Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others

3  

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others

तुझे आई बाबा आता माझेही...

तुझे आई बाबा आता माझेही...

5 mins
293


"मीरा अग दोन दिवस झाले तू बोलली नाहीस माई अप्पाशी ? माई विचारत होती...फोन करशील आज ..." अनयने ऑफिसला जाता जाता मीराला सुनावले.

" बघते...त्यांना बोलायचं का माझ्याशी ? तसं म्हणाले का ते ? काही काम आहे का ...? " मीरा ने मुद्दाम विचारले..

" नाही ग म्हणत होते मीरा बोलली नाही दोन दिवस म्हणून म्हणालो मी..." अनय ऑफिसला निघून गेला.

" आठ दिवस झाले बाबांशी बोल म्हणून म्हणतेय तर काय काम आहे का ? काय बोलू वगैरे म्हणतो...आणि ह्याच्या आई बाबांशी मी रोज बोलायचं...त्यांनी कधी मला स्वःताहुन केलाय का फोन की कधी चौकशी करतात मी कशी आहे याची ? फक्त मीच कर्तव्य पार पाडायची का ? त्यांची काहीच कर्तव्ये नाहीत...? " मीराची स्वतःशीच चीड चीड होत होती.


मीरा अनयचे लग्न होऊन दहा वर्षे झाली होती.आधी त्याचे माई अप्पा त्यांच्यासोबत राहायचे. अनयला लंडनला प्रोजेक्ट मिळाला होता आणि मीरा, अनय आणि त्यांची आठ वर्षांची परी तिकडे शिफ्ट झाले होते.मीरा सासू सासऱ्याना अगदी आई वडीलांसारख प्रेम आणि आदर करायची. अनयपेक्षा मीराच त्यांचं सगळं करायची त्यामुळे अनयला कधीच माई अप्पाची कुठलीच काळजी नव्हती.लंडनला आल्यापासून तर रोज न चुकता व्हिडिओ कॉल करून दोघेही अगदी न चुकता त्यांची विचारपूस करायचे.


पण अनय मीराच्या आई बाबांशी साधं फोनवरही बोलायला टाळायचा.मीराने लग्नानंतर नेहेमीच स्वतःच्या आई बाबांपेक्षा अनयच्या आई बाबांना प्राधान्य दिलं होतं.तसे संस्कारच होते तिच्यावर...माई खेड्यात राहिलेल्या होत्या आणि मीरा शहरात वाढलेली सुशिक्षित मुलगी त्यामुळे साहजिकच दोघींची मते वेगळी असायची पण मिराने माईंच मन न दुखवता नेहेमीच आपल्या मनाला मुरड घातली होती.माई जुन्या विचारांच्या होत्या , ' सुनेला नेहेमी आपल्या ताब्यात ठेवावे , तिचे कौतुक कधी करू नये नाहीतर ती डोक्यावर मिरे वाटते ' असे त्यांचे मत त्यामुळे त्यांनी कधीच मीराला मुलीप्रमाणे वागवले नाही.कुठल्याही कामात कधीच हातभार लावला नाही की नोकरीही करू दिली नाही...


तरीही मीराने नेहेमीच आपले कर्तव्य आनंदाने केले होते आणि अजूनही करतच होती.तिला नेहेमीच वाटायचे की अनयने सुद्धा आपल्या आई बाबांशी असेच छान वागावे , आपुलकीने त्यांची चौकशी करावी पण तो कधीच तसं करत नव्हता.कधीकधी मिराने जबरदस्तीने बोलायला लावलं तर तेवढ्यापुरत बोलायचा फक्त पण कधीच स्वतःहून त्यांची काळजी अनयने केली नव्हती...

मीरा किचन मध्ये काहीतरी काम करत होती...तिचा फोन वाजला..." मीरा अगं तुझ्या बाबांचा फोन आहे..." अनयच्या या बोलण्यावर तिने एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि तिने फोन घेतला...

" हे काय चालवलं आहेस तू मीरा ? आठ दिवस झाले तरी तू बोलली नाहीस माई अप्पाशी ? दोन मिनिट वेळ नाही का तुला ? बोलून घे बरं वाटेल त्यांना..." अनय जरा चीडूनच बोलला मिराशी...

" मी तुझ्या माई अप्पाशी बोलावं असं वाटतं ना तुला मग तू सुद्धा माझ्या आई बाबांशी बोलावं असं मला वाटतं...आपण एक काम करूया...तू ज्या दिवशी आई बाबांशी बोलशील तेव्हा आणि तितकच मी तुझ्या माई अप्पाशी बोलेन ...." आज मिराचाही स्वर चढला होता...

" काय बोलतेस हे मीरा ? अगं सून म्हणून तुझं कर्तव्यच आहे ना ते सासू सासऱ्यांना सांभाळणं ....आणि तुझे माई अप्पा कधीपासून म्हणायला लागलीस तू ? आधितर सारखी त्यांचं करण्यात मग्न असायचीच .मला कधी सांगावं लागलं नाही तुला इतकी तू त्यांची काळजी घ्यायची ना.माझ्यापेक्षा जास्त तू त्यांचावर लक्ष ठेवायचीस , कधी उलटून बोलली नाहीस...मला मान्य आहे माई जुन्या विचारांची आहे तुला बराच त्रास होतो तिच्यामुळे पण तू किती छान हॅण्डल करतेस सगळं .कधीच कोणाला तक्रारीची संधी नाही दिलीस .आणि आता हे काय नवीन ? अशी का वागते आहेस तू ? " अचानक मिराच्या वागण्यातला हा बदल बघून अनयचा पारा चढला...

