विळखा
विळखा
(अगाथा ख्रिस्तीच्या'वन टू बकल माय शू' वर आधारित...)
प्रकरण पहिले
कधी-कधी माणसाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात की ज्यावेळेस तुमची सामाजिक प्रतिष्ठा,तुमचं ऐश्वर्य,तुमची विद्वत्ता,तुमची धडाडी ह्या सगळ्याचा काही उपयोग नसतो.माणूस पार असहाय्य,हतबल झालेला असतो.प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी हा क्षण येतोच.
तसाच माझ्याही आयुष्यात अखेर हा क्षण येऊन ठेपला होता.माझ्या तर्कचातुर्याचा,सूक्ष्म अवलोकनाचा काहीही उपयोग झाला नव्हता.माझ्या नीतीधैर्याचा काटा पार शून्यावर आला होता.
मी..गौतम अभ्यंकर,एक बऱ्यापैकी नाव कमावलेला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह,आत्ता मात्र एका अतिशय आरामदायक खुर्चीवर गलीतगात्र अवस्थेत बसलो होतो.माझे डोळे अर्धवट उघडे होते.तोंडाचा आ वासलेला होता.मी नेहमी वरुणला,माझ्या सहाय्यकाला सांगतो,'आपल्याला आपल्या वेदनेला,मग ती शारिरीक असो वा मानसिक,आपली ताकद बनवता येण्याची किमया साधली पाहिजे.'
पण आत्ताच्या माझ्या वेदनेपुढे माझंच तत्त्वज्ञान लुप्त झालं होतं.आत्तापर्यंत माझी अशी ठाम धारणा बनली होती की या जगात सर्वात वेदनादायी काही असेल तर ती म्हणजे....दंतदुखी.
हो..मी डेन्टिस्टच्या समोर बसलो होतो.
डॉक्टर सन्मित्र घोष माझ्या किडलेल्या दाढेची दुरावस्था बघत होते.कितीही काळजी घेतली तरी माझ्या दाढेने मला दगा दिलाच होता.डॉक्टरांनी दाढ बधीर करण्यासाठी हातात इंजेक्शन घेतलेलं बघताच मी गपकन डोळे मिटून घेतले.डॉक्टर माझी ही अवस्था बघून गालातल्यागालात हसत होते.खरंतर मी त्यांच्या केबीनमध्ये पाऊल ठेवताक्षणी त्यांनी मला ओळखलं होतं.ते अक्षरशः भारावून गेले होते.त्यांनाही म्हणे डिटेक्टिव्ह व्हायची खूप इच्छा होती.पण शेवटी असा रुक्ष व्यवसाय निवडावा लागला होता.
सणसणीत उंची,अतिशय हसरा चेहरा,कानाला एकदम गोड वाटणारं बंगाली ढंगाचं पण अस्खलित मराठी बोलणं.
'ऍन ऍपल अ डे किप्स डॉक्टर अवे'ही फ्रेझ तर प्रचलित आहेच पण,'इफ डॉक्टर इज हॅन्डसम कीप ऍपल अवे'असं म्हणण्याएवढे ते देखणे होते.डॉक्टर असल्यामुळे मी त्यांना जरी'अहो'असं संबोधत असलो तरी जेमतेम सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांचा तरुण होता तो.साधारण दोन वर्षांपूर्वीच कोलकत्ता येथील गुरुनानक इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च मधून पासआऊट झाला होता.मूळ गाव कोलकत्ता इथे असलं तरी अप्रेंटसशीपसाठी तो त्याच्या आईबरोबर मुंबईला येऊन स्थायिक झाला होता.बाकी जवळचे नातेवाईक फारसे कोणी नव्हते.
अर्थात ही सर्व माहिती मगाशी त्यानेच मला बोलता बोलता दिली होती.
त्याने जुहूसारख्या पॉश एरियात स्वतःची प्रॅक्टिस सुरु केली आणि बघताबघता त्याचा चांगलाच जम बसला.त्याच्याकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये कितीतरी उच्चभ्रू,तसेच बरेच सेलिब्रेटीही होते.पण त्याचबरोबर गरजू लोकांवर तो अत्यल्प शुल्क घेऊन उपचार करत होता.त्यामुळे तो चांगलाच नावारुपास आला होता.मीसुध्दा त्याची ख्याती ऐकूनच आलो होतो.त्याच्या हाताचा कमालीचा सफाईदारपणा वाखाणण्यासारखा होता.
"सर,मी एकदा तुमच्या ऑफीसवर येणार आहे.तुमच्या केसेसचे किस्से तुमच्याकडून मला ऐकायचे आहेत."
"कधीही या डॉक्टर,यू आर ऑल्वेज वेलकम!"
"सर,अजून एक रिक्वेस्ट होती.तुम्ही मला अहो म्हणून संबोधू नका.मी सर्वार्थाने तुमच्यापेक्षा लहान आहे.मला नावानेच हाक मारा."
"नाही डॉक्टर,तुमच्या क्लिनिकमध्ये मी पेशंट म्हणून येणार.त्यामुळे इथे मी तुम्हाला आदरार्थीच संबोधणार.तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलात की नक्की नावाने बोलवीन.खरंतर मलाही ते जास्ती आवडेल."
"डन!मी लवकरच येऊन भेटेन तुम्हाला.
बरं,आता तुम्हाला साधारण अर्धा तास तरी बाहेर बसावं लागेल.दाढ पूर्ण बधीर झाल्यावरच पुढची ट्रीटमेंट सुरु करता येईल."
"शुअर डॉक्टर,थांबतो मी बाहेर."
असं म्हणून मी केबीनमधून बाहेर येऊन बसलो.
आमच्या पहिल्याच भेटीत हा उमदा डॉक्टर मला मनापासून आवडला.इतका,की मी माझ्या दुखणाऱ्या दाढेचे मनातल्या मनात आभार मानले.
मी बाहेर येऊन बसलो.बरीच गर्दी दिसत होती.वेटिंग रुम एकदम आलिशान,प्रशस्त होती.मंद म्युझिक वाजत होतं.छान थंडावा होता.कदाचित रुम वातानुकूलित असावी.
रिसेप्शनिस्टही सुंदर आणि चटपटीत वाटली.ती सस्मित मुद्रेने,आपुलकीने सगळ्यांशी बोलत होती.तिलाही माहित होतं,डेन्टिस्टकडे येणारे पेशंट कोणत्या प्रसंगाला सामोरे जात आहेत ते.
आता अर्धा तास तरी मला काहीच काम नव्हतं.त्यामुळे मी डोळे मिटून शांतपणे बसून राहिलो होतो.दहा मिनिटांतच एकदम गडबडीने बोलण्याचे आवाज आले म्हणून डोळे उघडून बघितलं तर समोर छोट्या पडद्यावर नुकतंच पदार्पण केलेली आणि अल्पावधीतच रसिकांच्या मनावर गारुड केलेली अभिनेत्री सलोनी उभी होती.
मला माझ्या व्यवसायामुळे,अगदी वैद्यकीय क्षेत्रातल्या संशोधनापासून ते लेटेस्ट कपड्यांचा ब्रँड कुठला इथपर्यंत सगळ्या क्षेत्रातील गोष्टींचं चौफेर ज्ञान आत्मसात करावंच लागतं.कधी कुठली माहिती उपयोगी पडेल सांगता येत नाही.त्यामुळे आत्ताही,मी सिरिअल्स बघत नसलो तरीही सलोनीला मी लगेच ओळखलं.
ती आत्ता इथे पेशंट म्हणूनच आली होती.
ती आल्यामुळे बाकीचे पेशंट आपलं दुखणं तात्पुरतं विसरले.सगळीकडे एकदम चैतन्य पसरलं.काहीजण तर तिच्याशी बोलायलाही लागले.
माझं सहजच तिच्या सॅण्डल्सकडे लक्ष गेलं. अतिशय नाजूक कलाकुसर केलेले सुंदर सॅण्डल्स होते ते.सलोनीच्या बाकी गेटअपला अगदी साजेसे होते.म्हणजे तिच्या ठायी नखशिखांत सौंदर्य एकवटलं होतं असं म्हणणं वावगं ठरलं नसतं.
सलोनी प्रसन्न हसून सगळ्यांशी माफक बोलली आणि मग मात्र कोपऱ्यातल्या सोफ्यावर जाऊन डोळे मिटून बसली.तिच्या अतिशय देखण्या चेहऱ्यावर याक्षणी वेदनेची बोलकी छटा स्पष्ट दिसत होती.
स्वाभाविकच होतं ते.दातांच्या डॉक्टरकडे येणारे साहजिकच दातांचं दुखणं घेऊनच येणार.मग मात्र तिला कोणीही डिस्टर्ब करायला गेलं नाही.
पाचच मिनिटांत सानिकाचा नंबर आला.कदाचित तिच्यासारख्या सेलिब्रेटीला जास्ती वेळ थांबवून ठेवलं नसावं.
माझीही दाढ बधीर व्हायला सुरुवात झाल्यामुळे काल संध्याकाळपासून मला छळणारी वेदना आता जाणवत नव्हती.
माझ्या नेहमीच्या स्वभावाला साजेसं आणि माझ्या व्यवसायाला आवश्यक असलेलं, माझं आजूबाजूचं निरीक्षण चालू झालं.
दरवाज्याबाहेर ठेवलेल्या शू रॅकवर सलोनीचे सॅण्डल्स आता विराजमान होते.
'अरे!'तिचा एक सॅण्डल सहा आणि एक सात नंबरचा होता,तश्या क्वचितच आढळतात अश्या व्यक्ती.त्यामुळे ही बाब माझ्या डोक्यात लगेच रजिस्टर झाली.
बाकीचे पेशंट फारसे आपापसात बोलत नव्हते.त्यामुळे माझं निरीक्षणंही मी लगेचच आटोपतं घेतलं.
सलोनीला आत जाऊन बराच वेळ झाला होता.अगदी स्वाभाविक होतं म्हणा ते.सलोनीसारखी पेशंट आल्यावर कोणताही डॉक्टर नेहमीपेक्षा जास्ती वेळ घेणारच.पण जसजसा वेळ पुढेपुढे सरकायला लागला तसतसा मी अस्वस्थ व्हायला लागलो.ऐन ट्रीटमेंटच्या वेळेस माझी भूल उतरते का काय अशी भीती मला वाटायला लागली.
माझ्या सहनशक्तीचा अंत होण्याच्या मार्गावर असतानाच सलोनी बाहेर आली आणि मला आत बोलावल्याची सूचना रिसेप्शनिस्टने केल्याबरोबर मी घाईघाईनेच आत शिरलो.एखाद्या केसचा छडा लावण्यासाठी कितीही काळ टिकून राहणारा माझा पेशन्स इथे मात्र अजिबात टिकला नव्हता.
मी डॉक्टरांच्या केबिनमध्ये दुसऱ्यांदा प्रवेश केला.पहिल्या वेळेपेक्षा आत्ता धाकधूक कमी होती.
डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच मात्र मी चमकलो.सलोनीसारखी पेशंट येऊन गेल्यावर खरंतर ते जास्ती प्रफुल्लीत दिसतील अशी माझी अपेक्षा होती.पण ते चांगलेच गंभीर दिसत होते.मी आत गेलो तेव्हा कुठेतरी शून्यात नजर लावून ते बसले होते.
"डॉक्टर,एनी प्रॉब्लेम?माझी काही मदत होण्यासारखी आहे का?"मी न रहावून त्यांना विचारलंच.
"सर,मी उद्याच येतो तुमच्याकडे.रादर,मला यावंच लागेल."
"येस,कधीही या डॉक्टर,पण काय झालंय?आत्ता माझी काही मदत होण्यासारखी आहे का?तुम्ही खूपच अपसेट दिसताय."
"नाही,नाही.तसं काहीच नाही.सकाळपासून बरेच पेशंट्स झाले त्यामुळे जरा दमलोय.
बाकी काही नाही."
मी मग विषय फार वाढवला नाही पण त्यांची अस्वस्थता माझ्या नजरेतून सुटली नव्हती.माझ्या दाढेचे पुढचे सोपस्कार डॉक्टरांनी तितक्याच सफाईदारपणे पार पाडले पण त्यात सहजता नव्हती.सगळं यंत्रवत घडत होतं.
खरंतर ते उद्या मला येऊन भेटणार होते.
कदाचित त्यांच्या अपसेट होण्याचं कारण उद्या मला कळणारच होतं.पण माझ्या व्यवसायामुळे,जराही कुठे एखादी खटकण्यासारखी बाब दिसली की त्याच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय मला चैन पडत नाही.आत्ता मात्र मी स्वतःला कसंबसं थोपवलं.
डॉक्टरांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो.काल संध्याकाळपासून ह्या दाढदुखीने मी हैराण झालो होतो.त्यामुळे काही खाणंही अशक्य झालं होतं.आता मात्र प्रचंड भुकेची जाणीव होत होती.डॉक्टरांनी,'अर्धा तास काहीही खायचं नाही'असं बजावून सांगितलं होतं.
माझ्या आणि वरुणच्या नेहमीच्या,अतिशय आवडीच्या हॉटेलमध्ये पोचायला,ट्रॅफिकमुळे सहजच वीस-पंचवीस मिनिटं लागली असती.त्यामुळे मी वरुणला थोड्या वेळात तिथे पोचायला सांगितलं आणि माझीही गाडी शक्य तितक्या स्पीडने पळवायला लागलो.
माझ्या ऑफिसपासून साधारण पाच मिनिटांच्या अंतरावरच'हॉटेल अगत्य'होतं.
नावाप्रमाणेच हॉटेलचा सगळा स्टाफ अगत्यशील होता.हॉटेल मॅनेजर अवस्थीची तर आमच्याबरोबर चांगलीच गट्टी जमली होती.साधारण चार वर्षांपूर्वी हे हॉटेल सुरु झालं होतं.कुठलाही भपका नसलेलं,अतिशय स्वच्छ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उत्कृष्ठ जेवण मिळणारं हे हॉटेल,माझं आणि वरुणचं एकदम लाडकं झालं होतं.
अर्ध्या तासाच्या आत मी अगत्यवर पोचलो तेव्हा वरुण आमच्या नेहमीच्या जागी बसून माझीच वाट बघत होता.अवस्थीनेही माझं अगदी तोंड भरुन स्वागत केलं.ह्या व्यवसायात असूनसुध्दा तो अगदी बहुश्रुत होता.त्याला जेव्हा फावला वेळ असेल तेव्हा,आम्ही तिथे असताना तो आमच्या गप्पांमध्ये सामील व्हायचा.कधीकधी एखादं असं सजेशन द्यायचा की ते माझ्या तपासकामात मला उपयोगी पडायचं.
आमच्या गप्पा छान रंगल्या.तेवढ्यात आम्ही ऑर्डर न करताच आमचा नेहमीचा फेव्हरेट मेन्यू आमच्यापुढे हजर झाला.मग मात्र मी अवस्थी तिथून जायची सुद्धा वाट न पाहता जेवायला सुरुवात केली.वरुणलाही बहुतेक चांगलीच भूक लागली असावी कारण तो सुद्धा भराभर एक-एक पदार्थ संपवत होता.अवस्थी मग हसतच तिथून निघून गेला.आमच्या पुढ्यातलं बरंचसं जेवण संपल्यावर मी बोलायला सुरुवात केली.
"वरुण,बहुतेक उद्याच आपल्या ऑफिसवर, आज मी गेलो होतो ते डॉ.सन्मित्र घोष येतील.अतिशय उमदं,दिलखुलास व्यक्तिमत्व आहे त्यांचं.साधारण तुझ्याच वयाचा असेल सन्मित्र.आपल्या केसेसचे किस्से त्याला ऐकायचे आहेतच पण तिथे अशी काही घटना घडली असावी की त्याला इथे येण्यावाचून पर्यायच उरला नसावा.अर्थात हा माझा नुसता संशय आहे.कदाचित तसं काही नसेलही."
असं म्हणून मी वरुणला सलोनी तिथे येऊन गेल्यापासून काय काय घडलं ते सांगितलं. सन्मित्रच्या अचानक बिघडलेल्या मनःस्थितीचा सलोनीशी नक्कीच काहीतरी संबंध असावा असा संशयही व्यक्त केला.
"वरुण,सुरुवातीला मला असं वाटलं की दोघांची वयं लक्षात घेता विफल प्रेमाबिमाची भानगड असेल.त्यामुळे आता समोरासमोर आल्यावर डॉक्टर अपसेट झाले असतील.
पण दोघांचं प्रोफेशन बघता ते कुठे एकत्र येऊन एकमेकांच्या प्रेमात पडण्याची शक्यता दिसत नाही.शिवाय सन्मित्र मूळचा कोलकत्ता इथला.सलोनीचं मूळ गाव कोणतं ते माझ्या वाचण्यात आलेलं नाही."
"सर,ती पुण्याची आहे.पुण्याच्या लॉ कॉलेजची ती स्टुडंट.शिक्षण पूर्ण होत असतानाच फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये कोर्स करणाऱ्या एका मैत्रिणीच्या डॉक्युमेण्टरीमध्ये तिच्या आग्रहाखातर सलोनीने काम केलं आणि तिच्या पूर्ण करिअरला वेगळाच टर्न मिळाला.बघताबघता ती ऍक्टिंग फील्डमध्येच कमालीची यशस्वी झाली.तिला जवळचे कोणीही नातेवाईक नाहीत.आईवडील सात-आठ वर्षांपूर्वी एका अपघातात गेलेत.पुण्याला होस्टेलवरच ती रहात होती.
साधारण तीन वर्षांपासून ती इथे मुंबईत सेटल झाली आहे."
"अरे वा वरुण!मी कौतुकाने त्याला म्हणालो,उगाच नाही मी तुला गुगल म्हणत. अनेक क्षेत्रातील माहितींचा किती मोठा खजिना असतो तुझ्याकडे."
वरुण संकोचून म्हणाला,"सर,हा निव्वळ योगायोग आहे.जुहूलाच माझा एक मित्र,प्रशांत राहतो.त्याचे आई,वडील आणि मोठा भाऊ पुण्याला असतात.तो इथे एकटाच राहतो.सलोनीने त्याच्या कॉम्प्लेक्स मध्येच,पर्लमध्ये,त्याच्याच फ्लॅटच्या समोरचा फ्लॅट रिसेंटली विकत घेतला आहे.तिच्या सौंदर्याची मी वेगळी तारीफ करण्याची गरज नाही.तुम्ही तिला ऑफस्क्रीन सुद्धा पाहिलंच आहे.त्यामुळे प्रशांतसकट झाडून सगळे जेण्टस्,अगदी आठवी-नववीच्या मुलांपासून ते सिनिअर सिटिझन्सपर्यंत,सगळे तिला मदत करायला,तिच्याशी काहीतरी निमित्त काढून बोलायला धडपडत असतात.प्रशांतने माझी पण एकदा ओळख करुन दिली होती तिच्या बरोबर.त्या वेळेस बोलता-बोलता तिनेच तिची ही माहिती आम्हाला दिली होती.ती सगळ्यांशी हसून-खेळून बोलते पण थोडं अंतर राखूनच.स्वतःच्या घरी तर ती सोसायटीतील कोणालाच बोलावत नाही.तरीही सगळे तिच्या एका स्माईलसाठी आतुरलेले असतात."
"अच्छा!पण मग सन्मित्र आणि तिचं काही प्रेमप्रकरण असेल अशी शक्यता नाही वाटत.तरीही काल तिथे काहीतरी नक्कीच घडलंय ज्यामुळे सन्मित्र एवढा अपसेट झाला होता.सलोनी जेव्हा केबीनच्या बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा मात्र नॉर्मल वाटला.
असो,हे काय गौडबंगाल आहे ते उद्या आपल्याला कळेलच.खरंच काही प्रॉब्लेम असेल तर सन्मित्र उद्या येईलच आपल्याला भेटायला.तेव्हा मात्र,त्याच्या अस्वस्थ होण्याचं कारण त्याच्याचकडून कळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.
चल,निघूया आता.बराच वेळ टेबल अडवून बसलोय आपण."
आम्ही दोघे मॅनेजरचा निरोप घेऊन बाहेर पडलो आणि ऑफिसवर आलो.तिथे पोचल्यावर रुटीन कामांना लगेचच सुरुवात केली खरी,पण काल रात्री दाढदुखीमुळे झालेलं जागरण आणि आत्ता सुग्रास जेवणामुळे तुडुंब भरलेलं पोट,ह्यामुळे झोपेने माझ्यावर चांगलाच अंमल बजावायला सुरुवात केली.डोळ्यांवर जरा पाणी मारुन यावं म्हणून मी उठलो तेवढ्यात मोबाईल वाजला.इन्स्पेक्टर भोसल्यांचा फोन होता.मी स्पीकर ऑन केला.
"गौतमजी,तुम्ही कुठे आहात?मी ताबडतोब तुम्हाला भेटायला येतोय."
पलीकडून ते घाईघाईने बोलत होते.
"मी ऑफिसमध्येच आहे.कधीही या तुम्ही.पण काय झालंय?अर्जंट केस आली आहे का?"
"हो,साधारण एक-दीड तासापूर्वी जुहूच्या डॉक्टर सन्मित्र घोष ह्यांचा त्यांच्या क्लिनिकमध्येच खून झालाय."
"काय?"
मी माझ्याही नकळत एवढा जोरात ओरडलो की वरुण माझ्याकडे धावला आणि त्याने मला सावरुन धरलं.ही इतकी प्रचंड धक्कादायक बातमी होती की मला त्याच्या आधाराची जरुरी होतीच.त्याने भोसल्यांना नक्की काय घडलं ते विचारलं.तेव्हा त्यांनी,'ऑफिसवर येऊनच डिटेल्स सांगतो'असं म्हणून फोन बंद केला.मी तसाच खुर्चीवर सुन्न होऊन बसलो.माझ्या डोळ्यांसमोर सन्मित्रचा हसरा चेहरा तरळत होता.'सर,मी तुमच्या ऑफिसवर येणार आहे,तुमच्या केसेसचे किस्से ऐकायला'हे त्याचे शब्द माझ्या कानात रुंजी घालत होते.ह्या बातमीवर विश्वास ठेवायला माझं मन धजावतंच नव्हतं.
माझी ही अवस्था पाहून वरुणसुध्दा चुपचाप बसून त्याच्या मोबाईलवर ह्या न्यूजचे काय अपडेट्स आहेत ते बघायला लागला.
माझ्या व्यवसायामुळे मृत्यू मला अपरिचित नाही.पण हल्ली मी फार हळवा बनत चाललोय असं मला जाणवायला लागलंय. माझ्याकडे येणाऱ्या केसेस मधले माझे क्लायंट्स म्हणा किंवा परिचित,नवपरिचित ह्यांच्यामध्ये मी नकळत भावनिकरीत्या गुंततोय.कदाचित हा माझ्या वाढत्या वयाचा परिणामही असेल.छे,छे!असा हळवेपणा माझ्या तपासकामात नक्कीच बाधा आणू शकला असता.सन्मित्रचा खुनी तर कुठल्याही परिस्थितीत उजेडात यायलाच हवा होता.मी तो आणणारच होतो.
'का?का?मी तेव्हाच सन्मित्रला खोदूनखोदून त्याच्या अस्वस्थपणाचं कारण विचारलं नाही!कदाचित काही उपयोग झालाही असता.पण आता ह्या गोष्टीचा पश्चात्ताप करण्यापेक्षा त्याच्या खुन्यापर्यंत कसं पोचायचं ह्याचा विचार करणं जास्त संयुक्तिक होतं.साध्या प्रेमप्रकरणाची शंका वाटलेल्या ह्या घटनेला फार विकृत स्वरुप मिळालं होतं.आता मी हातपाय गाळून बसणं शक्यच नव्हतं.तो माझा स्वभावच नाही.
"वरुण,जोपर्यंत आपण ह्या केसचा छडा लावत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही.लवकरात लवकर सन्मित्रच्या खुन्याला आपल्याला शोधावंच लागेल.आपण
सलोनीपासून सुरुवात करु.तिचा काहीतरी संबंध ह्या सगळ्या प्रकरणाशी नक्कीच आहे.तुझ्या मित्राच्याच कॉम्प्लेक्समध्ये ती रहाते म्हणालास ना?आत्ता भोसले आले की त्यांच्या कानावर ही गोष्ट घालू आणि आजच सलोनीला भेटायला जाऊ."
मी इतक्या लवकर 'बॅक टू नॉर्मल'झालेला बघून वरुणला खूप बरं वाटलेलं त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसलं.
"सर,मी ऑलरेडी प्रशांतला मेसेज टाकून ठेवला आहे की आपण सलोनीकडे चौकशीसाठी जाऊ तेव्हा त्याला घेऊनच जाऊ म्हणजे तिची भेट नक्की घेता येईल."
मी कौतुकाने वरुणच्या पाठीवर थोपटलं. वरुण आहेच तसा.माझी पुढची मूव्ह काय असेल ते बिनचूक ओळखून तो बरेचदा
ऍक्शनसुध्दा घेतो.आणखी थोडया वर्षांत माझ्या कामाचा सगळा भार त्याच्यावर सोपवायला हरकत नाही असा विचार त्या स्थितीतही माझ्या मनात डोकावून गेला.
"वरुण,मला फार अपराधी वाटतंय रे!काहीतरी प्रॉब्लेम आहे हे मला जाणवलं होतं.पण मी त्याचा पाठपुरावा केला नाही.एका निष्पाप,सर्वस्वी निरपराधी जीवाला माझ्या हलगर्जीपणाची किंमत भोगावी लागली."
"सर,तुम्ही उगाचच स्वतःला दोष देताय.थोडं कोणी अपसेट दिसलं किंवा काही प्रॉब्लेम आहे असं वाटलं तरी तो माणूस लगेच आपले प्राण गमावणार आहे अशी शंका कशी येईल?"
"तू म्हणतोस ते बरोबर आहे.पण आत्ता मात्र ही अपराधीपणाची भावना मनातून जात नाहीये."
"सर,मला खात्री आहे,सन्मित्रच्या खुन्याला आपण नक्कीच लवकर पकडू शकू.पकडू शकू नाही,आपल्या मोटोनुसार पकडणारच.आणि आम्ही दोघंही बरोबरच बोललो,"वुई डू नॉट ट्राय,वुई डू."
यावर आम्ही दोघेही हसलो.तेवढ्यात दारावर नॉक करुन भोसले आत आले.त्यांना जेमतेम मी खुर्चीवर टेकू दिलं आणि त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली.त्यांनी मात्र शांतपणे सगळं सांगायला सुरुवात केली.
"गौतमजी,साधारण साडेबाराच्या सुमारास डॉक्टरांच्या रिसेप्शनिस्टचा मला फोन आला.ती अतिशय घाबरलेली होती आणि तुटक-तुटक माहिती देत होती.डॉक्टरांचा खून झालाय एवढंच मला समजलं.मग मी ताबडतोब आमच्या टीमला घेऊन तिथे पोहोचलो.डॉक्टर त्यांच्या केबीनमध्ये जमिनीवर पालथे पडले होते.कोणीतरी बहुदा त्यांच्याच वापरातली वेगळ्या प्रकारची कात्री त्यांच्या पाठीत खुपसली होती.त्यांची कात्री अशासाठी म्हणतोय मी,कारण त्यावर फक्त डॉक्टरांचेच फिंगरप्रिंट्स होते.खुन्याने हँडग्लव्हज् वापरले असावेत.वेटिंग हॉल मधल्या सगळ्या लोकांनी डॉक्टरांची जोरदार किंकाळी ऐकली आणि रिसेप्शनिस्टबरोबर आणखीन दोन-तीन पेशंट पण आत धावले होते.डॉक्टरांना अश्या अवस्थेत पाहून सगळे प्रचंड हादरुन गेले होते.कोणीतरी पोलिसांना फोन करा म्हणून सुचवल्यावर रिसेप्शनिस्टने मला फोन केला.आम्ही तिथे पोहोचेपर्यंत केबीनमध्ये कोणीही गेलं नव्हतं.बरेच पेशंट निघूनही गेले होते.बाकीचे सगळे सोपस्कार पार पाडून मग मी रिसेप्शनिस्टकडे काय काय घडलं,शेवटचा पेशंट कोण होता ह्याची चौकशी केली.पण ह्या घटनेचा इतका मोठा धक्का तिला बसला होता की ती नीट सांगू शकली नाही.आजची अपॉईंटमेंट असलेल्या पेशंटची लिस्ट डेस्कटॉपच्या स्क्रीनवर पाहिली तेव्हा गौतमजी,तुमचं नाव त्या लिस्टमध्ये दिसलं.मग तर माझा तपास एकदमच सोपा होणार ह्या विचाराने मी निर्धास्त झालो."
"भोसले,मला ही केस सॉल्व्ह करण्याची निकड तुमच्यापेक्षाही जास्ती आहे.का,ते सांगतो."असं म्हणून मी त्यांना डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये,मी तिथे गेल्यापासून काय काय घडलं ते इत्यंभूत सांगितलं.
"भोसले,सलोनीचा काहीतरी संबंध ह्या केसशी नक्कीच आहे.त्यामुळे मी आणि वरुण आजच सलोनीची भेट घेणार आहोत."
"गौतमजी,डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये सलोनी आम्हाला भेटली.दाढ पूर्ण बधीर झाल्यावर तिची पुढची ट्रीटमेंट डॉक्टर करणार होते त्यामुळे ती तिथेच थांबली होती.आज दुपारीच ती आऊटडोअर शूटींगसाठी लोणावळ्याला जाणार आहे.दोन दिवसांनी ती येईल.कदाचित निघाली पण असेल.
ती काही फारशी माहिती देऊ शकली नाही.डॉक्टरांची ख्याती ऐकून ती आज पहिल्यांदाच तिथे आली होती.तिला बघून डॉक्टर अपसेट झाले असं तुम्हाला वाटतंय.
पण त्यांचा पूर्वपरिचय असावा असा उल्लेख तिने अजिबात केला नाही.
डॉक्टरांची किंकाळी ऐकून आपण तिथे धावलो असं ती सांगत होती.बाकीचे बाहेर थांबलेले पेशंट्स तेव्हाच आत धावले.
रिसेप्शनिस्टने पण ह्याला दुजोरा दिलाय.
आतून बेल वाजली की मग पुढच्या पेशंटला आत सोडायचं ह्याची वाट बघत ती थांबली होती.आधीचा पेशंट बाहेर आल्यावर केबीनमध्ये दुसरं कोणीही गेलं नव्हतं असं ती खात्रीपूर्वक सांगत होती.त्यामुळे हे काय गौडबंगाल आहे हे कळत नाहीये.आत जायला दुसरा कुठलाच मार्ग पण नाही.
त्यामुळे खुनी कुठून आणि केव्हा आत गेला हेच समजत नाहीये.आधीपासूनच आत कुठे लपून बसला असता तर डॉक्टरांना नक्कीच समजलं असतं.
डॉक्टर त्यांच्या क्लिनिकपासून जवळच रहातात.त्यामुळे आम्ही लगेच तिथे जाऊन चौकशी केली.खून करण्याएवढी त्यांची कोणाशी दुष्मनी असेल असं त्यांच्या परिचितांपैकी,त्यांच्या
शेजारी-पाजारी जे राहतात,त्यांच्याशी बोलताना मला तरी जाणवलं नाही.त्यांच्या आईवर मात्र दुःखाचा डोंगरच कोसळलाय.
कसंबसं मी त्यांचं सांत्वन केलंय.पण त्या पूर्णपणे खचून गेल्यात."
"भोसले,आपल्याला त्या नराधमाला अगदी लवकर शोधून काढायलाच हवं.मला वाटलं होतं तसं साधं प्रेमप्रकरण नक्कीच नाही.
कदाचित आजच्या त्याच्या अस्वस्थ होण्याचा त्याच्या खुनाशी संबंध नसेल सुध्दा.पण जी शंका आहे तिचं निरसन करुन घेतलंच पाहिजे.नुसते तर्क लढवण्यात काहीच अर्थ नाही.सलोनी येईपर्यंत तिच्या आणि सन्मित्रच्या पूर्वायुष्याबद्दल जेवढी माहिती काढता येईल तेवढी काढूया.वरुण,तुला सांगायला नकोच.तू आपल्या पद्धतीने ही माहिती नक्कीच मिळवशील.प्रशांतला सलोनीविषयी काय माहिती आहे ते बघ."
"गौतमजी,सलोनी मुंबईत परतली की मला इन्फॉर्म करायला मी तिला सांगितलं आहे.तुम्हालाही ताबडतोब कळवीन.मी निघतो आता.लेटेस्ट अपडेट्स कळवत राहू."
असं म्हणून भोसले आमचा निरोप घेऊन गेले.वरुण त्याच्या कामगिरीवर निघाला.
केसच्या संदर्भातल्या कोणाचीही माहिती कशी काढायची त्याचं टेक्निक त्याला चांगलंच पाठ होतं.मग मी पण माझ्या आवडत्या खुर्चीवर बसून ह्या केसचे दुवे कुठे जुळत आहेत का ते बघायला लागलो.
