पर्स मध्ये जणू संसार सारा
पर्स मध्ये जणू संसार सारा
रमा आज ऑफिसला घाईघाईने निघाली,
घरातलं आवरता आवरता तिला आज खूप उशीर झाला होता. डबा आणि पाण्याची बॉटल पर्स मध्ये टाकली आणि तशीच ती बाहेर पडली.
रेल्वे स्टेशन वेळेवर पोहोचण्यासाठी तिने तिची पावलं भराभर टाकली, रपरप रस्ता कापत ती चालत होती.काही मिनिटाने रेल्वे स्टेशन वर पोहोचली, लोकल यायला काही मिनिटे बाकी होती, आज ट्रेन साठी खूप गर्दी दिसत होती.
थोड्या वेळात रमाची मैत्रीण दीप्ती आली, दोघीच्याही गप्पा सुरु झाल्या. रोजची वेळ निघून गेली होती पण ट्रेन अजून आलेली नव्हती. दोघीही बसण्याचा विचार करत होत्या,पण बसलो तर ट्रेन मध्ये जागा मिळणार नाही असा विचार करत दोघी ताटकळत उभ्या होत्या.
थोडया वेळाने ट्रेन आली पण आज रोजच्यापेक्षा भयंकर गर्दी होती. रमा आणि दीप्ती चढण्यासाठी समोर समोर सरकत होत्या. दीप्ती चढली पण चढता चढता रमा पडली .तशी दीप्ती खाली उतरली आणि रमाला हॉस्पिटलला घेऊन गेली.पायाची दुखापत गंभीर होती, दिप्तीने तिच्या घरी कळवलं. सगळे आले. डॉक्टराने सांगितले फ्रॅक्चर आहे,ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनची तयारी झाली.
ऑपरेशन नंतर रमाला आठ दिवस तरी हॉस्पिटलला ठेवणार होते, डॉक्टरने तस सांगितलं होतं.
ऑपरेशन नंतर घरचे एक एक जण आळीपाळीने राहायचे. मंथ एंडिंग सुरू होत. मंथ एंडिंगला रमा संपुर्ण काम करायची, इलेक्ट्रिक बिल, पाणी बिल, वाण सामान, घरातील इतर छोटी मोठी काम सगळं रमा एकटीने करायची. सगळ्यांच्या कामांचा हिशोब करून ठेवायची आणि त्याप्रमाणे पैसे जमवायची.
लग्न करून आल्यापासून रमाच सगळं बघायची त्यामुळे इतरांना कधीच काही करण्याची गरज पडली नाही. पण आता रमा हॉस्पिटलला असल्यामुळे हे सगळं काम रम
ाचा नवरा निखिल त्याला करावं लागणार होतं. घरी त्याने इलेक्ट्रिक बिल शोधलं, सगळीकडे बघून झालं, अख्ख घर पालथं घातलं पण बिल काही सापडेना. त्यानंतर पाणी बिल शोधलं तेही सापडेना. निखिल हॉस्पिटलला गेला, रमा आराम करत होती, निखिल तिच्या बाजूला जाऊन बसला.
"रमा आता बर वाटतय का?"
रमाने होकारार्थी मान हलवली.
निखिलने तिला इलेक्ट्रिक बिल, पाणी बिल, वाण सामानाची लिस्ट, दुधाचे पैसे सगळं सगळं विचारलं. रमा खुदकन गालात हसली, आणि तिने पर्स कडे बोट दाखवला. निखिलने आश्चर्याने पर्स कडे बघितलं.
"पर्स मध्ये असं काय असेल? ही वेडी झाली." असा विचार करून मनातल्या मनात हसायला लागला. रमाने पर्स उघडायला सांगितली. निखिलने हसतच पर्स उघडली. आतमधील सामान बघून त्याला आश्चर्य वाटलं.
काय काय भरून ठेवलं होतं त्यात? निखिलने अगदी डोक्यावर हात ठेवून बापरे केलं.
इलेक्ट्रिक बिल, पाणी बिल,दुधाचा हिशोब, पेपरचे पैसे सगळ्यांचा हिशोब करून पैशाचे पॅकेट रेडी करून ठेवलेले, त्याव्यतिरिक्त सासूच्या औषधांची लिस्ट, सासऱ्यांचा तुटलेला चष्मा जो ती सुधरवून आणणार होती. मुलीच्या शाळेची फीसची स्लिप, एल आय सी पॉलिसी आणखी बरच काही होत.
"रमा अग हे काय आहे?" निखिलने आश्चर्याने विचारलं.
रमा फक्त हसली.
"बापरे मला हे सगळं माहीतच नव्हतं, रमा किती काही काही करतेस तू,आम्हाला कळत देखील नाही. तुझ्या पर्स मध्ये जणू तुझा अर्धा संसार आहे. आय एम प्राउड ऑफ यु रमा. आय एम लकी की तू माझी जीवनसंगिनी आहेस.
निखिलने रमाला जवळ घेतलं आणि मिठी मारली.
समाप्त:
कथा कशी वाटली नक्की कळवा.
धन्यवाद