हा सागरी किनारा (रंग निळा)
हा सागरी किनारा (रंग निळा)
दिशाला निळा क्षार सागरी किनारा नेहमीच खुणावत असे.कॉलेजची ट्रिप जेव्हा कोकणात गेली होती त्यावेळी तेथील निसर्ग आणि समुद्र किनारा पाहून तिने मनाशी ठरवले होते कधीतरी या ठिकाणीच रहायला यायचे. हिच तर ती ट्रिप होती जिथे दिशा आणि अविने प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या.हा सागरी किनारा ही त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार होता.
आज वीस वर्षे झाली हा सागरी किनारा तसाच आहे शांत,निळा त्याच्या किनाऱ्यावर बसलेली दिशाही तिच आहे.पण काही नाही तर तो आहे अविनाश.तोच अवी जो आधी तिचा खुप चांगला मित्र,प्रियकर नंतर पती होता. खुप पारखुन दिशाने त्याला आपला नवरा म्हणून निवडले होते. कारण ती स्वतः आपल्या आयुष्या आणि भविष्याबद्दल मोठी स्वप्ने बाळगून होती. महत्त्वाकांक्षी अशी होती. तिला तिच्या आयुष्यात काही तरी करायचे होते.स्वत: च्या पायावर उभे रहायचे होते. आणि या सर्वांची कल्पना तिने अवीला आधीच दिली होती.
"हे बघ अवी मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणून मला त्यांनी माझ्या आयुष्यातील सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.पण मी स्वतः काही तरी बनल्यानंतर.. म्हणून मी आधी माझं आणि माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल.मगच लग्न करेल आणि हो तू सुध्दा काही चांगली नौकरी करशील किंवा काही तरी बनशील तरच मी पुढचा विचार करेल."
अवी- " अर्थात दिशा आपण दोघेही आपापल्या आयुष्यात बऱ्यापैकी सेटल झाल्यावर मगच लग्नाचा विचार करु.तेवढाच अजुन आपल्याला थोडा जास्त वेळ मिळेल एकमेकांना समजुन घेण्यासाठी."
दिशाला अविनाश ची हीच गोष्ट आवडली होती. की तिच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी तो कायम तिची मदत करायचा,तिला पाठिंबा द्यायचा. एका मुलीसाठी यापेक्षा मोठी गोष्ट काय असु शकते.
दिशा आणि अविनाश एकाच कॉलेजमध्ये दिशा एम.ए.ला तर अवीनाश एम.कॉम. ला दिशा ठरवल्या प्रमाणे एम.पी.एस.सी.ची तयारी करत होती. दोन वर्षातच तिला परीक्षेत यश मिळाले आणि ति क्लास टु अधिकारी झाली.त्या दिवशी अविनाशचा आनंद पहाण्यासारखा होता.
" दिशा आज तु आई बाबांसोबत माझेही नाव केले हा. मी खूप खुश आहे खुप अभिनंदन,
तुझा अभिमान आहे मला.मी स्वतः ला खुप लकी मानतो. की, तु माझ्या आयुष्यात आहे. जे ठरवलं ते करुनच दाखवलं तु वेल डन!"
दिशा - "हो आता तुझ्या आभ्यासावर कॉन्सनट्रेट कर हा.म्हणजे आपल्याला लग्नाचा विचार करता येईल."
लवकरच अवीनाशही बॅंकेत एका चांगल्या पदावर नौकरीला लागला.आणि एका वर्षाच्या आतच दोघांच्या घरच्यांच्या संमतीने धुमधडाक्यात लग्न पार पडले.
अगदी जसं ठरवले होते तसेच झाले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
तीन वर्षांनी दिशाची पोस्टींग कोकणात झाली.अविनाश पुणे सोडू शकत नव्हता.त्याची नौकरी पुण्यात आणि आता दोघांच्या आयुष्यात एक छोटी परीही होती.. सहा महिन्यांची अदिती आणि दिशा कोकणात गेल्या.इकडे अवी एकटा पडला.सुरवातीचे काही दिवस तर निघाले. पण दिशाने जेव्हा अलीबागच्या समुद्र किनारी एक बंगलो विकत घेतला आणि तिथेच कायम स्थायिक होण्याचा निर्णय अवीला सांगीतला तेव्हा मात्र त्याने सरळ नकार दिला.दिशा ही तेवढीच हट्टी आहे हे त्याला माहीत होते.पण यावेळी दिशाने त्याला सांगितले
"अवी तुला माहिती आहे ना मला याच अलीबागच्या समुद्र किनारी घर घेऊन राहण्याची आधी पासून ईच्छा होती.आणि आज ही संधी चालुन आली आहे तर मी का सोडु? हे बघ तु तो जॉब सोडून दे. इथे माझ्या ओळखीने तुला चांगली नौकरी शोधु. तु पण इथेच ये."
"अजिबात नाही दिशा त्यापेक्षा तुच येना नौकरी सोडून माझ्या पगारात ही पुर्ण आयुष्य व्यवस्थितपणे काढु शकतो दरवेळी मीच का ऐकावे तुझे, कधीतरी तुम्ही माझा विचार करायला हवा की नको."
अशाच ओढाताणीत दिशा आणि अवी एकमेकांपासून कायमचे लांब झाले. आता दिशा रोज समुद्र किनारी जाते.त्या थंडगार वाळुत पाय रोवून बसते.आणि विचार करते. "मला जे हवं होतं ते मी मिळवलं निळा क्षार सागरी किनारा..पण,एकटीच मी या सागरी किनाऱ्यावर."
