नासा येवतीकर

Inspirational

3  

नासा येवतीकर

Inspirational

वाढदिवसाची भेट

वाढदिवसाची भेट

2 mins
1.6K


आज पूनम फारच अस्वस्थ होती. बाहेर काळे काळे ढग आभाळात जमा झाले होते. थोड्याच वेळात खूप जोराचा पाऊस पडण्याची शक्यता होती. आपल्या पतीदेवाच्या आठवणीने ती बेचैन होती. घरात तिच्या येरझाऱ्या वाढल्या होत्या. ऑफिसची वेळ संपून दोन तासाचा कालावधी संपला होता. वैभव एवढ्या वेळात घरी यायला हवा होता. पण अजून आला नाही म्हणून तिला जास्त काळजी वाटू लागली होती. तिची काळजी वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे त्याचा मोबाईलदेखील लागत नव्हता. फोन लावले की, 'आपण डायल केलेला क्रमांक स्विच ऑफ आहे', असे उत्तर मिळत होते. त्यामुळे तिची अजून काळजी वाढू लागली. अखेर रात्रीचे दहा वाजले होते. तिला आत्ता अजून जास्त काळजी वाटू लागली. 'काय झाले असेल?, फोन का लागत नाही?, तो अजून घरी का आला नाही?,' असे अनेक शंका आणि प्रश्न तिच्या मनात घर करीत होते. स्वयंपाक करून गार होऊन गेले होते. तिची भूक मरून गेली होती. काय करावे तिला काहीच सुचत नव्हते. एवढ्यात दारावरची बेल वाजली तसे तिने दार उघडले. उघडल्याबरोबर तिला डोळ्यासमोर वैभव दिसल्याक्षणी ती त्याच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडू लागली. प्रेम कसे व्यक्त होते याची प्रचीती अशा प्रसंगात दिसून येते. थोड्यावेळानंतर तिने त्याच्या शरीराकडे पाहिले तर अंगवारील कपडे रक्ताने माखले होते. हातापायाला बरेच खरचटले होते. बराच मार लागला होता. तिने काय झाले म्हणून त्याला विचारणा केली. तेव्हा तो म्हणाला, "मी नेहमीसारखे ऑफिसमधून वेळेला बाहेर पडलो. बाहेर खूप आभाळ भरून आले म्हणून पटकन घरी यावे याच विचारात गाडी चालवीत होतो. पाच-दहा मिनीटाचा प्रवास झाल्यानंतर माझ्या गाडीला मागून एका वाहनाने जोराची धडक दिली आणि काही कळायच्या आत माझी गाडी घसरली. मी खाली पडलो. रस्त्यावर मी जोरात आपटलो. हातापायाला मार लागले पण डोक्याला हेल्मेट होते म्हणून बरे झाले, मी वाचलो. अन्यथा काय झाले असते काहीच कळले नसते. माझ्या खिशातील मोबाईल जमिनीवर पडून खराब झाला. तेथील लोकांनी मला दवाखान्यात नेले आणि माझी गाडीही एकाने दवाखान्यात आणली. तेथे मलमपट्टी झाली. ही पोलिसकेस असल्यामुळे पोलिस येईपर्यंत मला तिथेच दवाखान्यात रहावे लागले. काही वेळाने तेथे एक पोलीस आला आणि त्याने माझी स्टेटमेंट घेतली. तेव्हा कुठे तेथून सुटलो. आज डोक्यावर हेल्मेट असल्याने मी वाचलो आणि तुझी खुप आठवण आली." असे सांगताच तिला एक महिन्यापूर्वी तो प्रसंग आठवला. त्यादिवशी वैभवचा वाढदिवस होता. तेव्हा वाढदिवसाला काय भेट द्यावे हे तिला सुचत नव्हते. दिवसभर खूप विचार केला. पण तिला काही सुचत नव्हते. ती सहज पेपर वाचू लागली होती. तिची नजर एका बातमीवर थांबली होती. 'रस्त्याच्या अपघातात एकाचा मृत्यू, हेल्मेट राहिला असता तर जीव वाचू शकले असते,' असे त्यात लिहिले होते. लगेच तिच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यादिवशी सायंकाळी तिने वैभवला एक हेल्मेट वाढदिवसाची भेट म्हणून त्याला दिली. त्याच हेल्मेटने आज त्याला पुनर्जन्म दिल्यामुळे तिला मनोमन खूप बरे वाटले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational