amol sonawane

Inspirational

2.6  

amol sonawane

Inspirational

परतफेड

परतफेड

8 mins
105


     भार्गवी बघ ना,आजही ती मुलगी नेहमी प्रमाणे तिथेच त्या गोल फिरणाऱ्या मोठ्या पाळण्याजवळ उभी आहे.आणि नेहमीप्रमाणेच तीच तेच निरीक्षण सुरू आहे.

    मी आज तिला विचारतोच बघ तुलासुद्धा..........

अभी तू तिला अजिबात काही विचारू नकोस हं, कदाचित तुझ्या विचारन्यामुळे ती हर्ट होऊ शकते.अरे आपला आणि तिचा अजून साधा परिचय सुद्धा नाही आणि कदाचित ती आपल्याला ओळखत सुद्धा नसेल, "सो प्लीज डोन्ट हर्ट हर".

    पण भार्गवी मला खरंच हे असे "देवाने एखाद्या बरोबर असं आयुष्य देणं अजिबात आवडत नाही बघ, वाईट वाटतं रे खूप असं कुणाला पाहिलं की म्हणजे, बघ ना प्रत्येकाला "जशा आशा,अपेक्षा, आनंद असतो तेवढं सुद्धा दुःख असतं", मला मान्य आहे पण अशा निष्पाप मुलीबरोबर देवाने म्हण किंवा नियतीने म्हण, असा क्रूर खेळ का करावा,म्हणून मी तिच्याशी आज बोलणारच.

   अभी मला तुझं पटतय रे पण इवलीशी पोर ती.आधीच तिचं हे बालपण अशा अवस्थेतून चाललंय, आणि "एखाद्याच्या दुःखावर आपण फक्त सहानुभूतीचा मलम लावू शकतो." आणि सगळे दोष देवावर ढकलून दीर्घ श्वास सोडण्या पलिकडे आपण काय करू शकतो सांग ना.?

   भार्गवी चे एवढे बोलणे संपेपर्यंत अभी आणि भार्गवी बागेच्या गेट पासून सुरु होणाऱ्या छोट्याशा रस्त्यावरून चालत चालत त्या मुलांच्या खेळण्या जवळ आले होते. जिथं ती हि मुलगी उभी होती. ती अगदी आशेने त्या गोल फिरणाऱ्या त्या पाळण्यातील मुलांच निरीक्षण करत होती.पाळणा फिरून खाली येताना मुलांच्या पोटात कसा गोळा येत असेल, किती भीती वाटत असेल, कसा आनंद घेत असतील,हे सगळे अगदी ती बसून अनुभवत होती.

     अभि तिच्याजवळ जाऊन तिला छान अशी स्माईल देत हाय बाळा नाव काय तुझं ?

   तरी तिचं लक्ष तिकडे न जाता ती पाळण्या कडेच आणि मुलांच्या मध्ये इतकी रममाण झाली होती की, अभीने विचारलेल्या प्रश्नांची तिला कल्पनासुद्धा नव्हती. की जवळ कोणी येऊन उभा राहिले आपल्याशी काही बोलत आहे याचं भान सुद्धा तिला राहिला नव्हत.

   शेवटी भार्गवीनेच अभिला इशाऱ्याने शांत बसायला सांगितले. आणि शेजारीच असणार्‍या बाकड्यावर दोघेही बसून तिचं एक टक निरीक्षण करू लागले.तब्बल अर्ध्या तासाने ती मुलगी तिच्या दोन्ही हाताने 'व्हीलचेअर' च्या चाकांना वळवत निघाली.तशी भार्गवी चालत येऊन तिला मदत करायला धावले. आणि भार्गवी ने तिची व्हील चेअर ढकलत बागीच्या छोट्या रस्त्याला आणायला मदत केली.तिकडे अभी मात्र मुलांच्या खेळण्यात एवढा दंग झाला की, त्याला भार्गवी आणि ती इवलीशी मुलगी गेलेली कल्पनासुद्धा नव्हती.

   अभि पुण्यात इंजिनिअरिंग करून बऱ्यापैकी पगार देणाऱ्या कंपनीत नोकरी करतोय.भार्गवी सुद्धा शिकलेली आहे.भार्गवी आणि त्याच्या लग्नाला सात वर्ष झालीत.परंतु पदरी अजून मूलबाळ नाही,म्हणून ते दोघेही दररोज संध्याकाळी अभिला वेळ असेल तेव्हा बागेत फिरायला येतात.येतात म्हणण्यापेक्षा त्यांच्या मातृत्वाची अन पितृत्वाची भूक भागवायला येतात. बागेत मुलं पाहिली की त्या दोघांना काही अंशी समाधान भेटते.एरवी घरात आणि नातेवाईकांकडे जायची पाबंदी कारण गेल्या सात वर्षापासून एकच प्रश्न सगळे विचारतात,मुलबाळ नाही असा.अजूनही भार्गवी वांझोट्या पणाच दुःख मनाशी कवटाळून बसली आहे.

  शेवटी मातृत्व म्हणजे प्रत्येक स्त्रीला पूर्णत्व बहाल करणारं, आणि आईपण लाभणार असं एक दैवी देणं असत,आणि नेमकं भार्गवी या निसर्गदत्त देणगीपासून वंचित होती.तीच जे दुःख आहे,ते समस्त पुरुष मंडळींना,किंवा कुना कुणालाही समजणार नव्हतं.

   शेवटी काही झालं तरी माणूस काय शोधत असतो तर "माणूस जे आपल्याला मिळत नाही ते दुसऱ्यांच्या कडून मिळते का ते शोधत असतो".आई नसेल तर,आई शोधत असतो. बहीण नसेल तर,बहिण शोधतो.प्रेम नसेल तर, प्रेम शोधतो.आणि आनंद नसेल तर,सुख शोधतो.जे आपल्याकडे नसेल त्यासाठी प्रत्येकजण जीवाचा आटापिटा करत असतो,अगदी तसेच सगळे उपाय,वैद्यकीय उपचार,उपास तपास,नवस करूनही भार्गवीच्या आयुष्यात काही उपयोग झाला नव्हता.

    अभी आणि भार्गवी बाबतीत सुद्धा असंच होतं कूस वांझ राहिल्याने, मातृत्वाचा आणि पितृत्वाची भुकेला शमवण्यासाठी, बागेतील मुलांना खेळताना बागडताना पाहून मुलांचा आनंद घेत होते. पण या व्हीलचेअरवरच्या मुलीबाबत मात्र दोघेही खूप हळवे होते. कारण तिला देवाने सर्व दिला पण सोबतीला असं पंगुत्व दिले होते. बिचारीला बालपणाचा सुद्धा आनंद घेता येत नाही की,कुठे मन मोकाट,मनमुराद फिरावे अशा ठिकाणी जाता येत नाही. स्वच्छंदी कुठे फिरता येत नाही, खेळण्याचा आनंद घेता येत नाही, धावण्याच्या शर्यतीत भाग घेता येत नाही. तिला फक्त एक जागी बसून कल्पनेचे इमले रचत आयुष्याचा नाटकी आनंद घ्यावा लागतो.

         या सकाळ विचारांमध्ये भार्गवी केव्हा बागेचा गेटवर पोचली हे त्याला कळलंच नाही. अभि ला जेव्हा भार्गवी चा फोन आला तेव्हा तो तसाच झपाझप चालत भार्गवी पाशी गेला आणि अगदी घाईने विचारू लागला.बोलली का तिच्याशी नाव काय तिचं,? कुठे राहते आई वडील काय करतात?शाळेत जाते का?अरे हो सांगते सांगते एवढा काय उतावीळ होतोस.

   तिचं नाव 'कीर्ती'आहे. ती तिच्या आत्याकडे राहते. आणि तिची आई लहानपणीच देवाघरी गेली आहे.आणि वडील अपघातामध्ये गेले. तीही वडिलांसोबतच होती. परंतु अपघातांमध्ये कीर्ती वाचली. "परंतु दोन्ही पायांना कायमचं अपंगत्व आले", आत्या तिचा तेव्हापासून सांभाळ करते आहे. घरात करमत नाही म्हणून दररोज संध्याकाळी बागेतील मुलांना खेळताना पाहून,स्वतः खेळत आहोत असा भास होतो आणि तेवढ्याच आनंदावर पुन्हा दुसऱ्या दिवसापर्यंत मनाला समजावत असते.

    खूप समजूतदार आहे रे कीर्ती. या अशा तिच्या परिस्थितीचं तिला दुःख नाही परंतु आईबाप सोबत नसल्याचा विरह तिला सहन होत नाही. म्हणून ती अशी बाकीच्या मुलांना पाहून आणि त्यांच्यासोबत असलेल्या आई वडिलांना पाहून तिच्या दुःखावर काही अंशी मलम लावण्याचा प्रयत्न करते.

    त्या रात्री मात्र अभिला काही झोप लागली नाही.पुन्हा किर्तीला केव्हा पाहिल तिच्याशी बोलेल असं त्याला झालं.परंतु पुढचे चार-पाच दिवस कामाच्या व्यापामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. पण त्याच्या मनात अष्टोप्रहर कीर्ती होती.

    अभि आणि भार्गवी नुकतच सहा महिन्यापूर्वी या गुलमोहर बिल्डिंग शिफ्ट झाले होते.स्वतःच्या मालकीचा फ्लॅट घेतला म्हणून. तशा गुलमोहर वसाहतीत आधीच्या पाच-सहा बिल्डींग होत्या नवीन तयार झाली होती आणि त्यामध्ये अभी आणि भार्गवी राहायला आले होते.

     अखेर अभिला आज संधी मिळालीच कीर्ती नेहमीप्रमाणे त्या झोपाळ्या जवळच होती,


अभी: तिच्याजवळ जाऊन हाय कीर्ती कशी आहेस.?


कीर्ती: मी मजेत आहे तुम्ही.?


अभि: मी पण...


कीर्ती: काकू नाही आल्यास तुमच्या सोबत.?


अभि: नाही तिला जरा बरं नाही.


कीर्ती: हो का काय झालय त्यांना.


अभि: काही नाही थोडं डोकं दुखतंय म्हणून.


कीर्ती: आम्ही गेले चार-पाच दिवस सोबतच असतो खूप छान आहेत काकू स्वभावाने.मला आज पर्यंत एवढ्या आपुलकीने कधीच कोणी विचारलं नाही खूप काळजी करतात माझी.


अभी: हो का.


कीर्ती : त्यांना सांगा मी विचारलं म्हणून.


अभि: बर,तुला एक विचारू का तुला बेटा.?


कीर्ती: हो !


अभि: तू दररोज इथे थांबते आणि नेमकं काय करते.


कीर्ती: काही नाही फिलिंग घेते ते पाळण्यात बसले असं,


अभि: मग,


कीर्ती: प्रत्यक्षात शक्य आहे का तसं.


अभि: मी नेतो तुला आणि बसवतो पाळण्यात.


कीर्ती : मला नाही जमणार


अभि: अगं चल माझ्या मुलीसारखी आहेस तू तुला काही इजा होऊ देणार नाही.

  आणि तेवढ्यात अभिन तिला अलगद व्हीलचेअरवरून उचललं आणि पाळण्यात काळजीपूर्वक बसवल. तिच्यासोबत तोही बसला त्या चिमुरडीच्या आनंदाला आज पारावार उरला नव्हता. कारण जे जिणं ती जगत होती, ते ती आज अनुभवत होती.आजच्या या प्रसंगामुळे अभी ची आणि कीर्ती ची छान गट्टी जमली. दररोज ती दोघ गप्पा मारणे, खेळ खेळणं,चित्र रंगवणे, गोष्टी सांगणे,यांसारखी धमाल करत होते.

   कीर्ती बरोबर गट्टी झाल्यामुळे भार्गवी आणि अभिजीत चा वेळ,आणि आनंद अगदी मजेत जात होता,कीर्ती बरोबर इतका जिव्हाळा निर्माण झाला होता की,अगदी स्वतःच्या लेकराप्रमाणे ते दोघे तिची काळजी घेत होती.तरीही स्वतःला मुलबाळ नसल्याचं दुःख मात्र अधूनमधून त्यांना घायाळ करत होत."माणसाचा स्वभावच असा आहे त्याला,तृप्त कधीच होता येत नाही,कारण समाधान नावाचा आजार त्याला,कधी स्वस्थ असल्याचा आनंद घेऊ देत नाही".

   काय रे राहुल्या तुला आज वेळ मिळाला का माझ्या नवीन घराला पाय लावायला.अरे नाही रे अभी मी आऊटऑफ सिटी होतो यार.आणि म्हणून नाही जमलं. रिअली सॉरी बर ते जाऊदे कशी आहे नवीन जागा नवीन लोक करमतय का.? हो रे आम्हाला इथं एक छान मुलगी भेटली अपंग आहे बिचारी,पण तिच्यात मी आणि भार्गवी खूप रमलोय. आमच्या मातृत्व आणि पितृत्वाची जी दरी आहे, या मुली मुळे काही अंशी भरून निघते एवढेच काय ते सुख.

   

राहुल: अरे वा छानच की मग नाव काय आहे त्या मुलीचं.?

   

 अभि: कीर्ती.

    

राहुल: आणि तिचे आई वडील.?

   

 अभि: दोघेही या जगात नाहीत.तिचा तिची आत्या सांभाळ करते.

    

राहुल: वडिलांचं गाव कुठलं,नाव काय काही विचारलं का नाही.?

    

अभी: अरे ती आपल्या नगरचीच आहे.

   

 राहुल: कोणतं गाव.?

    

अभी: वाळकी.

   

 राहुल: नाव काय म्हणालास तिच्या वडिलांचे.?

    

अभि : लहू वाळके.

    

राहुल: काय लहू वाळके,आभ्या यार आठवतं का नाही.

   

 अभी: काय रे ??????


राहुल: अभ्या गाणं आठवतं का सोच ना, जो होगा सो होगा, चल पडे है यार फिक्र को धूवे मे उडा के, जाने क्या होगा रामा रे जाने क्या हो गया मारा रे..........


अभि : कशाला रे जुन्या आठवणी राहुल्या आता.


राहुल्या: आठव अभी.


आपण त्यावेळेस नगरहून येताना तुझ्या वडिलांनी,तुझा बारावीत पहिला नंबर आला होता म्हणून,तुला भेट म्हणून नवी गाडी घेऊन दिली होती.आणि आपण मस्तपैकी त्या गाडीवर भरधाव वेगामध्ये येत होतो. तुझा स्वतःवर इतका कॉन्फिडन्स पाहता,गाडी खूप छान तू स्वतः नगरमधून चालवत आणत होतो.तुला गाडी चालवताना येत होती चांगली, यात शंकाच नव्हती. परंतु समोरच्या गाडीला ओव्हरटेक करत असताना,समोरूम येणाऱ्या टू व्हीलर ला तुझ्या गाडीचा कट बसला.आणि समोरच्या त्या दुचाकीवरून जाणाऱ्या त्या इसमास स्वताचज गाडी कंट्रोल करता आली नाही.

       आणि त्याची गाडी आपल्या मागून येणाऱ्या कारवार जाऊन आदळली आणि मोठा अपघात झाला.त्यात त्या इसमाचा अपघातात त्या इसमाचा डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला.

     आणि त्याच्यामागे बसलेल्या त्या लहानग्या मुलीचा मात्र जीव वाचला,त्यात तीच नशीब बलवत्तर म्हणूम ती वाचली,आपल्या एका चुकीमुळे त्या इसमाला प्राण गमवावे लागले,आणि त्या मुलीला बाप.

    पण तुझ्या वडिलांनी तू एकुलता एक असल्याने कसंतरी मॅनेज करून ते प्रकरण मिटवले, आणि त्या तुझ्या नव्याकोऱ्या गाडीला तेंव्हापासून आजतागायत तुमच्या गोठ्यामध्ये जागा करून दिलीय, आठवत का.?

    राहुल ने तो प्रसंग जसाच्या तसा सांगितल्यामुळे अभिला, अपघाताचा क्षण जसाच्या तसा डोळ्यासमोरून गेला, आणि आपण केलेल्या चुकीची शिक्षा,अशी कुणालातरी इतक्या निष्ठूरपणे भेटेल अशी साधी कल्पनाही केली नव्हती.

      परंतु आता त्या शिक्षेचा प्रायश्चित्त म्हणून देवाने आपल्या पदरी मुलाबाळांच सुख दिलं नाही याची त्याला प्रचिती आली.

       कीर्ती ही तीच मुलगी होती जी आपल्या चुकीमुळे झालेल्या अपघातात स्वतःचे दोन्ही पाय गमावून बसली होती.आणि पोरकी झाली होती परंतु आता तिच्याकडे स्वतःचे आईबाप नसल्याने, नातेवाईकाच्या घरी राहण्या शिवाय गत्यंतर नव्हते. आणि तिची अशी परिस्थिती असल्यामुळे जे आहे ते सहन करण्या शिवाय काहीच दुसरा कुठलाच इलाज नव्हता.

     यानंतर बरेच अथक प्रयत्नानंतर भार्गवी यांनी अभिने किर्तीला दत्तक म्हणून घेतले. आणि अभिला त्याच्या चुकीची शिक्षा म्हणण्यापेक्षा किर्तीला मुलगी म्हणून स्वीकारताना,तिच्या आई वडिलांची कमी न बसू देता किर्तीला आई-वडिलांचे प्रेम माया ममता ही सगळं भरभरून देता येईल, आणि स्वतःची मातृत्वाच आणि पितृत्वाचं शल्य भरून काढता येईल, यासारखं प्रायश्चित्त दुसरं कोणीच नव्हतं.

     म्हणून कीर्तीला लेकी सारख वाढवावं हा निर्णय दोघांनी घेतला. आणि कीर्तीच्या आयुष्यात सुखाचा, आनंदाचा,आणि अनाथ नसण्याचा कलंक पुसत,नव्या दिवसाचा नवा सूर्य नव्याने आणायचा आणि तिला सगळी सुख ओंजळ भरून द्यायचा निश्चय दोघांनी केला.

     एक अपघात घडला आणि नियतीची चक्र अशी फिरली की, स्वर्गात जाऊन पापाचे क्षालन करण्यापेक्षा इथेच याच जन्मी, त्याची "परतफेड" करण्याची संधी मिळाली.

    अभी आणि भार्गवीच्या आयुष्यात कीर्ती च्या रूपाने खरी "वात्सल्याची कीर्ती" जन्माला आली. खरंतर ही तडजोड अजिबात नव्हती, तर ही होती मातृत्व आणि पितृत्वाची तृष्णा, ती होती वात्सल्याची भूक आणि निर्मळ प्रेमाची छाया ज्यामुळे नियतीचा चक्राची प्रदक्षिणा पूर्ण झाली.

   नियती आणि नशिबाने अभी ला परतफेड म्हणून दिलेला हा सुखद अनुभव कीर्तीच्या आयुष्यात एक नवी पहाट, नवा उजेड,आणि नवा आनंद घेऊन आला.


Rate this content
Log in

More marathi story from amol sonawane

Similar marathi story from Inspirational