दिपमाला अहिरे

Inspirational Thriller

3.8  

दिपमाला अहिरे

Inspirational Thriller

त्या रात्री पाऊस होता.

त्या रात्री पाऊस होता.

6 mins
208


वातावरण ढगाळ झाले होते.काळेकुट्ट आभाळ भरून आले होते.कधीही मुसळधार पाऊस सुरू होईल असे वाटत होते.. आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला.

इतका की, हवेचा वेग इतका होता की,हवेसोबत उडणाऱ्या मातीचे कण डोळ्यात जाऊ लागले..समोरचे काहीही दिसत नव्हते.. आजुबाजुला सर्वच शांतता होती.. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती..कानात आवाज फक्त घोंघावणाऱ्या वाऱ्याचा येत होता.. एखाद्या वादळाच्या आधीची शांतता जशी मनाला बैचेन करते अगदी तसंच.. वाटतं होते.कोमलचे मन थाऱ्यावर नव्हते..आज ऑफीसात शिंदे सरांच्या रिटायर्डमेंट चा कार्यक्रम असल्यामुळे ऑफीस पाच वाजेऐवजी सात वाजेला सुटले होते..तसे तिने अगोदरच घरी सांगितलं होतं.. त्यानंतर सायंकाळपासून पावसाचे वातावरण दिसून आले.तसा तिने नेहा आणि आईला ही फोन करून कळवले होते.. पावसामुळे कदाचीत रीक्षा उशिरा मिळेल.. म्हणुन घरी यायला रोज पेक्षा जास्तच उशीर होईलच मला.. तुम्ही दोघीही काळजी करू नका..मी व्यवस्थित येईल.. ऑफीस ज्यांच्याकडे गाड्या होत्या ते पटापट निघुन गेले.कांचन सोबत जाणाऱ्या पाटील मॅडम ही त्यांच्याकडे मुलगी जावई आले असल्यामुळे दोन दिवसांपासून रजेवर होत्या..त्यातच नेमके आजच अविनाशला म्हणजे कोमलच्या नवऱ्याला ऑफिसच्या कामासाठी दोन दिवसांसाठी बाहेरगावी पाठवले होते.. म्हणून आज कोमल रीक्षा ने घरी जावे लागणार होते.

ती स्वतः पेक्षा जास्त घरी असलेल्या आपल्या सहा वर्षांची मुलगी नेहा आणि तिच्या सासुबाईंची काळजी वाटत होती.. नेहाला विजांच्या आवाजाची प्रचंड भिती वाटते..आई आठवणीने सर्व खिडक्या, दरवाजे बंद करतील तर बरं.याच विचारांत ती रीक्षास्टॅंड पर्यंत कधी येऊन पोहचली ते तिलाही कळले नाही..

आजुबाजुला एकही रिक्षा दिसत नव्हती.रस्ता पुर्ण ओस पडलेला होता.. कोमलने आपल्या हातातील घड्याळाकडे पाहिले तर साडेसात वाजले होते.म्हणुन तिला तेवढे काही वाटले नाही..येईलच एखादी रिक्षा म्हणून ती वाट पहात होती.वेळ तशी काही जास्त नव्हती झालेली.पण पावसाच्या वातावरणामुळे रस्ता जरा सामसुम झाला होता.. तेवढ्यात समोरून एक रीक्षा येतांना दिसली कोमलला जरा हायसे वाटले..तिने हात दिला पण ती रीक्षा न थांबता सरळ निघून गेली..अशा दोन तीन रीक्षा गेल्या.पण एकही रीकामी रीक्षा नाही भेटली..अशातच आठ वाजले,साडेआठ वाजले आणि तुरळक पावसाच्या सरी सुद्धा बरसु लागल्या..

बाजुलाच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कोमलने आसरा घेतला.. अजुनही एकही रीक्षा येता जातांना तिला दिसत नव्हती..

खरं तर आता तिला थोडी भिती वाटत होती..एक तास झाला.एकही रीक्षा आली नाही..नाहीच भेटली तर मी घरी कशी जाणार?  पायी जाणं तर शक्य नव्हते..नव्हते कारण घर तीन चार किलोमीटर अंतरावर होते...एक काम करते अवीला फोन करते.ते नक्कीच कुणालातरी पाठवतील मला घ्यायला.. या विचारात तिने पर्स मधुन मोबाईल काढला.पाहिले तर चार्जिंग संपल्यामुळे मोबाईल कधी बंद पडला हे तिच्या लक्षात आले नाही..

