, डोक्यावर फेल्ट हॅट चढवली व कपड्यांची बॅग घेऊन तो हिरोवर स्वार झाला. वायूवेगाने दौडत हिरोने फॅंटमला बागालियाच्या सीमेवर पोहोचविले. फॅंटमने हिरोच्या पाठीवर थोपटले आणि सोमिबियाच्या दिशेने जाऊ लागला. मोठमोठ्या वृक्षांची कत्तल करून सोमिबिया अगदी वैराण ,उजाड प्रदेश बनला होता

  फॅंटमचा भारतापर्यंतचा प्रवास न बोलताच झाला कारण प्रत्येक माणसाच्या हातात हलणारी चित्र दिसणारी चपटी डबी होती काहींनी त्याला वायर जोडून कानात ‌घातली होती तर काहीजण तर या डबीकडे पहात हसत होते, बोलत होते.

  मुंबईच्या विमानतळावर लोणावळ्याला जाणाऱ्या शेअर टॅक्सी मध्ये फॅंटम बसला कारण लग्न तिथे होते. मुंबईच्या उकाड्यात ओव्हरकोट आणि फेल्ट हॅट व वेगळ्या आकाराचा गॉगल घातलेला पाहून ‌ टॅक्सी ड्रायव्हर ने खांदे उडवले. फॅंटम फ्रंट सीटवर बसला. मागे एक आधुनिक कपडे घातलेली मुलगी व एक माणूस बसले होते. कर्कश्श हॉर्नच्या आवाजाने फॅंटमच्या कानठळ्या बसत होत्या. तेव्हढ्यात सिग्नल लागला आणि कार थांबली. फॅंटमचे लक्ष गेले तर शेजारच्या कारचा ड्रायव्हर डोके बाहेर काढून रक्त ओकत होता. फॅंटम दार उघडून त्याच्याकडे धावला तोच सिग्नलचा लाईट हिरवा झाला आणि काहीच झाले नाही अशा थाटात ती शेजारची कार निघून गेली. फॅंटम परत आपल्या टॅक्सी कडे आला. 'तो माणूस रक्त ओकत होता' या फॅंटमच्या शब्दांवर टॅक्सी ड्रायव्हर खो खो हसत म्हणाला 'काय पाव्हणं, आफ्रिकेच्या जंगलातून आलाय काय? एव्हढंबी म्हाईत न्हाई? अवो,तो पान खाऊन थुकत होता!' ड्रायव्हरच्या या खुलाशाने फॅंटमला काहीच उलगडा झाला नाही आणि लोक रस्त्यावर कसे थुंकू शकतात याचे त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होते.

फॅंटम रिअर मिरर मधून मागील सीटवर बसलेल्या दोघांकडे लक्ष ठेवून होता. तो माणूस चांगल्या चारित्र्याचा नसावा हे फॅंटमच्या अनुभवी नजरेने ताडले होते. आणि त्याचा अंदाज खरा ठरला.तो माणूस त्या मुलीच्या जवळ हळूहळू सरकू लागला तशी ती मुलगी बिचारी अंग चोरुन खिडकीला चिकटून बसली.आता तो माणूस तिला स्पर्श करणार तोच फॅंटम विद्युत् वेगाने मागे वळला आणि आपल्या कवटीची मुद्रा असलेल्या अंगठीने त्या माणसाच्या हनुवटीवर ठोसा लगावला.तो माणूस जागच्या जागी बेशुद्ध झाला. त्या माणसाला बेशुद्ध पडलेला पाहून ती मुलगी किंचाळणारच होती पण फॅंटमने तिला गप्प बसण्याची खूण केली.ही गोष्ट इतकी क्षणार्धात घडली की या गोष्टीची ड्रायव्हरला काहीच खबर नव्हती. तो शीळ वाजवत गाडी चालवत होता.

  अचानक वाहनांची गर्दी वाढली. कर्णकर्कश्श हॉर्न वाजवत माणसे उन्माद आल्यासारखे गाड्या चालवत होते.

 'लोणावळा आलं' ड्रायव्हरने गाडी थांबवली. 'हे हिलस्टेशन आहे?' ओव्हरकोटाच्या आत उकाड्याने हैराण झालेल्या फॅंटमला आश्चर्य वाटले. मानसिंग पवारांचे लग्न स्थळ सापडायला वेळ लागला नाही. संपूर्ण रिसॉर्ट लक्षावधी दिव्यांनी उजळून निघाला होता.ते लुकलुकणारे असंख्य दिवे पाहून फॅंटमला आफ्रिकेतील काजव्यांची आठवण झाली.रिसॉर्टच्या दारातच उभ्या असलेल्या मानसिंगरावांचे लक्ष फॅंटम कडे गेले आणि अत्यानंदाने 'मिस्टर वॉकर'असे ओरडून फॅंटमला मिठी मारली. फॅंटमला बाहेरील जगात 'वॉकर' म्हणून ओळखले जात असे. मानसिंग पुढे काही बोलणार तोच जोरजोरात बॅंडचा आवाज ऐकू येऊ लागला. 'नवरामुलगा येतोय,चला आपण त्याच्या स्वागताला जाऊ या'मानसिंग फॅंटमला हाताला धरून पुढे झाले.फुलांच्या अलंकारांनी सजलेला नवरदेव घोड्यावर बसून येत होता. घोडा बॅंडच्या तालावर नाचत होता. त्या पांढऱ्याशुभ्र घोड्याला पाहून फॅंटमला त्याच्या 'हिरोची'आठवण झाली. शीळ घातली की असेल तिथून दौडत येणारा,प्रत्येक मोहिमेत न थकता फॅंटमला साथ करणारा 'हिरो'.फॅंटमला त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले.

अचानक बॅंड थांबला.सगळ्यांच्या मुद्रा गंभीर झालेल्या होत्या. मानसिंगराव पुढे झाले आणि हात जोडून दीनवाण्या चेहऱ्याने नवरदेवाशी बोलू लागले.अचानक काय झाले ते फॅंटमला कळेना. त्याने प्रश्नार्थक मुद्रेने शेजारी उभ्या असलेल्या माणसाकडे पाहिले.'नवरामुलगा आणि त्याचे आई-वडील रुसून बसले आहेत. हुंडा म्हणून फॅक्टरी मागताहेत.'या खुलाशाने फॅंटमला काहीच बोध होईना.मानसिंगांनी अमेरिकेत एकत्र शिक्षण घेताना जे मराठी शिकवले होते त्यात 'हुंडा'हा शब्दच नव्हता.शिवाय लग्न हे दोघांचं असतं मग मुलीच्या आई-वडिलांनी च मुलाला का द्यावं? फॅंटमच्या या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळेना.

आपल्या मित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून फॅंटमला तिडीक आली आणि तो पुढे सरसावला. मानसिंगांच्या कानात फॅंटम काहीतरी कुजबुजला.

मानसिंगरावांनी अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले.पण 'मिस्टर वॉकर' कुठलेही अशक्य वाटणारे काम लीलया पार पाडतात हे त्यांनी अनुभवले होते म्हणून ते राजी झाले.

खोलीत नवरदेव,त्याचे आई-वडील एव्हढेच बसले होते.वाऱ्याच्या वेगाने फॅंटम खोलीत घुसला व त्याने दार बंद करुन घेतले व अंगावरचा ओव्हरकोट काढून टाकला. त्याचे खरे स्वरुप पाहून तिघेही गर्भगळीत झाले.अंगावर जांभळा स्किनटाईट ड्रेस,कवटीची मुद्रा असलेला कमरपट्टा आणि हातात दोन पिस्तुले.

'बऱ्या बोलाने लग्नाला तयार होता की नाही?' काळ्या गॉगल मधून रोखून पहात फॅंटमने विचारले. गांगरुन गेलेल्या तिघांनी फक्त माना डोलाविल्या.'यापुढे मानसिंगांकडे काहीही मागावयाचे नाही आणि लग्न झाल्यावर मुलीला त्रास द्यायचा नाही.नाहीतर माझ्याशी गाठ आहे.कळलं?'तिघांनी परत माना डोलाविल्या तशी फॅंटमने आपली पिस्तुले म्यान केली, अंगावर ओव्हरकोट चढविला व दार उघडून बाहेर आला.'मुलगा विनाअट लग्नाला तयार आहे'. तणावाखाली असलेल्या मानसिंगरावांच्या परिवाराला फॅंटमने निरोप दिला तसे सगळीकडे आनंदीआनंद पसरला. मानसिंगराव फॅंटमचे आभार मानण्यासाठी वळले पण फॅंटम होताच कुठे? त्याने वेगाने आपली खोली गाठली होती. फॅंटमला सकाळी जाग आली तीच सुरेल संगीताने.ते सूरच एव्हढे भारून टाकणारे होते की फॅंटमला अगदी ताजेतवाने वाटू लागले.भ राभर आवरून त्याने लग्नाच्या हॉलमध्ये पाऊल टाकले आणि तो थक्कच झाला. पूर्ण हॉलमध्ये फुलांची सजावट केली होती.हॉलमधील स्त्रीपुरुषांचा उत्साह ओसंडून वहात होता. रंगीबेरंगी रेशमी वस्त्र नेसलेल्या , विविध केशरचना केलेल्या, अंगावर अनेक अलंकारांनी सजलेल्या स्त्रिया उत्फुल्ल चेहऱ्यानी वावरत होत्या तर पुरुष एकमेकांना प्रेमाने भेटत होते.'भारत हा उत्सवांचा देश आहे'अशी या देशाची ओळख आहे ती खरीच आहे म्हणायची. फॅंटम मंत्रमुग्ध होऊन तो उल्हासाचा सागर न्याहाळत होता तेव्हढ्यात कोणाचे तरी लक्ष फॅंटम कडे गेले आणि मग 'मिस्टर वॉकर' म्हणून एकच गलका झाला. जो तो त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी,सेल्फी काढण्यासाठी धडपडू लागला. एका प्रौढ माणसाने त्याचा हात धरून त्याला खाद्यपदार्थांच्या मेजाकडे नेले. तेथील अनेकविध, रंगीबेरंगी पदार्थ पाहून फॅंटम थक्क झाला. भारताविषयीचा त्याचा आदर दुणावला.भारतीय संगीत, भारतीय उत्सव, भारतीय खाद्यपरंपरा सारंच कसं अवर्णनीय!

लग्न विधी चालू झाले. संपूर्ण विधींची माहिती फॅंटम समजावून घेत होता.तेव्हढ्यात 'चोर चोर' ,पकडा पकडा'असा आरडाओरडा ऐकू आला. एक व्यक्ती हॉलबाहेर पळताना फॅंटमने पाहिले. केवळ चार ढांगात त्याने चोराला पकडले. चोराची झडती घेतली असता एक अतिशय मौल्यवान हार त्याच्याकडे सापडला. सर्वांनी पुन्हा एकदा फॅंटमचा जयजयकार केला. पण फॅंटमच्या डोक्यात एकच विचार येत होता,इतका धोका पत्करून या स्त्रिया मौल्यवान दागिने का घालतात?

लग्न विधी संपले आणि नवविवाहितांना अहेर देण्याची एकच गडबड उडाली. फॅंटमने आफ्रिकेच्या जंगलातून अस्सल मध, पौष्टिक डिंक आणि पिग्मी जमातीतील स्त्रिया घालतात तसे मण्यांचे अलंकार भेटीदाखल दिले. ते अलंकार नवऱ्यामुलीला इतके आवडले की तिने त्यातील एक माळ लगेच गळ्यात घातली. नवऱ्यामुलाशी हस्तांदोलन करताना फॅंटमने त्याच्याकडे रोखून पाहिले तशी त्याने मान हलवून सारे काही लक्षात आहे असे दर्शविले. फॅंटम समाधानाने हसला. मानसिंगची मुलगी आता सुखासमाधानाने सासरी नांदणार होती. मानसिंगराव फॅंटमला सोडायला तयारच नव्हते. अजून थोडे दिवस रहा म्हणून सगळेचजण आग्रह करत होते. त्यांचे प्रेम,अगत्य पाहून फॅंटम भारावून गेला होता. 'अतिथी देवो भव' मानणारी भारतीय संस्कृती त्याला मोहवित होती पण त्याला त्याचं आफ्रिकेतील 'बागालिया राज्य' त्याला खुणावत होते. राज्याच्या सीमेवर त्याचे स्वागत करण्यासाठी त्याचा अश्व 'हिरो', लांडगा 'डेव्हिल'आणि बहिरी ससाणा 'फार्का' सज्ज असतिल तर 'कवटी गुहेत' त्याचा पिग्मी सहाय्यक 'गुरन' त्याची वाट बघत असेल.राज्यातील पशु पक्षी आणि वेगवेगळ्या जमातींमधील अडचणी सोडविण्यासाठी फॅंटम चे डोळे त्याच्या राज्याकडे लागले होते.

आणि म्हणूनच फॅंटम निघाला त्याच्या राज्याकडे, भारतभेटीमधल्या कडूगोड अनुभवांची शिदोरी घेऊन.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy