Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

नासा येवतीकर

Inspirational

3.9  

नासा येवतीकर

Inspirational

हाताची जादू

हाताची जादू

4 mins
2.0K



एका कार्यक्रमात मित्राला एक छानशी भेट द्यायची होती. म्हणून भाऊ गुरुजी एका दुकानात गेले. तेथे अनेक छान छान वस्तू दिसत होत्या. सर्व वस्तू न्याहाळत न्याहाळत गुरुजी पुढे पुढे जात होते. तेवढ्यात त्यांच्यापुढे एक तिसीतला तरुण उभा राहिला आणि म्हणाला, " नमस्कार भाऊ सर, मला ओळखलंत का ? "

त्याचा चेहरा पाहून गुरुजी भूतकाळात जाऊन आठवण करण्याचा प्रयत्न करीत होते. पण नाव काही केल्या आठवत नव्हते. किती तरी मुलं गुरुजींच्या हाताखालून शिकून निघून जातात. गुरुजी कोणाला कोणाला आठवण ठेवणार ? गुरुजी म्हणाले, " नाही, मी ओळखलो नाही. कोण रे तू ? तुझं गाव कोणतं ?"

यावर तो म्हणाला," सर मी कृष्णा, काळा कृष्णा, आठवलं का ? माझ्यासाठी तुम्ही माझ्या घरी आला होतात..." असे म्हटल्याबरोबर भाऊ गुरुजीला विजापूरच्या शाळेतील तो कृष्णा आठवलं आणि गुरुजी आनंदी झाले व म्हणाले, "अरे, किती दिवसांनी तुला पाहतोय, आणि तू इथे काय करतोस ? "

यावर तो म्हणाला," सर, हे माझेच दुकान आहे."

" अरे व्वा ! छान आहे की, एवढं सर्व छान छान पेंटींग, डिझाईन, हे सर्व वस्तू कुठून आणतोस तू ? "

यावर तो म्हणाला, "सर, हे विकत आणित नाही, हे मी स्वतः तयार करतो आणि हो तुम्हीच तर मला म्हणाला होतात तुझ्या हातात जादू आहे. तुमची कृपा आहे म्हणून हे सर्व शक्य आहे. नाही तर आज मी काय राहिलो असतो आणि कुठे राहिलो असतो ? हे माझे मलाच ठाऊक नाही."

गुरुजीला त्याच्या बोलण्याचा खूप आनंद वाटला. त्यांनी आवडलेली एक वस्तू घेतली आणि त्याची किंमत देऊ केली. पण कृष्णा घेण्यास अजिबात तयार होत नव्हता. पण पैसे नाही घेतले तर वस्तू घेणार नाही असे गुरुजी म्हटल्यावर त्याने ती रक्कम घेतली. ती वस्तू पोटाशी धरून गुरुजी कार्यक्रमाला जाण्यासाठी गाडीत बसले. खिडकीच्या बाहेर पळणारी झाडे पाहता पाहता गुरुजी त्या वीस वर्षांपूर्वीच्या विजापूरच्या प्राथमिक शाळेत जाऊन पोहोचले.

भाऊ गुरुजींची विजापूरच्या शाळेवर नुकतीच बदली झाली होती. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग होते. शाळेच्या पहिल्या दिवशीच गुरुजी शाळेत हजर झाले. मुख्याध्यापकानी त्यांच्या हातात तिसऱ्या वर्गाची हजेरीपट देऊन त्यांना तिसरा वर्ग शिकविण्यासाठी दिले. त्या वर्गात हजेरीपटावर जेमतेम 20 मुले होती. गुरुजीने वर्गाची हजेरी घेतली. एक एक मुलाची चाचपणी केली. त्या वर्गात कृष्णा नावाची दोन मुले होती. त्यापैकी एक कृष्णा उपस्थित होता तर दुसरा अनुपस्थित होता. त्याचे नाव आल्याबरोबर मुले ओरडू लागली " तो काळा कृष्णा काय येणार नाही." वर्गात सर्व मुले हजर, एक त्याला सोडून. असे दहा-बारा दिवस चालले. त्याच्या बाबतीत मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा केली असता गुरुजींना असे कळले की, तो अभ्यास करत नाही, खोड्या करतो, मारामारी करतो, घरीच मातीशी खेळत राहतो आणि शाळेला येतच नाही. गुरुजीच्या मनात त्याला भेटण्याची इच्छा झाली. एके दिवशी वर्गातील मुले नि भाऊ गुरुजी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलो.

घराच्या मागच्या बाजूला काळी मातीची चिखल तयार करण्यात आला होता आणि त्या चिखलाजवळ कृष्णा विविध वस्तू तयार करण्यात गर्क होता. त्याच्या आजूबाजूला मातीच्या अनेक वस्तू त्याने तयार केल्या होत्या. गुरूजींनी सर्व वस्तू हातात घेऊन पाहिले, खूप छान तयार केला होता. गुरुजीच्या सोबत आलेल्या मुलांनी कृष्णाला म्हणाले, " हे कृष्णा, तुला भेटायला नवीन सर आले आहेत."

गुरुजींनी त्याला जवळ बोलावून घेतले त्याचे नाव आणि प्राथमिक चौकशी केली. आणि त्याला विचारले की, " तू शाळेला का येत नाही ? "

तेंव्हा तो म्हणाला, " मला त्या शाळेत यायचे नाही. मला लिहिता येत नाही आणि वाचता देखील येत नाही. हे पोरे सारे मला ढ म्हणून चिडवतात. म्हणून मला शाळेला यावं वाटत नाही."

"यापुढे तुला कोणी काही म्हणणार नाहीत, तू चल शाळेला." असे बोलून गुरुजीने त्यास शाळेत सोबत घेऊन गेले. जाताना त्याने मातीपासून तयार केलेले सर्व साहित्य नेले. वर्गात गेल्या गेल्या त्याचे सर्व साहित्य मुलांना दाखवून त्याला शाबासकी दिली आणि यापुढे त्यास कोणी चिडवू नये याची सक्त सूचना देखील केली. असेच दहा - बारा दिवस उलटले. एके दिवशी शाळेत चित्रकलेची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत कृष्णाने काढलेले जंगलात चरत असलेली जनावरे आणि आजूबाजूचा निसर्गाच्या सुंदर चित्राने शाळेतून पहिला क्रमांक मिळविले. गुरुजींनी त्याचे चित्र शाळेत दर्शनी भागावर लावले. त्याला खूप अभिमान वाटू लागला. बाहेर येता जाता तो चित्र जागेवर आहे किंवा नाही हे पाहू लागला. तो एक उत्तम चित्रकार होता, त्याच्या हातात जादू होती, हे भाऊ गुरुजींनी ओळखलं आणि त्याला त्या क्षेत्रात हवी ती मदत करीत राहिले. जमेल तेंव्हा बोर्डावर त्याच्या हातून गुरुजी विविध प्रकारचे चित्र काढून घेऊ लागले. एव्हाना त्याला शाळेची गोडी लागली होती. सुट्टीच्या दिवशी त्याला करमत नव्हते. तो सदा कामात गर्क असे. गुरुजींनी चित्रकलेच्या माध्यमातून त्याला हळूहळू वाचनाकडे घेऊन गेले. आत्ता त्याला हळूहळू वाचता आणि लिहिता देखील येऊ लागले होते. तो पाचवी पास झाला आणि दुसऱ्या शाळेत त्याला जावे लागले. कारण विजापूरच्या शाळेत सहावा वर्ग नव्हता. खूप जड अंतकरणाने सर्वांनी त्याला निरोप दिले. त्याचे ही डोळे पाणावले होते. जाता जाता गुरुजींनी त्याला एकच सल्ला दिला होता की, " कृष्णा, तुझ्या हातात जादू आहे त्याचा योग्य वापर कर, जीवनात तू नक्की यशस्वी होशील." हेच लक्षात ठेवून कृष्णाने आज खूप प्रगती केली. कोणी ही त्याच्या दुकानात आल्यावर एक तासभर तरी नुसते चित्र पाहतच राहतात. नको असताना देखील त्याचे चित्र विकत घेतात. आज तो आपल्या ठिकाणी सुखी आहे हे ऐकून आणि पाहून गुरुजींना देखील परमोच्च आनंद झाला. जगात असे अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांच्या हातात जादू आहे फक्त गरज आहे ती त्यांना त्यांच्या कलेची जाणीव करून द्यायची. जे विद्यार्थ्यांच्या अंतरंगातील गुण ओळखून त्यांना तसे मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवितात तेच शिक्षक आजीवन विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहतात. असे हजारो कृष्णा घडविणाऱ्या शिक्षकांना विनम्र अभिवादन.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational