लाल रंग सौभाग्याचा
लाल रंग सौभाग्याचा
"अगं ही वैदेही कशी आली इथे,कुणी बोलावले तिला?" निशाची सासु किचन मध्ये येऊन हळुच निशाला विचारत होती.. "आई मीच बोलवले आहे तिला." "अगं पण हळदी कुंकू ला बोलवायला ती काय सौभाग्यवती आहे का? सासु तावातावाने निशाला बोलते. निशा हातात कुंकवाचा करंडा घेउन बाहेर हॉलमध्ये निघुन जाते.
बाहेरही काही वेगळी परिस्थिती नव्हती.आलेल्या सर्व बायका वैदेही कडे प्रश्नार्थक नजरेने पहात होत्या.तर काही वयस्कर बायका सरळ सरळ तिच्या तोंडावरच बोलत होत्या."काय बाई आजकालच्या मुली रीतीभाती सारं गुंडाळून ठेवतात."
निशा एकेका सुहासीनीला हळदी कुंकू देत होती.
आणि ओटी भरत होती. वैदेही आपली एका कोपऱ्यात उभी राहुन सारी गंमत पहात होती.
तिला आठवत होते तिचे लग्न झाल्यानंतरचे दिवस.
तिचा पती संजय आणि तिचा आवडीचा रंग एकच "लाल" म्हणून ती सणासुदीला, वाढदिवसाला दरवेळी
लाल रंगाची साडी नेसत असे हातभर लाल बांगड्या, कपाळी लाल चंद्रकोराची टिकली तिचे सौंदर्य अजून खुलवत असे. संजय तिला नेहमीच कौतुकाने बोलायचा "लाल रंगात तु अजुनच सुंदर दिसते."
पण खुप कमी वयात हा सौभाग्याचा लाल रंग नियतीने तिच्या पासुन हिरावून घेतला. बॉर्डरवर लढता लढता संजयला वीरमरण आले होते. आणि वैदेही पासुन तिचे सौभाग्य हिरावले होते.
"वैदेही अगं येना लवकर किती वेळा आवाज दिला मी,लक्ष कुठे आहे तुझे?चल लवकर." निशाच्या आवाजाने वैदेही भानावर आली.
निशा आणि वैदेही बालमैत्रिणी आज शारदीय नवरात्रौत्सवा च्या निमित्त सर्व सुहासिनींना
हळदी कुंकू साठी बोलावले होते आणि वैदेही ला सुद्धा आग्रहाने बोलावले होते.सर्व बायकांच्या नजरा निशावर आणि वैदेहीवर होत्या. वैदेही च्या लक्षात येताच ती सावरा सावर करीत निशाला बोलते
"अगं राहु देत ना निशु, यावेळी नको"
निशा तिच्या जवळ जाते हात धरून तिला पुढे घेऊन येते "का नको हा? तुला या बायकांची भिती वाटतेय का?" तेवढ्यात निशाची सासु मध्येच बोलते.
"निशा काय लावलं हे ? अगं तु या वैदेहीला इथे बोलावले ते ठीक आहे.पण तिला हळदी कुंकू कसे देऊ शकते? अगं हळदी कुंकू फक्त सुहासीनीलाच देतात विधवा बाईला नाही, माहित नाही का तुला?"
निशा -"फक्त एखाद्या स्त्रीचा नवरा नाही.म्हणुन तिने कुंकू लावु नये असं ठरवणारे आपण कोण? जिचा नवरा वारला आहे तिला तिचं ठरवण्याचा हक्क आहे.लग्न होताच कमी वयात एखाद्या बाईचे सौभाग्य काळाने तिच्या पासून हिरावून घेतले त्यात तिचा काय दोष? लग्नाआधी जशी एखादी मुलगी हळदी कुंकुचे बोट आपल्या कपाळी लावते.तशी एखाद्या विधवा स्त्रीने लावु नये हा नियम कुणी घातला? तर फक्त समाजाने.ज्या देवीच्या नावाचा आपण जागर करतो, तिच्या नावाने सुहासीनींची ओटी भरतो मला वाटतं त्या मातेला आपल्या सर्व लेकी एकसमानच आहेत. त्या देवीला कधीही वाटणार नाही की,नवरा नसलेल्या बाईने लाल रंगाचे कपडे परिधान करु नये किंवा लाल बांगड्या वापरु नये, मेहंदी लावु नये,या सर्व बुरसटलेल्या विचारांच्या रुढी आपण समाजाने तयार केल्या आहेत. म्हणूनच मी वैदेही ला हळदी कुंकू देणार तेही मानापानाने!!
(वरील कथा आणि कथेतील पात्रे पुर्णपणे काल्पनिक आहेत तरी कुणाच्या आयुष्याशी मिळता जुळता प्रसंग असेल तर केवळ योगायोग समजावा.कथा आवडल्यास एक लाइक करा कमेंट करा अजुन नवनवीन कथा वाचण्यासाठी नक्कीच फॉलो करा.)
