दोष कुणाचा?...
दोष कुणाचा?...
दोष कुणाचा तिचा? त्याचा? की परिस्थितीचा?.
प्रसन्न पहाट उगवली होती, सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता, कोकिळेने पण सुरांचे नाद घुमवले होते.
त्यात भर म्हणून देव्हाऱ्यातील घंटीचा नाद सर्वत्र घुमू लागला.
मुक्ताने तुळशीला पाणी घालून दिवसाची सुरुवात केली.
आज मुक्ताला रेग्युलर चेकअप साठी आणि टेस्टच्या रिपोर्ट साठी डॉक्टरांकडे जायचं होतं.
ती भराभर तयार झाली. सुमितला सांगून डॉक्टरांकडे गेली. दवाखान्यात पोहोचल्यानंतर,
दवाखान्यात आज खूप गर्दी होती.
चेकअप,कॉनसेलिंग साठी सकाळपासून गर्दी दिसत होती. मुक्ताने नाव नोंदणी केली आणि बाकावर जाऊन बसली. जवळ जवळ दोन तासानंतर मुक्ताचा नंबर आला.
“मॅडम आता येऊ का?
“ये मुक्ता."
मुक्ता आत गेली.
“बस..काय म्हणते तब्बेत. काळजी घेतेस ना?”
मुक्ताने स्मितहास्य करत होकारार्थी मान हलवली.
"मुक्ता तुझे रिपोर्ट्स आलेत. मुक्ता हे काय चाललंय?
आपली इतक्यांदा भेट झाली, समुपदेशन झालं. तू यातलं काहीच मला का सांगितलं नाहीस? आणि हे कधी घडलं, कुणामुळे झालंय?"
"मुक्ता तुझे एच.आय.व्ही.रिपोर्ट पॉझिटीव्ह निघालेत. कसे?"
मुक्ताने रिपोर्ट्स बघितले आणि हसायला लागली. डॉक्टर आश्चर्याने बघत राहिल्या.
'ही अशी काय वागतेय. स्त्रिया अश्या रिपोर्ट्स बघून रडतात, आतून तुटतात, बेशुद्ध होतात, स्वतःच भान हरपतात...पण ही हसते.'
डॉक्टर मनातल्या मनात विचार करू लागल्या.मुक्ता काय झालं?..
“काही नाही मॅडम."
“मुक्ता मी मागल्या वेळी तुला एच.आय.व्ही संसर्ग रोगाबद्दल माहिती दिली होती, तुला त्यातल काही कळलं होतं का?..”
“हो मॅडम..”
“हा रोग कशा-कशामुळे होतो हे ही सांगितलं होतं?"
“हो मॅडम...”
“हा रोग आई पासून बाळाला होऊ शकतो हे ही सांगितलं होतं आठवत ना?”
“हो मॅडम”
“मग काय झालं?”
मुक्ता फक्त हसली. मुक्ता तुझं वय फक्त 20 वर्ष आहे, तुझं संपूर्ण आयुष्य आहे असच जगणार आहेस का.
मुक्ता मी तुला आता जे विचारणार आहे ना त्याची नीट उत्तर दे..
“तुझं लग्नाआधी कुणावर प्रेम होतं का?"
मुक्ताने नकारार्थी मान हलवली.
“तुझे कुणाशी शारीरिक संबंध होते का?”
मुक्ताने परत नकारार्थी मान हलवली...“कुणी तुझ्यावर बळजबरी केली होती का?
“नाही”
"ठीक आहे...मुक्ता तू तुझ्या नवऱ्याला माझ्याकडे पाठव...मला त्याला भेटायचं आहे."
मुक्ता घरी गेली, तिने सुमितला मॅडमचा निरोप दिला.
चार-पाच दिवसात सुमित डॉक्टरांकडे गेला.
“बसा.. तुम्हाला मुक्ताने सर्व सांगितलं असेल.
“नाही..नाही तिने काहीच सांगितलं नाही.
“तुमची पत्नी मुक्ता एच.आय.व्ही.पॉझिटिव्ह आहे, माहिती आहे तुम्हाला?"
“नाही..डॉक्टर." लांब श्वास घेत तो बोलला.
“ओके... मग मला आता सगळं खरं काय आहे ते सांगा...”
“मॅडम मी एच.आय.व्ही.पॉझिटिव्ह आहे.. आणि हे मुक्ताला आणि तिच्या घरच्यांना माहीत आहे.
आमचं साखरपुडा झाल्यानंतर मी तिच्या घरी सगळं सांगितलं, त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता त्यांनी निमूटपणे लावून दिल लग्न.
डॉक्टर संताप व्यक्त करत.
“तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंत, एका निष्पाप मुलीचं आयुष्य उध्वस्त केलंय, आणि आता त्यात तो निष्पाप जीव.. तो तर या जगात आलाही नाहीय.
आता तुम्ही एकटे का आलात तिला का आणलं नाही...असो.. तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन उद्या पुन्हा या...निघा आता."
सुमित तिथून निघून गेला..डॉक्टरांच्या मनातले मुक्ता विषयीचे विचार जात नव्हते...
'अस काय झालं असेल की सगळं माहीत असूनही मुक्ताने लग्नाला होकार दिला असेल.'
पंधरा दिवसानंतर मुक्ता एकटीच दवाखान्यात गेली.
“मॅडम येऊ का?"
“ये मुक्ता... तुझा नवरा नाही आला सोबत?”
“नाही मॅडम.. तो कामाला गेलाय मी एकटीच आली.”
“ठीक आहे बस... घे पाणी घे.”
“नाही मॅडम.. मी बरी आहे."
“मुक्ता आता मी तुला जे काय विचारणार आहे, त्याची नीट विचार करून उत्तर दे. तुझा नवरा पॉझिटिव आहे हे तुला लग्नाआधी माहित होतं?..”
मुक्ता शांत बसून होती..
“मुक्ता अस शांत बसून नाही चालणार.. काय झालंय सांग मला.. तुला सगळं माहिती असूनसुद्धा तू हे पाऊल का उचलले?..का स्वतःचा जीव धोक्यात घातलास? याच कारण मला कळायला हवं. बोल मुक्ता."
डॉक्टरने मुक्ताच्या खांद्यावर धीराचा हात ठेवला, तिच्या जवळ बसल्या. मुक्ताला धीर वाटला आणि तिने मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
मुक्ता ढसाढसा रडायला लागली, खूप रडल्यानंतर ती थांबली. डॉक्टरनी तिला पाणी दिलं, तिला शांत केलं त्यानंतर मग मुक्ताने बोलायला सुरुवात केली.
"मॅडम आमची परिस्थिती खूप हलाखीची होती. चार बहिणी आणि एक भाऊ, आई-वडील असा सात जणांचा कुटुंब..बाबा हमालीचे काम करायचे आणि आई दुसऱ्
यांच्या घरी जाऊन जाऊन कपडे- भांडे करायची... त्याच्यावरच आमचं घर चालायचं.
कित्येक रात्री आम्ही उपाशीच काढल्या, घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मी शिकू शकले नाही, दहावी झाले त्यानंतर घरच्यांनी माझे शिक्षण बंद केले, शिक्षण अर्धवट राहील.
घरात मी मोठी असल्यामुळे पोरगी दहावी झाली आता तिचं लग्न लावून देऊ या विचाराने त्यांनी माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली..
दोन-तीन स्थळ आल्यानंतर सुमितच स्थळ आलं... सुमित कामाला आहे, घरदार चांगल आहे, शेती चांगली आहे, असा विचार करून घरच्यानी माझं लग्न पक्क केलं, साखरपुडा झाला...
त्यानंतर सुमित आणि त्याच्या घरच्यांनी माझ्या घरच्यांना सगळं सांगितलं.
सुमित वाईट धंद्याला लागला होता त्यातूनच त्याला हा रोग झाला, ही गोष्ट त्याने आधी नाही सांगितली साखरपुडा झाल्याच्या नंतर सांगितली मला यातलं काहीच माहिती नव्हतं.
त्या रात्री घरच्यांच बोलणं माझ्या कानावर पडल... आई बाबा बोलत होते..
“अहो काय करायच आता, त्यांनी आधी आपल्याला काहीच कल्पना दिली नाही.. आणि आता हे सगळं काय होऊन बसलं, साखरपुडा मोडला तरी बोलण आपल्यालाच ऐकावं लागेल आणि नाही मोडला तरी भोग आपल्यालाच भोगावे लागतील."
“साखरपुडा मोडायचा नाही, साखरपुडा मोडला तर पुन्हा पोरीशी लग्न कोण करेल?.. समाजात बदनामी होईल ती वेगळीच…. साखरपुडा मोडलेल्या पोरीशी कोण लग्न करणार?
आपली परिस्थिती अशी हलाखीची, तिच्या पाठच्या तीन बहिणी आहेत, तीच ऐकल्यावर त्यांची लग्न नाही जमणार.
“अहो पण आता आपल्याला सगळं कळलय ना..”
“कळलंय तर कळलंय, काही फरक पडत नाही आपण करूया आपल्या पोरीचं लग्न, तिचं लग्न झालं की तिच्या पाठच्या तीन बहिणीचं लग्न होईल."