तिने कपाळावर हात मारला.."अरे देवा आता काय करु? अवी,आई मला फोन करत असतील, काळजी वाटत असेल त्यांना माझी.. आणि आता मी मदत कशी घेऊ कुणाची..हे सर्व आजच व्हायचे होते का? काय करावे या विचारातच कोमल रस्त्याच्या मधोमध गेली.लांबपर्यंत पाहुन ही एकही रीक्षा किंवा गाडी काहीही येतांना दिसत नव्हते.. घड्याळ पाहिले तर साडेनऊ वाजले होते...पावसाची सारखी रिपरिप चालूच होती..वाराही तसाच सुसाट होता..कोमल आत्तापर्यंत पुर्णपणे भिजली होती... हळूहळू तिची हिंमत खचत होती.. आणि तिच्या डोळ्यांत पाणी ही आले होते.एवढ्या मोठ्या सामसुम रोडावर ती एकटीच होती.. संपूर्ण रोडावर जेव्हा तिने नजर टाकली.. तिच्या अंगावर काटा उभा रहिला..ती धावतच परत त्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन उभी राहीली...


अचानक विजेचा कडकडाट झाला.कोमल खुप घाबरली.अगदी तशाच विजेच्या आवेगाने एक रीक्षा समोर रस्त्यावर येऊन थांबली.. आणि रिक्षावाला जोरजोरात हॉर्न वाजवू लागला. कोमलला रीक्षा पाहताच आनंद झाला.पण अशी अचानक ही रीक्षा एवढ्या पावसात,रीक्षात बसु की,नको, हा रिक्षावाला चांगला तर असेल ना?हा मला कुठे दुसरीकडे घेऊन गेला तर?हाच विचार करत ती उभी राहिली.. तेवढ्यात रीक्षातुन ती डोकावली."अहो ताई चलताय ना? रीक्षा खाली आले, जायचं असेल तर या लवकर.मलापण उशीर होतोय घरी जायला..जोरात ओरडुन त्रासलेल्या आवाजात ती रीक्षा चालवणारी बाई कोमलशी बोलत होती..लेडीज रीक्षा ड्रायव्हर बघताच कोमलला जरा बरं वाटलं..ती पळतच जाऊन रीक्षात बसली..रीक्षावालीने जोरात रीक्षा चालू केली..कोमलला आता जरा शांत वाटतं होते..ती त्या रीक्षा वालीशी बोलु लागली..


" देवपुर, दत्तमंदिर रोडला जायचे आहे..मी रोज रीक्षाने ये -जा करते. पण तुला कधीच पाहिले नाही मी इकडे..तुला पाहुन मला किती बरं वाटलं माहितीये तुला, केव्हा पासून एकटीच उभी होती मी. खुप भिती वाटत होती मला.. एवढ्या रात्रीची, पावसात एकटी रीक्षा चालवते आहे.. खुप हिंमत वाली आहेस तु, कौतुक वाटलं तुझं..नाव काय गं तुझं?" कोमलची आपली बडबड चालुच होती..


"ताई एवढी भिती वाटते मग एवढ्या उशिरा पर्यंत घराबाहेर राहु नये..अहो जमाना किती खराब झाला हाय माहित आहे ना तुम्हांला? बाई माणुस साठी तर सुरक्षित राहिलंच नाही..कुठेबी जा.शहर असो की,खेडं..मी या रस्त्याने नाही चालत कधी..माझा रुट येगळा हाय.. पावसामुळं तिकडे रस्ता बंद हाय म्हनून आज इकडुन यावं लागलं.. पाहिलं तर तुम्ही इथं उभ्या दिसल्या.म्हणुन थांबवली रीक्षा... माझं नाव संगिता हाय..संगी बोलतात मला..


कोमल - अगं माझं ऑफिस जरा उशिरा सुटलं म्हणून उशीर झाला आज मला.. आणि आज हा पाऊस आणि वादळ.. म्हणुन रीक्षा नाही भेटली मला...पण हो देवाने तुला माझ्या मदतीसाठीच पाठवलं.."


संगीता -"देव बीव काई नसतं ताई, एकादा वाईट परसंग आला ना तर कुणीबी येत नाय मदतीला."


बऱ्याच वेळ गप्पा झाल्या पण तरीही आपण पोहचलो कसे नाही.. कोमलच्या मनात विचार येत होता.. तिने घड्याळाकडे पाहिले तर दहा वाजेला घड्याळ बंद पडले होते..पाणी गेले असणार असा विचार करून तिने त्याकडे दुर्लक्ष केले.बाहेर एव्हाना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला होता.. एवढा की,समोरचे,आजुबाजुचे काहीही दिसत नव्हते..

फक्त काळेकुट्ट अंधार आणि त्यात चमकणाऱ्या पावसाच्या धुवांधार सरी..पण कोमल आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाली होती.कारण संगीता ची तिला सोबत झाली होती.आणि उशिरा का होईना पण आपण सुखरुप घरी पोहचु असे तिला वाटत होते...


