बस स्टॉप
बस स्टॉप


स्वराजने आज पर्यंत दोन मुलींवर प्रेम केले होते. प्रेम मान्य असूनही दोन्ही वेळेस प्रेमात अपयश आल्यामुळे मनाने खूप खचला होता. नैराश्याच्या गर्तेत सापडला होता. मित्रांच्या सहवासात राहिल्याने नैराश्यातून लवकर स्थिरावला. प्रेमात अपयशी झाल्यानंतर स्वराज आता पुन्हा तिसऱ्या मुलीच्या प्रेमात पडायला तयार नव्हता. प्रेमाची भावना त्याच्यासाठी निष्ठुर झाली होती. त्याला एकट्याला राहायचे होते. आयुष्यात कोणतीच मुलगी नको होती. परंतु, एक इच्छा होती एखादी तरी चांगली मैत्रीण मिळावी. दुर्दैवाने तेही त्याच्या नशिबात नव्हतेच. मुळात त्याला मुलींशी जास्त संभाषण करणे माहित नव्हते, त्यामुळेच तो या गोष्टीत नेहमी मागे राहत असे. पुढे बी सी ए मध्ये प्रवेश घेतल्यानंतर रोज स्वराजचे कॉलेजला येणे जाणे सुरू झाले. रोज बस स्टँडवर तो एका मुलीला बघायचा. बऱ्याचदा बस स्टॉप वर जायची तिची आणि त्याची वेळ एकच होत असे. तरीही मात्र त्या मुलीशी बोलायची हिंमत काही त्याची होत नव्हती.
आता मात्र स्वराजला पार्टनर नको होती, तर त्याला अडीअडचणीत मदत करणारी, काही चुकल्यास समजून सांगणारी, वेळीच त्याची चूक त्याला दाखवून देणारी, आणि मनातील सर्व गुपिते सांगण्यासाठी एक चांगली, जवळची, जिवाभावाची मैत्रीण हवी होती. रोज दोघे एकाच बसमध्ये येत जात असल्याकारणाने एक दिवस नेमके दोघे बसमध्ये शेजारी शेजारी येऊन बसले. आणि कधीही न बोललेले दोघे जण कॉलेजच्या बस स्टॉप पासून स्वराजच्या घराजवळ असलेल्या बस स्टॉप पर्यंत एकमेकांशी खूप काही बोलून गेले. स्वराज त्याच्या बस स्टॉप वर उतरल्यानंतर त्याच्या लक्षात आले,"अरे, कॉलेजपासून आतापर्यंत जवळपास पूर्ण प्रवास एवढ्या तिच्याशी गप्पा मारल्या, एवढं बोललो पण नेमकी महत्त्वाचं तिचं नाव विचारायचं राहूनच गेलं".
दुसऱ्या दिवशी स्वराज कॉलेजला जाताना आयकार्डशिवाय कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही म्हणून आयकार्ड शोधू लागला. त्याने नेहमीच्या ठिकाणी ठेवतो तेथे प्रथम बघितले तर तिथे नव्हते. मग त्याने त्याची पूर्ण बॅग चेक केली पण त्यातही नव्हते. ते आयकार्ड शोधण्यासाठी त्या दिवशी सकाळी स्वराजने संपूर्ण घर पालथे घातले परंतु, ते आयकार्ड काही कॉलेजला जायची वेळ झाली तरी सापडले नाही. त्याला वाटले कॉलेजमध्ये पडले असेल, किंवा वर्गात कुठे पडले असेल, म्हणून तो त्या दिवशी तसाच कॉलेजला गेला. त्यातही कॉलेजमध्ये जायला उशीर झाल्याने 2 तास वेळेपेक्षा उशिरा पोहोचला म्हणून तो कॉलेजला जाऊनही त्या दिवशी त्याची गैरहजेरी लागली. याचे खूप मोठे दुःख झाले. याचे कारण त्याने एडमिशन घेतल्यापासून आजपर्यंत एकदाही विनाकारण कॉलेजला सुट्टी मारली नव्हती. त्या बाबतीत तो अत्यंत प्रामाणिक होता. त्या दिवशी कॉलेजमध्ये जाऊन हरवलेले आयकार्ड शोधू लागला. वर्गात बघितले, कॉलेजच्या परिसरात बघितले, कॉलेजमधील मामांना विचारलं त्यांनी पण नाही सापडलं म्हणून उत्तर दिलं. असे करत कॉलेजमध्ये जिथे गरज नाही अशा ठिकाणी ही आयकार्डचा शोध घेतला पण कुठेच मिळत नव्हतं. त्यामुळे आता स्वराजला नवीन आयकार्ड घेण्यासाठी कॉलेजमध्ये अर्ज करण्याशिवाय काही गत्यंतर नव्हते. कारण त्याला आज आयकार्डशिवाय कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि तोही गेटवरील वॉचमनला विनंती करून. पण उद्या ही प्रवेश मिळेलच याची शाश्वती नव्हती. त्या दिवशी कॉलेजच्या हेड ऑफ डिपार्टमेंट असलेल्या पाटील सरांनी सुद्धा स्वराजला ताकीद दिली होती की उद्यापासून आयकार्ड जवळ नसेल तोपर्यंत कॉलेजला यायचे नाही. त्यामुळे त्याने लगेचच दुसऱ्या आयकार्ड साठी लायब्ररी मध्ये अर्ज दाखल केला. तर त्याला आयकार्ड मिळायला 15 दिवस लागणार होते. त्यामुळे आता उद्यापासून कॉलेजला जायचे कसे? या मोठ्या विवंचनेत स्वराज अडकला होता. त्याकारणाने पुढचे काही दिवस स्वराज कॉलेजला आला नाही. परंतु, गेल्या दोन दिवसापूर्वी भेटलेली मुलगी त्या दिवसात खास स्वराजला भेटण्यासाठी येत होती.
एक महिन्यानंतर स्वराजची परीक्षा होती. त्या दिवसात तर आयकार्ड अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु अवघा एक महिना उलटून गेला तरी स्वराजचे आयकार्ड आलेले नव्हते. परीक्षा असल्याकारणाने तो दिवस ही कसाबसा स्वराजने मारून नेला. परीक्षेच्या निमित्ताने बस स्टॉपवर त्या दोघांची भेट पुन्हा होणार होती, याची त्याला कसलीही कल्पना नव्हती. आता स्वराजच्या ऐवजी तिच त्याला मिळवण्यासाठी त्याच्या मार्गावर होती. परीक्षा संपल्यानंतर स्वराज बस स्टॉप वर जाण्यासाठी कॉलेजच्या बाहेर पडला त्याला पाहून ती त्याच्या मागे बस स्टॉपवर पोहोचली. आणि स्वराजला आवाज दिला,"हे, हॅलो, स्वराज" कोणी आवाज दिला म्हणून तो मागे वळून बघतो तर तीच मुलगी आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्या मुलीला बघितल्यानंतर मनात विचार आला,"हिला तर आपण नाव सांगितलं नाही अजून मग आपल नाव तिला कसं समजल?" आता तिला विचारणार कसं? मोठा प्रश्न स्वराज समोर उभा होता. स्वराज काहीही न बोलता फक्तं त्याचं ओठावरचं हसू तिला दिसलं. खूप वेळ दोघे बसची वाट बघत तसेच उभे होते. तिला वाटत होतं. स्वराजनेच काहीतरी बोलावं. परंतु, त्या क्षणी स्वराज काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तो आयकार्डच्या चिंतेत हरवला होता. स्वराज काहीही न बोलता बसमध्ये चढल्यावर तिने त्याला आपल्या बॅग मधून आयकार्ड काढून स्वराजच्या हाती दिलं आणि सांगितलं, "तुझं आयकार्ड मला बस मध्ये सापडलं त्यावर तुझं नाव वाचलं तेव्हा लक्षात आलं, हे तुझ कार्ड आहे; ते तुला परत देण्यासाठी लवकर बस स्टॉप वर आले". त्याचे स्वतःचे आयकार्ड बघून स्वराजचा चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला.
क्रमशः