STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Romance

3  

ऋतुजा वैरागडकर

Romance

तुझ्या आठवणीत

तुझ्या आठवणीत

4 mins
294

प्रथम भेटीची हुरहुर तर होतीच. त्याच बरोबर पहिली प्रेयसी म्हणून जे त्या वयात होतं ते ही होत होतं. शनिवारी सकाळी ७ चे कॉलेज आणि ती ८ वाजता घरुन निघणारी. त्यामूळे थेट तिच्याच घराजवळ उभे रहायचं ठरवलेलं मी. त्यावेळी ” गारवा ” अल्बम खूप हीट होता. कॅसेटचा जमाना तो. पुर्ण कॅसेट कॉपी करुन छान पॅकिंग करुन तिला गिफ्ट तयार केलेलं. एक छानसं पत्र ज्यात मला तिच्याबद्दल ज्या भावना आहेत त्या सर्व ओतल्या होत्या. शेवटी ” बघ माझी आठवण येते का? “च्या ओळी. छान तयार होऊन, परफ्यूम मारुन निघालो घरुन. कॉलेजच्या समोरुन जाताना मित्रांनी हटकले, त्यांना ” आलोच जाऊन” सांगून कटवले आणि तिच्या घराखाली पोहचलो. समोरुन नेमकी तिची आई येताना दिसली. तिची नजर चुकवून उभा राहीलो आणि पुढच्याच मिनिटाला… ती येताना दिसली.


तिचे येणे आणि पाऊस.. एकच गाठ. तेव्हा लक्षात आले की आपण छत्री आणलीच नाही. मंद मंद हसणारा तिचा चेहरा दिसला आणि त्यावरचे ते हास्य… नजरेनेच खुणावले ” ये की छत्रीत “. छान गुलाबी छत्री, निघालो चालत चालत अर्धे अर्धे भिजत. पुढची काही मिनीटे दोघांपैकी कोणीच बोलले नाही.. फक्त पाऊसच बोलत होता.. आणि दोघांची मने चिंब भिजवत होता. ती थोडी सावधच होती. स्पर्श होऊ नये याची काळजी घेत होती. परंतू पाऊस लबाड.. इतका जोराने पडत होता की छत्रीत आत येणे भागच होते तिला आणि मलाही त्यामूळे स्पर्श होणार आणि नंतर तो हवाहवासाही वाटू लागला. तिला माहीत होतं मला मोगऱ्याचा सुगंध खुप आवडतो म्हणून तिने मोगऱ्याचा गजरा माळला होताच शिवाय मोगऱ्याचे अत्तरही लावले होते. पाय चालत असले तर मन मात्र स्थिर होते. मुंबई सारख्या ठिकाणी दुतर्फा झाडे असलेला आणि पुर्णपणे निर्मनुष्य असलेला रस्ता मी पहिल्यांदाच पाहत होतो. मी त्या रस्त्याने अनेकदा गेलो होतो, पण त्याची सुंदरता कधीच दिसली नव्हती. वरुन वाहत येणारे पाणी पायांना गुदगुल्या करत होते. इकडे स्पर्शाने मनाला गुदगुल्या होत होत्या.


”कुठे जाऊ या? ” मी शेवटी विचारलं.. ” तू नेशील तिथे ” तिच्या डोळ्यात एक मिश्किल छटा होती. “मला नाही माहीत या भागात फारसं काही ” मी अगतीक. ” चल मग मी नेते, चालशील ना भरपूर? ” तीने गालात हसत प्रश्न केला. ” हो ” मी पुन्हा अगतीकच.

मनात ” रिमझिम धून ” वाजत होते आणि अचानक ते ओठांवर आले. ती पटकन म्हणाली.. ” ए.. गा ना, मी हे गाणं परवा मैत्रिणीकडे ऐकलं. खुप मस्त आहे रे ” मी गाऊ लागलो..

रिमझिम धून, आभाळ भरुन हरवले मन, येणार हे कोण ? मन फुलांचा थवा.. गंध हा नवा नवा वाहतो वारा नवा जुन्यात हरवून….

एकच कडवं येत होतं ” छान गातोस रे. ” माझ्या गाण्याची तारीफ करणारी ती पहिली आणि तीच शेवटची.

गाणं जरी रिमझिम असलं तरी पाऊस मात्र भरपूर होता. अचानक तिने छत्री बाजूला केली.

” ए.. तुला भिजायला आवडतं? ”

मी ” नाही ” म्हणालो मात्र…

” मला आवडतं मग तुलाही आवडेल आत्ता पासून ” छत्री बंद झाली. पण त्यामूळे स्पर्श दुरावला. पण क्षणभरच.. पुढच्या क्षणी तिने माझा हात हातात घेतला आणि बोलली.. ” तुला एक गोष्ट सांगायची होती… ”

मी ” सांग की ”

” मला तू आवडतोस, भरपूर ”

” मलाही तू आवडतेस, म्हणूनच तर आपण असे एकत्र भिजत चाललोय, नाही का? ”

” हो मला अजून एक गोष्ट सांगायची आहे ”

” नंतर सांग.. तो बघ चहावाला मस्त कटिंग घेऊ ” बहुतेक तिने आणलेले अवसान चहा मुळे गळून पडले. वाफाळणारा चहा आणि त्यात पडणारे ते थेंब. मी हात सोडवत म्हणालो ” चहा थंड होईल पाणी पडले तर चल तिथे शेड खाली जाऊ. ” मुकाट्याने चालत माझ्या मागून आली. पावसाने दोघांनाही पुर्ण भिजवले होते. ओलेतेपणात सौंदर्य काय असते ते आम्ही दोघेही अनुभवत होतो तिच्या केसांतुन ओघळणारे पाणी कानाच्या पाळीवरुन खांद्यावर पडत होते. आणि तिला अधिकच पारदर्शी करत होते. ती सुद्धा माझ्या त्या रुपाकडे तसंच पाहत असावी. चहाचा कप तोंडाला लागताक्षणी तंद्री तुटली. चहा पटकन संपवून पुढे निघालो. पाऊस जरा कमी झाला होता जणू त्याने दोघांच्या मनावर आवर घालायचा प्रयत्न केल्याप्रमाणे.


” मी हात पकडू पुन्हा? ” पुन्हा तिचा खट्याळ प्रश्न. मी काही न बोलता हात पुढे केला. बोटांमध्ये बोटे गुंतवून तिने तो घट्ट धरला. समोर समुद्र होता. उफानामुळे लाटा जोरजोरात आणि मोठाल्या येत होत्या. समोर पाऊस दिसत होता परंतू आम्ही मात्र कोरडे होतो. तिथेच एक बेंच होता. हात न सोडता ती मला तिथे खेचत घेऊन गेली.

” तुलाही मला काहीतरी सांगायचंय ना? मला कळतंय रे तुझ्या मनातले ” क्षण शांत राहून ती म्हणाली ” काय आणलंस माझ्यासाठी? ” मी बॅग मधून कॅसेट काढली सोबत एक मोठ्ठं चॉकलेट सुद्धा होतं.

” ए.. सांग तुला काय पाहीजे? ” मी हात आणखी घट्ट केला आणि म्हणालो…..

” तुझ्या लग्नाला मला बोलावशील? ” तिच्या डोळ्या बदलणारे भाव आजही आठवतात. …

” हो, मला समजलंय की तुझे लग्न नक्की झालंय. या या मुलाशी. तोंडओळख आहे त्याच्याशी. मला तुझ्याबद्दल काही तक्रार नाही. कदाचित आपला मध्यंतरी संपर्क नव्हता त्यामूळे आपण दुर राहीलो. आणि आता पुन्हा भेटल्यावर ती भावना उचंबळून आली. ”


पाऊस पुन्हा रिमझिम सुरु झाला होता.. तिच्या डोळ्यातून. ” मी तुला फसवत नव्हते रे… मला खरोखरच तू आवडतोस, पण आता मी पुन्हा मागे नाही फिरु शकत. हीच गोष्ट सांगायला मी तुला घेऊन आले इकडे. हे बघ पत्र यात सर्व लिहिलंय मी. ” मी ही तिला माझ्याकडचं पत्र दिले. तिचा चेहरा मलूल झाला होता, माझ्यासारखाच … ढग दाटून येत होते. …

पाऊस सुरु होण्याआधी आम्ही निघालो ती तिच्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने….

कदाचित पुन्हा कधीही पावसात न भिजण्यासाठी…

मनात गाणे सुरु झालेले…

बघ माझी आठवण येते का…


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance