विंचवाचा मांत्रिक- संजय सोनवणे
विंचवाचा मांत्रिक- संजय सोनवणे


आमच्या गावात साप, विंचवाने दंश केल्यास प्राथमिक दवाखाण्यात कधी ही नेले जात नव्हते. तर एकच इलाज म्हणजे मांत्रिकाचे मंत्र. त्यातून माणूस वाचला तर सर्व श्रेय मांत्रिकाला दिले जायचे. मांत्रिक मंत्रासोबत गावठी झाड पाल्याचा वापर करायचा. तो झाड़पाला कुणालाही सांगत नसे. आजारी माणसाला उपचार करण्यासाठी त्या मांत्रिकाच्या घरी घेऊन गेले की मांत्रिक चुल्हीतील राख आणायचा व ज्या ठिकाणी विंचू चावला त्या ठिकाणी राखेने चोळायचा.झाड पाल्याचे घरघुती बनवलेले औषध प्यायला द्यायचा. बऱ्याच जनाना त्याचा गुण यायचा तो उशिरा. पण त्या मुळे लोक दिवसभर वेदनेने रडायचे .
मांत्रिक काही चढ़ करणारे होते. काही उतरवणारे
होते. विंचू एखाद्याला चावला असे एखाद्या चढ़ करणाऱ्या मांत्रिकाला समजले तर विंचवाचे विष त्या माणसाला खूप वेदना करायचे. त्यामुळे एखाद्याला विंचू चावला तरी न रडता गुपचुप न्यावे लागायचे अशी समजूत होती. साप जरी चावला तरी हाच प्रयोग असे. साप मारलाय की पळालाय असे मांत्रिक विचारत असे. साप न मारता पळाला तर विष शरीरात वाढून माणूस लवकर मरतो
असा समज पसरला होता. साप चावलेल्या माणसाला देवळात ठेवले जायचे. चढ़ करणाऱ्या मांत्रिकाला गावच्या शिवराळ शिव्या द्यायचे. त्याचे वाटूळ व्हईल म्हणायचे.विष उतरल्यावर देवळातून त्या माणसाला तीन दिवसानंतर घरी पाठवले जात होते. गरीबीमुळे लोक मांत्रिकाचाच आधार घेत होते. आजूबाजूला दवाखानाही
नव्हता. त्यात जीव वाचला तर सर्व श्रेय मांत्रिकाला जात होते. मांत्रिक पैशाची हाव न धरता मिळेल ते दान स्वीकारत होता. माणूस मेला तर त्याचे आयुष्य तेव्हढे मानायचे. ते कुणालाही दोष देत नव्हते.