त्यांच्या तोंडातला एक एक शब्द माझ्या हृदयाला चिरा पाडून जात होता.. पायाखालची जमीन सरकली.. डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या पण त्यावेळी काहीच करता आलं नाही...
मी तिथे तशीच उभी होती...निशब्द:
त्यांनी पण साखरपुडाच्या आधी काही नाही सांगितलं, आधी सांगितलं असत तर जमलेलं लग्न मोडता आलं असत..पण साखरपुडा झाल्याच्या नंतर सांगितलं कारण त्यांनाही माहीत होतं साखरपुडा झाला की हे लोकं काहीही करू शकणार नाही, त्याचाच फायदा त्यांनी उचलला...फसवलं आम्हाला.. आम्ही गरीब... आमची परिस्थिती गरीब.. याचाच फायदा त्यांनी घेतला..
पण मी गप्प राहिले आणि लग्नाला उभी राहिले, खरं तर लग्नाला फक्त माझ शरीर उभं होत कारण आत्मा तर आधीच मेला होता..
सुमितने फक्त माझ्या शरीराशी लग्न केलं, लग्नानंतरही त्याच्या वेश्या व्यवसाय सुरूच होता. जसा बाहेर इतरांच्या शरीरासोबत खेळायचा तसाच माझ्याही सोबत..
मुक्ताचे डोळे पुन्हा पाणावले.. मन भरून आलं...थोडं पाणी प्यायली आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली.
मला वाटलं लग्नानंतर सुधारेल, माझ्या वर प्रेम करेल पण अस काहीच घडलं नाही, दिवसा त्याला माझी गरज भासायचीच नाही, गरज होती ती फक्त रात्रीची...
मला खूपदा वाटलं ,सोडून जावं...कुठेतरी पळून जावं..पण माझा नाईलाज होता.. आणि सुमितनी जरी मला सोडलं असतं तरी तेच सगळं घडलं नसत कशावरून.
आता मला असच आयुष्य जगायचं आहे हे मी स्वीकारल.
मुक्ताचं सगळं बोलणं ऐकून डॉक्टरच्या डोळ्यात पाणी आलं.. शेवटी डॉक्टरही एक माणूसच आहे, तीच मन भरून आलं.. तिनी मुक्ताला शांत केलं आणि धीर दिला.
“तुझ्यासोबत जे काय घडलय ते जाऊ दे पण आता या बाळासोबत आपल्याला हे सगळं होऊ द्यायचं नाहीये ...तू तुझ्या बाळाला यातून वाचवू शकतेस पण त्यासाठी तुला सुमितला दूर कराव लागेल...
आता तू सुमितसोबत नाही राहायचं.. मी आहे तुझ्यासोबत मी सगळं करेल तुझं.
हे बाळ सुदृढ जन्माला यायला हवं, तुला या बाळासाठी सुमितला दूर करावं लागेल, तुला कळतंय का मी काय बोलतीय...”
“ पण मॅडम मी एकटीच कशी?...”
मुक्ता बोलता बोलता थांबली.
“तू एकटी नाहीयेस , मी तुझ्यासोबत आहे... राहिला प्रश्न सुमितचा तर ते मी सगळं करेल.. सुमितला त्याच्या केलेल्या चुकीबद्दल शिक्षा नक्की होईल.. त्यानी तुला फसवलं आणि त्याची शिक्षा त्याला कोर्टातून मिळेल...
मुक्ता तोंडावर हात ठेवत,
“कोर्टकचेरी... नाही.. नाही.. मॅडम आमच्याकडे तेवढा पैसा नाही...
"मुक्ता तुला आता मी सांगितले ना तुला काळजी करायची गरज नाहीये तुझा आणि तुझ्या बाळाचा काय करायचे ते मी बघेल.. तू फक्त आता आनंदी राहायचं स्वतःसाठी नाही तर त्या चिमुकल्या जीवासाठी.. तू जे भोगलस ना ते त्या निष्पाप जीवानी नाही भोगायचय, ते बाळ जन्माला येईल आणि सुदृढ येईल...
"आता समोरचे सहा महिने मी तुझी काळजी घेईल, तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे."
असा म्हणत डॉक्टरने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि तिची आणि तिच्या बाळाची संपूर्ण जबाबदारी घेतली.
समाप्त:
अशा कितीतरी मुक्ता या जगात असतील ज्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात असतील....चूक कोणाचीही असो भोगाव मात्र स्त्रीलाचं लागतं...इथे चूक मुक्ताची नव्हती तरी तीच आयुष्य पणाला लागलं...मग चूक कोणाची?..
तिची..त्याची...की परिस्थितीची?