Vasudev Patil

Horror Tragedy

2.0  

Vasudev Patil

Horror Tragedy

ZIni

ZIni

35 mins
1.8K


 चंदरनं आपली बुलेट विहीरीच्या धावेवर उभी केली नी साईड स्टॅण्ड लावत तो खाली उतरला.गाडीचा लाईट बंद होताच समोर पुर्वेला माघी पुनवेचा पुरा चांद त्याला दिसला.चांदाच्या रुपेरी आभेनं तो घरचं सारं भांडण क्षणात विसरुन त्याला तरतरी वाटू लागली.त्यानं डिक्कीतनं धावजीबा व त्याचा आणलेला डब्बा आणि दिलरुबा ढाब्यावरनं आणलेल्या ब्लेंडरच्या दोन्ही बाटल्या बाहेर काढत धावेवर पडलेली बाज सरकवत त्यावर ठेवल्या.नी गव्हास पाणी भरत असलेल्या धावजीबास हाकाटी भरली.तसा बुलेटच्या आवाजाने धावजीबास ही चंदर आल्याचं कळलंच होतं.पण गव्हाचं वाफं भरत आल्यानं तो दांड बदलवण्यासाठी थांबला होता.फावडीनं दांड बदलवुन त्यानं तीनेक वाफ्यास पाणी लावलं व तो धावेकडं आला.थाळण्यात हात पाय धुवत धुऱ्ह्यावरचा उपटून सोबत आणलेला मुळाही धुतला.चंदरनं ब्लेंडर घटाघटा रिचवत त्याला ग्लास भरून दिला.

ग्लास हातात घेत "चंदर बापू आज दोन बाटल्या?"

"बा आज घरच्यांनी माथं उठवलंय आता तु तरी नको उठवू.गपचिप पी नी चल जेवण आटपू.

कधी मधी टॅंगोचा अर्धा ग्लास मारणाऱ्या धावजीबास ब्लेंडरच्या एका ग्लासानंच किक दिली.

दोघांनी डब्बा उघडून जेवण केलं.

""बापू त्या कवठीचं तू बुजगावणं मिरचीत उभं करून चांगलं नाही केलंस!",धावजीबानं धोतराच्या सोंग्यास हात पुसत विषय छेडला.

"काय बा!आजुन दुपारचं तुझं तेच सुरु आहे की एवढ्याशा ग्लासानंच किक बसलीय?",चंदर त्राग्यात बोलला.

"तसं नाही बापू,पण मिरचीत बुजगावणं म्हणुन मेलेल्या गाई-गुराची कवठी उभी करतात पण तू तर..?"

"बा आता मी झोपतो,आता तू पाणी भर अडिच-तीनला मला उठव मग मी पाणी भरीन तू झोपायचं"म्हणत चंदर बाजेवर आडवा झाला.धावजीबा मात्र बडबडतच गव्हाकडं पाणी भरण्यासाठी गेला. जातांना तो सारखा मिरचीत उभ्या केलेल्या बुजगावण्याकडं पाहु लागला. चांदाच्या रुपेरी उजेडात त्याला दुरुनही डोळे चमकल्याचे दिसताच तो घाबरला.खाल मानेनं तो गव्हाच्या शेताकडं निघाला.

माघी पुनवेचा चांद आता वर चढत होता तसा मळ्यातील हिरवाईच्या शालूत चांद आपल्या रुपेरी प्रकाशाचा कशिदा काढत होता तर गुलाबी थंडी दहिवराचा आपला ओलेता शेवटचा हात फिरवत होती. पाण्याची नाली ज्या बांधावर होती त्यावरील बोरीच्या झाडावरील गाभुळलेल्या,पिकलेल्या बोरांचा घमघमाट सुटत होता.थंड वाऱ्याच्या झुळुकेनं अलवार देठांतून गळत बोरं नालीतल्या पाण्यात चुबुक,डुबुक टप आवाज करत होते. चांद आपला बयाजवार वर चढतच होता. चंदर बाजेवर शांत पहुडत विचार करत होता.

 वडिल कृषी खात्यातून निवृत्त होताच आलेल्या रकमेतून दोन वर्षांपूर्वीच सामंत डाॅक्टरांकडून हा मळा विकत घेतला.चंदरचं एम.एस.सी अॅग्री होऊनही नोकरी नसल्यानं निदान शेती तरी पाहीन हा हेतू.या आखाजीस लगेच मळ्याच्या खालच्या अंगालाच असलेलं दिनू सराफाचं चार एकर ही घेतलं.पण चंदरचं सारं गणितच विस्कटलं.कारण लहानपणापासुन चंदरशी नातं लावलेली सुलीचं मामानं ऐनवेळी चंदर ऐवजी लहान भाच्याशी लग्न उरकलं.मामाही त्याच्या जागी राईटच.लहान भाच्यानं बी.ए.एम.एस. होताच तालुक्याला क्लिनीक टाकलं.सुलीचं बि. फाॅर्म होतच.साहजिकच मामा बेरोजगार चंदरला कल्टी मारत लहान्या भाच्याची निवड केली. मोठा असुनही चंदर राहिला व अचानक लहान्याचं आधी उरकलं.चंदरला उरात कुठं तरी खोल जखम झालीच पण ती प्रेमाऐवजी इगोची होती.कारण सुली कधी उतरलीच नव्हती.मग कोण?

..

.

कोण ती?

गोकुळ दुग्धालय...

काॅलेजचे दिवस ...

झिनी?

झिनीची झिलई.,

झिनीची मऊशार झालर...

पण नंतर काळाच्या या विशाल गर्तेत ती कुठं गायब झाली?

व आपणही शोधलं नाही.

रात्री दररोज गोकुळ दुग्धालयावर मलई मारलेलं दुध प्यायला खूप आवडायचं चंदरला.पण नंतर गल्ल्यावर बसलेली गोरीपान लाल नाकाची चन्ना चुडी घातलेली झिनीच आवडू लागली.मग नजरेला नजर देत किती तरी वेळ नुसतं पाहत बसुन राहणं.त्यात झिनीनं तिरक्या डोळ्यानं पाहत नाकाचा लाल शेंडा उडवत मुलायम हास्य दिसताच चंदर सुधबुध विसरे.एक दोन महिने चाललं असं व झिनी गायब झाली ती नंतर दिसलीच नाही.चंदर लच्छा काठेवाडास माहित पडु न देता बाहेरुन तपास ही केला पण झिनी गेली ती गेलीच.मग बि.एस्सी.अॅग्री संपलं व चंदरने ही जिल्हा सोडला.पण झिनी निघता निघेना.म्हणुन सुलीचं त्याला काहीच वाटलं नाही.लग्नानंतर लहान भावानं सुलीकरिता

लगेच मेडीकल टाकलं.आधी चंदरच मेडीकलवर बसे.पण नंतर सुली थांबू लागली.व पुढे वाद वाढू लागले.म्हणून तेथुन चंदरची गच्छती होत त्याचं पुनर्वसन मळ्यात झालं.त्यानंही मग बाटली जवळ करत तालुका सोडला व तेथून पंचवीस किमी दूर वडिलांच्या पुर्वापार गाव तुराटखेड्यातील या मळ्यात आला.घरच्यांशी अपेक्षा यानं दिवसभर देखरेख करत रात्री घरी यावं.पण यानं गावातच मेसचा डब्बा लावत मळ्यातच धावजीबा जवळ थांबू लागला. वाटलं तर पाच सहा दिवसात घरी चक्कर‌ मारी.

आज दुपारीच त्यानं जेसीबीनं जुना सामंताचा मळा व सराफाच्या शेताच्या मधला भला मोठा बांध फोडुन शेत काढलं.पण त्या बांधात कवठी सह हाडाचा सांगाडा निघाला.तो त्यानं धावजी बा मनाई करत असतांनाही जरीला मिरचीच्या शेतात काठीनं बुजगावणं म्हणुन उभा केला होता.

नव्या दिनू सराफाच्या शेतात जरीला मिरची टच हिरव्या मिरच्यांनी लगडली होती.वरच्या आगऱ्यांना अजुनही पांढरी फुले व आरे लागतच होती. माणसांच्या खांद्याला मिरचीचं झाड लागे.चुकुन कोणी मळ्याकडं आला तर मिरची पाहतच उभा राही.नजर लागू नये व यदा कदाचीत झोप लागली तर चोरांना भिती वाटावी म्हणुनच त्यानं ते कवटीचं बुजगावणं उभं केलं होतं .पण ती कवठी कुणाची? व ती कोण?कशी मेली?हे माहित असलेला धावजीबा दुपारपासूनच धास्तावला होता.कारण मळा हा गावापासुन तीन चार किमी दूर भल्या मोठ्या नाल्याच्या खोऱ्यात.नाला उतरून पराटखेडं तर पाच किमी दूर.नाल्याच्या त्या बाजुला नदीवरच्या शिवधारा लिफ्ट इरिगेशनचं पाणी साऱ्या शिवारात फिरत असल्यानं ऊस, केळी मातलेली.दिवसाही ऊसाच्या फडातुन बिबटे व कोल्हे नजरेला पडत.त्यात या चंदर बापुनं या कवटीची भानगड उभी केलीय.

 आता चांद बरोबर डोक्यावर आलेला.थंडी आता चांगलीच लाडात येत होती. चंदरनं शाल अंगावर ओढली.ब्लेंडर भिणतच होती.गुंगी वाढू लागली.तोच मिरचीच्या शेतात सुर्रर्रर् सायं सूं सूं करत वारा झपाटला.नाल्याच्या खबदाडातून पाण्याच्या डोहाकडन' टिटिव टिव, टिटिटिव टिव' करत कर्कश आवाज उठवत टिटव्या मळ्याकडं सरकू लागल्या.नाल्यापल्याडच्या फडातून खोकड, कोल्ह्यांनी कोल्हेकुई भणकवली. मिरचीच्या शेतात उठलेलं वाऱ्याचं भवंडर गव्हाच्या शेताकडं सरकू लागलं तसं वरच्या बांधावर असलेल्या पिंपळावरचे बगळे, करकोचे, फडफड करत उडाले तर वडा- उंबरावरचे दिवांध ,वटवाघळांनी एकच गिल्ला केला.धावजी बा सावध झाला.गुडघ्या पर्यत पात आलेल्या गव्हाच्या शेतातून कावरा बावरा होत टिटवीच्या आवाजावर पचकन थूकला.

 चंदर अर्धी झोप अर्धी जाग या अवस्थेत पडुन होता.मोटार अचानक बंद झाली.थाळण्यात पडणाऱ्या पाण्याचा आवाज बंद झाला.नालीतील वाहणाऱ्या पाण्याचा आवाजही मंद मंद होत गेला. पक्ष्यांचा आवाज, फडफड विसावली.येणारं पाणी बंद होताच व विहीरीवरचा शंभर व्होल्टेजचा पिवळा बल्ब बंद पडताच लाईट गेली असेल म्हणत धावजी बा गव्हाच्या शेतातून बाहेर निघत बांधावरच अंगावरची गोधडी पांघरत झोपला.धावेवर आलाच नाही.

 चंदर गुंगीनं व झोपेनं म्लान होऊ लागला तोच त्याला पाण्याच्या कुंड्यातून बुड बुड बुड आवाज आला.जणू कोणी तरी हंडा भरत असावं.पुन्हा बुड बुड बुड तसाच आवाज.चंदर शेत शिवारास नवखा होता. पण त्यानं घेतली असल्यानं झोपेत दुर्लक्ष करत शाल गच्च लपेटली.कुणी तरी कुंड्यातून हंड्यावर हंडे भरत होता.त्यानंतर त्याला पायातील साखळ्या व हातातील कड्यांचा आवाज आपल्या बाजेकडं सरकत असल्याचं जाणवलं. आता झोप त्याचा ताबा घेऊ लागली. आवाज छन, छन ,कड, कड , करत बोरीकडं सरकू लागला.कुणीतरी बोरीच्या झाडांची खालची फांदी धरुन गदागदा हालवत असावं व गदरलेली, पिवळी बोरं टपाटपा पाडत असावं.पण पण चंदर गाढ निद्रेत विसावला.मग बोरं वेचून पदरात घेत एकेक हंडा डोक्यावर व कंबरेवर घेत छन छन आवाज दक्षिणेकडील ऊसाच्या फडाच्या बांधवाटेनं नाल्याकडं सरकत असल्याचं घोरणाऱ्या चंदरला स्वप्न दिसू लागलं.तीनला लाईट आली.थंडीनं जाग येताच चंदरनं मोटार सुरू केली व गव्हाच्या शेताकडं आला.धावजीबास हाका मारत उठवलं.धावजीबा मग लंघु शंका करून पुन्हा झोपला. तर चंदर पाणी भरु लागला.त्यानं मोबाईलवर 'झिनी रे झिनी,चदरीया झिनी रे झिनी!'हे गाणं लावत मोबाईल बांधावर ठेवला. पहाटेच्या थंड, शांत वातावरणात गाण्याचा कमी आवाजही शिवार दणकावत होता. चांद आता रुपेरी छटा टाकत तांबुस होत मावळतीकडं उतरत होता.धावजीबा एरवी घोरायला लागला होता.

चंदरचं पाणी भरणं सुरुच होतं.

तोच पुन्हा टिटवीचा कल्लोळ उठला.ऊसाच्या फडात वाऱ्याची सळसळ उठली.गव्हाच्या शेतात थंड सुरकी उठली.चंदरचं विहीरीकडं लक्ष गेलं.फडातून बाई विहीरीकडं सरकत असल्याचं त्याला दिसलं.चांदाच्या प्रकाशात चंदर टक लावून पाहू लागला.बाई डोक्यावर दोन, कंबरेवर एक तर दुसऱ्या हातात एक हंडा सांभाळत लयीत ती विहीरीवर आली, पाणी भरलं;नंतर बोरीकडं वळली. बोराची फांदी हलवत बोरं पाडली व वेचून बोरं खात धावेवर थांबली.चंदरला झोपेत असंच स्वप्न पडल्याचं आठवलं.कोण ही?इतक्या पहाटे पाणी भरायला?मग त्याला नाल्याच्या पल्याड दूर नदीकडच्या अनकाई टेकाडावर काठेवाड असतात हे ऐकलेलं आठवलं.कदाचित त्यापैकीच कुणी असावी असा विचार करत तो पाणी भरत विहीरीकडं टुकुर टुकुर पाहू लागला.

  बाईनं यथावकाश हंडे उचलले तितक्यात चंदर वाफं भरल्यानं दांड पालटवू लागला.तितक्यात ती बाई दिसेनासी झाली.मात्र बुजगावणं उभं केलेल्या जागी मिरचीच्या शेतात टिटव्या जिवाच्या आकांतांने कलकल करू लागल्या व थोड्याच वेळात उगवतीला धुक्यात लपेटलेली तांबडी आभा फुटली.

 उठलेल्या धावजीबानं सरळ घरची वाट धरली ती पुन्हा मळ्यात पाय ठेवायचा नाही या निश्चयानंच.

पण झिनी तर आता रोज मळ्यात येणारच होती व तेथून तुराटखेड्यात.......


चंदरनं बांध फोडून तिला मोकळं केल्यावर ती बदला घेण्यासाठी बुजगावण्यातून मळ्यात वावरणारच होती.


====================


#झिनी


      भाग::--दुसरा

 धावजीबा आज अचानक न सांगता लेकीच्या गावास निघून गेल्यानं चंदरला दुपारीही मळ्यातच थांबावं लागलं.दिवसा ऊस तोडणी करणारे मजुर मळ्यावर पाणी भरायला हमखास येत.कारण नाल्यापल्याड इरिगेसनच पाणी असल्यानं शिवाऱ्यातल्या जवळपास सर्वच विहीरी बंद होत्या व सामंताच्या मळ्यातील विहीरीचं पाणी गोड असल्याचं सालोसाल येणाऱ्या उसतोडणी मजुरांना माहीत असल्यानं पिण्याचं पाणी येथुनच नेत.अनकाई टेकाडावरचे काठेवाडी बायाही कायम येथेच येत.चंदरचं पुर्वापार गाव असलं तरी तालुक्याला राहणं व त्यात शिक्षणा निमीत्तानं बाहेर म्हणुन गावाशी आताच नव्याने ओळख होत होती.मळा घेतल्यावरही मेडीकलवरच थांबत असल्यानं पुर्वी मळ्यात ही वडीलच थांबत.

 माघी पाडव्याचा चांद कालपेक्षा उशीरा उगत होता.थंडीही मळ्यात पाय पसरू लागली.लोडशेडींग आजपासुन बदलल्यानं रात्री बारालाच लाईट येणार होती.चंदरनं आपला प्रोग्राम आटोपत मेसचा डबा खाल्ला.पाणी भरणाऱ्याची गर्दी बरीच कमी झाली होती.त्यानं मोबाईल वर बाराची बेल लावत झोप काढायचं ठरवलं.चांद वरवर चढत होता तशी थंडी ओली होत साऱ्या शिवाराला भिजवण्याचा घाट घालत होती तर वारा बोरीच्या झाडाशी झिम्मा खेळत टपाटप बोराची पथारी गवतात, गव्हात मांडत होता.

 गवतातले डास कानाजवळ येत भुणभुण करत होते.अकराच्या सुमारास नाल्याकडच्या उसाच्या फडाकडनं कालसारखाच टिटव्याचा कल्लोळ उठला.गावाकडनं कुत्र्यानं काढलेला बेसुर हेल ही त्या आवाजात तवंग उठवत गेला.तोच उसाच्या बांधाकडनं छन छन कड कड आवाज विहीरीकडची धाव जवळ करू लागला. आता चंदर सावध झाला.बोरीच्या झाडावर गदरलेली बोरं खाण्यासाठी आलेलं कुठलं तरी पाखरू विचित्र आवाज करत दंगा करत विरीरीवरच्या आभाळात घिरट्या घेऊ लागलं. पाण्याच्या थाळण्यावर हंडे ठेवल्याचा आवाज आला नी चंदरनं शाल बाजुला करतमोबाईल स्टाॅर्च सुरू करून उठत

"कोण?"पृच्छा रू लागला.

"मी झिनी!, काठेवाड! एवढे हंडे इथं राहू द्या की.मी पांडू राऊताच्या चक्कीवर दळायळा चालली!दळून आणल्यावर पाणी भरुन नेईनं हंडे!"  

डोक्यावर पोतडी(गोणी)घेतलेली बाई हंडे थाळण्यावर ठेवत म्हणाली.

चंदरचं तिच्या बोलण्याकडं लक्षच नव्हतं.तो 'झिनी' हे नाव ऐकताच विचारात गडला होता.

"झिनी?"

"होय झिनीच"

"गोकुळ दुग्धालय,.."

"होय ते माझे वडिल"चंदरचं बोलणं मध्येच तोडत झिनी म्हणाली.

आता चंदर उठत थाळण्याकडं सरकत "झिने अगं मी चंदर!ओळखलं का मला?मी तुमच्या दुग्धालयावर..…."

"होय ओळखलं,कसं विसरेन ! पण आता मला घाई आहे दळायला व तेथून परतायला उशीर होईल.घरचे बोलतील.नंतर बोलू"चंदरचं बोलणं मध्येच तोडत झिनी म्हणाली.

"अगं पण तू इथं कशी?निदान ते तरी सांग"चंदर धक्क्यातून सावरत विचारू लागला.

"इथंच अनकाई टेकाडावर आमचा कबिला आहे.मला आता उशीर होतोय जाऊ द्या आता भेट होईलच,सारं निवांत सांगेन"म्हणत झिनी गावाकडं चालती झाली.

इतक्या वर्षात झिनी भेटली पण तरी जास्त न बोलता चालली याचं चंदरला आश्चर्य वाटलं.

चांदाच्या उजेडात मात्र झिनी त्याला आधीच्या झिनीपेक्षा खूपच‌ सुंदर दिसली.तिचं नखशिखांत बदललेलं साडीतलं रूप तितक्या वेळेतही त्याला भूरळ घालू लागलं.पण त्याला कळेना जिल्ह्याला राहणारी झिनी इकडं‌ खेड्यात व ती रानात कशी?तिनं कबीला इथंच सांगितला म्हणजे लग्नच इथंच झालेलं असावं.शेवटी विचार करून करून त्याच्या डोक्यास मुंग्या येऊ लागल्या.काल रात्री पण हीच असावी.आता तर रोज भेटू असं ती म्हणाली.त्याच्या मनात आनंदाच्या ऊर्मी दाटून आल्या.तो झिनी परत येण्याची वाट पाहू लागला.त्यातच अंगातली भिनू लागली व तो घोरू लागला.


=======================


 डाॅ. सामंताच्या वाड्यावर जेवण आटोपल्यावर पांडू राऊतानं बावणेबारा वाजताच वसंता व दिना शिंदेची रजा घेत उठू लागला.

कारण बाराला लाईट आली म्हणजे चक्की सुरु करुन दिवसभराची तटलेली दळणं दळावीच लागणार होती.कुत्री भुंकत होती त्यांना हाकलत तो गाव आखरीस असलेल्या खळ्यात आला.पुढचं झापं उघडंच होतं.त्याची चाहूल लागताच पाळलेली 'चंदी' कुत्री लाडाला येत चुईमुई मुईचुई आवाज करत पायात घुटमळू लागली.म्हशी,पारडू, गाई, बैलं, वासरू कान टवकारत काही उठली, तर काही बसल्या जागी रवंथ करत रेकू, हंबरू लागले.खळ्याच्या बाहेर पडलेल्या चक्कीच्या जुन्या जात्याच्या लाल चाळ्या(दगडा)वर बसलेला सेना धनगरानं आधीच उठत चक्कीच्या वाड्याची कडी उघडली.पांडू चाचपळत मध्ये घुसणार तोच लाईट आली उंदीर, घुसा बिळात पळाल्या व पिवळ्या बल्बाच्या उजेडात एल आकाराच्या कडप्पाच्या दगडावर ठेवलेल्या दळणाच्या पाट्या पाहून पांडुला आज दिवस उजाडेपर्यंत उभं रहावं लागेल याची जाणीव झाली.त्यानं स्टार्टरचा खटका उचलताच घन्नssss खटपट खटपट करत धुरडा उठवत चक्की सुरु झाली.त्यानं पायानं खालचं चाक व वरचं चाक हातानं लावत जातं लावलं व पहिलीच पाटी उचलत झब्ब्यात टाकली.सेना धनगरास सर्व पाट्या एकमेकावर ठेवावयास लावत दळणं पुढं सरकावयाला लावत दळणाचा पसारा शिस्तीत लावावयाला लावला.त्या बदल्यात त्याचं आधी दळून देत त्याला मोकळं केलं.उधारीच्या खात्याची वही झटकत तिच्यानंच खुर्ची झटकत तो बसला.गर्दी कितीही असली तरी सहसा रात्री कुणी थांबत नसत .सकाळी मग पहाटपासुन पिठ नेणारे गर्दी करत.

एकेक दळण निघत होतं तसं शांततेत चक्कीच्या आवाजाची तिव्रता थंडीत वाढू लागली. तोच खळ्यातील चक्कीच्या शेडसमोरील गोठ्यात चंदी कुत्री जोरजोरात भुंकू लागली तर गुरं अंग झटकत उठून कान टवकारत कावरीबावरी होऊन पाहू लागली. पांडूनं पट्ट्यानं चक्कीच्या गोल डिब्ब्याला दोन तीन दणके देत बाहेर आला.तोच चंदी बाहेरच्या दिशेकडं पाहत जिवाचा आकांत करत भुंकू लागली.पांडूनं "चंदी चूप, का भुंकते?काय दिसतंय चूप!"ओरडत शांत केलं.तरी चंदी हुई चुई चु चु हुं करत बाहेर पाहतच होती.पांडुनं मग गुरांना ऊसाची हिरवी पात(बांडी)टाकत बाजुलाच लघुशंका करत चक्कीत परतत सरलेलं दळण टाकलं.तोच दरवाज्यात त्याला डोक्यावर दळणाची पोती धरलेली बाई आत येतांना दिसली.दळण दळायला रात्री अपरात्री माणसं येत,पण एकच्या वेळेला बाई सहसा येत नसे. बाई गावातली नव्हती.तो चक्रावला.

"जी दळण दळायचंय!दळून देणार ना?" बाईनं विचारलं.

"हा!दळून देतो,ठेव मागे.कुठून आलीस?"

"जी आम्ही ऊस तोडणारे.आजच आमची टोळी अनकाई टेकाडावर उतरलीय.व सकाळी लगेच ऊस तोडायला जाणार, म्हणुन उशिरा आली",पोती खाली ठेवत बाई बोलली.

 अनकाई टेकाड्याचं नाव ऐकताच पांडुला चार वर्षापुर्वीचा प्रसंग आठवत अंगावर काटा उभा राहिला.

"जी धान्य पाखडायचं बाकी आहे,सुप देता का?लगेच इथल्या इथं दळण करते!"बाईनं तिरकं पाहत लाडीकपणे विचारलं.पांडुनं उठत सूप, खाली पारलेचा डबा व पालाचं तुकडं दिलं.बाई पांडु दिसेल अशा बेतानं समोर बसुनच दळण करू लागली.

पांडू दळण टाकत बाईकडं सारखा टकामका पाहू लागला.विस- बाविशीच्या वयातली बाई पोटुशी दिसत होती.अप्रतिम लावण्य पिवळ्या प्रकाशाला खिजवत होतं.पांडू सारखा बावरा होत होता.बाई मधुनच वर मान करत पांडुकडं पाही.त्यानं पांडू आणखीच बावरा होई.त्यानं पाखराचा अंदाज बांधण्याआधीच पाखरु जाळ्यात सहज येऊ पाहत होतं.तितक्यात दरवाज्यातून एक कुत्रं पडलेलं पिठ खायला घुसलं.पांडूनं मोका उठवत त्याला हातातल्या पट्ट्यानं हाकलत दरवाजा आतून लावला.ते पाहून बाई काही मना करण्याऐवजी छद्मी हासली.दळण होताच तिनं डबा सरळ पुढं आणुन ठेवला.एरवी दुसरं गिऱ्हाईक असतं तर पांडू त्यावर खेकसत मागं दळण ठेवायला लावलं असतं.पण ही वेळ,हे दळण, हे पाखरू ..याची बातच न्यारी होती.बाई समोरच उभी राहत दळणावर बोटानं रेघोट्या मारत पांडूकडं पाहू लागली.

"गाव कोणतं तुझं?" पांडूनं सलगी करायला सुरुवात केली.

"जी फुरसुंगी!कन्नड घाटात" नजर रोखत बाई उत्तरली.

"मग इतक्या लांब ऊस तोडायला?" नजरेत नजर गुंतवत पांडु विचारू लागला.

"पोटासाठी यावचं लागतं.तसं दरवर्षी आम्ही नवसारीकडं जातो या वर्षी पहिल्यांदाच इकडं"

"चला त्या निमीत्तानं भेटलात तरी"लाळ घोटत पांडू हात पुढे करत बोलला.

"मग टाका ना लवकर दळण" बाईनंही हात पुढं सरकवला.

पांडुनं दळण टाकलं व बाहेर कुणी आहे का याचा दरवाजा उघडून कानोसा घेतला. दरवाजा पुन्हा लावला.

परत आला तर बाई खाली बसून डबा गोल गोल करत पिठ सावरत होती.पांडू पुढं सरकला व बाईचा हात धरणार तोच फणा काढून नागिणीनं फुत्कार मारावा तसा बाईनं...झिनीनं पवित्रा घेतला.

पांडुनं बदललेलं रूप क्षणात ओळखलं.

" झिनी तू?"

"होय पांड्या कुत्र्या मी झिनीच"

पांडू क्षणात मागं सरकला."झिनी त्याला पकडण्यासाठी मागे धावली.पाडू तितक्या जागेत तावडीत सापडलेल्या कुत्र्यासारखा धावू लागला.आधी तो दाराकडं पळाला पण दार उघडेना.पांडू धडपडत दार उघडू लागला.तोच झिनीनं त्याचं नरडं पकडत दाबलं.चार भावाच्या मोठ्या कुटुंबातल्या गबरू उंदरानं दूध ,तूप, मांस लहानपणापासुनच खूप चेपलेलं म्हणुन अंगात रेड्याची ताकत.पण झिनीच्या हातात ते लाथा झटकू लागलं. श्वास रोखला जाऊ लागला.तोच खाली जागा ओली होऊ लागली.झिनीनं झटक्यात सोडताच तो उंदरासारखा इकडंतिकडं धापा टाकत पळू लागला.झिनी व त्याच्यात तितक्यात जागेत आट्यापाट्या सुरू झाल्या तो दळणाचा पसारा फैलवत पळू लागला.आता चक्कीतलं दळण संपल्यानं ती घरघर करत आवाज करू लागली.झिनीनं दळण टाकत आवाज कमी केला.पाडू आता मीटर ची पेटी ठोकलेल्या खांबाआड घुसून झिनीकडं भयभीत नजरेनं पाहत "झिनी चुकलो आम्ही! माफ कर पण मला जिवंत सोड"

"कुत्र्या! गरवार पोरीला तीन तीन लांडग्यांनी लचके तोडत लूटतांना मजा येत होती तुम्हाला!नी आता ही कसा लाळ टपकवत होता बाई पाहून.नी तुला सोडू?"झिनी चवताळून म्हणाली.झिनीनं पुढे सरकत त्याच्या मुस्काटात लाथ घालत बाहेर काढू लागली.पण तो खांबाला धरत तसाच मार खात होता.तोच झिनीनं मिटर मधली बल्बची जिवंत वायर बाहेर काढली.पांडू जिवंत वायर पाहताच जोरानं राडा करत बाहेर निघू लागला नी त्या गडबडीत अंधारात चक्कीच्या पट्ट्यात अडकून पुलीत घुसला.क्षणात फाउंडेशन च्या पत्र्यात हात कापले गेले पट्टा तुटला मोटार घुंन्न करत रिकामी फिरू लागली. झिनीनं झोरात आकांत करत "मेल्या मला नासवून मारतांना हासत होते ना! मग आता रडत रडत मर! कारण हसत हसत केलेली पापे रडत रडत फेडाविच लागतात"म्हणत तिनं वायर त्याच्या दोन्ही पायाच्या मध्ये अडकवताच झोराचा झटका देत कुत्रं पायाच्या टाचा घासून घासून मेलं.झिनी मळ्यात परतली.हंडे घेत जाऊ लागताच गव्हात पाणी भरणारा चंदर धावतच विहीरीवर आला पण तो पावेतो ती उसाच्या फडातून नाल्याकडं तुरकली होती.त्यानं पाठलाग करत नाला पार केला पण तरी त्याला गुंगारा देत ती मिरचीच्या शेतात बुजगावण्याजवळ परतली.पुर्वेला नदीकडनं मियाॅव मियाॅव म्याव करत मोरानं केका घुमवला नी दहिवराचा चिलमन बाजुला सारत केशरी ,तांबडी आभा फुटू लागली.तुराटखेड्यात लवकर दळण घ्यायला आलेल्या दिवाण्याच्या म्हातारीनं एकच गिल्ला करत खळ्यात सारं तुराटखेडं गोळा केलं. ठाणे अंमलदार दिनू शिंदे,डाॅ.वसंता डोळे चोळतच आले.पाडूच्या चोळामोळा व शिजलेल्या कलेवराला पाहताच सुन्न होऊन खाली कोसळू लागले.लोक घोळक्या घोळक्यात 'जास्त दारूनंच पडतांना शाॅक लागून पट्ट्यात फेकला व पुलीत अडकला असावा' बोलू लागले.पांडूचे तिन्ही भाऊ छाती पिटू लागले व आकांत करत

"दिनू,वसंता काय झालं रे पांडुला?" विचारू लागले.पण दिना शिंदेला उद्या काय घडणार‌ हे कुठं माहीत होतं!


===================


# झिनी


      भाग::--तिसरा


    आज दिवसभर आभाळ मेंढी अभ्रानं झाकोळलेलं होतं.सर्वत्र झगार(पावसाची अंधारी)दाटलेली होती.मेघातून खळ्या गाळणं सुरुच होतं.बेमोसमी पावसाचं वातावरण माघात तुराटवाडीकरांना अनबक वाटत होतं. हे आभाळ सर्व रबीच्या पिकांचं नुकसान करेल असा विचार करत असतांनाच लोकांना पांडू राऊत गेल्याचं दुःख आभाळ करतंय असं वाटत होतं.सकाळी दहालाच चोळामोळा होऊन शाॅकनं शिजलेलं पांडुचं कलेवर नाल्याच्या काठी दहन करण्यात आलं. दिना शिंदे ,वसंत सामंत सोबतच आसवं गाळत परतू लागले. साऱ्या लोकासमवेत चंदरही परतला व प्रेतयात्रेकरिता आलेल्या वडिलांना पोहोचवण्यासाठी तालुक्याला घरी इच्छा नसतांनाही जावं लागलं.त्याला झिनीला भेटण्याची चुटबुट लागली होती.आई व वडीलांनी आज त्याला मळ्यात परतू दिलंच नाही. पांडूच्या मौतीनं गावात भितीमय वातावरण झालं होतं तर रात्री मळ्यात झिनी येईल म्हणून तो परतण्याची घाई करत होता.

  दिना शिंदे घरी आल्याबरोबर पेग चढवत झोपी गेला.सायंकाळी तो आज डाॅ. वसंताकडं फिरकलाच नाही.संध्याकाळी पुन्हा अंघोळ करून तो न जेवताच चौकीवर गेला.

चौकीवर रघू मिसाळ,सिदप्पा जगताप हजर होताच.त्यांना त्याने खंबा व कोंबड्याची सोय करावयास लावली.कधीही ऊसाच्या कारखान्यातील मळीपासून बनणारी देशी, तर कधी मव्हाची कॅन,तर कधी व्हिस्की,ब्रॅन्डी, बीयर उपलब्ध केली जाई.चौकीच्या पुढं कनकाई डोंगराच्या घाटावर कनव्हाय पाॅईंट होता .तेथून घाट चढला की आठ-दहा किमीवर दुसऱ्या राज्याची सिमा लागे .परंतू याच रस्त्यानं ऊसाच्या ट्रक,भाकड गुराच्या गाड्या,गावठी मद्य तर कधी रानातील ऐवजाची वाहतूक चाले .म्हणुन दिना शिंदेचं चांगलच फावत असे.त्याची डाॅ. वसंत सामंत व इतर अनेक मोठ्या राजकीय, सामाजिक,हस्तीत कायम उठबस चाले.

 चौकीवरच त्यानं बराच वेळ पित पांडूबाबत विचार करत घालवला.तिकडं कोंबडं फटकारलं गेलं.जेवण आटपून

सिदप्पा, व मिसाळला घेत महिंद्रा जिप नं गस्तीला घाटाच्या कनव्हाय पाॅईंटकडं एखादं बकरं मिळतं का म्हणुन तो निघाला.जीप चौकीपासुन उत्तरेला घाटाकडं निघाली.तेथून दोन अडिच किमीवर पराटखेड्याचा फाटा फुटे तर सरळ पुढे जाऊन घाट लागे.अजुनही टपोरे थेंब अधुन मधुन पडतच होते.हवेत गारवा होता.चांद आज मेघाआडच होता.मिसाळ गाडी चालवत होता.तुराटखेड्याची वस्ती मागे पडताच सुनावा लागला.मध्येच एखादा ऊसाचा ट्रक येई.गाडी घाट जवळ करु लागली.तोच गाडीच्या उजेडात रात्री अकराच्या सुमारास रस्त्यावर बाई चालत असल्याचं लक्षात येताचं शिंदेनं मिसाळला इशारा करत गाडी उभी करायला लावली.कचकच करकर आवाज करत गाडी उभी राहिली.गाडीच्या उजेडात विशी -बाविशीतली पोटूशी सुंदर बाईला पाहताच शिंदेला थंडीतही झिंग वाटली.

"कोण गं तू?आणि या बेवक्ती कुठं चालली",शिंदेनं दरडावून विचारलं.

"मी रख्मा!ऊस तोडणीला आलोत जी!अनकाई टेकाडावर तांडा पडलाय आमचा!तुराटखेड्यात गेली होती"

ऊस तोडणीचा सिझन असल्याने रानात अनेक तांडे मुक्कामाला असतात हे शिंदेला ठाऊक होतं.कधी दळण दळणं,बाजार करणं, तर कधी गाडी भरून ते मुक्कामाच्या ठिकाणी परतत पण एकटी बाई इतक्या उशिरा सहसा नाही.

"ते ठिक पण कशाला गेली होती गावात ?इतका उशीर का?सोबत कुणीच कसं नाही?"शिंदेनं पोलिशी खाक्यानं सरबत्ती सुरू केली.

"जी दिस गेलेत!बरं नव्हतं गावातल्या डाॅक्टराकडं गेली होती.त्यांनी सलाईन चढवली गुंगी आली झोप लागली.मग बराच उशीर झाला."

 शिंदे आता गाडीतनं खाली उतरत हात झटकत बाईकडं बारकाईनं पाहू लागला.

"डाॅ.सामंताकडं गेली होती का?,सोबत कोण होतं?"

"जी.डाॅक्टर वसंत सामंत असंच नाव होतं.आमचे घरचे सोबत होते पण सलाईनला उशीर होईल म्हणून डाॅक्टरांनीच त्यांना तो पावेतो तुमची इतर कामं करून दोनेक तासांनी या असं सांगत त्यांना पाठवून दिलं बाहेर.मग मला जाग आली तेव्हा सलाईन संपली होती व घरचे ही इतर कामं आवरत परतली होती.मग निघालो पण त्यांनी तु चाल पुढं मी येतोच मागणं असं सांगत दारूच्या गुत्त्यावर बसुन गेले.येतीलच आता ते.तो पावेतो मी हळूहळू येथपावेतो आली.जर का एखादं वाहन आलं की मी जाईन पराटवाडीकडंन टेकाडावर." बाई शिंदेच्या नजरेत नजर टाकत उत्तरली.

साला वसंतानं पांडु मरायला काही तास होत नाही तोच या बाईची 'झिनीसारखीच गत केली.काय लोचट माणूस आहे हा.हिला वाटतंय आपल्याला सलाईनची गुंगी आली पण त्यानं हिला गुंगीचं औषध देऊन हिच्या दादल्याला बाहेर पिटाळलं..."

त्यानं पुन्हा बाईकडं हेतूपुर्वक पाहताच पुसटशा उजेडातही वसंताला ही दोष देऊन उपयोग नाही हे मनोमन ताडलं.बाई त्याच्याकडंच पाहत होती.

"तुराटवाडीहून जवळचा रस्ता सोडून फेऱ्याच्या रस्त्यानं का जातेय" आता रघू मिसाळानं गाडीतूनच दरडावत विचारलं.

"जी त्या रस्त्यानं फडातून जनावराची भिती वाटते जी!शिवाय हा फेऱ्याचा असला तरी सुरक्षित व वाहन भेटेल म्हणून"बाईनं शिंदेवरची नजर स्थीर ठेवत रघूकडं न पाहताच सांगितलं.

"ठिक आहे पुढं फाट्यावर तुझा नवरा येईपर्यंत थांब मगच जा.एकटी नको जाऊ"सांगत मिसाळाला गाडी स्टार्ट करायला लावली पण गाडीत बसतांनाही त्याला वसंताचा हेवा वाटला.

 घाटावरील कनव्हाय पाॅईंटवर शिंदेनं आणखी रिचवली.थोडं थांबल्यावर त्यानं मनात काही गणित जमवत सिदप्पाला व मिसाळाला जास्तीची पाजत तिथंच प्यायला बसवलं.त्यानं गाडी स्टार्ट करत "हेल्यांनो किती प्याल !प्या मी चाललो गस्तीला"म्हणत गाडी चौकीकडं हाणली.

पण चौकीच्या रस्त्यावर पराटखेडे फाट्यावरच त्यानं गणित आखल्याप्रमाणं म्हणा वा बाईचं नशीब थोर म्हणा तिच रख्मा त्याला उभी दिसली.

"गाडी थांबवत "काय गं तू अजून गेलीच नाही का?नी तुझा नवरा अजून आलाच नाही का?"

"कसं जाणार!तूम्हीच तर म्हणाले होते की एकटी जाऊ नको,नवऱ्याची वाट पहा, नी आमच्या माणसाचं कसं असतं साहेब की एकदा गुत्त्यात बसले की त्यांना पोरंसोरं,बाई ,संसार साऱ्यांची याद पडते"

शिंदेला तिच्याकडं पाहून इतकी सुंदर बाई नी रानावनात ऊस तोडतेय!काय नशीबाचा खेळ असतो.

"चल बस गाडीत मी पोहोचवतो तुला"

रख्माला मनोमन' आपण टाकलेले दाणे टिपण्यासाठी पाखरू पुढं सरसावलंय'याची जाणीव झाली.म्हणून शिंदेनं मागे बसायची खुण करूनही ती ड्रायव्हर सीट जवळ पुढेच बसली.

शिंदेनं फाट्यावर गाडी वळवत पराटखेड्याकडं न वळवता घाटाकडंच नेली.

"साहेब फाटा मागं चाललाय नी आपण गाडी कुठं नेताय?"रखमा वरवरचं आश्चर्य व भिती दाखवत विचारू लागली.

"घाबरू नको हा रस्ता कनकाई डोंगरावरनं पराटखेड्यावरून अनकाई टेकाडावरच जातो.फेऱ्याचा आहे पण माझी गस्त पण होईल व तुला पोहोचवणं पण"शिंदे रख्माकडं पाहत म्हणाला.

"जी कुठूनही चला पण लवकर पोहोचवा"रख्मा सीटवरनं जवळ सरकत म्हणाली.

घाटातल्या कनव्हाय पाॅईंटच्या अलिकडनं कनकाई डोगरात वरच्या निर्जन जंगलात जाणारी एक आडवळणाचा कच्चा रस्ता होता.त्याकडं शिंदे गाडी नेऊ लागला.आता बारा वाजायला आले असतील.नभातलं मेंढी आभाळ आता विरत होतं व थोडी कोर कमी चांद आकाशात आपला रुपेरी प्रकाश सांडू लागला.तशा घडा घडानं चांदण्या नभाला लगडू लागल्या.डोंगराच्या पोटा पोटानं कोरलेला रस्ता गाडीला वर वर नेत होता.आजुबाजूला पक्व होऊन पिवळं झालेलं रोशा गवत वाऱ्यावर लाटेप्रणानं डुलत होतं.वरती डोंगरावर सागाची झाडं तर खालच्या अंगाला मध्ये मध्ये मव्हाची व आंब्यांची झाडं ओल्या अंगानं कुडकुडत शांत उभी होती.आता शिंदेचा हात गियरवरनं रखमाकडं सरकत होता तर रखमा ही मंद हसत त्याच्याकडं पाहत सरकत होती.

"किती सुंदर वातावरण आहे!"रखमा म्हणाली.शिंदेला तेच हवं होतं

 वरती पठार लागताच शिंदेनं गाडी उभी केली.

"साहेब रस्ता चुकलात वाटतं?"रख्मानं विचारलं.

कारण मिळताच"तसंच वाटतं!पण तू घाबरू नको इथून जरी गाडी पुढं जाणार नाही पण पायवाटेनं थोडं उतरलं की आलंच तुमचं ठिकाण",शिंदे म्हणाला व तिचा हात पकडत तिला खाली उतरवलं.

पकडलेला हात तसाच ठेवत ती त्याच्या सोबत चालत पायवाटेनं उतरू लागली.

"असंच चालत रहावं आपल्यासोबत या चांदणचुऱ्यात! "रखमा आपला श्वास वाढवत म्हणाली.

"काय गं तुझ्या बोलण्यावरून व दिसण्यावरून तू ऊस तोडणारी मजूर वाटत नाही!"

"मग?"

रख्मा थांबत हसत विचारती झाली नी शिंदेचा दारूच्या झिंगेतला संयम खचू लागला त्यानं तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला.

त्याला थांबवत " पुढं मोहोळ आंबा आहे.निवांत त्याच्या खाली बसू." रख्मा म्हणाली.

"का गं तुला कसं माहीत मोहोळ आंबा?"दारूत असला तरी शिंदेला प्रश्न पडलाच.

"साहेब आम्ही रानोमाळ फिरणारी माणसं,ज्या गावात जातो तिथली सारी माहिती भटकतांना आपोआप कळत, समजत जाते" रख्मानं त्याचा हात घट्ट दाबत आंब्याची वाट धरली.

मोठा विस्तारलेल्या या जुन्या झाडावर कायम आग्या मोहोळाची गाड्याच्या चाकाच्या आकाराची दोन तीन पोळे कायम असायची.मधमाश्याच्या भितीनं सहसा कुणी या आंब्याजवळ दिवसा येतंच नसे.

 शिंद्याला आता थंडीनं दारुची किक बसायला सुरुवात झाली होती.गाडीतली बिनतारी संदेशयंत्रणावरचे संदेश ही त्याला समजत नव्हते व तो आंब्याकडं आल्यावर अंतरामुळं ते ऐकू येणं ही बंद झालं.

वातावरणात थोड्याशा पावसानं व उंचावरच्या ठिकाणामुळं जोराची थंडी व धुकं उतरू लागलं.तसा शिंदे रखमाला चिकटू लागला.

"थंडी वाजते हो. आधी काही तरी पेटून जाळ करा"रखमा लाडात येत म्हणाली.

"अगं वरती मोहोळाची पोळी आहेत.जाळ केल्यानं उठलेत तर ?"शिंदे त्या ही अवस्थेत थोडी सुध सांभाळत बोलला.

"हवं तर आब्यांच्या झाडापासून दूर करा जाळ"रखमानं आता त्याला जवळच ओढलं होतं.

त्यानं हा ना म्हणत काड्या व पालापाचोळा गोळा करायला सुरवात‌ केली. दिवस भराच्या पावसाच्या टपोऱ्या थेंबानं पाचोळाही ओला होता.म्हणुन आंब्याच्या खालचा पालापाचोळा व काड्या गोळा करून झाडापासून लांब अंतरावर नेला पण तरी वासनांध शिंदेला वारा काय करणार होता हे कळतच नव्हतं.

खिशातनं लाईटर काढतांना पडलेला मोबाईल रख्मानं न कळू देता बंद करून दूर गवतात भिरकावला. लाईटरनं शेकोटीनं पेट घेतला तसा शिंदेचा आतील जाळ ही चेतू लागला पण रख्माचा सूडाग्नी त्याहून जोरात पेटला.शेकोटीनं जोराचा धुराचा गराडा करत वाऱ्यानं धूर आंब्याच्या झाडाकडं वेगानं वाहू लागला.तशा आंब्याच्या झाडावरील मोहोळातील मधमाशा भणाणल्या.त्या वेगानं शिंदेकडं झपाटल्या. एक, दोन, दहा, शंभर, हजारो मधमाशा क्षणात शिंदेच्या मदणाने पेटलेल्या शरिराचा चावा घेऊ लागल्या.रख्मा लाल होत त्याला गच्च मिठी मारत "मेल्या कुत्र्या दिन्या ओळखलं का मला?पोटुशा पोटावर पोलीशी दंडुक्यानं मारत होतास ना तू!लांडग्यांनो सारी आग शांत करूनही ,लचके तोडून ही माझ्या पोटावर किती वार केलेत रे तुम्ही?"

या बोलण्यानं शिंदे शुद्धीवर येत क्षणात धुंदी उतरवत विचारू लागला.

"कोण झिनी तू?" 

"कुत्र्या, हो .मी झिनीच!"

मधमाशांना हाकलत सैरावैरा लोळणाऱ्या शिंदेला मधमाशांच्या चाव्यापेक्षा 'झिनीचा हा डंख जिव्हारी लागत होता‌.

तो इकडे तिकडे पळू लागला.पण झिनीनं -पारध्यानं सशाचं मानगुट पकडावं तसंच त्याचं मानगुट पकडत त्याला हवेत उचलून धरला.धूराचा गराडा वाढला तशा साऱ्या मधमाशा तूटून पडल्या.तो हवेत कपडे फाडत लाथा झटकू लागला.

"मेल्या पांडू कुत्र्याच्या मौतीनं ही तुला सुध आली नाही.वसंताच्या सलाईनचं नाव काढताच झिनी आठवली तरी तू जाळ्यात अडकला.मर आता."

हजारो डंखांनी तो विव्हळत फाटलेल्या खिशात मोबाईल शोधू लागला. तो न मिळताच गाडीकडं जाता यावं म्हणुन केविलवाणा प्रयत्न करू लागला पण झिनीची हाताची पकड ढिली झालीच नाही.

पहाटे पहाटे साऱ्या गांधीलमाशा, मधमाशा आपले काटे शिंदेच्या कपडे फाटलेल्या शरिरात सोडत पसार झाल्या झिनीनं त्याला आंब्याखाली आणत काठीनं पोळं फोडलं तसं मधाची धार खाली शिद्याच्या शरिरावर पडली.उशिरानं रानातलं अस्वल फिरत फिरत वासानं आलं.पण त्यानं मधासोबत त्राण शिल्लक असलेल्या शिंदेच्या हालचालीनं चवताळत हाताच्या पंज्यानं ओरबाडत नाक कान तोडले,डोळे फोडले नी झुंजूमुंजू होताच रानात पळालं पण त्या आधीच झिनी चंदर नसलेल्या मळ्यात मिरचीतल्या बुजगावण्यात विसावली.पुढे डाॅ. वसंताचचे उपचार घ्यायला तिला जायचं असल्यानं.

 सकाळी सकाळीच मिसाळ व जगतापांनी शिंदेला बिनतारी संदेश वरून व नंतर मोबाईल वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ झाल्यानं ते मिळालं त्या वाहनानं चौकीत व नंतर गावात परतले.घरी पण तपासाअंती शिंदे न मिळाल्याने पुलीस यंत्रणा व घरचे चक्रावले. दुपार पर्यंत फिर फिर फिरल्यावर कनकाई डोंगरावर जीप मिळाली व नंतर मोहोळ आंब्याखाली शिंदेचं मधमाशांनी चावलेलं व नंतर अस्वलाने फाडलेलं कलेवर...

लगातार दोन दिवसात दोन घटनांनी तुराटवाडी सुन्न झाली.पण तरी साऱ्यांना अपघातच दिसत असल्यानं पोलीसात जाण्याचा प्रश्नच नव्हता.

  चंदर सायंकाळी आला व शिंदेंची प्रेतयात्रा आटोपत सरळ मळ्यात परतला व कालचक्रात कोण कधी व कसा जाईल हे कुणीच सांगू शकत नाही असा शाश्वत विचार करत रात्र केव्हा होईल व झिनी केव्हा येईल याची आतुरतेने वाट पाहू लागला.

पण....

वसंता....?

त्याला पांडू व शिंदे दोन दिवसात अचानक गेल्यानं शंका आली पण आपणच प्रकरण उकरलं तर आपणच उघडं पडू म्हणुन शांत बसायचं ठरवूनही जिवाला शांतता लागत नव्हती...


   =================


#झिनी#


      भाग::-- चौथा


  रात्री पुन्हा जोरदार गारासहीत बेमोसमी पाऊस बरसू लागला.वादळ, विजा, मेघाचा घनघोफ घुमू लागला.अनकाई- कनकाई डोंगराकडनं तीव्र प्रकाशाचा लोट चाटून गेला नी सारं शिवार दणाणलं.गारांनी मिरच्यांनी लगडलेल्या डहाळ्या जमिनदोस्त होऊ लागल्या.बोरांचा, पानाचा पथारा जमिनीवर पडत पाण्यात वाहू लागला तर काही वादळात उडू लागला.पण चंदरला होणाऱ्या नुकसानीपेक्षा व राऊत ,शिंदेच्या जाण्याच्या दु:खापेक्षाही आज झिनी पावसाची मळ्यात येईल की नाही याचीच जास्त काळजी वाटत होती.आज ती आली म्हणजे तिला सारं विचारायचंच या निर्धारानं तो वादळी बेमोसमी पावसातही मळ्यातील झोपडीत वाट पाहत बसला होता.आज त्यानं घेतलीच नव्हती.कारण दोन दिवसात गावात झालेल्या मौतीनं अड्ड्याकडं जाणं त्याला शिस्तीचं वाटलं नाही.

अकरा -साडे अकराला आकाश खुललं व घडीचा स्च्छ धुतलेला नितळ चांद दिसू लागला.तशी ऊसाच्या फडाकडनं छनछन कडकड घुमली.चंदर बाहेर आला.थंड वाऱ्याची जोरदार लहर त्याच्या अंगात दौडली.नाल्याकडनं टिटिव टिटिव आवाजाची कर्कशता घुमताच झिनी ओल्या वाटेवरनं येतांना दिसू लागली.त्याची धडधड वाढली.

झिनी ओलेत्या वस्त्रात चांदाच्या फिकत आभेत रमणीय वाटत होती.

"इतक्या पावसातही आलीस?"चंदरला ती आल्याची खुशी वाटूनही काहीतरी विचारून त्यानं बोलण्यास सुरवात केलीस.

"गावात जायचं होतं वसंता डाॅक्टराकडं!"

"अगं आज जाऊनही ते भेटणार नाही तुला!कारण गावात काल व आजही मौत झालीय"

"माहितीय मला पण तरी जाणं भागच होतं. पण त्या धावजीबानं काहीतरी गडबड करु ठेवलीय" झिनी विरुद्ध दिशेला तोंड फिरवत दात ओठ खाऊ लागली.

"झिनी! ये झोपडीत ,किती तरी कालखंडानंतर भेटतोय आपण !परवा ही घाईत निघून गेली.सांग ना तू इथं कशी आलीस ?"

"चंदर साऱ्या आयुष्याचा फालुदा झालाय बघ!काय सांगू तुला?"

"अगं पण शहरात राहणारी नी या आड रानात कशी?"

"अरे आडरानात म्हणजे लग्न झालंय माझं लाखाशी!पण चंदर लग्न होऊनही...,"झिनी काहीतरी टाळत होती.

लग्न म्हणताच चंदरला एकदम भकासपणाची जाणीव झाली.

त्यानं झिनीचा हात हातात घेण्यासाठी आपला हात पुढे केला तोच चटका बसावा त्या वेगानं झिनी झोपडीच्या कुडाकडं मागं सरकत "चंदर नको ,खाक होशील!"म्हणाली

"झिनी!ऐक , सविस्तर तरी सांग."

झिनीच्या डोळ्यात धारा वगळू लागल्या. तिला कुठून सुरूवात करावी व कुठपर्यत बया करावं हे कळेना.

.

.

.

शांत..

.

.


स्तब्ध

.

.

.

झिनीनं सुरुवात केली.

बापानं दुध प्यायला येणाऱ्या पोराकडं पोर झुकतेय हे लक्षात येताच अल्लड पोरीला समजावण्याचा प्रयत्न केला पण झिनी जरी काही बोलेना तरी पोराचं आकर्षण ही कमी होईना.म्हणुन बापानं तडकाफडकी काही निर्णय घेतला.त्याच्या डेअरीवर लाखा नावाचा अनकाई टेकाडावरचा मुलगा दुध पोहोचवायला येई.काठेवाडमध्ये बापाचा चांगला जम.पण पुर्वापार व्यवसाय म्हणुन लाखा दोन-तीनशे गाई सांभाळत दुधाचा व्यवसाय करी.मुलगा सुस्वरुप व हुशार.बापानं याच्याशी झिनीचं लगोलग लग्न लावून दिलं.

झिनीनं भरपूर कालवाकालव व विरोध केला.बापाचा मारही खाल्ला पण व्यर्थ.झिनी लग्न करून अनकाई टेकाडावर आली.

लाखा लग्नाच्या एक वर्ष आधी आजारी पडला होता.जवळपास एक महिना.वाचणार की नाही अशी गत तेव्हा आई-बापांनी त्यास कुलदैवत देवीवर नेत "देवीमाता पोरगा वाचू दे संसार फुलू दे लग्नानंतर कोऱ्या जोडप्यासहित दर्शनाला यात्रेत पाठवू"असा नवस बोलले व औषधोपचार ही केले.लाखा सुधरला .लग्नानंतर देवीची यात्रा अजुन चार महिना होती.म्हणून लाखास त्याबाबत जाणीव करून देत पथ्य बाळगण्यास सांगितले.लग्नानंतर झिनी या आडरानात आली पण उघड्यावरच्या या भटक्या जिन्याची तिला अजिबात सवय नसल्यानं पाणी, गाई- गुरांचा वास, डास यानं आठ दिवसात ती आजारी पडली.

लाखानं तिला आपल्या फटफटीनं तुराटवाडीतल्या वसंता डाॅक्टराकडं नेलं.

वसंता नी लाखाचे जवळचे संबंध होते.कारण डाॅक्टराच्या शेतात लागणारं खत लाखाकडून पुरवलं जाई.तसेच शेतीकामास लागणारे गोऱ्हे ही लाखाकडुनच विकत घेतले जात.दुध घेतलं जाई.बदल्यात सामंताच्या मळ्यातलं पिण्याचं पाणी रात्री पहाटे केव्हाही भरण्यास लाखा व इतर काठेवाडींना सुट होती.तसेच साऱ्या जंगलात ऊस तोडल्यावर वा केळ्याचा पाडा पडल्यावर गुरांना चराई करता येई.म्हणुन लाखा व डाॅक्टर यांच्यात घरोब्याचे संबंध होते.

    झिनीला दवाखान्यात सध्याकाळी लाखानं नेताच दोघांना राहत्या घरून आधी जेवण झालं मग वसंतानं झिनीला दवाखान्यात सलाईन लावली.लाखास दूध द्यायला जायची घाई असल्यानं त्यास जायला लावलं.सलाईन मध्ये कसली कसली इंजेक्शनं मिसळली गेली तशी नव्या नवेली नवरीस -झिनीस झोप दाटली.दोनेक तासांनी सुध आली तेव्हा अस्ताव्यस्त केस व कपडे सावरत झिनी उठली.तोच लाखा आला .परततांना वसंतानं "वहिनीस विषमज्वर झालाय .चार पाच दिवस सलाईन द्यावी लागेल लाखा.दररोज याच वेळी आण.दिवसा गर्दी असते"सांगत भरल्या तृप्त मनानं निरोप दिला.झिनीची झोप होऊनही अंग ठणकू लागलं.रस्त्यात लाखा तिला डाॅक्टर व माझे संबंध किती चांगले आहेत याबाबत वाडा येईपर्यत गोडवे गात होता.झिनी लागणाऱ्या दचक्या बरोबर पुढे सरकताच देवीचा नवस आठवून लाखा अंतर राखत होता.यात्रेत नवस फेडे पर्यंत कोरं झोडपं राहण्यासाठी.पण पुढचे चार दिवस वसंताची ट्रिटमेंट मात्र तशीच सुरू राहिली.जी लाखालाच काय पण झिनीला देखील समजली नाही.चार दिवसात तब्येतीत उतार न मिळाल्याने लाखानं झिनीला तिच्या माहेरी नेलं व चांगल्या दवाखान्यात उपचारासाठी ठेवलं. विषमज्वर व मलेरिया नं पुर्ण बरी व्हायला झिनीला पंधरा वीस दिवस गेले.त्यानंतर आराम करत दिड एक महिन्यात झिनी परतली.

