STORYMIRROR

Ratnadeep Mohite

Abstract

3  

Ratnadeep Mohite

Abstract

"तू खुश आहेस ना?"

"तू खुश आहेस ना?"

3 mins
359

जेव्हा माझं शालेय जीवन चालू होतं तेव्हा मला एक मुलगी खूप आवडायची ती पण तिथेच घाटकोपरच्या नित्यानंद नगर मध्ये राहत होती.मी बीएमसी वसाहतीत राहायचो आणि ती बाहेरच्या गल्लीत, होय त्या परिसरात चाळ नव्हती सगळ्या ओबडधोबड गल्ल्या होत्या, ऐकायला वेगळंच वाटेल पण गल्ली हीच व्याख्या बरोबर होती,एखादी शरीराने भरगच्च व्यक्ती जरी त्या गल्लीत शिरली तर त्या व्यक्तीला खेकड्यासारखं वाकडं वाकडं चालण्याशिवाय पर्याय नव्हता.

         महाविद्यालयात माझा प्रवेश झाल्यावर तिच्या गल्लीतल्या एका मित्राला सांगून तिला प्रपोस केलं, तो मित्र ह्याला सेटिंग लावणं असं बोलत असे.तिच्या उत्तराची वाट बघत मी बुद्धन च्या दुकानाजवळ उभा होतो, बुद्धन आमच्या परिसरातील एका पानपट्टीवाल्याचं नाव. ऐकायला वेगळंच वाटत ना बुद्धन एका पानपट्टीवाल्याचं नाव आणि रत्नदीप एका भोंदू मुलाचं नाव.

         तीचा मित्र त्यादिवशी भेटलाच नाही.दुसऱ्या दिवशी भेटला आणि म्हणाला "ती नाही बोलली".मी क्षणभर शांत झालो.नंतर त्याला विचारलं "नक्की काय बोलली ती?".तो काही करून सांगत नव्हता पण खूप वेळा विचारल्यावर तो बोलला "ती बोलली की, शी तो काळ्या ढापण्या मी नाही बाबा". त्याचे हे उत्तर ऐकून माझ्या कपाळातच गेल्या..!

         रात्रभर डोकं दुखलं, वेळ गेला तसा मी ती गोष्ट विसरून गेलो. थोड्या वर्षांनी माझ्या खास मित्रानी जो खूप गोरा आणि उंच होता त्याने तिला पटवलं. एका क्षणासाठी परत माझ्या कपाळातच गेल्या, पण दुसऱ्या क्षणी मन मोठं करून मित्र खुश आहे आहे म्हणून शांत झालो. त्याच्यासोबत तिचं काही महिनेच चाललं आणि ब्रेकअप झाला.तिचं लग्नही ठरलं सगळं खुपचं घाईत झालं. तिच्या लग्नात तिचा पूर्वीचा प्रियकर तो माझा पक्का मित्र आणि मी आम्ही निर्लज्जासारखे हजेरी लावून आलो.

           परत वर्षामागून वर्ष गेली सगळं बदललं होतं, तिचं इन्स्टाग्राम प्रोफाइल अचानक दिसलं लगेच फॉलोची रिक्वेस्ट पाठवली. तिनेही ती लगेच ऍक्सेप्ट केली. मी घाई घाईत तिला "हाय ओळखलस का मला?" असा मेसेज पाठवला, तिचा ही मेसेज आला "हो ओळखलं ना, का नाही ओळखणार?". मी खुश झालो.मग एक तास नुसतं 'काय चाललंय? हा कसा आहे? ती काय करते आता? घरचे कसे आहेत?' अश्या वायफळ गप्पा चालल्या होत्या.

               अचानक तिने विचारलं "तू का जागा एवढ्या रात्री? जीएफ शी बोलतोयस का?". मी तिच्यासाठी जागा होतो पण आता तिला हे कसं सांगणार, म्हणून तिला बोललो "नाही ग असंच झोप येत नाहीये". अचानक ती बोलली " मुलींपेक्षा तुमच लाईफ किती चांगलं आहे". मी तिला सांगत होतो की अस काही नाही सगळंच चांगलं आहे, पण ती बोलली "ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत". मी तिला हसवण्यासाठी दुसरा विषय काढला पण ती आता बोलत सुटली होती म्हणाली "ज्यांचं लग्न नाही झालं त्यांचं लाईफ किती मस्त असतं". मी बोललो "तू खुष आहेस ना?"

               ती म्हणाली "आहे पण आणि नाही पण 50-50". ती फक्त मला बुचकळ्यात टाकत होती. मी विचारत होतो 'असं का?'.पण ती उत्तर देण टाळत होती. परत मी तिला हसवण्यासाठी बोललो "तू खूप जाडी झालीस गं, पण तरीही छान दिसतेस..!". ती हसली आणि परत थोड्या वेळाने म्हणाली "हा शेवटी एका मुलाची आई ना..!".हे ऐकून माझ्या परत एकदा कपाळातच आल्या..!

                 तिने स्वतःच्या मुलाचा फोटो पाठवला त्याच नाव सांगितलं, दोन वर्षांचा मुलगा होता. मी मस्तमस्त,वा, सुंदर,सुरेख ह्या गोडगोड शब्दांची रांग लावली, परत तिने स्वतःची लाईफ किती कठीण आहे हे सांगण सुरू केलं.मी म्हणालो "हे बघ आपल्या आनंदाची चावी आपल्याच हातात असते,आणि आपण चारीबाजूला असलेले दुःख पाहून आनंदाला टाळं लावून बसतो..!" त्यावर ती परत "ह्या सर्व बोलण्याच्या गोष्टी आहेत" असंच बोलू लागली, आता मला कंटाळा यायला लागला तिच्याशी बोलून. मी तिला म्हटलं "हे बघ आता मला झोप येतेय मी झोपतो तू पण झोप,उद्या कामाला जायचंय ना तुला? खूप वर्षांनी तुझ्याशी बोलून चांगलं वाटलं,मी आशा करतो तू फिफ्टी फिफ्टी नाही तर शंभर टक्के खुश होशील, शुभरात्री..!". ती म्हणाली "मी खुषच आहे रे तरीपण" अस बोलून तिनेही निरोप घेतला.

           तिच्या "तरीपण" या शब्दात ती खुष नसल्याचं स्पष्टपणे समजत होत,पण माझ्या हातात मी स्वतः खूष राहणं एवढंच होतं. "शेवटी आपलं जीवन सुखात जाईल की दुःखात हे ज्याच्या त्याच्या हातात असतं..!"


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract