वाचनालयाची दशा आणि दिशा
वाचनालयाची दशा आणि दिशा
पुस्तक हेच खरे मित्र, पुस्तका सारखा मित्र नाही, या गोष्टी कळण्या आधीच मला वाचनाची आवड लागली होती. बालपणी गावी एका लग्नानिमित्त गेलो होतो, तेथे किराणा दुकानात पुस्तके वाचनास होती. ती मी वाचून काढली, दुकानासह असलेले वाचनालय याचा पाहिला संबंध आला. वाचाल तर वाचाल या प्रमाणे वाचनालयात बराच वेळ घालवला.
आमच्या कॉलेजला वाचनालय इमारत वेगळी व प्रशस्त होती १२ वी बोर्ड परीक्षेसाठी खास रात्रौ १० पर्यंत वाचनालय खुले राहत होते, तेथे बराच अभ्यास आम्ही केला व उज्ज्वल यश मिळवले.
त्यानंतर विभागीय शासकीय ग्रंथालय येथे सभासद झालो, त्या कार्डवर बरेच मित्र एम.फिल. व पी.एच.डी धारक ही झाले आहेत. दिवाळी अंक वाचन व दरमहा पुस्तक खरेदी यामुळे माझे वैयक्तीक वाचनालय ही आहे.
आता तुम्हाला वाटेल मी माझ्या या बाबी का सांगतोय, कारण सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळेला ग्रंथालय निधी उपलब्ध झाला त्या खरेदी साठी माझ्या मित्राने मला सोबत घेतले होते व पं. स. ग. शि. अ. यांच्या आदेशाने आम्ही आनंदाने चाललो होतो त्या मुळे हे सारे पुन्हा आठवत होते.
तेथे जावून पुन्हा एकदा हवे ते पुस्तक खरेदी करता येईल असे वाटत होते. आम्ही तेथे पोहचलो मात्र अपेक्षा भंग झाला.
ना तेथे पुस्तक प्रदर्शन होते, ना पुस्तक निवड यादी. तेथे होते ते आधीच कॅरिबॅग मधे १६ पुस्तकांचा बांधलेला गठ्ठा. आपला तयार करुन आणलेला चेक देणे , गठ्ठा उचलणे व निघणे. कोणी काहीच विचारायचे नाही. मन खिन्न झाले, कॅरिबॅग खोलून पाहिले तर.....
गांडुळ शेती, वराह पालन आदी रद्दी आमच्या माथी मारली होती. जर प्राथमिक स्तरावर टक्केवारी पायी असे वाचनालयाचे वाटोळे होणार असेल तर पुढचे न बोललेले बरे.
आमच्या तमाम महापुरुषांनी पुस्तक प्रेमाणे इतिहास घडवला, काहींनी तर इतिहासच बदलला, मात्र त्यांचा वारसा आपण चालवत आहोत का? त्यामुळे वाचनालयाची आज धूळकेंद्र झा
ली आहेत. गजबजलेली वाचनालये आज सुतक पडलेली स्थाने झाली आहेत.
याच देशाचे भाग्य विधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचनालयात घालवलेला वेळ सर्वांना माहित आहेच, त्या मुळे सक्षम अशी लोकशाही उदयास आली, त्याच वाचनालयाची परत फेड म्हणून मुंबई दादर येथे राजगृह फक्त पुस्तकासाठी बांधले.
त्यांचे गुरू म.फुले यांचेही पुस्तक प्रेम आपणास माहित आहे, सत्य धर्म उदयास त्यामुळेच आला हा वारसा असून देखील आजचे चित्र मात्र खूपच उदासीन आहे.
मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस कडून गाव तेथे ग्रंथालय योजना घोषणा केली होती, मात्र तीही सर्वच ठिकाणी यशस्वी झाली नाही. खरं तर ही योजना यशस्वी व्हायला हवी हाती.
आज खरंच गरज आहे, गाव तेथे वाचनालय असण्याची. युवकांना दिशा देण्याचे काम ही वाचनालये करणार आहेत.
शाळेतही वाचन दिन साजरा करतो तसेच मुलांचा कल लक्षात घेता
नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया व प्रथम यांची कमी किमतीतील दर्जेदार पुस्तके घेतल्यास वाचनालये समृध्द होतील व वाचन कल वाढेल.
प्रत्येकाने आवर्जुन पुस्तक वाचन केले व वाचनालयातही जाणे सुरू केले तर, नक्कीच वाचनालयांना गतवैभव प्राप्त होईल.
तसेच वाचनालयातील कर्मचारी यांचा सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे , त्यांच्या समस्याही सोडवणे क्रमप्राप्त आहे, शासनाची उदासीनता देखील दूर व्हावी असे वाटते, वेळ लागेल मात्र बदल नक्की घडेल. पुन्हा एकदा वाचनालये गजबजतील. इतर साधने जरी वाढलेत तरी पुस्तका वरचा विश्वास आबाधीत आहे. इतर मार्गाने उपलब्ध होणारी माहिती त्रोटक व खोटीही असू शकते. मात्र पुस्तके हे प्रमाण आहेत. आपली इच्छा शक्ती प्रबळ असली तर, सुतक पडलेली वाचनालये सुसज्ज होतील व त्यातून आपण नक्कीच समृध्द होवू.
वाचनालयांना दशा तुन दिशा देण्याचे काम प्राथमिक स्तरावर फक्त शिक्षकच करू शकतो, यात आपले दुमत नसावे.