STORYMIRROR

Anil Kulkarni

Inspirational

2  

Anil Kulkarni

Inspirational

ये जीवन है...

ये जीवन है...

3 mins
105

ये जीवन है इस जीवन का यही है रंग रूप....

थोडे गम है थोडी खुशिया.


सरड्याप्रमाणे रंग बदलतं आयुष्य.आयुष्य स्थिर नाही. काल,आज व उद्या यांचे रंग वेगळेच असतात. प्रत्येक क्षण वेगळ्या रंगात न्हाऊन निघालेला असतो. क्षणात सगळे जमीनदोस्त होतं. माणसे उध्वस्त होतात. बुडबुडा फुटायच्या आत बुडबुडा आयुष्य जगून घेतो. निर्माल्य व्हायच्या आंत फुलं सुगंध देऊन जातात.जीवन प्रवाही आहे. कालचं आज टिकत नाही,आजचं उद्या टिकत नाही व उद्याचं परवा टिकणार नाही. प्रत्येक पिढी म्हणते आमच्या वेळेस असं होतं. एकत्र कुटुंबात असलेल्यांनी अडचणीत संसार केला, शृंगार केला, प्रणय केला, तृप्त समाधान मिळवलं ते आज लिव्हिंग मध्ये तो चोरटा आनंद कुठे आहे.ना लाजणं ना मुरडणं पटल नाही तर ब्रेकअप.


छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेणारी एक पिढी होती. धीर धरणारी एक पिढी होती. त्याग करणारी एक पिढी होती.या सुखांनो या म्हणणारी पिढी होती.आता सुखं हात जोडून उभी आहेत,तरी सुख नाही.कुणी कुणावर अवलंबून नाही.सगळे स्वतंत्र.स्वतःचे निर्णय स्वतःच घेणार, स्वतःचा न्याय

स्वतःच करणार. पूर्वी घरात मोठ्या माणसाचं ऐकल जायचं.आता मृत्यूच ही ऐकलं जात नाही,इतकी माणसे स्वतंत्र झालीत.जीवन जगण्याच तंत्र असतं, त्याला झुगारून जीवन जगणं चालू आहे.नात्यावर उभारलेली इमारत नात्याला गाडून उभी राहत आहे.प्रत्येकाच्या सुखाचा, दुःखाचा पोत वेगळा. जीवनातल्या क्षणांचा, सुखाच्या आठवणींचा रवंथ करता यायला हवा.


आपण दुःखच रवंथ करत बसतो. सुख आणि दुःख एकत्र कधीच नांदत नाहीत व त्यांचा घटस्फोट ही होत नाही. होतो तो स्फोट. जास्त सुख पचत नाही पण जास्त दुःख पचवावंच लागतं. सुख आणि दुःख दोघांनाही भोगाव लागतं भोगल्याशिवाय एकमेकांचा अर्थ कळत नाहीत. सुखही कवटाळण्याची गोष्ट व दुःखही टाळण्याची गोष्ट. आपण सुख कवटाळतो. दुःख आपल्याला कवटाळतो.हे निसर्ग चक्र आहे. स्वतः फुलण्यात निसर्गाला फुलवणं आहे. निसर्गाला उध्वस्त करण्यात अस्त आहे. सुखात माणसे रत होतात, आरक्त होतात. दुःखात विरक्त होतात विभक्त होतात.


सुखी माणसाचा सदरा लटकवायला दुःखाची खुंटी लागतेच. प्रत्येकाचा प्रवास वेगळा, दिशा वेगळी, रस्ता वेगळा त्याच्यामुळे येणाऱ्या सुखदुःखाचे थांबे वेगवेगळे. काही थांबेच सुखावह असतात, तिथे क्षणभर विश्रांती घ्यावीशी वाटते. काही थांबे कंटाळवाणे वाटतात. प्रत्येकाचे सुखाचे मापदंड वेगळे वेगळे आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतही सुख असतं, जीवनाचा आनंद असतो. सुखाला मापदंड असतं. दुःखाला न्यूनगंड असतं. जेवढा न्यूनगंड जास्त तेवढे दुःख जास्त. दुःख एकट कधीच येत नाही ईर्षा न्यूनगंड ही दुःखाची भावंडे आहेत. काट्या शिवाय गुलाब नाही तसं दुःखाशिवाय सुख नाही. उभ्या-आडव्या धाग्यांनीच वस्त्र बनतं. कोणतेही धागे उसवले की कपडा अस्तित्व गमावून बसतो. अस्तित्वाला सुरुंग लागल्याशिवाय माणसेही बदलत नाहीत.


आपण जे काही असतो ते अनुवंशिकते मुळेच. अनुवंशिकतेतून खूप काही झिरपत,चांगल वाईट. जेवढ कौशल्य तेवढं बळ. कौशल्य ही अनुवंशिकता विकसित करण्याची गोष्ट असते. अनुवंशिकतेचा केवळ अभिमान बाळगून चालत नाही. कल्पवृक्ष कन्येसाठी लावला तरी वेलू गगनावर नेण्याचं काम कन्येलाच करावं लागतं. जेवढ पंखात बळ तेवढे भरारी उंच. आपल्या सगळ्यांना अनुवंशिकतेचा पाया मिळालेला असतो त्याच्यावर इमारत बांधायची किती ऊंच किती सुंदर हे प्रत्येकाला ठरवावं लागतं. हे प्रत्येकाचे कौशल्या वरून ठरतं. कौशल्या शिवाय सौंदर्य नाही. मिळालेला वारसा आरसा असतो. आरसा केवळ न्याहाळण्यासाठी नसतो.वैगुण्य शोधण्यासाठी असतो. आरसा प्रतिमा सुधारण्यासाठी असतो. प्रतिभा सुधारण्यासाठी वारसा विकसित करावा लागतो.


अपयशावर यशाचे इमले बांधता आले पाहिजेत. अनेकांनी ते बांधले आहेत. अपयश यशाची पहिली पायरी आहे तर यश अखेरची पायरी आहे.यश शिखर आहे. दुःख, निराशा, इर्षा, न्यूनगंड हे फक्त स्पीड ब्रेकर्स आहेत प्रवासात ते आवश्यक हीअसतात.सुखाला ग्रहण लागलं असं आपण म्हणतो,पण ग्रहण क्षणिक असत. दुःख व कोळसा कितीही उगाळला तरीही स्वत:चा गुणधर्म सोडतं नाहीत. आयुष्य संपलं असं वाटणारे आज दिमाखात उभे आहेत.


एका मूत्रपिंडावर ही लाखो डोळ्यांना जीवदान देता येत. २५% यकृत काम करत असतानाही यशश्री खेचून आणता येते. अनेक अवयव काम करत नसताना संशोधन करता येत. अनेकांच्या यशोगाथा आहेत त्या समोर येत नाहीत. प्रेरणेसाठी यशोगाथा आवश्यक असतात. दुःखातून उमलता यायला हवं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational