मृत्युदंश : एक भयकथा
मृत्युदंश : एक भयकथा
साधारण पौर्णिमेच्या रात्रीचे 11 वाजेच्या सुमारास तेजस एकटाच रेल्वे रुळाच्या शेजारच्या रस्त्यावरून घराच्या दिशेने चालला होता. रस्त्यावर सूनसान होती. एक कुत्रा दिसत नव्हता. त्यात अर्ध्या रस्त्यात रस्त्यावरील दिवे बंद पडले. अजूनच अंधार झाला. तेजस खूप घाबरला होता. लवकरात लवकर घरी पोहोचण्याच्या बेतात तो गाडी जोरात चालवू लागला परंतु, रस्त्याच्या मध्यावर गाडी ही बंद पडली. तेजसला वाटले गाडीतले पेट्रोल संपले असेल. म्हणून तो गाडीचे पेट्रोल चेक करू लागला. पेट्रोल बघता बघता त्याच्या लक्षात आले,"आपण तर येताना नुकतेच पेट्रोल भरून आलो, मग पेट्रोल कसे काय लगेच संपेल?", "पेट्रोल संपले नाही तर, गाडी कशी काय बंद पडली?, आणि आताच बरी बंद पडली , गाडीला पण आताच बंद पडायचे होते" असे म्हणत स्वतःशीच बडबडू लागला. गाडी अशा प्रकारे बंद पडणं नक्की योगायोग आहे की त्यामागे भुताटकी आहे हे त्याला ही समजत नव्हते. शेवटी गाडी ढकल करण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे शिल्लक नव्हता. तो तसाच गाडी ढकलत पायी घराकडे निघाला. साधारण त्या गाडीच्या गडबडीत एक तास उलटून गेला होता. रात्रीचे १ वाजत आले होते. तरी रस्त्यावरील दिव्यांचा पत्ता नव्हता. घर अजून बरेच लांब होते. त्याच्या घरापर्यंत जायला अजून अर्धा तास लागणार होता. तेजस आधीच खूप थकला होता. पण एवढ्या रात्री रेल्वे रुळाच्या शेजारच्या रस्त्यावरून एकटे पायी जाणे म्हणजे जरा भितीचेच होते.
त्या रस्त्यावरून जाताना भीत भीत कसातरी घराजवळ येऊन पोहोचला. त्याचवेळी कोणी तरी आवाज दिल्यासारखा त्याला भास झाला. म्हणून तो मागे वळून बघतो तर कोणीच नव्हते. तेजस मात्र आणखीनच घाबरला होता. आणि गाडीसोबत पळत पळत कसातरी घरात पोहोचला. त्याच्या भीतीचे कारण म्हणजे त्या दिवसाच्या आदल्या रात्री रेल्वे रुळावर एका व्यक्तीने घरात भांडण झाले म्हणून रेल्वेखाली आत्महत्या केली होती. हे तेजसला माहित होते पण त्याच्या घराकडे जाणारा तो एकच रस्ता होता त्यामुळे त्या रस्त्यावरून जाण्याशिवाय त्याच्याकडे ही दुसरा पर्याय नव्हता. तेजस कसाबसा घरी तर पोहोचला. पण त्याच रात्री त्यांच्याच गल्लीत दोन मुलांना सफेद वस्त्र घातलेली एक व्यक्ती कोणीतरी दिसली. त्या व्यक्तीला बघताच ते दोघे पळत पळत घरी येऊन पोहोचले. एक महिन्यापूर्वी पुन्हा एका स्त्रीने नवरा दारू पिऊन येऊन घरी तमाशा घालतो म्हणून रेल्वे रुळावर झोपून रेल्वेखाली जीव दिला. त्या स्त्रीची लाश दुसऱ्या दिवशी सकाळी त्या रेल्वे रुळावर आढळून आली. हे असे आत्महत्येचे सत्र सारखे चालूच होते. आणि त्याचे पडसाद मात्र रात्रीच्या वेळी तेथील स्थानिक लोकांना अनुभवयास मिळत होते. थोड्या दिवसांनी पुन्हा एक स्त्री रेल्वे रुळाच्या दिशेने पळत चालली होती ते आजूबाजूच्या लोकांनी बघितले आणि त्यातील काही लोक त्या स्त्रीच्या मागे पळत पळत तिला आत्महत्येपासून त्या रेल्वे रुळाकडे जाण्यापासून परावृत्त केले.
काही दिवसांनी आम्ही
मित्र त्या रस्त्यावरून शाळेत जात असताना रेल्वे रुळावर खूप गर्दी जमलेली दिसली. पोलिस आलेले होते. तिथे काय झाले? एवढी गर्दी का जमली आहे म्हणून बघण्यासाठी सायकल वरून उतरून त्या गर्दीत जाऊन बघितले तर तिथे एक प्रेत सापडले होते. त्या प्रेताचे तुकडे तुकडे झाले होते. त्या प्रेताचे हृदय एका बाजूला, धड एका बाजूला, हात आणि पाय एका बाजूला पडलेल्या अवस्थेत होते. शिवाय तेही सर्व अवयव रक्त बंबाळ झालेल्या अवस्थेत बघून आमच्या काळजात धस्स झालं आणि आम्ही देखील खूप घाबरलो. तेथील एका मुलाला विचारणा केल्यास समजले काल एका २५ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली जीव दिला पण त्याचे कारण अद्याप समजले नव्हते. अशी सतत एका नंतर एक मृत्यूची मालिका त्या रस्त्याला चालूच होती. आणि मग त्याचे परिणाम रात्री लोकांवर होत असत. सतत एकामागोमाग घडणारी मृत्यूची मालिका आणि रात्री घडणारे भुताटकीचे भास यामुळे परिसरातील लोक त्रासले होते. चिंताग्रस्त झाले होते. त्या परिस्थितीतून मार्ग कसा काढावा कळत नव्हते. तेथील लोक भयग्रस्त होते त्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी कोणी लवकर पुढे येत नव्हते. एके दिवशी त्या परिसरातील एका रहिवाशाला रेल्वे रुळाजवळ रस्त्याच्या चौफुली वर खूप वर्षांपासून बंद असलेले मंदिर दिसले. तेव्हा त्याच्या मनात विचार आला,"जर आपण या मंदिराचा जिर्णोद्धार केला तर कदाचित परिसराचा भयगंभीर प्रश्न मार्गी लागू शकतो." तेव्हा घरी जाऊन त्याने शेजारच्या काकांकडे त्या विषयी चर्चा केली तेव्हा त्यांनी सुट्टीच्या दिवशीचा मुहूर्त काढून त्या परिसरातील सर्व लोकांना आमंत्रित करून मीटिंग भरवली.
काकांनी मीटिंगमध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय यथोचित पद्धतीने समस्त रहिवाशांपुढे मांडला. सर्व रहिवाशांना पटला देखील. त्यानुसार मंदिराच्या कामासाठी सर्वांनी देणगी देण्याचे कबूल केले. आणि मग त्या देणगीतून आलेल्या पैशातून मंदिराची पुनर्बांधणी सुरू झाली. अखेर सुंदर पहाटे हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त साधून मंदिरात हनुमानाची सुबक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून होमहवन करण्यात आले त्यात समस्त रहिवाशांनी आता पर्यंत मृत पावलेल्या मृतात्म्यांना शांती लाभावी म्हणून होमात आहुत्या टाकल्या आणि एक यज्ञ संपन्न झाला. त्या गावातील नगरसेवकाकडून मंदिराचे उद्घाटन केले व समस्त भाविक वर्गासाठी दर्शनासाठी मंदिर खुले केले. त्या दिवसापासून रोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमानाची न चुकता आरती सुरु झाली. मंदिरात हनुमान चालीसा पठण सुरू झाले. प्रत्येक वर्षीचा हनुमान जयंती उत्सव मोठ्या दिमाखात, उत्साहात पार पाडण्यास सुरुवात झाली. व हनुमान मंदिर उघडल्यामुळे त्या परिसरातील मृत्यूच्या मालिकेला पूर्णविराम मिळाला. व भयग्रस्त घटनांनी विवश असलेला तो परिसर भयाण, भयगंभीर विवंचनातून अखेर मुक्त झाला. जसे मंदिर दर्शनासाठी उघडले गेले तेव्हापासून आत्महत्येचे प्रमाण थांबले. त्या परिसरातील प्रत्येक जण आपल्या समस्येचे निराकरण हनुमानाच्या मंदिरात येऊन शोधून सोडवू लागला. आणि त्या परिसराच्या एका नव्या पर्वास प्रारंभ झाला.