   झिनी येताच डाॅक्टरच्या आता अनकाई टेकाड्यावर दुध घेण्यासाठी, खत घेण्यासाठी तर उगाच लाखाला भेटण्यासाठी वारंवार फेऱ्या होऊ लागल्या.ही बाब त्याचे मित्र पांडू व शिंदेलाही समजली.ते ही झिनीला व तिचं सौंदर्य पाहण्यासाठी वसंता सोबत घिरट्या घालू लागले.निष्पाप झिनीला वसंताची नियत कळायला बरेच दिवस लागलेत.निसर्गानं आपलं दान देण्याचं कर्तव्य चोख बजावलं.झिनीला उलट्या होऊ लागल्या.दुपारी एक दोन म्हाताऱ्या वगळता सारी गुरामागं गेलीली.नेमका त्याच वेळी वसंता गाडीला बॅग अडकवत पराटखेड्याकडनं परतत वाड्यात आला.उलट्या करणाऱ्या झिनीला म्हतारीने त्यास दाखवलं त्यानं तपासणी करत "वहिणी आनंदाची बातमी लाखास लवकर कळवा "म्हणत इंजेक्शन भरलं व एका हातात घेत दुसऱ्या हातानं..

झिनीला वसंताचे शब्द झिणझिण्या आणत असतांनाच वासनांध स्पर्शाची जाणीव झाली.क्षणात ती वाघिणीगत चवताळत वसंताची घाणेरडी नजर‌ ओळखताच तिनं हातातलं इंजेक्शन झटक्यात आपल्या हातात घेत गुराच्या डाॅक्टरानं बैलाच्या ढोपरावर सुई मारावी तशीच क्षणात वसंताच्या कमरेत इंजेक्शन खचकन मारत वसंता कळ येऊन बोंबलत नाही तोच दोन चार मुस्काटात लगावत कनातीतून बाहेर आली.

वसंतानं इंजेक्शनची सुई काढत कमर व गालफडं गुपचुप चोळत नाटकी हसू आणत बाहेर येत म्हतारीला वहिणीस दिवस गेल्याची बातमी देऊन खाल मानेनं गाडीला कशीबशी किक मारत निघून गेला.

झिनीला वसंताचं कृत्य व त्यानंतर दिवस गेल्याची बातमी ऐकून छातीत धस्स झालं.लाखानं कधी हात लावला नाही.चंदरनं तर कधीच नाही.ना आपण कुठं शेण खाल्लं मग हे कसं?यानं तिच्या मेंदूला झिणझिण्या आल्या.

 संध्याकाळी म्हातारीनं सांगताच सारेजण लाखास तुच्छतेनं पाहू लागले.निदान यात्रेपावेतोही लाखानं पथ्य पाळलं नाही म्हणून त्यास कोसू लागले.पण त्यानं मौन पाळत रात्री झिनीला फैलावर घेतलं.

"झिनी सांग कुणाचं पाप हे?"

रागानं गच्ची आवळत तो गरजला.

झिनीनं डोळे वर चढवत दोन्ही हातानं हाताची पकड सोडवत "लाखा,तुझीच काय पण माझ्या आई-वडिलांची आण घेऊन सांगतेय मी घाण खाणारी अवलाद नाही,पण माझं मलाच कळत नाही की नेमकं काय घडलंय"

झिनीनं जीव तोडून सांगितलं पण लाखाचा विश्र्वास बसला नाही .त्यानं तिला जोराची लाथ घालत रागात बाहेर पडला.अंधारात तो किती तरी वेळ मुसमुसत रडला.पण त्यानं सारा दोष आपल्यावर घेत 'आपला संयम सुटला,आपण देवीचा नवस फेडेपर्यंत थांबलो नाही'असं दर्शवत चार चौघात झिनीची इज्जत वाचवली.पण झिनीला मात्र कायमचं दूर केलं.

त्या दिवसापासून तो झिनीला गुराचं आवरणं, सामंताच्या मळ्यातून रात्री पहाटे केव्हाही पाणी आणणं तर कधी तुराटवाडीत गुरांच दांड भरडण्यासाठी चक्कीवर पाठवणं अशी कष्टाची कामं सोपवत त्रास देऊ लागला.जेणेकरून ही माहेरी जाईल व आपण मोकळं.पण झिनीनं ही जिद्द बांधली आपण पाप केलं नाही तर मग हा दाग घेऊन नाहीच जायचं माहेरी.

लाखा वेड्यागणच राहू लागला.काम करणं ही बंद केलं .वाड्यावरच्या लोकांना खात्री झाली की देवीनंच याला पापाची शिक्षा दिली असावी व झिनीलाही मिळेलच.

इकडे वसंता झिनी एकटी कसी सापडेल याचा प्लॅन पांडू व दिना शिंदेला लावून आखू लागला.

 मळ्यात रात्री झिनी पाणी भरायला केव्हा येते हे वसंतानं पाळत ठेवून जाणून घेतलं.पांडू दिनाला सोबत घेत कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी शिकार करायचं ठरवलं.मळ्यात दुध लाखाकडूनच आणलं.धावजीबाला आज मळ्यातून घरी पाठवत सुट्टी दिली.तिघांनी दुध तापवत ठेवलं.पुनवेचा चांद आकाशात चांदणचुरा पेरत चढू लागला तसे हे ही तर्र झाले.दूध तर तापतच होते.दहा अकराच्या सुमारास पोटूशी झिनी डोक्यावर कमरेवर हंडे घेऊन आली.कोकरू येतंय याचा सुगावा लागताच जाळ मालवत यांनी दुधाचं पातेलं आडोशाला ठेवत तिन्ही लांडग्यांनी ऊसाच्या फडात दबा धरला. तीन लांडग्यांनी मिळून एका कोकरूची हारीनं निर्दय पणे शिकार केली.लचके तोडले.झिनी आरडा ओरडा करु लागताच तोंड बांधण्यात आलं. 

   "अरे या कोकरूस माहित नसेल पण दवाखान्यातच गुंगीचं औषध देऊन चार दिवस पारध केलीय मी पांडू!"वसंता बाजुला होत सांगत होता.सुध हरपायला आलेल्या झिनीला हे ऐकताच पोटातलं पाप कुणाचं हे समजलं.

आडोशाला ठेवलेल्या दुधात चांद पुर्णाकृती दिसेपर्यंत लांडग्यांचं ओरबाडणं सुरूच होतं.कोकरू अखेरचा दम टाकू लागताच लांडगे शुद्धीवर आले.त्या ही स्थितीत झिनी उठली व उसाच्या फडातून सरकत वाड्याकडं परतू लागली.लांडगे आता पातेल्यातलं दूध पित थोडा वेळ बसले.

झिनी निसटली.तिला आपल्यावरचं लागलेलं लांच्छन लाखास सांगूनच हा देह ठेवायचा होता.

दूध पिऊन लांडगे परतताच त्यांना जागेवर कोकरू दिसेना.ते घाबरले.ही जर परतली तर वाड्यात बातमी पसरेल म्हणून त्यांनी फडात शोधायला सुरुवात केली.

  एव्हाना काही झालं तरी परतायला उशीर का म्हणून लाखा तिकडनं नाल्या पर्यंत झिनीचा तपास करायला येतच होता.चांदण्यात लाखा दिसताच झिनीनं हंबरडा फोडत लाखास "लाखा, घाण मी नाही खाल्ली रे!पण तुझ्या या हरामी मित्रानं ......,"सारं बया करत ती हाफू लागली.

  लाखानं सारं ऐकताच झिनीला छातीशी लावत तो ढसाढसा रडू लागला.पण क्षणात अंगार फुलावा त्या प्रमाणं हाताला सोटा सावरत त्यानं झिनीला तेथेच बसवत मळ्याकडं दौड धरली.

झिनी त्याला परत फिरवू लागली पण तो पावेतो तो निघून ही गेला.

 तोच ऊसाच्या फडातून दुसऱ्या बांधाकडनं हे तिन्ही लांडगे झिनीजवळ आले.झिनी मोठ्या कष्टानं उठत पळण्याचा प्रयत्न करू लागली पण

पण..

पांडू व दिनानं पोठावरच काठ्या टाकत झिनीचा श्वास तुटेपर्यंत बेदम मारलं.

मळ्यात हे न दिसताच लाखा परतू लागला.तोच फडातून अचानक हल्ला झाला.एकीकडं तीन मदमस्त लांडगे तर दुसरीकडे लाखा एकटा तरी लाखानं त्यांची डोस्की फोडत तिघांना मारूतीगत लाल केलं.पण वर्मावर मार बसताच लाखानं ही लोळण घेतली .मग बराच वेळ मार बरसतच होता.

नंतर त्यांनी त्याला उचलत नाल्या पल्याड खोल खड्डा करत पुरला.व नंतर झिनीला उचलत वसंताच्या मळ्यात व सराफाच्या मळ्यात जो सामाईक बांध होता त्यात एक नाल्याची वहन होती.त्यातून यांच्या शेतातली माती व खत सराफाच्या मळ्यात वाहून जाई म्हणुन सिमेंट चा बंधारा बांधण्याचं काम चालू होतं.त्या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात टाकत झिनीला पुरलं.

 पहाटे तिन्ही लांडगे टेकाडावरच्या वाड्यात परतत त्या लोकांना झिनी तिच्या माहेराकडच्या कुणा माणसाबरोबर सापडली म्हणुन लाखानं तिला जागीच तोडली.तो माणुस पळून गेला असं लाखाला वाटलं पण अंधारातून त्यानं परतत लाखालाही उडवलं.दोन्ही प्रेतं पुरलीत.आम्ही मळ्यात कोजागरीसाठी थांबलो होतो उसाच्या फडात लपुन सारं पाहिलं.

  वाड्यातली माणसं बिथरली.त्यांना यांनी उलटसुलट सांगत जास्त घाबरवलं.शेवटी सकाळ होताच त्यांनी तालुक्यातून गाड्या आणत सामान भरलं व काठेवाडात प्रयाण केलं.बाकी माणसांनी गाई हाकलत नेल्या.उगाच पोलीसाचा ससेमिरा नको.झिनी व लाखा देवीच्या कोपाने वा त्यांच्या पापानं गेलेत असा समज करून मूग गिळत निघून गेले.तर झिनीच्या वडिलांनी हे चंदरचंच काम असावं समजत तो ही काठेवाडात निघून गेला.

झिनीनं बया करताच चंदरच्या डोळ्यात अश्रूंसोबत आग वाहू लागली.

पांडू व दिनाला देवानं बरोबर शिक्षा दिली असं त्याला वाटलं पण ते झिनीलाच ठाऊक होतं.

वसंता आता तुला मी ही सोडणार नाही चंदर गरजला.झिनीला तेच हवं होतं.चंदरची मदत.धावजीबानं गोंधळ करून ठेवला होता . नाही तर तिनंच वसंताचा एव्हाणा बार भरला असता.


अनकाई कनकाई डोंगराकडनं सरकलेल्या विजेच्या लोडानं तिचं काम सोपं केलं होतं .आता चंदर तिच्या सोबतच राहणार होता.


       =================


#झिनी#


    भाग ::-- पाचवा


 मांजरांच्या पंज्यात उंदीर गावणारच आता अशी गत असतांनाच अचानक उंदीर बिळात घुसल्यानं मांजर बिळाजवळून आल्या पावलांनी परत फिरावी तशीच झिनी काल रात्री चंदरच्या मळ्यात परतली होती.पण विजेचा प्रचंड आगिठा घेऊनच.कारण उंदराला बिळातून बाहेर काढण्यासाठी तिला आता आपल्या चंदरची गरज होती व उंदराचा खात्मा केल्यावरही तिला चंदर कायमचाच हवा होता.

    पांडू पाठोपाठ दिना शिंदेही गेला हे कळताच लेकीच्या गावाला जाऊन बसलेल्या धावजीबास चैन पडेना.कारण आज आपण येथून हललो नाहीत तर डाॅ.वसंताही हमखास शिकार होईलच व आपण तात्यासाहेब सामंताच्या घरचं मिठ खाल्लंय.त्या मिठाला जागणं हे आपलं कर्तव्यच आहे , शिवाय चंदरलाही धोका आहेच.म्हणून ही पळपुटी वृत्ती आपणास सोडावीच लागेल.असा विचार करत दुपारीच धावजीबा दिना शिंदेच्या प्रेतयात्रेला धावतपळत तुराटखेड्यास आला व तेथे आलेल्या तात्यासाहेबांना बाजुला घेत स्मशानातच 'चंदरनं बांध काढतांना झिनीच्या कवठीचं बुजगावणं कसं उभारलं व त्यानंतर सलग दोन दिवसात झिनीनं पांडू राऊताला व दिना शिंदेला कसं गिळलं व आज आपल्या वसंताच्या जिवीतास कसा धोका आहे हे समजावलं.सत्तरीकडं झुकलेल्या तात्यासाहेबांना आपल्या इमानी नोकरांच्या खुलाशानं परिस्थीतीचं गांभिर्य कळताच त्यांनी प्रेतयात्रा आटोपून परस्पर जीपनं मांत्रिक बाबास गाठलं व चार वाजेपर्यंत त्यांना तुराटखेड्यास आणलं.मांत्रीक बाबानं लगोलग सामंताच्या मळ्याचं जो आता चंदरला विकला होता निरीक्षण केलं.पण झिनीच्या प्रभावानं धावजीबा व मांत्रिक बाबास मळ्यात जाणं मुश्कील झालं.बाबास कळून चुकलं इथं की पूर्ण तयारीशिवाय मळ्यात पाय ठेवून बुजगावण्यास हात लावणं जिवावर बेतणारं ठरेल.म्हणुन त्यांनी परतत तात्पुरतं दोन तीन दिवस वसंताला सुरक्षित ठेवत नंतर झिनीचा बंदोबस्त करायचं ठरवलं. ते आल्या पावली गावात तात्यासाहेबांच्या वाड्यावर परतले.सद्या वाड्यात नव्या बंगल्यात फक्त वसंताचा दवाखानाच होता.तात्याचं सारं कुटुंब तालुक्यालाच राहत होते.फक्त वसंता तेव्हढा येथं राहत तालुक्याला ये-जा करी.तो मात्र बऱ्याचदा दोन - तीन दिवस येथेच मुक्काम करी.वाड्याचं स्वरूप तसंच ठेवून पुढच्या भागात नविन बंगला बनवला होता पण बांधकाम झालं नी झिनी प्रकरण घडलं म्हणून तात्यांनी आपलं बिऱ्हाड तालुक्याला हलवलं.पण वसंता आपला डाॅक्टरी पेशा करण्यासाठी व दिना, पांडूची सोबत,पिणं खाणं व इतर गोरखधंदे म्हणुन गावातलं राहतं घर सोडून वाड्यातल्या(खळ्यातल्या)या एकांत जागी नविन बांधलेल्या बंगल्यात राहत होता.

बाबांनी दोन तीन दिवस वसंताला येथेच सुरक्षित ठेवण्याचं ठरवलं.कारण तालुक्याला नेलं तर कुटुंबातील इतरांनाही धोका आहे.त्यांनी एकाला पाठवत काही पुजेचं सामान लगेच मागवलं. धारेचा भला मोठा लिंबू,काळी बाहुली,हिरव्या मिरच्या अशा बऱ्याचशा वस्तुनं विधी करत वाड्यास चहुबाजुनं फिरुन त्या वस्तू दूर चौ रस्त्यावर टाकावयास लावल्या. व वसंताला कडक शब्दात बजावलं.

  "वसंता!, तू डाॅक्टर असल्यानं माझ्या म्हणण्यावर तुझा कदाचित भरवसा बसणार नाही .पण तरी मी परत येईपर्यंत तू रात्री या वाड्याबाहेर मुळीच पाय ठेवायचा नाही.कुणी कितीही बोलावलं वा अर्जंट पेशंट आला तरी.भले वाड्यातच त्याला आणावयास लावून ट्रिटमेंट दे.शिवाय रात्रीचं कुण्या परक्या व्यक्तीस वाड्यात प्रवेश देऊ नको.ओळखीचा असला तरच वाड्यात घे",बाबानं वसंताला सारं समजावून सांगितले.

वसंतानंही पुजा व हे असलं बाबाचं सांगणं हे सारं नविन असल्यानं सारं त्यानं हसण्यावारी नेलं.पण तात्यासाहेब जवळ असल्यानं त्यानं फक्त हो म्हणत त्याकडं दुर्लक्ष केलं.

बाबा 'मी दोन दिवसात परत येतो'सांगत निघून गेले.तूर्तास धोका टळला म्हणून तात्यासाहेब ही निघून गेले.

त्या रात्री झिनी वाड्याजवळ आली पण तिला वाड्यात प्रवेश करताच येईना.उंदीर बिळाच्या तोडात दिसत होता पण तिचा नाईलाज होता.म्हणुन ती तशीच मळ्यात परत गेली.पण विजा, गारा, वादळ घेऊन तिनं दुसऱ्या रात्री बिळातनं उंदीर काढण्यासाठी चंदरला साथीला घेतलं.

 सकाळी नऊ वाजताच धावत पळत रघू व सिद्दपा यांनी वसंताला गाठलं.दिना शिंदेचं कलेवर पडलं होतं त्या ठिकाणी मातीत आंब्याखाली रघूच्या पोलीशी नजरेला रेघोट्या दिसल्या होत्या.त्यानं त्या सिद्दपाला बारकाईनं न्याहाळायला लावल्या होत्या.माशांच्या चावांनी व नंतर अस्वलाच्या हल्यानं दिना शिंदे पायाच्या टाचा घासुन मरतांना टाचांनीच काही तरी लिहून गेला होता.ते रघुनं बारकाईनं पाहीलं असता 'झिनी' ही अक्षरं दिसताच शिंदेच्या प्रेतयात्रे नंतर तो व सिद्दप्पा अनकाई टेकाडावर गेले.पण त्यांना त्या ठिकाणी ऊसतोडणी मजुराचा तांडा पडलेला दिसलाच नाही.त्यांनी मग काल रात्री गस्तीच्या वेळी दिसलेली बाई कोण? याचा शोध घेण्याचं ठरवलं. म्हणुन ते आज वसंता जवळ आले होते.

"डाॅक्टरसाहेब काल संध्याकाळी कोणी पेशंट आले होते का आपणाकडं?"

"पेशंट म्हणजे ?दररोज किती पेशंट येतात ,कुणाचं नाव सांगू?"

"तसं नाही डाॅक्टरसाहेब.पण पोटुशी बाई!कुणीतरी ऊसतोडणी मजूर?"

"पोटुशी? ऊसतोडणी मजूर? नाही.

पण का?" वसंतानं विचारलं

"चांगलं आठवा.संध्याकाळपासुन तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत?"

वसंतानं मेंदूला ताण देत काल या वेळेत कोण कोण आलं हे आठवून पाहिलं नी ठाम नकार दिला.

रघू व सिद्दप्पा आता गोंधळले.जर यांच्याकडे आली नव्हती व टेकाडावर नव्हती तर मग ती बाई कोण?

शिंदे साहेबांनी तक्ष मरतांना 'झिनी' लिहीलंय.मग झिनी असावी का?

पण रेघोट्या पायानं सहजही उमटू शकतात.कायद्यानं दोन दिवसातील घटनांना झिनी जबाबदार हे आपण ठोस सांगू शकत नाही.

"डाॅक्टर साहेब !सावध असा!पांडुचं शिजलेलं पुलीत चोळामोळा झालेलं कलेवर व अस्वलानं फाडलेलं शिंदे साहेबाचं कलेवर‌पाहता वरपांगी या घटना अपघात वाटत असल्या तरी यात कुठं तरी झिनी प्रकरणाचा वास येतोय.म्हणुन आपण सावधानताबाळगा"रघू व सिद्दप्पा जगतापांनी वसंतास सावध करत निघून गेले.

 आता वसंता कालच्या तात्यांनी आणलेल्या बाबाच्या व रघूव सिद्दप्पा यांच्या म्हणण्यावर हसावं की रडावं या संभ्रवावस्थेत पडला.त्यानं कपाट उघडत बाटली काढली व नीट मारली.मग दुसरी तिसरी...

तो झोपला तर सायंकाळी सातलाच उठला.सायंकाळी बाहेर बरेच पेशंट उभे होते.त्यांना कसंतरी तसाच तपासत औषधोपचार करू लागला.त्यापैंकीच पेशंटसोबत आलेल्या एकाला गावातनं जेवणाची व इतर सोय करायला लावली.तो बाबाच्या व रघूच्या सांगण्याचा मनात विचार करत तालुक्याला परतलाच नाही.पेशंट कमीहोताच आलेल्या जेवणाचा डबा झाकून ठेवत प्यायला बसला.पिता पिता त्याला दहा वाजले.पुढचा व मागच्या वाड्याचा दरवाजा लावून जेवण करून झोपावं असा विचार करत तो दरवाजा लावू लागला.पुढचा लावुनतोबंगल्यातून मागच्या बाजून वाड्यात उतरला.वाड.याच्या मागच्या बाजूला येताच 'कृष्णा' घोडा जोरजोरात खिंकाळू लागला.कावऱ्या बावऱ्या नजरेनं पाहत पुढच्या पायानं उभा राहत दोर खेचू लागला.जागच्या जागी थयथयाट करू लागला.वसंतानं खळ्याचं मागचं झापं बंद असल्याची खात्री केली.तोच खळ्यातील जुन्या लिंबाच्या झाडावरून पोपटाचा थवा मिठू मिठू करत उंच झेपावला नी त्याच झाडाच्या ढोलीतलं दिवांध रडवेल्या व भयाणकारी आवाजात घुत्कारू लागलं .वसंताला हा प्रकार अजब वाटला.तो वाड्याकडं परतू लागताच उंच उडालेला पोपटाचा थवा खाली झेपावत त्याच्या डोक्यावरून बंगल्याच्या पुढच्या दरवाज्याकडं धाब्यावरनं उडत निघाला.वाड्याचं लोखंडी गेट बंद करत तो बंगल्यात परतत असतांना कृष्णाचं जीव तोडून खिंकाळणं व थयथय करणं सुरुच होतं.एकवेळ वसंतानं त्याला शांत करत मागं पाहतांना त्याची नजर निंबाच्या झाडाकडं गेली.त्याला चमकणारे दोन डोळे दिसले.धुंदीत पक्षी असावा असं समजत तो बंगल्यात परतला.तोच बंगल्याचा पुढचा दरवाजा कोणी तरी जोरजोरात ठोठावत असल्याचा त.याला आ्आज आला.

