STORYMIRROR

amol sonawane

Abstract

3  

amol sonawane

Abstract

उशी

उशी

2 mins
197

     दिवसभराच्या थकलेल्या,श्रमलेल्या शरीराला जेव्हा अलगद कुणाच्यातरी मांडीवर डोकं ठेवून निद्रेच्या स्वाधीन करावं असं वाटतं तेव्हा, न कुठली उबदार कूस असते,न कुठला केसांतून फिरणारा प्रेमळ हात असतो, न कुठला सावरणारा देह असतो,न सोबतीला घरातला कुठला सदस्य असतो.

  विचारांच्या थैमान घालणाऱ्या कल्लोळातून जेव्हा सुटका होते, आणि पापण्या उघडण्याचे सुद्धा त्राण उरत नाही तेव्हा सुरू होतो खरा अंमल झोपेचा परंतु, या सुखद झोपेचा प्रवास सुद्धा कणभरही सुखाचा, आनंदाचा,कि चैतन्याचा अजिबात नसतो.

  अंथरुणात पडल्या पडल्या फक्त डोळे मिटले जातात परंतु, असंख्य विचारांच्या इंगळ्या खूप खोलवर डंक मारतच असतात. त्याही दररोज नित्यनेमाने छळत असतात, मग भूतकाळाचे काही दुःख, भविष्याचे कसलेसे वेध घेत दिवसभराच्या घडलेल्या घटनाक्रमाला उजाळा देणारा तो 'क्षण' म्हणजे झोप आणि जागेपणातली न सरणारी 'कातरवेळच' असते.

  आईची आठवण काढत कधीतरी मिटलेल्या डोळ्यातून सुद्धा जेव्हा अश्रू ओघळायला लागतात,सोबत नसलेल्या बापाच्या सावलीच्या आभासी जगात हिंडून येताना हृदयाचे हुंदके शेजारी असणाऱ्या सहचारिणी पर्यंत सुद्धा नकळत जेंव्हा हंबरत असतात. तेव्हा आणि सौभाग्यवतीने रागामध्ये केलेल्या शब्दांच्या वारांना अलगद कूस बदलत आपणच आपला मलम लावत असताना, मुलांच्या भविष्यासाठी कुठे कमी पडतो आहोत का ? याचा वेध घेत असताना समोर आनंदी आणि निरागस पहुडलेल्या लेकराला आकस्मित जखमांचं आणि अनाठायी वळांच दुखणं काय हे समजू न देता जेव्हा अंधारातही रंगीत स्वप्नांची चित्र दिसायला लागतात. "ती वेळ म्हणजे जीवाची देहाची आणि मनाची खरी उलघाल असते."

   आणि याच विचारमंथनातून निघणारी अपूर्ण स्वप्न अचानक रात्रीच्या झोपेला खडबडून जागं करण्यासाठीच सज्ज असतात. अशावेळी माझ्या मनातलं सर्व ऐकून माझे आकस्मिक आलेले अश्रू गिळून मुकाट एकटीच ऐकणारी, डोक्याखालची " उशी" निमूटपणे, माझे दुःख, माझे सुख, माझ्या वेदना, माझे हुंकार, सर्व, सर्व काही तितक्याच तन्मयतेने तितक्याच आदराने ऐकत असते. आणि माझी आणि माझ्या मनाची सर्व रहस्य गुपित एखाद्या विश्वासू मैत्रिणी प्रमाणे जपत असते.

   खरंतर अगदी माझाच नाही तर प्रत्येकाचं रहस्य ,गुपित, अबोल बोलणे, आचारविचार, सार, सारं काही डोक्या खालच्या 'ऊशीला' खडानखडा, शब्दनशब्द माहित असतं." भिंतीला जसे कान असतात." अगदी तशा उक्तीप्रमाणे, "उशीलाही तोंड असती तर,"     


        प्रत्येकाचे असंख्य घोटाळे, असंख्य गोष्टी,आणि मनाचे सर्व बोलणे, सर्वांना समजले असते पण नशीब बलवत्तर म्हणून वाचतोय सगळे, नाहीतर अगदी मनातलं ही सांगायला हक्काचं असं कोणीच उरलं नसतं आणि अंधार्‍या रात्री सोबतीला कुणी कुणी उरलं नसतं.

     एरवी दिवसा एका कोनाड्यात पडणारी,अंथरुणांच्या ओझ्याखाली श्वास गुदमरेपर्यंत आणि लुटूपुटूच्या भांडणांमध्ये सहज सोप्प शस्त्र होणारी 'उशी',आपण सहन करत असलेल्या सर्व व्यथांची साक्षीदार राहिली नसती.

   आणि येणाऱ्या प्रत्येक रात्रीला हक्काची सोबतीन, जीवाची मैत्रीण भेटली नसती. कोण म्हणतो मैत्री फक्त जीवांची जीवाशी होते, झाडांची पक्षांशी होते, ढगांची मातीशी होते," मी म्हणतो खरी मैत्री, डोक्या खालच्या उशांशी होते."

   असत्या तिलाही जर नजरा

   अन सोबतीला शब्दांचा पसारा

   भाग्य तुझे 'अबोल' आहे ती,

   जवळ असा धगधगता निखारा.

कोण म्हणे तिच्यासोबत शृंगार होत नाही

सोसता तुला, तिचा अंगार होत नाही

नशीब समज वेड्या,रहस्यांचा तुझ्या,

तिच्याकडून कधीही 'संहार' होत नाही.


"एक नवी मैत्रीण जी नव्याने,आणि कायद्याने भेटलेली."


Rate this content
Log in

More marathi story from amol sonawane

Similar marathi story from Abstract