थोड्या वेळाने जरा लक्षपूर्वक बघितल्यावर तिला लक्षात आले की, रीक्षा चालते तर आहे.पण असं का वाटतंय की, आपण पुन्हा पुन्हा त्याच जागेवर फिरुन येतोय..की,मग या जागेवरून पुढे जातच नाही आहोत..तिला हे सर्व जरा विचित्र वाटले.कारण एवढ्या वर्षांपासून ती रोजच या रस्त्याने ये-जा करत होती.. तिला थोडी भिती वाटली.. तिच्या मनात नको -धको ते विचार येत होते...तिने भित भित चोरट्या नजरेने संगीता कडे पाहिले..ही नक्की माणुसच आहे ना,की भुत???

तेवढ्यात संगीता बोलु लागली..


"काय झालं ताई मी माणुस हाय का भुत हाच ईचार करताय ना? बरोबर हाय तुमचं..मी माणुस नाय,एक भटकती आत्मा हाय."


कोमलची बोलती बंद झाली..तिला दरदरून घाम फुटला.. "कोण आ...आ...त..आत्मा...?"


संगीता - "व्हय पण घाबरु नका मी काय बी करत नाय तुमाला..तुमची मदत करायाच आली हाय मी.."

कोमल - "मदत ती कशी?? मला मारणार तर नाही ना तु? माझी मुलगी माझी वाट बघते आहे घरी." कोमल जोरजोरात रडु लागली.. संगीता ने तिला समजावून सांगितले....

"ताई घाबरु नका काही वर्षांपूर्वी माझ्या सोबत जे झालं ते दुसऱ्या कुणा बाई पोरी सोबत व्हायला नगं म्हणून मी एकट्या दुकट्या बाई माणसाला मदत कराया येते."

कोमल तिच्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहते"म्हणजे??"


संगीता-"व्हय मी संगिता एक रीक्षा चालवणारी सर्व गाव मला वळखायचं. संगी नावानं घरची परिस्थिती बेताची बाप मी लहान असताना मेला..आई लोकाची धुणीभांडी करायची.. परिस्थिती मुळं तेवढं शिक्षाण नाही करता आलं. आई आणि मी दोघीबी एकमेकाला आधार होतो..पण अचानक आईला डोक्याचा कॅन्सर झाला. दवाखान्यात लई. पैसा लागला..म्हणुन मंग रीक्षा चालवायला सुरू केली.. आपल्या बापाची रीक्षा हुती..धुळ खात पडली हुती..मग काढली तिला भाईर..

रीक्षा शिकली बी आणि चालवाया लागली बी..रोजचे पेट्रोल पाण्याचा खर्च काढुन हातात पैसा बी उरत व्हता..

माई रीक्षा चांगली चालत व्हुती,भाडं चांगल भेटत व्हतं,गिराईक बी फिक्स झालते माहे..पण दुसऱ्या रीक्षा वाल्यांना ते पचलं नाय.. त्यांना वाटायचं संगी मुळं त्यांचा धंदा हुत नाय,पायजे तेवढा भाडा मिळत नाय..मंग काय त्यांनी माला रस्त्यातुन काढयचा ईचार पक्का केला..पण डाव त्यांनी प्रेमाचा टाकला.. म्हणून मी वळखु शकले नाय.. आणि फसले.. त्यांच्यातला एक त्यानं मला त्याच्या प्रेमात पाडली.... मध्येच देवानं आईला माझ्यापासून दूर केली.. कॅन्सर शी लढता लढता ती कायमची हारली..मी एकटी पडली..त्याचाच काय तो आधार वाटायचा मला.. हळूहळू मी त्याच्या जाळ्यात पुरती अडकली.. आणि त्या रात्री पाऊस होता...ती रात्र माझ्या आयुष्यातील शेवटची रात्र हुती...एक दिवस असाच सोसाट्याचा वारा,इजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस.. गोड बोलुन तो माला याच रस्त्यावर घेऊन आला.त्याचे तीन चार रीक्षावाले मित्र आणि त्यानं माझ्या वर अतिप्रसंग केला...गळा दाबून माझा खुन केला.आणि या समोरच्या दरीत फेकून दिली..पण तेव्हा पासून माझा हा आत्मा इथं फिरतो.. फक्त अशा पाणी पावसाच्या अंधाऱ्या राती दुसऱ्या कुठल्याबी बाई पोरी वर अशी वाईट परिस्थिती यायला नको.. कुण्या बी एखाद्या बाईपोरीला माह्या मदतीची गरज असली तर मी रीक्षा घेऊन येते.. घरापर्यंत सोडायला नाई तर त्या एकट्या दुकट्या बाई बरबर थांबायला...कारण की, मला एवढंच लक्षात हाय मी मेली त्या रात्री पाऊस होता..


संगिताचे हे सर्व बोलणे ऐकून कोमल बेशुद्ध पडली..पण जेव्हा ती शुद्धीवर आली.तेव्हा आपल्या घरी होती... आपण घरी सुखरूप पोहचलो यासाठी तिने मनातून संगिताचे आभार मानले...प्रेमाचा हा आगळावेगळा रंग तिने पाहिला होता..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational