Ratnadeep Mohite

Others

3  

Ratnadeep Mohite

Others

स्वतःसोबत

स्वतःसोबत

3 mins
264


  खरेदी म्हणजे माझा एक छंदच जणू.एखाद्या गोष्टीची खरेदी करायच ठरवायचं,मग त्यावर उगाच अतिविचार करायचा की, "ही वस्तू खरंच आत्ता गरजेची आहे का? किती टिकेल, असाच मोह होतोय की,खरंच घेतली तर फायद्याचं होईल?नीट उपयोगात येईल का?" असे अनेक विचार आणि अनेक प्रश्नांमध्ये स्वतःसोबत एकप्रकारे चर्चा करूनचं खरेदी करतो मी.काय ठाऊक पण कदाचित स्वतःसोबत चर्चा करणे हा सुद्धा माझा छंदच असू शकतो.

मोठया आनंदाने खरेदी केलेल्या सामानामधली एक वस्तू दोषपूर्ण निघाली.सगळ्या आनंदावर जणू विरजण पडल्यासारखं झालं.असं काही झालं की पप्पा मला म्हणणार, "घाईघाईने कोणती गोष्ट करू नये!".पप्पा एवढंच बोलून विषय सोडून देणार पण मग मी त्याच गोष्टीवर उगाच विचार करत बसणार,शिवाय बहिणींना मला धांधरट म्हणून चिडवायची अजून एक संधी मिळणार.त्यापेक्षा आधी कोणालाच सांगायचं नाही त्या वस्तूच्या डिफेक्टबद्दल आणि मग ती गोष्ट गुपचूप बदली करून आणायची,असं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी एकटा जायचा खूप कंटाळा आला होता. माझा पुतण्या दीक्षांत नुकताच कॉलेज मधून थकून परत आला होता.त्याला विचारलं तरी तो काय आत्ता येणार नाही, "मेला ढेंगा वर करून झोपला असेल!"असा विचार करून मी एकटाच ती वस्तू घेऊन सरळ त्या मॉलमध्ये शिरलो.वस्तू बदली करायचा गेट-पास बनवण्यासारख्या कंटाळवाण्या गोष्टी उरकून आत गेलो. बिल आणि त्या वस्तूमधला उत्पादन दोष मुद्दाम जरा रागात असल्याचा आव आणून मॅनेजर ला दाखवला, त्यानेही लगेच त्या वस्तूला परत घेऊन दुसरी दिली. मला खूप मज्जा वाटली,किटकिट न करता त्याने माझं काम पटकन करून दिलं म्हणून.

बाहेर जाणार तोच जोरदार पाऊस सुरू झाला.अनपेक्षितपणे पाऊस पडल्यामुळे बहुतेक माणसं तिथेच उभी राहून काचेतून पावसाकडे पाहत तो थांबण्याची वाट पाहत उभे होते. मी उभा राहून राहून कंटाळलो."परत आत जाऊन

पाऊस थांबेपर्यंत फिरुया,तेवढाच टाईमपास",असा विचार करून वरच्या मजल्यावर जाणार तेवढ्यात बघतो काय,मॉल चक्क एका गावच्या कौलारू घराप्रमाणे गळत होता.रघुलीला मॉल चे छत पूर्णपणे काचेचे आहे.त्या काचेवरून जोरात वाहणारे पावसाचे पाणी बघून मस्त वाटलं.तसंच झिरपण्याऱ्या थेंबांकडे पाहून खूप हसू आलं.त्या एवढया मोठया मॉलच्या देखरेख व्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले होते.

पाऊस कमी झाल्यावर बाहेर पडलो.थोडा चाललो तसा पावसाने जोर धरला. मी लगेच रस्त्याजवळील एका आडोश्याला जाऊन उभा राहिलो.बाजूलाच एक मक्याच्या कणसाचे उकडलेले दाणे विकणारा भैया बसला होता. वेळ जावा आणि पोटात थोडी भर पडावी म्हणून मी त्याच्या त्या मोठ्या छत्रीत उभा राहून मक्याचे गरमागरम चटपटीत दाणे खात होतो.परत स्वतःसोबत मनातल्या मनात गप्पा मारू लागलो. विचार आला "भेंडी! मस्त आहे याचा धंदा,एक कणीस दहा रुपयाचं जरी भेटत असेल,तरी हा भैया त्याचे दाणे काढून,उकडून चाळीस रुपये कमवत असेल."

खूपच थंडगार वारा वाहत होता,मनात आलं "जर मला प्रेयसी असली असती तर किती मज्जा आली असती, तिच्यासोबत या सुंदर वातावरणात गरम गरम मक्याचे दाणे खात वेळ किती सुंदर गेला असता!" "जाऊदे मुली म्हणजे डोक्याला शंभर ताप!,नाहीये कोणी तेच बरं,एकटा जीव सदाशिव!"असं स्वतःला समजावलं.कदाचित 'कोल्ह्याला द्राक्ष आंबट!' असंच असावं. तितक्यात समोरून एक पांढराशुभ्र शर्ट घातलेला एखादा अधिकाऱ्यासारखा दिसणारा माणूस येत होता.त्याला बघून भैयाचं तोंड असं काही झालं जस एखाद्या मुलाचं त्याच्या प्रेयसीच्या भावाला बघितल्यावर होतं.तो इसम जवळ येऊन उभा राहताच भैयानं चोरखिश्यातली पाचशे रुपयाची नोट काढून त्याला दिली.त्या व्यक्तीनेही पटकन ती घेतली आणि खिश्यात ठेवताना आजूबाजूला एक नजर फिरवली आणि निघून गेला. मला समजलं हा पालिकेचा अधिकारी असणार.मला वाटत होतं तेवढीपण ह्या भैयाची मज्जा नव्हती.

पाऊस पूर्णपणे थांबला.मी परत एकटाच स्वतःसोबत घालवलेल्या संध्याकाळचा अनुभव आठवत घरच्या रस्त्याने चालू लागलो.


Rate this content
Log in