प्रकरण दुसरे
संध्याकाळी वरुणने जी काही माहिती आणली ती केसच्या तपासकामासाठी बिल्कुल उपयोगी नव्हती.सन्मित्र आणि सलोनी दोघांचीही फॅमिली बॅकग्राऊंड अगदी साधी होती.सर्वसाधारण लोकांचं आयुष्य जसं सरधोपट मार्गावरुन जातं तसंच त्यांचंही होतं.सलोनीच्या करिअरला थोडा ट्विस्ट मिळाला.सन्मित्र डॉक्टर झाला.मग मात्र त्यांच्या करिअरची गाडी सुसाट सुटली.दोघांनीही स्वतःची ओळख निर्माण केली.पण त्यांचा संबंध दूरान्वयानेही वरकरणी तरी आलेला दिसत नव्हता.मग सन्मित्रच्या अपसेट होण्याचा आणि सलोनीचा काहीच संबंध नव्हता?पण दोघांच्या भेटीनंतर पुढच्या साधारण तासाभरात त्याचा खून झाला त्याअर्थी काहीतरी गंभीर मामला नक्कीच होता.
सलोनीचा संबंध खुनाशी असो वा नसो,तिच्याकडे चौकशीसाठी आम्ही जाणारच होतो.ती येईपर्यंत तूर्तास तरी केसच्या दृष्टीने पुढच्या स्टेप्स घेण्यात काही हशील नव्हतं.सन्मित्रच्या आईंची भेट मात्र मी दुसऱ्याच दिवशी घेतली.माझ्यासाठी कसोटीचाच क्षण होता तो.आमची पूर्वीची काहीही ओळख नसतानाही त्यांनी माझ्याजवळ आपलं मन मोकळं केलं.
सन्मित्र माझ्या काही केसेसचे किस्से म्हणे त्यांना सांगायचा.त्यांच्या भेटीमुळे माझ्या मनातील अपराधीपणाची भावना मात्र अजूनच गडद झाली.वरुण बिचारा मला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होता.आता खुन्याला पकडल्याशिवाय मला मात्र क्षणभरही चैन पडणार नव्हतं.तो दिवस काहीही विशेष न घडता तसाच मावळला.
प्रकरण तिसरे
दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण सातचा सुमार असेल.मी नुकतीच माझी आन्हिकं आटोपून बाल्कनीमध्ये चहा घेत,पेपर चाळत बसलो होतो.तेवढ्यात मोबाईल वाजला.
एवढया सकाळी कोणाचा फोन असेल म्हणून मी जरा आश्चर्यानेच बघितलं तर भोसल्यांचा फोन होता.मी फोन उचलल्या-उचलल्या ते अतिशय घाईघाईत बोलले,"गौतमजी,तुम्ही प्लीज लगेच सलोनीच्या घरी या.कोणीतरी तिच्या डोक्यावर तिच्याच हॉलमधल्या मोठया ब्रॉन्झच्या पुतळ्याचा फटका मारुन तिचा खून केलाय."
"काय?मी अविश्वासाने जोरात ओरडलोच.
काय सांगताय काय भोसले!कसं आणि कधी घडलं हे?"
"मी पण अजून घटनास्थळी पोचलो नाहीये.
सलोनी राहते त्या पर्ल कॉम्प्लेक्सच्या सिक्युरिटी गार्डने आमच्या पोलीस स्टेशनला फोन करुन ह्या खुनाची खबर दिली.बट
नॅचरल,तो खूप घाबरला असल्यामुळे
फोनवर नीट काही सांगू शकला नाही.मी तिकडे निघालो आहे.तुम्ही पण लगेच येऊ शकलात तर काही डिटेल्स समजू शकतील."
"हो,हो,आलोच मी."
असं म्हणून मी भोसल्यांचा कॉल बंद करुन वरुणला कॉल केला.त्याला ह्या घटनेची बातमी सांगून तयार राहायला सांगितलं.मी जाता-जाता त्याला पिकअप करणार होतो.
घटनेचं गांभिर्य वरुणच्या लगेच लक्षात आल्यामुळे त्याने कुठलेही प्रश्न मला विचारले नाहीत.असा सूज्ञपणा तो नेहमीच दाखवतो.
अर्ध्या तासाच्या आत आम्ही पर्ल कॉम्प्लेक्स मधल्या सलोनीच्या फ्लॅटमध्ये होतो.भोसले त्यांच्या टीमला बरोबर घेऊन नुकतेच आले होते.प्रायमरी इनव्हेस्टिगेशनचं काम सुरु झालं होतं.मेन डोअरच्या लगेचच्या आतल्या बाजूला सलोनीचा मृतदेह पालथा पडला होता.डोक्यावर जोरदार आघात केल्यामुळे डोक्यापासून रक्ताचे ओघोळ वाहिले होते.एक आघात करुन खुनी थांबला नसावा हे उघड दिसत होतं.फोरेन्सिक टीमच्या डॉक्टरांनी तपासणीसाठी तिचा मृतदेह सरळ केला.तिच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच तिथे जमलेल्या आम्हा सर्वांच्या तोंडून भयोद्गार बाहेर पडले.बहुतेकांनी आपल्या माना दुसरीकडे फिरवल्या.मृत्यूचं इतकं भेसूर दर्शन आत्तापर्यंतच्या माझ्या कुठल्याच केसमध्ये मी पाहिलं नव्हतं.
इतक्या देखण्या चेहऱ्याची अशी अवस्था करणारा किती क्रूरकर्मा असेल ह्याची कल्पनाही करवत नव्हती.जेमतेम सलोनीची ओळख पटत होती.ती नुकतीच बाहेरुन आली असावी,कारण तिच्या अंगावर बाहेर जाण्याचे कपडे होते.एवढंच नाही तर पायात,मी सन्मित्रच्या क्लिनिकमध्ये पाहिलेले सॅण्डल्स होते.मेन डोअरकडे पाय असलेल्या स्थितीत तिचा मृतदेह पालथा पडला होता.त्यावरुन मी अंदाज बांधला की ती घरात शिरल्याशिरल्या खुन्याने तिच्या डोक्यावर पाठीमागून आघात केला असावा.तिला बचावाची कुठलीच संधी मिळाली नसावी.दुर्दैवी जीव!
भोसल्यांनी सिक्युरिटी गार्डला चौकशीसाठी बोलावलं होतं.तोपर्यंत मी सलोनीच्या मृतदेहाचं निरीक्षण करायला लागलो,अर्थातच तिच्या चेहऱ्याकडे न बघता.अचानक मी चमकलो.माझ्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच वरुण माझ्याजवळ आला.तो मला काहीतरी विचारणार एवढ्यात भोसल्यांच्या स्टाफपैकी एकाने सिक्युरिटी गार्ड आल्याची वर्दी दिली.
तो घाबरुन जिन्यातच थांबला होता.आत यायला तयार नव्हता.भोसले स्वतः जाऊन त्याला आत घेऊन आले.सलोनीच्या मृतदेहाकडे लक्ष जाताच त्याचं उसनं अवसान ओसरलं.भीतीने त्याची बोबडीच वळली.कसंबसं त्याला शांत करुन आम्ही त्याला घेऊन आतल्या रुममध्ये गेलो.
थोडं पाणी प्यायल्यावर तो जरा बोलण्याच्या स्थितीत आला आणि सांगायला लागला,
"रात्री आठ ते सकाळी आठ अशी माझी ड्युटी असते.आज मॅडम सकाळी साधारण सहा वाजता बाहेरुन आल्या.गाडी त्या स्वतःच चालवतात.गाडीतून उतरल्या तेव्हा हातात छोटी बॅग होती.त्यावरुन मी अंदाज केला की त्या शूटिंगसाठी बाहेरगावी गेल्या असाव्यात.मी त्यांच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी लावून आलो तेव्हा त्या तिथेच उभ्या होत्या.मला थोडं आश्चर्यच वाटलं.कारण एरवी मी गाडी पार्क करेपर्यंत त्या निघून जातात.मग मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना गाडीची किल्ली देतो.पण आज त्या थांबल्या होत्या.मी किल्ली दिल्यावर त्यांनी मला दूधवाला आल्यावर त्यांच्याकडे पाठवून द्यायला सांगितलं.पूर्ण सोसाटीमध्ये एकच दूधवाला सगळ्यांकडे दूध टाकतो.मॅडम आपणहून माझ्याशी क्वचितच बोलायच्या.
माझ्याशीच काय,सोसायटीमधल्या कोणाशीच जास्त बोलायच्या नाहीत.फक्त बघून हसायच्या.त्यामुळे त्या आपणहून बोलल्यामुळे खरंतर मी खूष झालो होतो साहेब.अर्ध्या तासातच दूधवाला आला. त्याला मी पहिल्यांदा मॅडमकडे जायला सांगितलं.पाचंच मिनिटांत तो'खून खून'असं जोरात ओरडत पळतंच खाली आला.सलोनी मॅडमचा खून झालाय एवढंच कसंबसं बोलून तो जवळजवळ पळतच तिथून निघून गेला.
मी पण चक्रावूनच गेलो साहेब.दूधवाला बोलला त्यावर विश्वास बसेना म्हणून मी मॅडमच्या फ्लॅटमध्ये जाऊन बघायचं ठरवलं.थोडी भीती वाटत होती पण ती बातमी अजिबात खरी वाटत नव्हती. थोड्या वेळापूर्वीच तर मॅडम माझ्याशी बोलल्या होत्या.असा कसा लगेच खून होईल असंच मला वाटत होतं.वर गेलो तर फ्लॅटचं दार अर्धवट उघडं होतं आणि रक्ताचा ओघळ बाहेर आला होता.ते बघून,बाकीचं काही न बघता तसाच सुसाट पळत मी खाली आलो आणि पोलीस स्टेशनला फोन केला.बास!मला एवढंच माहिती आहे."
गार्ड चांगलाच स्मार्ट वाटत होता.त्याला ठाऊक असलेला घटनाक्रम त्याने अगदी सुसंगत सांगितला.मी त्याच्या पाठीवर थोपटून त्याला आत्ता जायला सांगितलं पण गरज पडल्यास पुन्हा यावं लागेल हे सुद्धा बजावलं.तो आम्हाला सलाम ठोकून निघून गेला.
"गौतमजी,प्रत्येक मजल्यावर तीनच समोरासमोर असलेले फ्लॅट्स आहेत. वरुणचा मित्र प्रशांत आणि देशपांडे असे अजून दोघांचे फ्लॅट्स ह्या फ्लोअरवर आहेत.मला वाटतं आधी प्रशांतशी बोलून घेऊ मग देशपांड्यांशी."
"सर,वरुण म्हणाला,"मी ऑलरेडी प्रशांतशी बोललो आहे.त्याला ह्या घटनेबद्दल खरंतर काहीच माहिती नाही.सलोनीच्या खुनाची खबर मी त्याला दिली तेव्हा तो गाढ झोपेत होता.पण आपण बोलून बघूया त्याच्याशी."
"लेट्स मूव्ह,बघूया तो ह्यावर कितपत प्रकाश टाकतोय."
आम्ही सगळे प्रशांतच्या फ्लॅटवर पोहोचलो.
त्याच्या फ्लॅटचं दार उघडंच होतं आणि तो हॉलमध्ये आमचीच वाट बघत बसला होता.चेहऱ्यावरुन तरी चांगलाच हादरलेला दिसत होता.साहजिकच होतं ते.
त्याने एकदम घाईघाईने बोलायला सुरुवात केली,सर,माझा विश्वासच बसत नाहीये ह्या बातमीवर.पण खरंच सांगतो,समोरच्या फ्लॅटमध्ये एवढी मोठी दुर्दैवी घटना घडली तरी मला काहीही पत्ता लागला नाही.मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.ऑफिसमधून घरी यायला तसा उशीरच होतो.फॉरेन
कोलॅबरेटेड कंपनी असल्यामुळे रात्री तिकडच्या क्लायंटस् बरोबर बरेचदा व्हिडिओ कॉन्फरन्स असते.त्यामुळे झोपायला उशीर होतो.साहजिकच साडेसात-आठच्या आधी मी कधीच उठत नाही.
म्हणूनच आजही सलोनीच्या बाबतीतली एवढी दुर्दैवी घटना तिच्या शेजारी रहात असूनही मला अजिबात समजली नाही.
वरुणचा फोन आल्यावर मी झोपेतून जागा झालो.पण कुठलेही झटापटीचे आवाज पहाटे मला तरी जाणवले नाहीत.तशी माझी झोप सावध आहे."
"तुला आवाज जाणवले नाहीत हे अगदी शक्य आहे प्रशांत.कारण सलोनीच्या फ्लॅटमध्ये कुठलीही झटापट झालीच नाही. सगळ्या वस्तू जागच्याजागी आहेत.ती बाहेरुन फ्लॅटमध्ये शिरताच आधीपासून आत लपलेल्या खुन्याने ती बेसावध असतानाच तिच्या डोक्यावर बरेच प्रहार केले असावेत.बिचारीला स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नसावी.तिचा चेहरा तर पाहण्याच्या पलीकडे गेला होता."
"सर,वरुणने ही बातमी मला कळवल्यावर एक गोष्ट मात्र मी लगेच केली.आमच्या सोसायटीमध्ये रिसेन्टली प्रत्येक फ्लॅटच्या मेन डोअरला हे पीपहोल कॅमेरे बसवले आहेत.त्यात आठ तासाच्या रेकॉर्डिंगचं बाय डिफॉल्ट सेटिंग करुन ठेवलं आहे.रात्रीचे बारा ते सकाळचे आठ असं रेकॉर्डिंग त्यात होतं.बारा-बारा तासांचे दोन गार्ड आहेत. एंट्रन्सला सीसीटीव्ही आहे.त्यामुळे पूर्ण चोवीस तास रेकॉर्डिंग करण्याची गरज नाही वाटत.दुसरं आठ तासांचं रेकॉर्डिंग होताना पहिलं वाईप आउट होतं.बॅकअपची सोय आहे पण त्याचं सेटिंग कसं करायचं ते मी अजून समजून घेतलं नाहीये.
रेकॉर्डिंग चेक करण्याची सुध्दा ही पहिलीच वेळ.एरवी डोअरबेल वाजल्यावर बाहेर कोण आलंय ते बघण्यासाठी हा स्क्रीन फक्त आम्ही ऑन करतो.स्क्रीन ऑन असेल तर पॅसेजमधलं जेवढं कव्हर होईल तेवढं दृश्य ह्यातून आपण पाहू शकतो तेही समोरच्याला न समजता.आत्ता तुम्ही येईपर्यंत ह्यातलं रेकॉर्डिंग मी फॉरवर्ड करत बघितलं.सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी सलोनी तिच्या फ्लॅटचा दरवाजा लॅच-कीने उघडताना दिसतीये.आत शिरल्यावर मात्र काय झालं ते अजिबात समजत नाहीये.म्हणजे दरवाज्याच्या आतला भाग कॅमेऱ्यात कॅप्चर होतंच नाही."
"फॅन्टॅस्टिक!मी एकदम ओरडलोच.कदाचित काहीतरी थ्रेड ह्यातून आपल्याला मिळेल.
आम्ही आलो तेव्हा सलोनी आणि तुझ्या फ्लॅटचा दरवाजा उघडाच होता.त्यामुळे ह्या कॅमेऱ्याकडे आमचं लक्षच गेलं नाही.
एनीवेज्,इट्स गुड दॅट यू रिअलाईज्ड धिस.वरुण,लवकरच प्रशांत आपल्याला
जॉईन होणार असं चिन्ह दिसतंय.माझा पत्ता कट करु नका म्हणजे झालं."
"सर,काहीतरीच काय!असं बोलतच प्रशांतने रेकॉर्डिंग ऑन केलं.काल रात्री बारापासून ते सकाळी सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत तर कोणीही आल्याचं दिसत नव्हतं.प्रशांत म्हणाला तसं सलोनी सहा वाजून आठ मिनिटांनी आली.तिने लॅच-कीने दरवाजा उघडला.त्याच्यापुढे रेकॉर्डिंगमध्ये काहीच दिसत नव्हतं.तिने दार पूर्ण बंद केलं नाही एवढं निश्चित.नाहीतर कॅमेऱ्यामध्ये बंद दाराचा थोडा भाग दिसत राहिला असता.मी पुन्हा एकदा रिवाईंड करुन सलोनी तिच्या फ्लॅटमध्ये शिरल्यापासूनचा पार्ट बघितला,आणि सहा वाजून तेरा मिनिटांनी दाराबाहेर रक्ताचा ओघोळ वाहताना मला दिसला.अर्थात,खूप निरखून बघितल्यावरच कळत होतं.तेसुध्दा गार्डने ही बाब सांगितली होती म्हणून लक्षात आली.
आदरवाईझ त्या कॅमेऱ्याच्या तळहाताएवढ्या स्क्रीनमध्ये झूम करुन बघण्याची सोय नसताना पटकन कळलंही नसतं.पण ह्यावरुन एक गोष्ट क्लिअर झाली.ती म्हणजे,सलोनी फ्लॅटमध्ये शिरल्याशिरल्या केवळ पाच मिनिटांच्या आत तिचा खून झाला होता.
"भोसले,आपल्याला वाटलं होतं तसाच खुनी तिच्या फ्लॅटमध्ये आधीपासून बसलेला होता.पण तो नक्कीच तिच्या
निकटवर्तीयांपैकी असणार.त्याशिवाय तिच्या शेड्युलची एवढी बित्तंबातमी दुसऱ्या कोणाला कळणार नाही.ती लोणावळ्याहून निघून तिच्या घरी बरोब्बर किती वाजता पोचणार हे खुन्याला अचूक माहिती होतं. तिच्या आधी जाऊन फ्लॅटमध्ये लपून रहाणं त्याशिवाय शक्यच झालं नसतं.मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं,सलोनीच्या जीवावर उठण्याएवढं तिचं कोणाशी शत्रुत्व असेल?तिच्या क्षेत्रात स्पर्धा खूप असली तरी एवढं क्रूरकर्म कोणी करु शकेल असं नाही वाटत.शिवाय सन्मित्र ह्या फ्रेममध्ये कुठे बसतो,दोघांच्या खुनांमध्ये कनेक्शन आहे का,असल्यास काय?हे प्रश्न सोडवायचे बाकी आहेतच.वरुण,धिस केस इज् अ टफ नट टू क्रॅक,ऑफकोर्स दॅट वोन्ट स्टॉप अस.कसून कामाला मात्र लागायला पाहिजे."
"ऍट युवर सर्व्हिस सर,"
वरुण कमरेत झुकून काहीश्या नाटकी स्वरात म्हणाला.
यावर आम्ही सगळेच हसलो.वातावरणातला ताण ह्यामुळे जरा सैल झाला.
मी भोसल्यांना म्हणालो,"चला,समोरच्या फ्लॅटमधल्या देशपांडे फॅमिलीला भेटून बघू."
ह्यावर प्रशांत लगेच म्हणाला,"सर,देशपांडे काकू एकट्याच रहातात तिथे.त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो आणि काका पूर्वीच वारले आहेत.काकूंना सोसायटीमधल्या सगळ्यांच्या घरी काय चाललंय ह्यात प्रचंड इंटरेस्ट आहे.शिवाय एकदा बोलायला लागल्या की त्यांची गाडी थांबतच नाही.प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायच्या त्यांच्या स्वभावामुळे कोणी त्यांच्याशी जास्ती बोलतसुध्दा नाही.तरीही त्या मात्र स्नूपिंग थांबवत नाहीत."
"बरं झालं तू सांगून ठेवलंस ते.चला,भेटून येऊ त्यांना."
आम्ही सगळे देशपांडे काकूंकडे गेलो.त्यांनी दार उघडताच प्रशांतने आमची ओळख करुन दिली आणि येण्यामागचा हेतू सांगितला.त्याबरोबर प्रशांत म्हणाला तशी खरंच त्यांची गाडी सुसाट सुटली.
त्या सांगायल्या लागल्या,"झालं ते फार वाईट झालं पण हे असं कधीतरी घडणारच होतं.ह्या आजकालच्या मुली,ह्यांना पूर्ण स्वातंत्र्य हवं,कोणाचीही,कुठलीही बंधनं नकोत.मग अशी किंमत चुकवावीच लागते.आता सलोनीचंच बघाना.मी ह्या सोसायटीची सगळ्यात जुनी मेंबर,शिवाय तिच्यापेक्षा कितीतरी अनुभवी.पण तिने माझा एकही सल्ला कधी मानला नाही.
कायमच स्वतःच्या मर्जीनुसार वागत होती.मी आणि प्रशांत तिचे सख्खे शेजारी असल्यामुळे आमच्याबरोबर बाकीच्या लोकांपेक्षा थोडं जास्त बोलायची इतकंच.
तिचं क्षेत्र पण असं होतं ना की...."
मध्येच त्यांचं बोलणं थांबवत मी त्यांना विचारलं,"काकू,आज सकाळी सहाच्या सुमारास किंवा ती दोन दिवस नव्हती तेव्हा तुम्ही सलोनीच्या फ्लॅटबाहेर कोणाला रेंगाळताना पाहिलंत का?आज सकाळी तुम्हाला काही वेगळी चाहूल जाणवली का?"
"दोन दिवसांत तर कोणीच नवीन माणूस ह्या फ्लोअरवर आलेला नाही.माझं लक्ष असतं ना.आज सकाळचं म्हणाल तर,मला निद्रानाशाचा त्रास आहे.झोपेसाठी गोळ्या घेणं मला अजिबात पसंत नाही.त्यामुळे मी रात्रभर काहीतरी वाचत बसते,टीव्ही बघते,कधी गाणी ऐकते.कधीकधी तर चक्क घर आवरत बसते.पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास मग मला झोप येते.त्यामुळे नऊ वाजेपर्यंत तर मी गाढ झोपेत असते.
सकाळी काही घडलं असलं तर मला समजणं अवघड आहे.
एक मात्र सांगते,तेवढा एक त्रास सोडला तर बाकी माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे."
"आवाज तर त्याहून खणखणीत आहे."
वरुण माझ्या कानाशी पुटपुटला.हसू दाबतच मी काकूंची एक्स्प्रेस थांबवत म्हणालो,
"काकू,तुम्ही जे पहाटे पाहू शकला नाहीत ते तुमच्या ह्या कॅमेऱ्याने मात्र पाहिलं आहे.ह्यामध्ये आठ तासांपर्यंतचं रेकॉर्डिंग होण्याचं सेटिंग करुन ठेवलं आहे.आपण ते पाहूया.प्रशांतच्या कॅमेऱ्यापेक्षा वेगळा अँगल इथे असणार.त्यामुळे काही नवीन क्लू मिळतोय का ते बघूया.
"ह्यामध्ये रेकॉर्डिंग होतं?" काकू प्रचंड आश्चर्याने जवळजवळ ओरडल्या."हा कॅमेरा बसवणारा माणूस कसं बोलला नाही मला?मी आधीच पाहिलं असतं ना!"
त्यावर प्रशांत बोलला,"काकू,ही गोष्ट त्यांनी आपणहून कोणालाच सांगितली नाहीये.मला ह्या कॅमेऱ्याच्या वर्किंगमधले डिटेल्स जाणून घ्यायचे होते म्हणून मी त्या टेक्निशिअनला विचारलं होतं तेव्हा त्याने मला ही गोष्ट सांगितली होती.तसंही सगळ्यांना कुठे ह्यात इंटरेस्ट असतो.प्रत्येकाला एवढं सांगत बसण्यापेक्षा त्यांनी आपल्याला कॅमेरा इंस्टॉल केला तेव्हा एक ब्रोशर दिलं होतं.त्यामध्ये ही सगळी माहिती डिटेल,सोप्या भाषेत दिली आहे.
आज सकाळपर्यंत कधी हे चेक करायची वेळच आली नाही.आज गरज लागली ती अश्या परिस्थितीत."
असं बोलतच प्रशांतने रेकॉर्डिंग सुरु केलं. पहिला पार्ट फॉरवर्ड करत सकाळी सहापर्यंत आणला.मग सलोनी स्क्रीनवर दिसली.त्याबरोबर काकूंच्या चेहऱ्यावर एकदम फेरफार झाले.त्यांचे डोळे पाणावले.म्हणजे बाकी कश्याही असल्या तरी त्या सहृदय नक्कीच होत्या.
सलोनीने दार उघडलेले दिसले.पण काकूंच्या फ्लॅटची रचना अशी होती की कॅमेऱ्यामध्ये फक्त सलोनी दिसत होती.तिच्या फ्लॅटचं दारपण दिसत नव्हतं.म्हणजे प्रशांतच्या फ्लॅटएवढा पण अँगल त्यात दिसत नव्हता.
काकू मात्र काहीतरी नवीन समजल्यामुळे खूष झाल्या.त्यांनी लगेच डिक्लेअर पण केलं की त्या आता रोज रेकॉर्डिंग चेक करतील आणि काही महत्वाचं दिसलं तर आम्हाला इन्फॉर्म करतील.आम्ही तिघांनी त्यांना आमचे फोन नंबर देण्याचं मात्र टाळलं.जर काही दिसलं तर प्रशांतला कॉल करायला त्यांना सांगितलं.रेकॉर्डिंगची बाब त्यांना आधी का कोणी सांगितली नाही हा त्यांचा मुद्दा त्या रेटवत होत्याच.
मग आम्ही तिथे थांबलो नाही. सलोनीच्या फ्लॅटवर जाऊन उरलेले सगळे सोपस्कार पार पाडायचे होते.भोसल्यांबरोबर मी आणि वरुणसुध्दा थांबलो होतो.तिथलं सगळं आवरुन,वरुणला वाटेत त्याच्या घरी ड्रॉप करुन,मी घरी पोचलो तेव्हा ऑलमोस्ट चार वाजले होते.सकाळी सातपासून ते दुपारी चारपर्यंत ह्या अमानुष नाट्यात आम्ही गुरफटले गेलो होतो.जेवायची इच्छाच उरली नव्हती.वॉश वगैरे घेऊन मी मस्तपैकी कडक कॉफी बनवली आणि कॉफीचा मग घेऊन सोफ्यावर आरामात बसलो.जरी निवांत बसलो असलो तरी ह्या केसच्या संदर्भातलं विचारचक्र मात्र जोरदार चालू होतं.
आत्तापर्यंतच्या माझ्या केसेसपेक्षा खूपच वेगळी केस होती ही.अर्थात तश्या प्रत्येक केसचंच काहीतरी वेगळेपण होतं.पण ह्यावेळी दोन खून झाले होते आणि दोन्हीचा मोटिव्हच समजत नव्हता.
माणूस जेव्हा पैश्यांची गरज,मग हाव आणि कालांतराने त्याचं व्यसन ह्या पायऱ्या क्रमाक्रमाने चढतो तेव्हा गुन्हेगारीच्या जगातील त्याचा प्रवेश निश्चित असतो.पण सलोनी आणि सन्मित्रच्या बाबतीत ती शक्यता वाटत नव्हती.शिवाय आत्ताच त्यांची करिअर्स सुरु झाली होती त्यामुळे पैश्यांसाठी त्यांचा खून होण्याएवढा धो-धो पैसा अजून दोघांकडेही नव्हता.त्यामुळे प्रायमाफेशी तरी पैसा हे खुनांचं मोटिव्ह वाटत नव्हतं.
दोन्ही खुनांमध्ये कनेक्शन आहे का नाही ते अजून गुलदस्त्यातच होतं.कनेक्शन असेल तर,एक शक्यता...कुठल्या खतरनाक रॅकेटमध्ये ही दोघं अडकली असावीत का? दुसरी शक्यता..ती दोघं त्या रॅकेटसाठी काम तर करत नसतील ना?
दुसरी शक्यता माझी मलाच भयावह वाटली.कारण सन्मित्रचा इनोसन्ट चेहरा,लहान मुलांसारखे लुकलुकणारे डोळे त्याला दोषी ठरवण्यापासून मला रोखत होते.पण चेहऱ्यामागचा चेहरा किती भयंकर असू शकतो ह्याचं प्रत्यंतर मला बऱ्याच केसेसमध्ये आलं होतं.
हं!माझ्याच पहिल्या तर्काला छेद देणारा दुसरा तर्क मीच लढवत होतो.छे!आता विचार करण्याची कपॅसिटी संपली होती.
मनातला विचारांचा पसारा आवरण्यापलिकडे गेला की मी एक रामबाण उपाययोजना करतो.
शांतपणे डोळे मिटून घ्यायचे,नजरेसमोर माझ्या जन्मगावाचा,श्रीवर्धनचा समुद्रकिनारा आणायचा.तिथे माझ्या बालपणीच्या अनेक सुखद आठवणी आहेत.
निर्मनुष्य सागरकिनारा..चमचमणाऱ्या फेसाळत्या लाटा..सागराची मंद गाज..
आपोआप माझं मन हळूहळू शांत होत गेलं.
प्रकरण चौथे
दुसऱ्या दिवशी पहाटे,सव्वापाचच्या सुमारास माझा मोबाईल किणकिणला.मी अर्धवट झोपेतच कोणाचा फोन आलाय ते बघितलं. वरुणचं नाव फ्लॅश होताना बघून माझी झोप खाडकन उडाली.
"सर,आपल्याला लगेच प्रशांतकडे जावं लागणार आहे.त्याचा आत्ता फोन आला होता.खूप महत्वाचं काहीतरी त्याला आपल्याला सांगायचं आहे.त्याच्या घरीच येण्याची रिक्वेस्ट त्याने केली आहे.अर्ध्या तासात मी तुम्हाला पिकअप करायला आलो तर चालेल का?"
"अरे चालेल का काय विचारतोस,पळेल.मी विसाव्या मिनिटाला तयार रहातो."
एवढं बोलून मी सुपरफास्ट स्पीडने आवरायला लागलो.काय करणार!सगळ्या घटनाच विजेच्या वेगाने घडत होत्या.विचार करायला पण फारशी सवड नव्हती.
आत्तापण काय झालं असेल ह्याविषयी कुठलेही तर्क न लढवता मी वीस मिनिटांत तयार झालो.पुढच्या मिनिटाला वरुण आला आणि पंधरा मिनिटांत आम्ही प्रशांतच्या घरी होतो.तिथे देशपांडे काकूंना बघून थोडं आश्चर्य वाटलं.
"काकू,आज ह्या वेळेला तुम्ही जाग्या कशा?"मी विचारलंच त्यांना.
"मी काहीही बोलणार नाही.डायरेक्ट बघाच तुम्ही आता.प्रशांत,कर सुरु."
काकू एकदम विजयी वीराच्या आवेशात बोलल्या.आमचीही उत्सुकता वाढली होती.ते ओळखून प्रशांतने लगेच रेकॉर्डिंग सुरु केलं.
पहिली सात-आठ मिनिटं फॉरवर्ड केली.आणि..थोड्याच वेळात,म्हणजे बारा वाजून बारा मिनिटांनी संपूर्ण चेहरा झाकणारं हेल्मेट घालून एक माणूस ह्या फ्लोअरवर आला आणि सलोनीच्या फ्लॅटसमोर येऊन थांबला.तो लॅच-कीने दरवाजा उघडेल असं वाटत असतानाच त्याने अगदी हळू आवाजात दारावर नॉक केलं.महदाश्चर्य म्हणजे दार उघडलं गेलं आणि तो माणूस आत शिरल्यावर लगेच बंद झालं.मी आणि वरुणने,एखादा ऍक्शन थ्रिलर मूव्ही बघत असल्याप्रमाणे श्वास रोखून ठेवले होते.खरंच काहीतरी अनपेक्षित समोर दिसत होतं.नंतर प्रशांतने चार वाजून अठ्ठावीस मिनिटांवर रेकॉर्डिंग फॉरवर्ड करत आणलं.बरोबर साडेचारला दार परत उघडलं.
बहुतेक रात्रीचाच हेल्मेटधारी बाहेर आला.
दार लगेच बंद झालं.'बहुतेक'अशासाठी म्हणतोय कारण हेल्मेटमुळे रात्री तो आला
तेव्हाही चेहरा दिसला नव्हता आणि आत्ताही नाही.पण शरीरयष्टीवरुन आणि कपड्यांवरुन दोघेही एकच असावेत असं वाटत होते.तो लिफ्टच्या दिशेने जाताना दिसला नाही.
जिन्याच्या दिशेनेच वळलेला दिसला.
प्रशांतने रेकॉर्डिंग बंद केलं आणि म्हणाला,"सर,ह्यानंतर आत्तापर्यंत कोणीही आलेलं नाहीये.आज पहाटे..."
अर्ध्यातच त्याचं वाक्य तोडत काकू म्हणाल्या,"थांब,थांब,आता मी सांगते.गौतमजी,तुम्हाला तर माहितीच आहे,मला निद्रानाश आहे.त्यामुळे मी काल रात्री हॉलमध्ये बसून पुस्तक वाचत होते.पण सकाळीच एवढी दुर्दैवी घटना घडली होती.
त्यामुळे मी खूप अस्वस्थ होते.वाचनात अजिबात लक्ष लागत नव्हतं.त्यामुळे हॉलमध्येच फेऱ्या मारत बसले होते.
अचानक,साधारण सव्वाबाराच्या सुमारास मला पॅसेजमध्ये काहीतरी हालचालींचे आवाज जाणवले.अगदी अस्पष्ट होते.पण सगळीकडे शांतता होती आणि मी हॉलमध्येच होते त्यामुळे मला ते जाणवले.
खरंतर मी दार उघडूनच बघणार होते.पण तेवढी हिंमत नाही झाली.म्हणून मग मी हा स्क्रीन चालू केला.माझ्या दरवाज्याच्या कॅमेऱ्यातून फक्त तो हेल्मेटवाला आलेला दिसला.दाराचा अगदी थोडा भाग त्यात दिसतो.त्यामुळे ते थोडं उघडल्यासारखं वाटलं पण खात्री नव्हती,आणि खरं सांगू का!मी इतकी घाबरले की बेडरुममध्ये येऊन कॉटवर पांघरुण घेऊन बसले.तशी मी भित्री मुळीच नाही.आता किती वर्षं एकटीच तर राहते.पण अशी घटना माझ्या पूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच घडलीये.रात्रीचं त्या माणसाचं गुपचुप येणं..सलोनीच्या फ्लॅटमध्ये कोणी नसताना दार उघडलं जाणं..
कोणीही घाबरेलंच ना?नंतर पूर्ण रात्र मी जागीच होते.मग पहाटे पाचच्या आधी रेकॉर्डिंग बघितलं.तेव्हा साडेचारला तोच हेल्मेटवाला पुन्हा तिच्या घराबाहेर पडलेला दिसला.मधल्या चार तासात कोणी आलं नाही का गेलं नाही.मग मी तशीच प्रशांतकडे आले.त्याला झोपेतूनच उठवलं आणि रेकॉर्डिंग चेक करायला लावलं.नंतर त्याने तुम्हाला फोन लावला."
काकूंनी एका दमात घडलेलं सगळं सांगितलं.
खरंच त्यांचा हा प्रॉम्पटनेस कौतुकास्पद होता.अशी सजगता प्रत्येक नागरिकाने दाखवली तर बऱ्याच छडा न लागलेल्या गुन्ह्यांची उकल होण्यात मदत होईल.मी काकूंचे मनापासून आभार मानले.काकूंची परवानगी घेऊन वरुण त्यांच्या कॅमेऱ्यातलं रेकॉर्डिंग चेक करुन आला.खाली जाऊन रात्रपाळीच्या गार्डला भेटून बाराच्या सुमारास कोणी हेल्मेटवाला आला होता का ते त्याने कन्फर्म केलं.शिवाय सीसीटीव्हीचं फूटेज चेक केलं पण कुठेच त्या माणसाचा पत्ता लागला नाही.मग तो परत प्रशांतकडे आला.
आता भोसल्यांना इन्फॉर्म करायला हवं होतं.पण तितकी अर्जन्सी या क्षणी नसल्यामुळे मी त्यांची झोप डिस्टर्ब करण्याऐवजी साडेसात-आठच्या सुमारास त्यांना कॉल करायचं ठरवलं.
मी वरुणला म्हणालो,"तुला आज प्रशांतकडे थांबून दिवसभर कॅमेऱ्याचा स्क्रीन ऑन करुन वॉच ठेवावा लागणार कारण सकाळी आठच्या पुढे रेकॉर्डिंगचं सेटिंग ह्यात नाही केलंय.एवढा खुलेआम तो हेल्मेटवाला येणार नाही.परत येईलच ह्याचीही शाश्वती नाही.
पण तरीही आपल्याला सतर्क रहावंच लागेल.रात्रीतर खडा पहारा द्यावा लागणार."
मध्येच काकू म्हणाल्या,"तुम्ही काही काळजी करु नका.मी चोवीस ताससुध्दा वॉच ठेऊ शकीन.सलोनीचा खुनी पकडला गेलाच पाहिजे.तिचा स्वभाव कसाही असला तरी असा भीषण प्रसंग कोणावर येऊ नये असं मला अगदी मनापासून वाटतं. त्यामुळे मी पूर्ण सहकार्य करीन."
"काकू,तुम्ही जो ऍलर्टनेस दाखवलात त्याची खरंच खूप मोलाची मदत झालीये आम्हाला.
पण आता तुम्ही काळजी करु नका.मस्तपैकी झोपा आता.आज रात्री हवं तर प्रशांतकडे या.बारा वाजल्यापासून अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार आहे.काही सनसनाटी घडलंच तर तुम्हीही त्याच्या साक्षीदार होऊ शकाल."
"हो,हो,चालेल.मी रात्री इथे नक्की येईन.शिवाय दिवसभरात मधून-मधून काही दिसतंय का तेसुध्दा बघीन."असं बोलून काकू त्यांच्या घरी गेल्या.
"सर,प्रशांत म्हणाला,मी ब्रेकफास्टचं काहीतरी बघतो."
"अरे नको,मी आता निघतो.भोसल्यांना घेऊन रात्री नऊपर्यंत येईन."
तो एकटाच इथे राहतो आणि त्याचं जेवणखाण बहुतेक वेळा ऑफिसमध्येच होतं हे मला माहिती होतं.त्यामुळे त्याला कशाला अडचणीत टाका,असा विचार करुन मी उठलो.पण त्याने खूपच आग्रह केल्यामुळे मी थांबलो.तसंही माझी ब्रेकफास्टचीच वेळ होती.त्यामुळे मी जास्ती आढेवेढे घेतले नाहीत.दहा-पंधरा मिनिटांतच त्याने ऑम्लेट्स,भरपूर बटर फासलेले टोस्टस्, वाफाळती कॉफी शिवाय,केक,बिस्कीटस् आणि फळं असं सगळं आमच्या समोर आणून ठेवलं.एवढा फर्स्टक्लास मेन्यू असूनही चांगली खातीरदारी करु शकलो नाही म्हणून तो हळहळत होता.सगळ्याचा मस्त समाचार घेत आम्ही छान अवांतर गप्पा मारल्या.थोडा वेळ आम्ही खरंच विसरुन गेलो होतो की इथे का आलो आहोत.समोरच्या वॉलक्लॉकमध्ये साडेआठचा टोला पडला आणि मी भानावर आलो.
क्षणभर माझी मलाच शरम वाटली.
कालच एवढी दुर्दैवी घटना घडली होती आणि आज आम्ही सगळं विसरुन हास्यविनोदात रमून गेलो होतो.'जन पळभर म्हणतील हाय हाय'हेच त्रिकालाबाधित सत्य आहे हे पुन्हा नव्याने मला जाणवलं.
मी तिथूनच भोसल्यांना फोन केला.
अपेक्षेप्रमाणे ते रात्री इकडे येण्यासाठी एका पायावर तयार झाले.दिवसभरात कधीतरी येऊन रेकॉर्डिंग चेक करुन जाईन असंही त्यांनी सांगितलं.वरुण थांबणार होता त्यामुळे मला अजिबात काळजी करायचं कारण नव्हतं.
मी दोघांचा निरोप घेऊन निघालो.वाटेतच एक छान सुपरमार्केट दिसलं.किरकोळ गोष्टींची खरेदी करायची होती म्हणून मी सुपरमार्केटपाशी थांबलो आणि आत शिरलो.आत्ता नुकतंच उघडलं असल्यामुळे फारसे कस्टमर्स आले नव्हते.त्यामुळे सेल्समनसुध्दा निवांत होते.मी एका रॅकपाशी उभा राहून मला हव्या असलेल्या गोष्टी बघत होतो.शेजारीच दोन सेल्समन रॅकवर ट्रॉलीमधल्या गोष्टी नीट मांडून ठेवत होते.
त्यांच्या आपसात गप्पा चालल्या होत्या.
सहज कानावर पडत होत्या.अचानक त्यांचं बोलणं ऐकून मी कान टवकारले.
आश्चर्याने माझ्या भुवया उंचावल्या गेल्या.ही माहिती आमच्या केसच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरु शकत होती.मी घाईघाईने त्यांच्यापाशी गेलो आणि माझी ओळख त्यांना सांगत ते आत्ता जे बोलत होते ते जरा खुलासेवार सांगण्याची विनंती केली.सुरवातीला ते जरा बुजल्यासारखे वाटत होते.पण नंतर मात्र घडाघडा बोलायला लागले.त्यातल्या एकाने एक सेल्फीपण मला दाखवला.माझं सीसीटीव्हीचं फूटेज बघण्याचं काम त्यामुळे वाचलं.मी मनापासून त्यांचे आभार मानले.दोघांचेही नंबर्स घेतले.परत गरज पडल्यास कॉल करीन असं सांगून पुन्हा एकदा त्यांचे आभार मानून मी निघालो.मी गाडी चालवत असताना आता खूपच रिलॅक्स झालो होतो.अजून महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा बाकी होता पण एक गोष्ट नक्की,द मिस्ट वॉज नाऊ क्लिअरिंग.
आज मी घरीच थांबायचं ठरवलं होतं. ऑफिसवर जाऊन तसंही काही उपयोग नव्हता.मी निव्वळ योगायोगाने त्या सुपरमार्केटमध्ये गेलो होतो.पण खूपच महत्त्वाची बातमी हाती लागली होती.ही बातमी माझ्या शंकेला पुष्टी देणारी होती.पण अद्याप खुनांचं मोटिव्ह कळत नव्हतं त्यामुळे खुनी कोण?एकच आहे का दोन?ह्या विषयी ठोस अंदाज बांधणं जमत नव्हतं.असो,किमान एक धागा तर मिळाला होता.त्याला पकडून पुढचा पल्ला गाठू इतपत विश्वास होता.
मी जेमतेम घरी येऊन टेकतोय तेवढ्यात बेल वाजली.दार उघडलं तर दारात अतिशय नावाजलेले,जनमानसात लोकप्रिय असलेले देशमाने वकील उभे होते.मला वाटलेलं प्रचंड आश्चर्य माझ्या चेहऱ्यावर उमटलं असणार.म्हणूनच देशमाने हसतच म्हणाले,"काय गौतमजी,मला आतसुध्दा बोलवणार नाही का?तुमच्या इनस्पेक्टर मित्राप्रमाणे इथूनच कटवताय का काय?मी इकडून जात होतो,म्हंटलं तुमच्याकडे चहा प्यावा.
"अरे!कटवीन कसा?या ना,आत या.मी त्यांचं छान आदरातिथ्य केलं.त्यांचं खाणंपिणं झाल्यावर मी त्यांना विचारलं,"बोला,काय काम काढलं आहे?"
"छे हो!काम कसलं?तुमच्या भेटीचा योग फारसा येत नाही.तुमचे मित्र नाराज असतात आमच्यावर.खरंतर त्यांची नाराजी का आहे ते मला समजतच नाही.
बाकी,तुम्ही काय म्हणताय?नवीन कुठली केस?अरे हां!सलोनी मर्डर केस तुमच्याकडे आलीच असेल.कुठपर्यंत आली प्रगती?"
देशमान्यांनी आवर्जून चौकशी करण्याएवढी सलोनी फार मोठी हस्ती नव्हती.मला वाटलेलं आश्चर्य चेहऱ्यावर दिसू न देता मी त्यांना म्हणालो,"छे,प्रगती कुठली?अजून खुनाचं मोटिव्हसुध्दा लक्षात आलेलं नाहीये.
खुनी शोधणं तर लांबची गोष्ट आहे."
हे ऐकल्यावर देशमानेंना मग अजून माझ्याकडे थांबण्याची इच्छा दिसली नाही.ते थोड्याच वेळात माझा निरोप घेऊन निघाले.
आता मात्र माझी पक्की खात्री पटली,सलोनी प्रकरण अजिबात साधं नाहीये.देशमान्यांची प्रतिमा लोकांच्या नजरेत अगदी स्वच्छ,आदर्श होती.पण भोसल्यांमुळे मला आतल्या गोटातल्या बातम्या समजत होत्या.देशमाने म्हणजे कायद्याच्या कक्षेत राहून सगळी बेकायदा कृत्य करणारा माणूस होता.कायदा अगदी कोळून प्यायलेला असल्यामुळे सगळ्या पळवाटा माहिती होत्या.भोसल्यांचा तर अंदाज होता की अंडरवर्ल्डशी सुध्दा त्यांचं संधान होतं. कितीदा तरी त्यांच्याविरुध्द मिळालेला पुरावा बघता-बघता हातातून निसटून गेला होता.
सगळं काही माहिती असूनही पुराव्याअभावी भोसले त्यांच्यावर कुठलीही ऍक्शन घेऊ शकत नव्हते.आतातर ते फार बडी असामी झाले होते.काही महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा सौरभ देशमाने युवा खासदार म्हणून निवडून आला होता.अतिशय रुबाबदार असलेला सौरभ फक्त तरुण मुलींची'दिल की धडकन'
नव्हता तर मुलंसुध्दा त्याच्या स्टाईलचं अनुकरण करत होती.त्याची हेअरस्टाईल,त्याच्या कोल्हापुरी चपला,पांढऱ्याशुभ्र सिल्कच्या कुर्त्यावरचं त्याचं जॅकेट,इतकंच काय त्याची वेलट्रीम्ड दाढी,सगळंच तुफान पॉप्युलर झालं होतं.तो इंकपेनांचा मोठा शौकीन होता.त्याच्या जॅकेटच्या खिशाला खूप महागडी,पाच-सहा पेनं तरी कायम लटकत असायची.खिशात पेन असणं हे सुविद्यपणाचं एक लक्षण आहे असं तो नेहमी सांगायचा.युवावर्गासाठी त्याने अल्पावधीतच खूप महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या होत्या.त्याचं ओरेटरी स्कील तर जबरदस्त होतं.खूप प्रॉमिसिंग वाटत होता तो.
बाप-लेक अगदी भिन्न स्वभावाचे होते.
मात्र,सौरभमुळे देशमाने अजूनच फॉर्ममध्ये आले होते.क्रिमिनल लॉयर असल्यामुळे त्यांचं पोलीसस्टेशनला सतत जाणं असायचं.भोसल्यांच्या ब्रँचला आल्यावर ते मुद्दाम त्यांच्याशी काहीतरी तिरकस बोलायचे.
कुठला तरी मुद्दा अडवून धरायचे.भोसले आपली सगळी कुंडली जाणतात,हे देशमान्यांना पुरेपूर माहित होतं.त्यामुळे दोघांच्यात कोल्ड वॉर चालू असायचं.
सौरभमुळे आता तर त्यांना अडकवणं अजूनच अवघड झालं होतं आणि देशमाने या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेत होते.त्यामुळे त्यांच्या नुसत्या दर्शनानेही भोसल्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जायची.
आज म्हणूनच त्यांच्या अनपेक्षित भेटीमुळे मी चक्रावून गेलो होतो.सलोनी प्रकरणातील त्यांचा इन्टरेस्टही गोंधळून टाकणाराच होता.
रात्री भोसल्यांच्या कानावर हे घातलं पाहिजे असा विचार करत मी दुसऱ्या कामांकडे वळलो.
रात्री बरोबर साडेनऊला मी आणि भोसले प्रशांतकडे पोचलो.कॅमेऱ्याचा स्क्रीन ऑनच होता.दिवसभरात वरुण मधूनमधून रिपोर्ट करत होताच.
अपेक्षेप्रमाणेच काहीही विशेष घडलं नव्हतं.
खरंतर आज तो हेल्मेटवाला नक्की येईलच
ह्याची तरी कुठे खात्री होती.पण भोसले सकाळीच म्हणाले की सलोनीच्या खुनाचा तपास चालू आहे तोपर्यंत ते कधीही फ्लॅटची तपासणी करु शकत होते.फ्लॅट अजून सील केला नव्हता.फक्त लॅच होतं तेवढंच लावलं होतं.आज काही घडलं नाही तर उद्या आम्ही सलोनीचा फ्लॅट संपूर्ण चेक करायचं ठरवलं.देशपांडे काकू अजून आल्या नव्हत्या.
तोपर्यंत बाकीच्यांना सकाळची सनसनाटी खबर सांगितली.देशमान्यांच्या सदिच्छा भेटीबद्दल सांगितलं.त्याचबरोबर माझा संशय बोलून दाखवला आणि तो सेल्फीसुध्दा दाखवला.सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला.
'गौतमजी,हे जर खरं असेल तर ही केस चांगलीच कॉम्पलिकेटेड होणार आहे.खूप मोठं षडयंत्र रचलं गेलंय हाच अर्थ ह्यातून निघतोय.एकंदरीत ही केस चॅलेंजिंग असणार तर."
नुसत्या कल्पनेनेच भोसले एकदम उत्साहाने सळसळले.खरंच होतं ते.केस जितकी कठीण तितका आम्हाला तिघांना जास्ती आनंद व्हायचा.अरे!आयुष्यात काही आव्हानं नसतील तर असं थ्रिल नसलेलं जगणं किती बेचव होईल.माझा हा चाकोरीबाहेरचा व्यवसाय ह्याच दृष्टीकोनातून मी निवडला होता.
प्रवाहाविरुद्ध पोहण्यासाठी गट्स लागतातच.पण नुसत्या काठावर उभ्या रहाणाऱ्या कृतीशून्य लोकांपेक्षा प्रवाहाबरोबर पोहणारे कैक पटीने चांगले.निदान प्रवाहात उडी मारण्याची हिंमत तरी ते दाखवतात.
सुदैवाने वरुण,भोसले आणि मी समविचारी
असल्यामुळे कुठलंही चॅलेंज् ऍक्सेप्ट करण्याची आमची तयारी होती.
हं,आता कधीकधी अशी अकाली संपलेली आयुष्यं बघून डिप्रेस्ड व्हायचो.पण गुन्हेगार पकडल्यानंतरचं समाधान तितकंच मोठं असायचं.
तितक्यात काकूंची तुफान मेल आली.काकू आल्यावर विचार वगैरे सगळे थांबतात.तसा स्कोपच त्या देत नाहीत.आल्या-आल्या त्यांनी घडाघडा बोलायला सुरुवात केली.
"गौतमजी,आज दिवसभरात कोणीच आलेलं नाही.मी सारखी बघत होते ना.मला तर एवढी घाई झालीये रात्रीचे बारा वाजण्याची.कधी एकदा बारा वाजतात आणि तो हेल्मेटवाला खुनी येतोय असं.."
मी मध्येच त्यांना थांबवत म्हणालो,"काकू,तो खुनी आहे असं अजून कुठेही सिद्ध झालेलं नाही.असा एकदम कुठलाही निष्कर्ष घाईघाईने काढू नका.
अतिशय महत्त्वाचं म्हणजे कोणाजवळही
याची जराही वाच्यता करु नका."
"आता एवढं का मला समजत नाही!मी कालपासून घराबाहेरपण गेले नाहीये.तुम्ही अजिबात चिंता करु नका.पण मला एक सांगा,तो हेल्मेटवाला खुनी नसेल,तर असं लपूनछपून यायचं काय कारण?सलोनीच्या फ्लॅटमध्ये कोणीतरी आहे याची मात्र मला भीती वाटतीये."
वरुण त्यांना समजावत म्हणाला,
"काकू,आम्ही एवढे सगळे असताना तुम्ही घाबरायचं काहीच कारण नाही.तसंही तुम्ही अजिबात भित्र्या नाही आहात.बरोबर ना?"
वरुण त्यांची जरा फिरकी घेत होता.पण ते त्यांच्या लक्षात आलं नव्हतं आणि त्या अगदी सिन्सिअरली'हो ना,हो ना'करत होत्या.आम्ही आपले इकडेतिकडे बघून हसू लपवायचा प्रयत्न करत होतो.
घड्याळाचा काटा त्याच्या वेगाने पुढेपुढे सरकत बारावर येऊन स्थिरावला.मग मात्र आम्ही एकदम ऍलर्ट होऊन स्क्रीनकडे लक्ष एकवटलं.
आणि...बारा वाजून बारा मिनिटांनी एक हेल्मेटधारी सलोनीच्या फ्लॅटसमोर अवतीर्ण झाला.आमचे श्वास रोखले गेले.काकूंचे विस्फारलेले डोळे मी क्षणमात्र पाहिले.
त्याने दारावर हलक्या आवाजात नॉक केलं.लगेचच दरवाजा उघडला गेला.आतली व्यक्ती कॅमेऱ्याच्या अँगलमुळे दिसणार नव्हतीच.दार हलकेच बंद झालं.सगळी कालची पुनरावृत्ती.
मग आमचे श्वास पुन्हा सुरळीत झाले.
"बघा,बघा,मी बोलले होते तसंच आजही झालं ना!"काकू उत्तेजित होऊन बोलायला लागल्या,"तोच खुनी आहे.फ्लॅटमध्ये त्याचा साथीदार असणार.दोघांनी मिळून सलोनीचा खून केला असेल."
काकूंची एक्सप्रेस सतत थांबवावी लागत होती.मी त्यांना शांत करत म्हणालो,"आता तुम्ही इथेच आत जाऊन विश्रांती घ्या.बाहेर जाऊन दाराचे आवाज नको करायला.पहाटे परत कालच्या वेळेस स्क्रीन बघूया.आम्ही टर्न बाय टर्न बघत राहूच.काही घडलं तर तुम्हाला उठवू.आता खरंच आराम करा तुम्ही."
"मला इनडायरेक्टली हाकलताय तुम्ही हे लक्षात आलंय माझ्या.पण ठीक आहे.
कालपासून घडणाऱ्या विचित्र घटनांनी तसंही मी फार दमले आहे.झोप तर मला एवढ्यात येत नाही हे तुम्हाला बोलले होते मी.आराम करीन फक्त.काही घडलं तर मात्र बोलवा हं."
असं म्हणून त्या आतल्या रुममधे गेल्या.
आता आम्हाला शांतपणे पुढचं प्लॅनिंग करता आलं असतं.
"गौतमजी,आत्ताच मी माझ्या टीमला बोलवतो.लगेच फ्लॅटवर जाऊन धडकूया का?उद्या ह्या वेळेपर्यंत कशाला थांबायचं?तोपर्यंत ते निसटून गेले तर!"
"भोसले,अशी घाई नका करु.ते जे कोण आणि किती आहेत ते सध्या अगदी बेसावध आहेत.माझा संशय जर खरा असेल तर एवढ्यात ते कुठे जाणार नाहीत.इथलं सगळं वाईन्डअप करायला त्यांना थोडा वेळ तर लागेलच ना.तो हेल्मेटवाला मात्र शंकरच्या,इथल्या गार्डच्या समोरुन नक्कीच येत नसावा.आज सकाळीच इथून घरी जाताना मी त्याला रात्री बारानंतर अगदी बारकाईने गेटवर लक्ष ठेवायला सांगितलं आहे.कोणीही आलं तरी व्यवस्थित चेहरा बघून खात्री केल्याशिवाय सोडू नकोस असं बजावलं आहे.
सीसीटीव्हीचं फुटेज् पण चेक करायला सांगितलं आहे.माझा फोन नंबर त्याला दिला आहे आणि काही संशयास्पद वाटलं तर लगेच कॉल करायला सांगितलं आहे.तो तसा स्मार्ट आहे.एवढं काम नक्कीच करु शकेल.थांबा,मीच विचारतो त्याला कॉल करुन.लगेच मी शंकरला फोन लावला आणि कोणी वर येताना मगाशी दिसलं का याबाबत विचारलं.त्याने नाही असं सांगितल्यावर फूटेज् चेक करुन लगेच कळवायला सांगितलं.त्याचा थोड्याच वेळात फोन आला.एवढ्यात हेल्मेटवाला तर नाहीच पण सोसायटीतील कोणीच बाहेरुन आलं नव्हतं.
"भोसले,मला असं वाटतंय,तो माणूस पर्लमध्येच आणि ह्याच विंगमध्ये रहाणारा असला पाहिजे.स्क्रीनमध्ये नीट दिसत नसलं तरी खालच्या फ्लोअरवरुन येत असावा असा फील येतोय.
प्रशांत,ह्या विंगमध्ये असा कुठला फ्लॅट आहे का,की जो बंद असतो,ओनर दुसरीकडे रहातो आणि क्वचितच कधीतरी येतो?किंवा एखादा फ्लॅट विकला गेलेलाच नाही?असं होण्याचे चान्सेस असतात की फ्लॅट ओनरला पत्ता लागू न देता रिकाम्या फ्लॅटमध्ये गुपचूप राहून बेकायदा गोष्टी केल्या जातात.तशी काही भानगड आहे,का तो रहस्यमय माणूस खरंच सलोनी प्रकरणाशी संबंधित आहे ह्याची शहानिशा करावी लागेल.एकच गृहीतक बरोबर आहे असं मानून त्या दिशेनेच फक्त प्रयत्न करुन नाही चालणार."
"सर,प्रशांत म्हणाला,तसा व्हेकन्ट फ्लॅट कोणताच नाही.पण खालच्या फ्लोअरवर, सलोनीच्या एक्झॅक्ट खालचा फ्लॅट मि.शर्मा यांचा आहे.ते साधारण आठ-दहा दिवसातून एकदा फ्लॅटवर येतात.ट्रॅव्हलिंग जॉब आहे असं त्यांनी एकदा सोसायटी मीटिंगमध्ये सांगितलं होतं.कायम त्यांच्या डोक्यावर टोपी असते.जाड भिंगाचा चष्मा आणि बऱ्यापैकी मोठी दाढी ह्यामुळे आम्हाला त्यांचा चेहरा नीट कधी दिसलाच नाही.वयाचा सुध्दा काहीच अंदाज करता आलेला नाही.ते घरी येतात तेव्हा एकटेच....ओ माय गॉड!सगळंच सस्पिशिअस आहे सर."
"सर,मध्येच वरुण बोलला,त्या फ्लोअर वरच्या बाकी दोघांच्या कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग उद्या सकाळी चेक करुन येऊ का?नक्कीच काहीतरी समजेल."
"देअर यू आर!चेहरा दिसला नाही तरीही तो माणूसच खालच्या फ्लोअरवरचा शर्मा आहे का हे लगेचच कळेल.
आधी टोपी,दाढी आणि आता हेल्मेट.दोघेही एकच असावेत असा संशय घ्यायला भरपूर स्कोप आहे.असा गेटअप करुन तो आयडेंटिटी लपवतोय हे नक्की.उद्या ठोस काहीतरी समजेलच.चला,साडेतीनपर्यंत झोप काढायला काहीच हरकत नाही.रेकॉर्डिंग तर आपण बघणार आहोतच."
आम्ही सगळे सोफ्यावर येऊन बसलो.वरुण मध्येच आत जाऊन काकूंना पाहून आला.
"सर,आश्चर्य म्हणजे आज काकू अगदी गाढ झोपल्या आहेत.पहाटेपर्यंत झोप येत नाही म्हणत होत्या ना."
मी थोडासा खेदाने हसून म्हणालो,
"कदाचित एकाकीपणा हे त्यांच्या
निद्रानाशाचं कारण असावं.'होम अलोन',आजकाल बऱ्याच घरांमध्ये आढळणारी कॉमन सिच्युएशन."
आम्ही हे बोलत होतो तोपर्यंत भोसल्यांनी तिथल्या सेटीवर आरामात झोपून तालासुरात घोरायला पण सुरुवात केली होती.आम्ही तिघांनीही हसत-हसत मस्त ताणून दिली.साडेतीनचा अलार्म वाजला तेव्हा एकापाठोपाठ एक सगळे उठलो.काकू अजूनही छान झोपलेल्याच होत्या.
जरा फ्रेश होऊन परत स्क्रीनसमोर येऊन थांबलो.आणि..बरोबर साडेचारला सलोनीच्या फ्लॅटचं दार उघडलं.हेल्मेटधारी बाहेर आला.दार ताबडतोब बंद झालं.तो जिन्याच्या दिशेने गेला असावा.प्रशांतने मधल्या वेळेतलं रेकॉर्डिंग भराभर फॉरवर्ड करत आम्हाला दाखवलं.तेव्हा सगळं सामसूम होतं.
आता मात्र मी सूत्रं माझ्या ताब्यात घेऊन भराभर सूचना द्यायला लागलो.
"वरुण,साधारण सात वाजता खाली जाऊन शर्मा सोडून उरलेल्या दोघांच्या फ्लॅटचं रेकॉर्डिंग पहिले चेक कर.दोघं एकच आहेत हे जरी समजलं तरी आपलं काम जरा सोपं होईल.भोसले,तुमच्या टीममधल्या पाच-सहा लोकांना इथे येऊन थांबायला सांगा.तो जर शर्मा असेल...शर्माच असणार.त्याशिवाय लगेच इथे येण्याचं धाडस दुसरं कोणी करणार नाही.त्यामुळे उद्याही तो येणार.रेकॉर्डिंगचं त्यांना नक्कीच माहित नाहीये.कोणाला थोडासाही संशय आला असेल हे त्यांच्या ध्यानीमनीही नसेल.त्यामुळे ते थोडेसे बेसावध असण्याची शक्यता आहे.फ्लॅटमध्ये किती जणं रहात आहेत त्याची आपल्याला काहीच कल्पना नाही.
त्यांची संख्या जास्ती असू शकते.म्हणूनच भोसले,तुमची माणसं लागणारच.
या आपल्या मिशनमध्ये टाईम प्रिसिजनला खूप महत्त्व आहे,रादर त्यावरच सगळं अवलंबून आहे.ज्यावेळेस हेल्मेटवाला येऊन नॉक करेल तेव्हा ऑबव्हिअसली आतली व्यक्ती स्क्रीन ऑन करुन खात्री करुन घेणार.तेव्हा आपण त्या रेंजमध्ये थांबून चालणार नाही.दार जेव्हा उघडेल,बरोब्बर त्याच क्षणी हेल्मेटवाल्याला पकडणं, उघडलेलं दार पकडून ठेवणं,आतल्या माणसाला पकडणं ह्या सगळ्या क्रिया एकाच वेळी होणं अत्यंत जरुरीचं आहे.भोसले,तुमची दोन-तीन माणसं जिन्यात आणि साधारण तेवढीच प्रशांतकडे थांबलेली असतील.आपण त्या लोकांना पकडल्यावर लगेच त्यांनी येऊन फ्लॅटमध्ये घुसून आतले जे कोण साथीदार असतील त्यांना कंट्रोल करायचं आहे.कदाचित ह्या दोघांनी जास्ती गडबड केली तर तिथे तुमच्या टीमची मदत लागू शकेल.आत्ता मी जरी इन्सट्रक्शन बेस्ड थिअरी सांगत असलो तरी उद्या प्रॅक्टिकलच्या वेळेस ती ऍप्लाय करता येईलच हे सांगू शकणार नाही.
त्यामुळे ऍलर्टनेस खूप महत्त्वाचा आहे.
सो,रेडी फॉर द मिशन?"
"बाय ऑल मीन्स्!"वरुण आणि भोसले एकदमच बोलले.
"सर,मला हे इतकं थ्रिलिंग वाटतंय,की जॉब सोडून तुम्हाला लगेच जॉईन व्हावं अशी इच्छा होतीये."
"प्रशांत,मी त्याला म्हणालो,अश्या थ्रिल्समध्ये रिस्क फॅक्टर खूप असतो.सेफ अँड सिक्युअर काही नाही.बघ,तयारी आहे का ते."
"आत्ता ज्याचा साक्षीदार व्हायला मिळतंय तो क्षण तर अनुभवतो.लेट्स सी!"
आमचं हे डिस्कशन चाललं होतं तोपर्यंत सात वाजत आले होते.वरुण खालच्या मजल्यावर जाऊन शर्मा सोडून उरलेल्या दोघांचं रेकॉर्डिंग चेक करुन आला.आमचा अंदाज परफेक्ट होता.हेल्मेटवाला मि.शर्माच होता.शर्माच्या फ्लॅटमधूनच बारा वाजून अकरा मिनिटांनी तो बाहेर पडला होता आणि वरच्या जिन्याकडे गेलेला दिसत होता.वरुणने शंकरकडे चौकशी केली आणि फूटेजपण चेक केलं.शर्मा रात्री साडेआठच्या सुमारास दोन्ही दिवशी बिल्डींगमध्ये शिरताना दिसला.आता शंकेला जागाच नव्हती.
पण एक प्रश्नचिन्ह होतंच.शर्माच्या रुपात इतके दिवस वावरणारा तो कोण?उद्या परदाफार्श झाल्यावर समजणारच होतं म्हणा.पण आता तेवढाही धीर धरवत नव्हता.
काकूंना मात्र कसंबसं समजावून आम्ही त्यांना प्रशांतकडे उद्या रात्री येऊन आतल्या खोलीत बसण्यासाठी तयार केलं.त्यांनी त्या क्षणी थोडीशीही चुकीची हालचाल,कसला आवाज केला असता,तर शर्मा नक्की सावध झाला असता.कारण रात्रीच्या नीरव शांततेत अगदी लहान आवाजही ऐकू जातो.काकूंना असं वगळल्यामुळे त्या जरा नाराज झाल्या पण मनं जपण्याची ही वेळ नक्कीच नव्हती.
आता प्रतीक्षा होती उद्या रात्रीची.
प्रकरण पाचवे
दुसरा दिवस जरा अस्वस्थतेतच गेला.अश्या कामगिरीवर जाण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती.पण प्रत्येक वेळेस थोडं टेन्शन असायचंच.आज घड्याळ संथ गतीने चाललंय असं उगाचंच वाटत होतं.
अखेर तो क्षण आला.आम्ही जय्यत तयारीनिशी स्क्रीनसमोर थांबलो होतो.
भोसलेंची तीन-चार माणसं वरच्या जिन्यात दबा धरुन बसली होती आणि तेवढीच प्रशांतकडे थांबली होती.आम्ही प्रशांतच्या दाराचं लॅच काढून ठेवलं आणि दार अलगद लावून घेतलं.आणि....बारा वाजून बारा मिनिटांनी शर्मा सलोनीच्या फ्लॅटसमोर येऊन थांबला.आमचे श्वास रोखले गेले.सगळं चित्त एकाग्र झालं.शर्माने हलकेच नॉक केलं.दार हळूहळू उघडलं जाऊ लागलं.
बस्स!हीच ती वेळ.शर्माला काही कळायच्या आत भोसल्यांनी त्याच्यावर चपळाईने झडप घातली आणि आपल्या मजबूत पकडीत त्याचे दोन्ही हात मागे धरुन ठेवले.बरोब्बर त्याचवेळी मी अर्धवट उघडलेल्या दारात पाय घालून ते ढकलून पूर्ण उघडलं आणि वरुणने दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला झेप घेऊन पकडलं.भोसल्यांची माणसं आमच्या मदतीला लगेच धावली.
काहीजणं पिस्तूल हातात धरुनच सावधपणे आत शिरली.पण संपूर्ण फ्लॅट रिकामा होता.शर्मा भोसल्यांच्या तावडीतून सुटायचा जोरदार,पण निष्फळ प्रयत्न करत होता आणि वरुणने धरुन ठेवलेली व्यक्ती संतापाने थरथरत होती.ती व्यक्ती..सलोनी होती.
बरचंस अपेक्षित असूनही भयाची शिरशिरी उमटल्यावाचून राहिली नाही.भोसल्यांच्या
माणसांनी पुढे होऊन शर्माचं हेल्मेट काढलं आणि आम्ही प्रचंड आश्चर्याने बघतच राहिलो.आमच्या समोर सौरभ देशमाने,द यूथ आयकॉन,उभा होता.
मी एकदम भानावर येत सलोनीला म्हणालो,
"सलोनी,तुला आणि तुझ्या साथीदाराला,सौरभला,सन्मित्र आणि शिल्पा,या दोघांच्या खुनाबद्दल अटक करतोय.सलोनी कितीही कसलेली अभिनेत्री असली तरी हे ऐकून चेहऱ्यावरचे भाव लपवू शकली नाही.पण लगेच स्वतःला सावरुन ओरडली,"कोण सन्मित्र?आणि कुठल्याही शिल्पाला मी ओळखत नाही."
आता सौरभने पण स्वतःला सावरलं होतं.त्याचं नेहमीचं पॉलिश्ड वागणं गायब झालं होतं.
"हा काय तमाशा चालवला आहे तुम्ही लोकांनी.भोसले,तुम्ही कोणाला अटक करताय ह्याची शुद्ध आहे का तुम्हाला?याचे परिणाम चांगले होणार नाहीत,सांगून ठेवतो तुम्हाला."तो थयथयाट करतच बोलला.
मी त्याला म्हणालो,"तमाशा आमचा नाही,तुमचा चाललाय मिस्टर शर्मा.असं रात्री हेल्मेट घालून गुपचूप भेटायला येणं,हा त्याचाच एक भाग आहे वाटतं?"
"कोण शर्मा?आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे.पण उगाच स्कॅन्डल नको म्हणून आम्ही ते उघडउघड व्यक्त करु शकत नाही म्हणून मी असा गुपचूप येतो."
"पण सलोनीचा तर खून झाला होता ना?तरीही तू तिला भेटायला कसा काय येतो आहेस गेले दोन दिवस?तुझा खेळ संपलाय शर्मा.तू शर्माच्या फ्लॅटमधून बाहेर पडतानाच्या
रेकॉर्डिंगची क्लिप,आज सकाळीच ह्या कॅमेऱ्याच्या कंपनीच्या माणसाने इथे येऊन ती घेऊन पोलीसस्टेशनला पाठवली आहे.
आणि हे बघ,आत्ता खालून,तुझ्या फ्लॅटमधून भोसल्यांच्या माणसाने आणलेलं तुझं वेषान्तराचं सामान,ही दाढी,चष्मा,टोपी."
ते बघून सौरभला घाम फुटला.तरीही तो ओरडला,"कुठलं रेकॉर्डिंग म्हणताय तुम्ही?ते कोणी केलं?"
"ह्या कॅमेऱ्याने केलंय.आत्ताचं
रेकॉर्डिंग पण झालेलं आहे.खालच्या
फ्लोअरवरचे तुझे शेजारी गुप्ता आहेत ना,त्यांच्या कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग भोसल्यांचा हाच माणूस चेक करुन आलाय."
"या कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग होतं?"सलोनी आणि सौरभ दोघंही एकदमच ओरडली.
मी तिला म्हणालो,"हो,कितीही वेल प्लॅन्ड मर्डर असला तरीही अनावधानाने छोटासा का होईना पण काहीतरी क्लू गुन्हेगार मागे ठेवतोच.रेकॉर्डिंगबद्दल तुम्ही अवेअर असतात तर असे अडकले नसतात.सलोनी,तू आत्ताच पाच-सहा दिवसांपूर्वी सन्मित्रकडे डेंटल ट्रीट्मेंटसाठी गेली होतीस,त्याचाच खून तुम्ही केलाय आणि तुला शिल्पा आठवत नसेल तर ही बघ शिल्पा."असं म्हणून मी तो सेल्फी दोघांनाही दाखवला.तो बघताच दोघांच्या चेहऱ्याचा रंग उडाला.
सौरभ ओरडतच बोलला,"सलोनी,मी तेव्हाच तुला सांगत होतो.त्या डॉक्टर बरोबर या गौतमला पण संपवून टाकतो.तू उगाच थांबवलंस मला."
हे ऐकून भोसल्यांचा संयम संपला.पुढे होऊन त्यांनी आपल्या पोलादी हाताचा एकच प्रहार सौरभवर केला.त्याबरोबर त्याचा सगळा आवेश क्षणार्धात नाहीसा होऊन
तो सोफ्यावर जवळजवळ कोसळलाच.
सलोनीपण चुपचाप त्याच्या शेजारी बसली आणि म्हणाली,"सर,मी सगळं सांगते
तुम्हाला.आता लपवण्यात काहीच अर्थ नाहीये.
या सगळ्याची सुरुवात पुण्याच्या लॉ कॉलेजपासून झाली.मी आणि सौरभ क्लासमेट्स."
'अरे!हे कनेक्शन काल कसं लक्षात आलं नाही माझ्या!'सौरभ लॉ कॉलेजचा स्टुडंट होता हे माझ्या वाचनात आलं होतं.ही लिंक डोक्यात आली नाही म्हणून मी जरा हळहळलो.असो,त्याने फार काही बिघडलं नव्हतं.
सलोनी पुढे सांगत होती,"तिथेच आमचं जमलं.मला कोणीही जवळचे नातेवाईक नाहीत.पुण्याला मी हॉस्टेलवरच रहात होते आणि खरं सांगते,माझं मन कोणाच्या तरी प्रेमाला आसुसलेलं होतं.त्याच वेळी आमची भेट झाली.आमचं एकमेकांवर अगदी जिवापाड प्रेम होतं,अजूनही आहे.नंतर सौरभ राजकारणाकडे वळला.बघता-बघता खासदार झाला.मग पूर्वीसारखं राजरोस आम्हाला भेटता येईना.म्हणून त्याने शर्माचं रुप घेऊन पर्लमध्ये फ्लॅट घेतला आणि तिथे आम्ही भेटू लागलो.आता तुम्हाला सांगून टाकते,आम्ही...ड्रग्ज सप्लाय करतो."
हे ऐकून आम्हाला प्रचंड धक्का बसला.तरुण पिढीसाठी वेगवेगळे प्रकल्प चालू करणारा यूथ आयकॉन,त्यांचा आधारस्तंभच त्यांना ड्रग्जच्या विषारी विळख्यात लोटत होता.आमचा विश्वासच बसेना.
"मला सुरुवातीला जेव्हा सौरभचं हे रुप दिसलं होतं तेव्हा मला खूप धक्का बसला होता.पण मला त्याचं प्रेम गमवायचं नव्हतं.शिवाय..खोटं कशाला बोलू,इतक्या सहज मिळणारा इतका पैसा कोणाला नको असतो?मग मी पण त्याला सामील झाले.
सौरभच्या पदाचा आम्हाला फायदा व्हायचा.एअरपोर्टवर वगैरे त्याचं चेकिंग विशेष
व्हायचं नाही.मी पण ऍक्टिंग सुरु केल्यानंतर माझ्या व्हॅनिटी बॅगमधून सहज मालाची ने-आण करु शकत होते.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही फक्त दोघंच मिळून हे काम करतो.आमचा कोणीही तिसरा पार्टनर नाही.एकच सप्लायर आणि दोन डिसट्रिब्युटर,बास!जितकी कमी माणसं असतील तेवढी रिस्क कमी असं सौरभचं म्हणणं होतं.मी अभिनयक्षेत्रात माझं करिअर सुरु करण्याच्या आधी आम्ही ह्याच कामाच्या संदर्भात कोलकत्याला गेलो होतो.साधारण रात्रीचा अडीच-तीनचा सुमार असेल.आमच्या एका डिसट्रिब्युटर बरोबर आमची मिटिंग ठरली होती.कमिशनवरुन तो सध्या खूपच ताणून धरत होता.म्हणून प्रत्यक्ष भेटायचं ठरलं होतं.एका निर्जन रस्त्यावर थोडं आडबाजूला आम्ही बोलत होतो.कुठल्याही हॉटेलमध्ये वगैरे बोलणी करायला भेटायचं आम्ही टाळलं होतं. सौरभ खासदार झाल्यापासून आम्ही जास्ती गुप्तता पाळत होतो.हो,एक सांगायचं राहिलंच,सौरभ माझ्याबरोबर असताना नेहमी शर्माच्या गेटअपमध्ये असायचा.त्यामुळे तसं कोणी ओळखायचा धोका नसायचा पण आम्ही शक्यतो कुणाच्या नजरेत भरणार नाही याची खबरदारी घ्यायचो.
त्या रात्री त्या माणसाबरोबर आमची बाचाबाची झाली.त्याने अचानक माझ्या तोंडावर जोरात ठोसा मारला.माझे पुढचे दोन दात अर्धवट तुटले,रक्त वाहायला लागलं.ते बघून सौरभ खूप चिडला आणि त्याने स्वतःजवळचा सुरा काढून काही कळायच्या आत त्या माणसाला भोसकलं.तो ऑन द स्पॉट खलास झाला.आम्हाला बघणारं आजूबाजूला चिटपाखरुही नव्हतं.समोरच्या बिल्डिंगच्या खिडक्या बहुतेक सगळ्या बंद होत्या,काहींवर पडदे लावलेले होते.आम्हाला कोणीही पाहिलं नाही असं तेव्हा आम्हाला वाटलं होतं.
बाजूच्या झुडुपांत आम्ही डेडबॉडी टाकली आणि निघालो.आमचा कुठलाच ट्रेस पोलिसांना लागणं शक्य नव्हतं.आत्तापर्यंत लागलेलाही नाही.
माझ्या दातांवर मात्र उपचार करणं जरुरीचं होतं.रक्त थांबलं असलं तरीही खूप वेदना होत होत्या.आम्ही गल्लीतून वळून पुढच्या बाजूला रोडवर आलो.डाव्या साईडलाच नेमकी मोठी डेंटल इन्स्टिट्यूट दिसली.
सकाळ होण्याची वाट बघत बसायला आमच्याकडे वेळ आणि पेशन्स नव्हता. त्यामुळे आम्ही तिथे काही उपचार होतील का ते पाहायचं ठरवलं.ती आमची पहिली चूक."
इतका वेळ सलोनी नॉनस्टॉप बोलत होती.आता मात्र ती थांबली आणि पाणी पिऊन परत बोलायला लागली.
"ती जरी टीचिंग इन्स्टिट्यूट असली तरी एकंदरीत माझी हालत बघता तिथल्या
सिनिअर डॉक्टरांनी त्यांच्या असिस्टंटला माझ्यावर उपचार करायला सांगितले.तो असिस्टंट..सन्मित्र होता.मला तो तेव्हा जरा नर्व्हस वाटला होता कारण त्याचे हात थोडे शेक होत होते.अर्थात त्यामागचं कारण आत्ता मला समजलं होतं.ह्याला नीट जमेल का?असंही मला तेव्हा वाटलं होतं.पण त्याने माझ्या दातांचं खूपच सफाईदार ब्रिजिंग केलं.त्या लोकांनी आमच्याकडून ट्रीट्मेंटचे पैसेही घेतले नव्हते.मी ही घटना काही फारशी लक्षात ठेवली नाही.
नंतर मग मी मुंबईतच सेटल व्हायचं ठरवलं.ऍक्टिंग फिल्डमध्ये करिअर करावं असं फायनल केल्यावर,कॉस्मॅटिक सर्जरीच्या
सहाय्याने मी माझ्या चेहऱ्यात थोडे फेरफार करुन तो अजून आकर्षक बनवला.खूप जवळून निरखून पाहिल्यानंतर माझी पूर्वीची ओळख असेल तरच ती पटावी इतकी मी वेगळी दिसायला लागले.हळूहळू मला सिरिअल्समध्ये भरपूर कामं मिळायला लागली आणि अल्पावधीतच मी पॉप्युलर सेलिब्रेटी झाले.एक प्रॉब्लेम मात्र व्हायला लागला,आता लोकं मलाही ओळखू लागल्यामुळे पुन्हा आमच्या भेटी थांबल्या.मग सौरभच्या सांगण्यावरुन मी सुध्दा पर्लमध्ये फ्लॅट घेतला आणि दोघांच्या बिझी शेड्युलमधून जसा वेळ मिळेल तसे माझ्या फ्लॅटमध्ये भेटायला लागलो.
पाच-सहा दिवसांपूर्वी माझी दाढ दुखत होती म्हणून मी सन्मित्रचं नाव ऐकून त्याच्याकडे ट्रीट्मेंटसाठी गेले होते.ती माझी दुसरी मोठी चूक.
मी त्याच्या केबीनमध्ये शिरल्यावर त्याने माझं एकदम हसून स्वागत केलं आणि माझ्या सध्याच्या रोलची पण तारीफ केली.वेळातवेळ काढून मी तुमची सिरिअल बघतो हे पण सांगितलं,आणि अचानक बोलता-बोलता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.तो एकटक माझ्याकडे बघायला लागला.लोकांच्या नजरांची मला सवय आहे पण ही नजर काही वेगळीच होती.आता मला त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटायला लागलं पण कुठे ते आठवेना.मी अस्वस्थ झाले.मग त्याने मला ट्रीट्मेंटसाठी असलेल्या चेअरवर बसायला सांगितलं आणि तो माझ्या दाढेची तपासणी करायला आला.एका क्षणात त्याने हात झटक्यात मागे घेतले,त्याचे डोळे विस्फारले आणि तो एकदम ओरडला,'तुम्हीच...तुम्हीच आहात त्या,ज्यांची ट्रीटमेंट मी मध्यरात्री कोलकत्याला
असताना केली होती.'
अचानक माझीही ट्यूब पेटली,याला कुठे बघितलं होतं ते आठवलं.पण त्याच्या पुढच्याच शब्दांनी माझ्या पायाखालची जमीन सरकली.तो म्हणत होता,'तुम्ही आणि तुमच्या मित्राने आमच्या इन्स्टिट्यूटच्या मागच्या
रोडवर एकाचा खून केला होता.मी काहीतरी वाचत खिडकीत बसलो होतो.त्या पडद्यामागून मी ते पाहिलं.आत्ता तुमचा चेहरा जरा वेगळा दिसतोय म्हणून मी गोंधळलो होतो.पण हे दातांचं ब्रिजिंग बघून खात्री पटली.इतके दिवस घाबरुन मी पोलिसांना काहीही सांगितलं नव्हतं.उगाच कशाला स्वतःला यात गोवायचं असा बचावाचा पवित्रा घेतला होता.पण आता मी गप्प बसणार नाही.सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह आत्ता इथे ट्रीट्मेंटसाठी आलेत. मी त्यांना लगेचच सांगणार आहे.'
मी जबरदस्त हादरुन गेले हे ऐकून.पण लगेच सावरुन माझ्यातल्या अभिनेत्रीचं सगळं कसब पणाला लावून त्याला समजावलं की,तो खून नव्हता.सेल्फ डिफेन्समध्ये घडलेला तो एक अपघात होता.तो माणूस गुंड होता आणि त्यानेच आमच्यावर हल्ला केला होता.पोलिसांना पण तो हवा होता. त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल होते.
त्याची समजूत पटलेली नाही हे त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होतं.पण तो थोडा विचारात पडलेला दिसला.लगेच कुठली ऍक्शन त्याने घेतली नाही.मला त्याने जायला सांगितलं.पण तो गौतमसरांना काही सांगतोय का हे बघण्यासाठी मी बाहेरच थांबले.त्यांना कळलं असतं तर आमची सगळंच बिंग फुटलं असतं.सर आत गेल्यावर मी थोडं बाहेर येऊन सौरभला कॉल करुन सगळं सांगितलं.आम्ही ताबडतोब सन्मित्रचा काटा काढण्याचं ठरवलं.कुठलाही धोका आम्हाला पत्करायचा नव्हता.सर बाहेर आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरुन त्यांना काही कळलं आहे असं वाटलं नाही.तोपर्यंत सौरभ शर्माच्या गेटअपमध्ये बाहेर येऊन थांबला होता.
आता सलोनी बोलायची थांबली.तिने सौरभला बोलायची खूण केली आणि डोळे मिटून शांतपणे बसली.आता यातून सुटका नाही हे तिने खूपच लवकर स्वीकारलेलं दिसलं.सौरभ इतका वेळ मख्खासारखा बसला होता त्याला आता कंठ फुटला.
"सलोनीचा फोन आल्यावर मी लगेचच तिथे आलो.सर,तुम्हाला जाताना बघितलं आणि आत शिरलो.तेव्हा सलोनी रिसेप्शन काऊंटर
जवळ उभी राहून मुद्दाम हसून-खेळून तिथल्या लोकांशी बोलत होती.सगळे पेशंट तिच्या सभोवताली जमून तिच्याशी बोलत होते.ती रिसेप्शनिस्ट तर अगदी भारावून गेलेली दिसली.मी पटकन सन्मित्रच्या केबीनमध्ये शिरलो.कोणाचंही माझ्याकडे लक्ष गेलं नाही.
सन्मित्र पाठमोरा उभा राहून त्याच्या टेबलापाशी काहीतरी वाचत होता.मी त्याला काही कळायच्या आत त्याच्याच टेबलावरची कात्री उचलून त्याच्या पाठीत खुपसली.मी माझं सायलेन्सर लावलेलं पिस्तुल नेलं होतं पण तिथली कात्री बघून आणि त्याचं लक्ष नाही हे बघून विचार बदलला.माझं काम अजून सोपं झालं.ग्लव्हज् तर मी घातले होतेच.त्याची किंकाळी ऐकून सगळे आत धावले तेव्हा मी दाराआड लपलो होतो.सगळे वाकून त्याच्याकडे बघत असतानाच मी तिथून सटकलो.तसाच घरी आलो.माझ्या वडिलांना सगळं सांगितलं.
सलोनीचा खून झाल्याचं भासवायची आयडिया त्यांचीच.सलोनी मग गुपचूप दिल्लीला जाणार होती.तिथे आमचा एक फ्लॅट आहे.मी थोडे दिवसांनी आमच्या
पक्षातल्या लोकांशी बेबनाव झाल्याचं खोटं चित्र रंगवून पदाचा राजीनामा देणार होतो आणि हवापालट म्हणून दिल्लीला जाऊन तिथून आम्ही दुबईला जायचा प्लॅन आखला होता.अर्थात आमच्या पिताश्रींचाच हा प्लॅन होता.सलोनीच्या जागी कुणाची तरी डेडबॉडी लागणार होती.आमच्या डोळ्यांसमोर सलोनीची पुण्याची मैत्रीण, शिल्पा आली.तिलाही जवळचे कोणी नातेवाईक नव्हते.हॉस्टेलवरच ती रहात होती.ह्या दोघींच्या चेहऱ्यात खूप साम्य होतं.सलोनीचा चेहरा आता सर्जरीमुळे वेगळा दिसत असला तरी ती डेडबॉडी सलोनीची नाही अशी शंका कोणाला नसती आली.मुख्य म्हणजे शिल्पाला पण ऍक्टिंग मध्ये करिअर करायची इच्छा होती.
सलोनी ठरल्याप्रमाणे आऊटडोअर शूटिंगसाठी गेली.त्याआधी,'तुझी एका
सिरिअलच्या डायरेक्टर बरोबर ओळख करुन देतो.रोल मिळण्याचे चान्सेस आहेत.'असं शिल्पाला सांगून आम्ही तिला इथे बोलावून घेतलं.उगीच गवगवा नको म्हणून
बिल्डिंगमधल्या कोणाच्या नजरेला पडू नकोस असं सांगितलं.रात्री आठला ड्युटी बदलण्याच्या आधी अर्धा तास गेटवर कोणी गार्ड नसतो.सीसीटीव्ही असल्यामुळे एवढी गरज कधी भासत नाही.तेवढया वेळात स्कार्फ बांधून बाहेर जाऊन येत जा असं तिला बजावलं.सलोनी आऊटडोअर शूटींगवरुन आली की डायरेक्टरची भेट घ्यायचं ठरलं होतं.सलोनी आली त्या दिवशी पहाटे,मी साडेतीनच्या सुमारास मागच्या बाजूच्या बाल्कनीच्या,शेजारच्या पाईपला धरुन सलोनीच्या बाल्कनीत चढलो.तिथेच कुंड्या वगैरे ठेवण्यासाठी पॅरॅपेटवॉल असल्यामुळे मला चढणं सोपं गेलं.शिवाय हा भाग सीसीटीव्हीमध्ये कॅप्चर होत नाही.तिथल्या दाराची आतली कडी काढण्यासाठी आम्ही कडीच्या शेजारची काच आधीच कापून शिल्पाला संशय येणार नाही अश्याप्रकारे अलगद बसवली होती.कडी हलक्या हाताने काढून मी गुपचूप हॉलमध्ये येऊन बसलो.शिल्पा गाढ झोपलेली होती.आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे सलोनी पहाटे आल्यावर तिने बिल्डिंगच्या खालून शिल्पाला फोन करुन लॅच-की विसरल्याचा बहाणा करुन तिला फक्त लॅच उघडून ठेवायला सांगितलं.शिल्पा अर्धवट झोपेतच होती.ती लॅच उघडून वळताच तिच्या डोक्यावर मी पुतळ्याचे प्रहार केले.सलोनी तेव्हाच आत शिरली.तिने स्वतःचे सॅण्डल्स काढून शिल्पाच्या पायात घातले.स्वतःचं ब्रेसलेट तिच्या हातात चढवलं.मग आम्ही दोघे बाल्कनीतूनच खाली उतरुन माझ्या फ्लॅटमध्ये आलो.शिल्पाला इथून हलवल्यावर सलोनी पुन्हा गुपचूप स्वतःच्या फ्लॅटमध्ये येऊन रहायला लागली आणि मी,रात्री कोणी पाहिलंच तर ओळखू नये म्हणून इथे हेल्मेट घालून येत होतो."
हे सगळं सांगताना दोघांच्याही चेहऱ्यावर ना खेद होता ना पश्चात्ताप.पैश्यांचा मोह माणसाला इतकं रसातळाला नेतो की
मनुष्यप्राण्यामधील मनुष्य जाऊन फक्त प्राणी केव्हा उरला हे त्यालाही कळत नाही.ही दोघं तर त्यापेक्षाही नीचतम पातळीवरची होती.आपल्या क्षुद्र फायद्यासाठी सहज जाता-जाता निष्पाप लोकांचे खून करण्याएवढे उलट्या काळजाचे नराधम होते हे.कायद्याला मंजूर असतं तर मीच ह्यांचे जीव घ्यायला मागेपुढे पाहिलं नसतं.
मध्येच सलोनीने विचारलं,"तुम्हाला शिल्पा कशी माहित?"
"मी जेव्हा तुझा खून झाल्याची बातमी कळल्यावर इथे आलो होतो तेव्हा डेडबॉडीचं
निरिक्षण करताना मला एक गोष्ट जाणवली. सन्मित्रच्या क्लिनिकमध्ये तुझे सॅण्डल्स मी बघितले होते.ते तुझ्या पायात परफेक्ट बसले होते.शू-रॅकवर ते ठेवले होते तेव्हा त्यांचा नंबर सहा आणि सात आहे असं मला दिसलं होतं.डेडबॉडीच्या पायात असलेल्या सॅण्डलपैकी एक लूज बसला होता.पायांतून निघून येईल असं वाटत होतं.म्हणजेच मृत व्यक्तीच्या दोन्ही पायांचा नंबर सहाच होता हे सिद्ध होत होतं.शिवाय चेहरा मुद्दाम विद्रूप केलेला,त्यामुळे मला थोडा संशय आला होता.मी तेव्हा लगेच कोणाजवळ बोललो नाही.त्यानंतर मी इथल्या सुपरमार्केटमध्ये गेलो होतो तेव्हा तिथल्या सेल्समन्सचं बोलणं माझ्या कानावर पडलं.त्यांच्या बोलण्यात शिल्पाचा उल्लेख आल्यावर मी त्यांच्याकडे चौकशी केली.ती तीन दिवस रोज साडेसातच्या सुमारास दूध,फळं वगैरे न्यायला तिथे जात होती.तिथल्या टीव्हीवर तुझी सिरिअल लागलेली असायची.पहिल्या दिवशीच तिने बोलता-बोलता त्या दोघांना सांगितलं होतं की तुझी आणि तिची खूप छान मैत्री आहे.त्यांचा विश्वास बसला नाही म्हणून तिने तुम्हां दोघींचे बरेच फोटो त्यांना दाखवले.त्या तिघांनी पण एक सेल्फी काढला.शिल्पा तिथे गेली की त्यांच्या बरोबर खूप छान गप्पा मारायची.तुझा खून झाल्यापासून मात्र ती तिकडे फिरकली पण नाही असं ते म्हणत होते.तो सेल्फी त्यांनी मला दाखवल्यावर तुमच्यातील साम्य बघून मी पण चक्रावलो होतो.थोडी-थोडी लिंक लागत होती.सौरभ आणि शिल्पाच्या खुनांचा तुमच्यावर केलेला आरोप मी खरंतर अर्धवट पुराव्याच्या आधारे केला.पण अंधारात मारलेला हा तीर अचूक जागी लागला.तुम्ही कबुली देऊन टाकलीत.तुमचं तोंड उघडण्यासाठी आम्हाला फार कष्ट नाही घ्यावे लागले."
सौरभ छद्मी हसून म्हणाला,"नसतील घ्यावे लागले.पण माझ्या वडिलांनासुध्दा ही केस फिरवायला फारसे कष्ट नाही घ्यावे लागणार.हाता-तोंडाशी आलेली केस उलटवण्यात तर त्यांचा हातखंडा आहे.
आत्ताचं आमचं हे स्टेटमेंट ते आरामात बदलू शकतील किंवा रद्द ठरवतील.हा ड्रग्जचा बिझनेस मी त्यांच्या सांगण्यावरुनच तर सुरु केलाय.ते पूर्णपणे आमच्या पाठीशी उभे रहातील.तुमच्याकडे आमच्याविरुद्ध ह्या कबुलीखेरीज दुसरा कुठलाही पुरावा नाही.ना आम्हाला तुम्ही खून करताना पकडलंय ना आमच्याकडे ड्रग्ज सापडली आहेत.पुराव्याशिवाय केस स्टँड होऊच शकणार नाही."
तो हे बोलत असतानाच मगाचपासून खटकत असलेली एक गोष्ट मला आत्ता जाणवली.त्याच्या टी-शर्टच्या खिशाला पाच-सहा पेनं लटकत होती.एरवी जॅकेटला असणं वेगळी गोष्ट.पण अश्यावेळी आवर्जून पेनं बरोबर घेणं मला विअर्ड वाटलं.एक विचार मनात आला आणि मी वरुणला नजरेनेच खुणावलं.वरुणला त्याचा अर्थ परफेक्ट समजला.मी मग काहीतरी बोलत सौरभचं लक्ष माझ्याकडे वळवलं आणि त्याचक्षणी वरुणने झडप घालून सौरभच्या खिशातील सगळी पेनं हस्तगत केली.भोसल्यांना,नक्की काय झालं हे जरी समजलं नाही तरी त्यांनी समयसूचकता दाखवून सौरभला पुन्हा आपल्या पकडीत रोखून धरलं.त्यांनी तसं केलं नसतं तर सौरभने वरुणला हमखास काहीतरी इजा केली असती.तो प्रचंड संतापाने धुमसायला लागला होता.त्यामुळे तर माझी खात्रीच पटली आणि ती सगळी इन्कपेन्स मी एकेक करुन उघडायला लागलो.प्रत्येक पेनामध्ये शाईच्या ऐवजी...ब्राउन शुगर होती.
आम्ही अक्षरशः अवाक झालो.कोणाच्या नकळत अशी पेनांची देवाण-घेवाण करुन ह्या लोकांचा धंदा जोरात चालला होता तर.म्हणून कायम त्याच्या खिशाला पेनं लटकत असायची.परत कोणाला संशयही नाही.खरंच सुन्न झालो आम्ही.
आता सौरभचा उरला-सुरला सुसंस्कृतपणा नष्ट झाला.त्याने अभूतपूर्व शिव्या द्यायला सुरुवात केली.त्याचा हा आरडा-ओरडा ऐकून आतल्या खोलीत झोपलेल्या काकू जाग्या होऊन बाहेर आल्या आणि समोर सलोनीला बघून त्या एकदम पांढऱ्याफटक पडल्या आणि चक्कर येऊन कोसळल्या.मग मी,वरुण आणि प्रशांत त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि भोसल्यांबरोबर सौरभ आणि सलोनीची वरात
पोलीस स्टेशनला निघाली.
डॉक्टरांनी काकूंना चेक करुन काळजीचं कारण नाही असं सांगितलं.जबरदस्त धक्का बसल्यामुळे त्यांचं प्रेशर एकदम वाढलं होतं.दोन-तीन तासात त्यांना घरी पण सोडणार होते.प्रशांतने आत्ताच्या परिस्थितीत त्यांची सगळी जबाबदारी स्वीकारली हे बघून मला बरं वाटलं.कोण म्हणतं हल्लीची पिढी बेजबाबदार,इनसेन्सिटिव्ह आहे?
वरुणला ड्रॉप करुन मी घरी पोचलो तेव्हा सकाळचे आठ वाजून गेले होते.अजिबात एनर्जी उरली नव्हती त्यामुळे मस्तपैकी ताणून दिली.पुढचे दोन दिवस गडबडीत गेले.भोसल्यांना आणि मला कमिशनरांकडून खास बोलावणं होतं.सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत होता.देशमानेंना फायनली अडकवता आलं म्हणून भोसले पण विशेष खूष होते.
दोन दिवसांनी मी प्रशांतकडे गेलो होतो.
काकू नेमक्या बाहेर गेल्या होत्या.प्रशांत सांगत होता,आता काकूंची आणि त्याची छान गट्टी जमली होती.इतके दिवस त्याने कधी काकूंशी फारशी दोस्ती करायचा प्रयत्न केला नव्हता.पण परवाच्या प्रसांगानंतर सगळी गणितं बदलली होती.गेले दोन दिवस रोज त्या काहीतरी छान पदार्थ बनवून प्रशांतला देत होत्या आणि तो पण त्यांची छोटी-छोटी कामं अगदी प्रेमाने करत होता.एक गोष्ट मात्र मला जाणवली,केवळ दोन दिवसांतच तो सुध्दा काकूंसारखं भरभरुन बोलायला लागला होता.मी हसतच त्याच्या पाठीवर थोपटून निघालो.आता इथे येणं-जाणं होणारच होतं.माझेही बंध इथे जुळले गेले होते.
प्रकरण सहावे
पाच-सहा दिवसांनंतर आज मी निवांत बाल्कनीत बसलो होतो.केस इतक्या झटपट सोडवूनही समाधानी वाटत नव्हतं.एखादा
झंझावात येऊन खूप काही उध्वस्त करुन गेलाय असं फिलिंग येत होतं.सन्मित्र आणि शिल्पाच्या हकनाक मृत्यूंचं शल्य माझ्या मनात कायमचं रहाणार होतं.विहरणाऱ्या असंख्य पाखरांचे ठसे जसे त्या आकाशाच्या पटलावर उमटत नाहीत तसेच दुःखद,अप्रिय घटनांचे ठसे आपल्या मनःपटलावर उमटलेच नसते तर!
हं.. एक जड निश्वास सोडून मी उठलो.आज माझी डॉ.गोखल्यांबरोबर अपॉईंटमेंट होती.माझी दाढेची राहिलेली ट्रीटमेंट करावी लागणारच होती.मी डॉक्टरांच्या केबीनमध्ये त्या आरामदायक चेअरवर बसलो होतो.
डॉक्टर साधारण पन्नाशी उलटलेले,अतिशय सौम्य व्यक्तिमत्व असलेले होते.दाढ बधीर करण्यासाठी त्यांनी इंजेक्शन हातात घेतलेलं बघताच मी गपकन डोळे मिटून घेतले. सन्मित्रची आठवण येणं अगदीच अपरिहार्य होतं.माझ्याही नकळत माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि ते बघून इंजेक्शन बाजूला ठेवून डॉक्टरांनी मला हळुवारपणे विचारलं,"फार दुखलं का?"