" हो ना तेच चुकलं माझं...आधीपासून मी माझी कर्तव्ये करत राहिले मला कितीही त्रास झाला तरीही...पण माझ्या मनाचा विचार कोणीही कधी केला नाही , अगदी तू सुद्धा नाही...मी माई अप्पाची इतकी काळजी घेते पण तू माझ्या आई बाबांची साधी चौकशी सुद्धा करत नाहीस...नेहेमी त्यांचा उल्लेख ' तुझे आई बाबा ' असा करतोस ..फोन मध्ये बघ नंबर त्यांच्या नावाने सेव्ह केला आहेस पण मी मात्र तुझ्या माई अप्पाची नेहेमीच माझ्या आई बाबांपेक्षा जास्त काळजी घेतलीये.


आज मी तुझी माई अप्पा म्हणाले तर तुझ्या मनाला लागलं आणि तू तर इतकी वर्ष झाली तरी आई बाबांचा उल्लेख ' तुझे आई बाबा ' असा करतोस...तुझे कोणीच नाहीत का ते ? फक्त कधीतरी प्रेमाने त्यांची विचारपूस करावी इतकीच आपेक्षा आहे तुझ्याकडून...ती ही चुकीची आहे का ?

फक्त सगळ्या आपेक्षा माझ्याकडुनच का ? सगळी कर्तव्ये पाळण्याचा ठेका मीच घेतलाय का ? तुम्ही सगळे मात्र मला नेहेमीच गृहीत धरता.कधीच माझ्या मनाचा विचार करत नाही.मग मी का करू ? 

माझ्या बाबतीत जे वागताय ते ठीक आहे पण माझ्या आई बाबविषयी जर तुला काही वाटत नसेल तर मलाही तसेच का वाटू नये ? आता या पुढे मला तसं वागायला जमणार नाही. जसं तू आई बाबांशी वागशील तसच मी सुद्धा तुझ्या माई अप्पाशी वागणार...कोणाला काय वाटायचं ते वाटू दे...मी कितीही केलं सगळ्यांच तरी कोणाला किंमत नाही मग मी का त्रास करून घेऊ ? 


बाबांचं ऑपरेशन होतं पण अप्पाची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी गेले नाही.हेच जर मी माई अप्पाच्या बाबतीत वागले असते तर ? त्यांना थोडं काही झालं तरी मी कासावीस होते पण तू तुला तर वर्षातून एकदाही आई बाबांना भेटायला जाता येत नाही. आता आपण परत गेल्यावरही मी माई अप्पासोबत तितकेच दिवस राहीन जितके दिवस तू आई बाबाबरोबर राहशील. लग्नानंतर तर म्हणायचात तुम्ही की ' दोन्ही कुटुंबे एक झाली पण ते तर कधीच जाणवलं नाही मला...


पण ठीक आहे आता मी माझी चूक सुधारणार आहे..." मिराच मन खूपच दुखावलं गेलं होतं.दहा वर्षांपासून हृदयात बंदिस्त केलेल्या जखमा भळाभळा वाहू लागल्या होत्या... अनयचे डोळे खाडकन उघडले ! मीरा बोलली ते खरंच बरोबर होतं.त्याला खूप अपराधी वाटतं होतं.खरंच इतकी मोठी चूक कशी झाली आपल्याकडून ते ही इतकी वर्ष ? त्याला खूप पश्चाताप झाला होता.


अनयने मिरापुढे हात जोडले " खरंच मीरा तुझी माफी कुठल्या तोंडाने मागू ग मी ? पण माझं चुकलं ...यापुढे असं कधीच नाही होणार...आता आई बाबा माझेही आई बाबा असतील.आणि माई अप्पा इतकीच काळजी मी सुद्धा त्यांची घेईन.मला एक संधी देशील ना ग..." कळकळीने केलेली अनयची मागणी मिराने स्वीकारली आणि त्याला एक साधी देण्याचं ठरवलं... अनयने त्यापुढे कधीच मीराला तक्रारीची संधी दिली नाही.तिच्या आई बाबांशी अनय अगदी मुलाप्रमाणे वागू लागला.


आज मिराचा वाढदिवस होता ! अनय सकाळपासूनच न सांगता कुठेतरी निघून गेला होता..मीरा काळजीत होती तितक्यात डोरबेल वाजली...आणि सरप्राइज असं म्हणत माई - अप्पा आणि मिराचे आई - बाबा समोर आले... मीराचा वाढदिवस आनंदाने भरून गेला ! गोड हसत अनयने मीराचा हात हातात घेतला..." कसं वाटलं सरप्राइज ? आता नेहमी असच खुश ठेवणार मी राणी सरकारांना..." 

मीराच्या डोळ्यात आनंदाश्रू आले ! दोन्ही आई बाबा अगदी आनंदाने परीसोबत गप्पा गोष्टी करत होते...!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational