वाडा चिरेबंदी
वाडा चिरेबंदी
माध्यमिक शाळेत शिकत असताना त्या शाळेत प्रवेश करण्यासाठी एक मागचा गेट व पुढचा गेट म्हणजेच मुख्य प्रवेशद्वार असे दोन गेट होते; जे मुख्य गेटमधून बाहेर पडलो की आपण मेन रोडला निघतो आणि मागच्या गेटमधून बाहेर पडलो की आपण उद्यान नजीकच्या रस्त्याला निघतो. मागच्या गेटने सुद्धा मेन रोडला जात येत होते पण फिरून जावे लागत असे.
रोज आमची शाळा सुटली की मागच्या गेटला म्हणजेच उद्यान नजीकच्या रस्त्याला आमचे रिक्षावाले काका आम्हाला घरी जाण्यासाठी घ्यायला येत असत. परंतु काकांची प्रत्येक शाळेच्या मुलांची वेगळी ट्रीप असल्यामुळे काकांना कधी कधी यायला उशीर होत असायचा. त्या वेळेत काका येईपर्यंत आम्ही सर्व मित्र रस्त्याला लागून असलेल्या उद्यानात जाऊन झोके, घसरगुंडी, वजन काटा खेळत बसायचो. आणि हा रोजचा आमचा दिनक्रम झाला होता.
एके दिवशी असेच काकांना घ्यायला यायला उशीर झाला म्हणून आम्ही त्या उद्यानात खेळायला गेलो असता खेळता खेळता आमच्यातील काही मुलांचे लक्ष त्या उद्यानाच्या पलीकडे असलेल्या वाड्याकडे गेले. तो वाडा खूप जुनाट आणि भकास, अडगळीतल्या खोलीसारखा वाटत होता. तिथे तो वाडा लांबून बघितल्यावर आम्हां मित्रांची बरीच चर्चा झाली. पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या वर्गातील मुलांना सांगितल्यावर तो वाडा पछाडलेला आहे, त्या वाड्यात कोणी ही जात नाही, त्या वाड्याचे नाव चिरेबंदी होते. आता त्या वाड्याचे नाव चिरेबंदी का ठेवलं असावं हे सुद्धा एक मोठे कोडेच होते. परंतु, तिथे बऱ्याच वर्षांपासून कोणीही फिरकले नाही, आणि तेथील आजूबाजूचे लोक ही त्या वाड्याजवळ कोणाला जाऊ देत नाही. पण हो तिथे दर दोन तीन दिवसातून एकदा पोलीस येत असतात. हे सगळ ऐकल्यावर आम्ही सर्वच मित्र मोठ्या संभ्रमात पडलो. कारण, तो वाडा कोणाचा आहे?, त्या वाड्यात इतक्या दिवस कोणी का आलं नाही? वगैरे वगैरे मोठे रहस्य होते जणू.
वर्गातील मुलांनी वाड्याबद्दल सांगितलेली हकीकत ऐकून त्या वाड्याकडे जायची आणि त्या वाड्याचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता आमची शिगेला पोहोचली. लागलीच आम्ही वाड्याकडे जाण्यासाठी नियोजन करायला सुरुवात केली. आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी शाळेतील पहिले चार तासांना हजर राहून मधल्या सुट्टीत शाळेच्या मागच्या गेटला गेलो. बघतो तर काय? शाळेचे गेट बंद. गेटला आमच्या शाळेतील मामांनी कुलूप लावले होते. आम्हाला जायचे तर होते. पण जाणार कसे? तत्क्षणी आमच्यातील एक जण गेटवर चढून बाहेर उडी मारून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मग त्याचे बघून एक एक करत सर्वच गेटवरून उड्या मारत कल्टी मारत होते. तेवढ्यात आमच्या शाळेतील एका मामाने बघितले, तो तिकडून धावत धावत "ये थांबा रे पोरांनो, थांबा! आलोच." असे आवा
ज देत येतच होता पण त्याचे ऐकून न ऐकल्या सारखे करत आम्ही तो आमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही कसेबसे निसटलोच. परंतु, मामाच्या हाती काही लागलो नाही.
चिरेबंदी वाड्याबद्दल ऐकून मनात थोडी भीतीची पाल चुकचुकत होती, तरीही आम्ही काही त्या वाड्याकडे जाण्याचा हट्ट सोडला नाही. गेलो त्या दिवशी त्या वाड्यापर्यंत, तर तेथेही असलेल्या दुकानातला दुकानदार आम्हाला ओरडला, "काय रे पोरांनो, शाळा सोडून इथे काय करताय? जाऊ नका त्या वाड्याजवळ व्हा बाजूला. निघा गप शाळेत." तरीही आम्ही तेथून हटलो नाहीच. कारण आम्ही निश्चय करूनच तिकडे गेलो होतो की काही झालं तरी आज त्या वाड्याचे रहस्य जाणून घेतल्याशिवाय घरी जायचं नाही. आणि आम्ही सुद्धा एवढे आडदांड पोरं त्या वाड्याजवळ जाऊन तिथे ज्या कामासाठी गेलो होतो ते बाजूला ठेवून तिथे खेळत बसलो. पण वाड्याचे एकंदर निरीक्षण करता वाडा बराच जुनाट, भकास आणि अडगळीच्या खोलीसारखा वाटत होता. वाड्याभोवती सुकलेल्या झाडांचा पाला पाचोळा इतरत्र कुठेही अस्तव्यस्त पसरलेला होता. आम्हाला तिथे वाड्याजवळ बघून आजूबाजूचे लोक ओरडायला लागले. ते सुद्धा भीतीने त्रस्त्र वाटत होते. तरीही आम्ही त्या वाड्यात जाणार तेवढ्यात रिक्षाचा हॉर्न वाजला, काका आले म्हणून आम्हाला निघावं लागलं. त्या दिवशी मात्र आमचा हेतू साध्य करायचं राहूनच गेला.
तरीही आम्ही काही शांत बसलो नाही. महिन्याचा शेवटचा दिवस होता. म्हणजेच शाळेचा महिनाखेर होता. त्या दिवशी शाळा लवकर सुटणार होती. मग शाळा सुटल्यावर परत आम्ही तिथेच त्या वाड्याजवळ गेलो. आता मात्र आम्हाला त्या वाड्यात घुसायचे होते. आणि ठरल्याप्रमाणे वाड्यात घुसायच्या उद्देशाने गेलो. जाऊन बघतो तर वाड्याच्या गेटला कुलूप होते. वाड्यातील सर्व खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या. पण त्या काचा फुटल्या कशा हेच कोणाला माहित नाही. काही जण म्हणत होते, "पोरांनी दगड मारून मारून फोडल्या असतील." पण सत्य कोणाला माहित नव्हते. त्या दिवशी आम्ही बराच वेळ त्या वाड्याजवळ होतो. काही वेळाने पोलिसांची गाडी येऊन थांबली. पोलिसांना बघून आम्ही जरा घाबरलो होतो. गाडीतून दोन चार पोलिस उतरले आणि त्यांच्यातील चालू असलेली बातचीत आमच्या कानावर पडली. तिथे राहणाऱ्या घर मालकाने फाशी घेतली होती. आणि ती केस अजून चालू होती. अजूनही त्या केसचा निकाल काही लागला नव्हता. तरीही तेथे जमलेल्या काही लोकांतून चर्चा चालू होती की त्या घर मालकाची आत्मा अजूनही त्या घरात फिरत असते. त्या घरमालकाच्या आत्म्याला अजूनही शांती मिळालेली नव्हती. मुळात तो घात की घातपात याचाच सोक्षमोक्ष पोलिसांना देखील लागत नव्हता. त्या दिवशी अखेर त्या वाड्यामागचे गूढ उकलले. आम्ही देखील घाबरलो तेथून जसे पलायन केले तसे पुन्हा कधी त्या वाड्याजवळ फिरकलो ही नाही. आमची मात्र चांगलीच हौस फिटली.