रंगली मेहंदी नव्याने..(लाल)
रंगली मेहंदी नव्याने..(लाल)
"अगं वीणा किती छान रंग चढलाय मेहंदीला?
खरंच अगदी लालबुंद झालाय गं हात..मानस चं खुप प्रेम आहे बर का तुझ्यावर म्हणून मेहंदी इतकी खूलुन आलीय.". वीणा च्या सर्व मैत्रिणी तिला सारख्या चिडवत होत्या..
वीणा मात्र लाजत,अंग चोरुन एका कोपऱ्यात उभी होती..तिचा आणि मानस चा आज साखरपुडा होता..
पण तिकडे पाटावर बसलेल्या मानसला त्याचे मित्र एकच प्रश्न विचारत होते.."अरे..मित्रा तु एवढा हॅंडसम,एक प्रसिद्ध वकील,वेलसेटल आणि महत्वाचे म्हणजे कुवारा होतास आणि तुला एका विधवेशी लग्न करण्याची दुर्बुद्धी आली कुठून??तुला तर एक चांगली तुझ्या तोलामोलाची मुलगी भेटली असती ना?
मग ही उष्टी पत्रावळी कशासाठी??"
मानस ने न रागावता शांतपणे मित्राला उत्तर दिले
"आई वडिलांनी तिचे कमी वयातच लग्न करून दिले.. आणि दुर्दैवाने लग्नाच्या एका महिन्यातच तिच्या पहिल्या नवऱ्याचा अकाली मृत्यू झाला.यात तिचा काय दोष आहे?? आत्ता कुठे तिच्या आयुष्याला सुरुवात झाली होती. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ती अशी एकटी पडली.तर एक जोडीदार म्हणून मी तिला आयुष्यभर साथ देण्यासाठी तिचा हात हातात घेतला त्यात काही चुकीचे आहे असे मला तरी वाटत नाही.."
समोर उभी असलेली वीणा सर्व ऐकत होती.. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि आपल्या हातावरच्या मेंहंदी कडे पहात ती विचार करु लागली..मानसच्या रुपाने पुन्हा माझ्या बेरंगी आयुष्याला रंग चढला..हातावर ही लालबुंद मेंहंदी पुन्हा नव्याने रंगली...