"आलो आलो"म्हणत तो तिकडं जाऊ लागताच धुंदीत ही त्याला मांत्रीक बाबांचे 'अनोळखी माणसास आत घेऊ नको व तू ही बाहेर पाय ठेवू नकोस'हे बोल आठवले.तरी कोण आहे हे तर पाहू म्हणून तो दरवाज्याच.या फटीतून पाहू लागला.

बाहेर चंदर‌ दिसताच त्याला हायसं वाटलं व त्यानं दार उघडत "चंदर काय काम काढलंस रे या वेळेला?नी तू सध्या मळ्यातचराहतोस का,घरी नाही जात का?"विचारलं.

"डाॅक्टर साहेब सध्या मळ्यातच कामंं भरपूर म्हणुन घरी जाणं कमी झालंय"चंदरनं आत येत सांगितलं.

"बरं काय काम काढलंय?नी मळ्यातनं पायीच आलास का?"

"डाॅक्टर साहेब गाडी मळ्यातच बंद पडलीयम्हणुन पायीच आलोय, नी..." चंदर बोलावं की बोलू नये या विचारात पडत इकडे तिकडे पाहू लागला.

वसंताच्या ध्यानात येताच‌ कपाटातनं बाटली काढत ग्लासात ओतत त्यालाही देत "घाबरू नको,इथं माझ्याशिवाय दुसरं कोणीचं नाही म्हणुन काय काम आहे ते मनमोकळं सांग."चंदरला दारू सोबत धीरही दिला.

चंदरनं एक ग्लास मारत "डाॅक्टर साहेब एका अडचणीत‌ सापडलोय,मला आपली मदत हवीय" आता चंदरनं बाटली उचलत ग्लास भरून डाॅक्टरला दिला.पण त्या सोबतच बोलतांना टेबलाजवळच पडलेल्या औषधीतून कुठली तरी नेमकी गोळी चपखल शोधत चलाखीनं ग्लासात टाकत त्यांना दिला.डाॅक्टरला दररोज सोबतीला असणारे पांडू व दिना आज नसल्यानं चंदरची सोबत मिळताच हायसं वाटून त्यानं तो ग्लास घटाघटा घशात ओतला व आणखी खाली ग्लास पुढं करत "चदर मित्रा तुझं काम सांग आधी?"विचारलं.

चंदरनं लगेच आणखी गोळी टाकत ग्लास देत "डाॅक्टरसाहेब ,काम जरा नाजूक आहे,मळ्यात बाई आहे,दिवस गेल्यात,तिची तब्येत बिघडलीय तिला चालायला त्रास होतोय गाडीपण बंद पडलीय म्हणुन त्या ही स्थितीत आणली तिला पण चालणं अवघड झाल्यानं रस्त्यावर बसवून तुम्हास घ्यायला आलोय"चंदरनं एका दमात सांगितलं.

आता डाॅक्टराची बोबडी वळायला लागली.चंदरनं खिशातनं चाखणं काढत टेबलावरची इच्छीत पावडर मिसळली.ते चाखणं खात ,चंदरनं भरून दिलेले ग्लास रिचवत वसंता अडखळत बोलू लागला.

"चंदर तू मळ्यात बाई आणली!घरच्यांना ,गाववाल्यांना माहित नाही.आणली तर आणली वरून....अरे रे रे .बरं जाऊ दे मला मळ्यात येता येणार नाही.माझं ही असंच जुनं एक प्रकरण डोकं वर काढतंय पण ते जाऊ दे तू मागं जा व माझी गाडी घेऊन जा पण त्या बाईला इथंच घेऊन ये,मग मी इलाज करतो."

एवढा डोस देऊन ही याची बुद्धी काम करतेय म्हणुन चंदरनं आणखी दिली.

तोच मागच्या वाड्यात घोड्यानं हैदोस मांडला.

"डाॅक्टरसाहेब हे घोडं का खिंकाळतंय एवढं?",चंदरनं मागं विचीत्र नजरेनं पाहत विचारलं.

"अरे चंदर कालपासुन त्याला कुणी फिरवलंच नाही व व्यवस्थीत चन्याची चंदी पण मिळाली नाही म्हणुन खिदळतंय वाटतं"

"मग गाडीपेक्षा मी त्यालाच नेतो.त्याचं फिरवणं पण होईल व तिकडणं मी बाईला पण आणतो" चंदरनं न दिसणाऱ्या घोड्याकडं पाहत विचारलं.

 "चालेल मला काही हरकत नाही पण त्या तुझ्या बाईला नक्की आण"

वसंताला आता चालणं ही मुश्कील‌ होत‌ होतं तरी तो उठला. त्यानं मागच्या खळ्याच्या झापाला लावलेल्या कुलपाची किल्ली घेत चंदरसोबत वाड्याकडं आला.वाड्याच गेट उघडताच चंदर घोड्याकडं जाऊ लागला.तोच घोडा थयथयाट करत‌ खिंकाळू लागला व लाथा झाडत उभा राहू लागला.चंदरनं हासत पाहून त्याच्या पाठीवर हात फिरवताच बिथरलेलं घोडं शांत होत त्याचा हात चाटू लागला.तो पावेतो वसंतानं लोखंडी गेट उघडत खळ्यातून झापाकडं जाऊ लागला.त्याही स्थितीत झापाच्या बाहेर आपल्याला जायचं नाही ही संवेदना त्याला आठवतच होती पण त्याचा चालतांना तोल मात्र जात होता.

 खळ्यातल्या निंबावर पोपटांनी पुन्हा जोमानं उच्छाद सुरू केला व तोच दिवांध घुत्कारू लागलं.जवळच्या चिंचेवरची वटवाघळं या थैमानानं उठत उडत दूर निघाली.चांदाच्या उजेडात वसंता झापाच्या कुलूपाचं लिव्हर शोधत गरागरा फिरवू लागला .कुलूप काढुन त्यानं मेढीवर ठेवत झापं पायानं ढकलताच दुरुन 'टिटिव टिव! टिटिव टिव!' करत टिटवी जवळ येऊ लागली.

 चंदरनं तितक्यात घोड्यास दोन तीन बाटल्या चढवल्या.खोगीर चढवत त्यानं रिकीबित पाय अडकवत मांड पक्की करून घोडा बाहेर काढला पूर्ण खळ्यास उलट दिशेनं चक्कर मारत वसंता झाप लावण्याच्या आधीचं परत खळ्यात घातला.

"काय रे चंदर परत का?"

"काही नाही बेवक्ताला घोडं बाहेर जायला अडलंय नी माघारी परतलं.त्यानं खळ्यात एक चक्कर मारली.चालता चालता त्याला दोर दिसताच त्यानं खाली झपटी मारत दोर उचलला व वसंता उभा तिथं घोडा आणला.घोडा आता हवेत पुढचे पाय उचलत उभा होऊ लागला, खिंकाळू‌ लागला व गरगर फिरू लागला.चंदरनं संधी साधत घोड्याच्या पोटात पाय जोरात मारताच घोड्यानं मागच्या दोन्ही लाथा झाडत‌ वसंताला झापाच्या बाहेर अलगद फेकला.

बस्स वसंताला काही कळून उठणार व आत जाणार तोच घोडा मागून लाथा झाडत त्याला खळ्यापासून दूर नेऊ लागला.आता खळ्यातील झाडावरील सर्व पक्ष्यांनी एकच राडा व गिल्ला उठवला.वसंताचे ओठ दातात घुसले व सारं थोबाड सुजायला लागलं.तोच त्याला घोड्यावर चंदरच्या कवेत झिनी बसलेली दिसली.

तो सुजू पाहत असलेल्या चेहऱ्यावर आश्चर्य व भिती आणत"झिनी तू?" उद्गारला.

"मेल्या कुत्र्या!तुला कालच फाडणार होते पण तुला त्या मांत्रिकानं माझ्यापुरता बंदिस्त केलेल्या बिळात बंदिस्त केला नी मला मग चंदरला आणावं लागलं!,आता तू सुटणार नाही.तोच चंदरनं आणलेल्या दोराचा फासा करत झिनीनं वसंताच्या पायात फेकला.चंदरनं घोडं उधळवलं.फासा पायात पक्का बसताच वसंता घसडून ओढला जाऊ लागला.मग चंदर व झिनीनं घोड्यास चौखूर पळवत काट्याकुट्यातून ,दगडधोड्यातून, बांधावरून तर कुठे ऊस तोडलेल्या धसकटाच्या शेतातुन फेकला. वसंताच्या कपड्यासोबतच कातडीच्याही चिंध्या झाल्या.मध्येच दारुत तर्रर्र घोडं मागच्या लाथा तोंडावर झाडतच होतं.चांद कलतीला लागेपर्यंत चंदर व झिनीनं घोडं मळा अनकाई टेकाड, नाला व पुन्हा मळ्यात फिरवला.विहीरीवरनं अल्लर उडी मारताच टरबुज भिंतीवर आपटलं जावं त्याप्रमाणं वसंता विहीरीच्या भिंतीवर आपटला.त्याची हाडं कडाकडा मोडली.आता वसंताची सुध हरपायला येऊ लागली.घोडं बरोबर झिनीला पुरलं होतं त्या सपाट केलेल्या बांधावरच्या जागी येऊन थांबताच झिनीनं दोर काढत त्याची तंगडी धरत घोड्याच्या रिकीबीत अडकवली.

"मेल्या कुत्र्या मला बेशुद्धीत भोगतांना तुला जी मजा आली त्याच्या दुप्पट मजा तुला बेशुद्धीत पळवतांना वाटली.आता जा खुशाल त्या पांड्या व दिन्या कुत्र्यांजवळ"संतापात बेफाम होत झिनीनं त्याच्या दोन्ही तंगड्यात वर्मावर लाथ घातली.बेशुद्धीतही कुत्रं केकाटावं तसं हीन आवाजात केकाटत वसंता श्वासासाठी काल्यावाल्या करू लागला. वसंताची सुध हरपण्यापुर्वी त्याला'माणसानं हसत हसत केलेली पापे रडत रडत फेडावी लागतात'हे वाक्य आठवू लागलं.

 सकाळी पुर्वेला सूर्य आला तरी रिकीबीत अडकलेल्या वसंताला ओढत‌ ओढत घोडं त्याच जागी फिरत होतं. आता वसंताच्या फुटलेल्या टरबुजागत लाल दिसणाऱ्या चेहऱ्याभोवती माशा घोंगावू लागल्या.

 दहाच्या सुमारास पुजेच्या विधीचं सारं सामान घेऊन धावजीबा ,मांत्रीक व तात्या तुराटखेड्यास वाड्यात परतले.बंगल्याचं, वाड्याचं व खळ्याचं दारं सताड उघडी पाहताच तात्याच्या चेहऱ्यावर बारा वाजले.मांत्रिकानं वसंता न दिसताच तोडलेलं रिंगण ओळखलं.त्यांनी साऱ्यांना वसंतास मळ्यातच शोधायला पाठवलं.

  दुपारी वसंताच्या प्रेतासोबतच झोपडीत विज कोसळून मरून पडलेल्या चंदरलाही गावात आणण्यात आलं चार दिवसात चार घटना.दारूच्या नशेत घोड्यावर बसल्यानं घोडा उधळला व वसंता रिकीबीत पाय अडकून तर चंदर कालच्या रात्री पडलेल्या बेमोसमी पावसातील वीज कोसळल्याने मेल्याचं वरकरणी दिसत होतं.रघू व सिद्दपा पुन्हा हातच चोळत राहिले.इकडे चंदर व वसंताला भडाग्नी देत असतांनाच आता कुठलीही भिती न बाळगता धावजीबा बुजगावण्यातील झिनीची कवठी आणून चंदरच्या पेटत्या चितेत टाकत होता.

तात्या डोळे पुसत होते तर चंदरच्या घरचे हंबरडा फोडत होते.

 पण झिनी आज चंदरसोबत खुशीत मुक्त होत होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror