वेळ
वेळ


"काय कसा गेला शाळेचा पहिला दिवस..."
"अरे गप्प का, मी काही विचारतेय..."
"मला नाही बोलायचं..."
"अरे पण का... चल हातपाय धुऊन घे, जेवण वाढते तुला..."
"काय आहे जेवायला..."
"डाळ आणि भाजी..."
"मला नाही जेवायचं दररोज तेच जेवण..."
"अरे असं काय करतोस वेड्यासारखा... काही झालं का शाळेत?"
"मला नवीन बॅग व कंपास हवा, देशील तू..."
"नवीन बॅग?"
"हो आज माझे सगळे मित्र नवीन बॅग घेऊन आलेले आणि मला ते हसले मी गेल्या वर्षीची बॅग नेली म्हणून..."
"हो का म्हणजे रागाचं कारण हे आहे..."
"हो त्यांचं बॅग, कंपास सगळे नवीन आहे... माझ्याकडे मात्र जुनंच..."
"हे बघ बाळा तुझ्या मित्रामध्ये आणि तुझ्यामध्ये फरक आहे... ते जे घेऊ शकतात, आपली तेवढी परिस्थिती नाही आहे... जुनं असलं तरी वापरण्यासारखी आहे ना, दुसऱ्यासारखं आपले जीवन नाही आहे... आपल्याला काटकसर करूनच जगावं लागतं..."
"कंटाळा आलाय मला या परिस्थितीचा... ना मनासारखं जगणं ना राहणं... किती दिवस असंच जगायचं..."
"असं म्हणून कसं चालेल..."
"मग काय म्हणू..."
"हे बघ बाळा मान्य आहे तुझे मित्र श्रीमंत आहेत, पण आपण त्याची बरोबरी नाही करू शकत. तुझे वडील दिवस-रात्र हमाली करतात... तुझा भाऊ शिकायला एवढा हुशार, पण पैशापायी पुढे शिकला नाही. तोही हॉटेलात काम करतो, तुझी ताई आपल्या बापाला त्रास नको म्हणून आपल्या लग्नासाठी पै आणि पै लोकांचे कपडे शिवून जमवत आहे... पण त्यांचं स्वप्न एकच आहे, तू खूप शिकावंस, मोठं व्हावंस आणि त्याची मिळकत काय मोठी नाही रे... घर खर्च सगळं पकडून शेवट हातात काही उरत नाही रे... पण तू असं म्हणू नकोस ही वेळ पण निघून जाईल... तू शिक मोठा हो की ही परीस्थिती बदल... वेळ नकीच बदलेल... फक्त तू मोठेपणावर लक्ष न देता तुझ्या अभ्यासावर लक्ष दे रे बाबा."