Vrushali Thakur

Horror

5.0  

Vrushali Thakur

Horror

तृष्णा

तृष्णा

22 mins
1.3K


अंगाला बोचणाऱ्या थंडीसरशी तिने भोवतालची तलम चादर लपेटून घेतली. नवव्या मजल्यावरच्या त्या आलिशान मॉडर्न बेडरूममधल्या मऊशार बेडवर झोपलेल्या तिला मऊ दुलाईतून बाहेर यायची इच्छा होत नव्हती. तिचे मऊशार, स्वतःभोवती गिरकी घेणारे सोनेरी केस पलंगावर विखुरले होते. उघड्या गोऱ्यापान नितळ पाठीवर खिडकीतून पडद्याना न जुमानता काही कवडसे अलगद स्पर्श करत होते. तरारलेल्या मांसल वळणदार पोटऱ्या मधूनच चादरितून बाहेर डोकावत होत्या. एखादा चुकार खट्याळ कवडसा त्यांनाही अलगद चुंबत होता. अचानक पाठीवर उमटलेल्या गोड शहाऱ्याने ती नाजूक थरथरली. हाताच्या घडीमध्ये लपवलेल्या तिच्या नाजुक चेहऱ्यावर गुलाबी हसू पसरलं. 


"उम्म... निकत...." ती दुलई लपेटून घेत मागे वळली. फिक्कट निळ्या रंगाच्या दुलाईमधे अर्धवट लिपटलेला तिचा अनावृत्त गोरापान देह, त्यावर सळसळणारे मोकळे केस, कसलेला बांधा, त्यावरची घाटदार वळण, त्याच्या वळणांवर पडलेल्या वळ्या त्याला आव्हान द्यायला पुरेशा होत्या. तिने मागे वळून पाहिलं मात्र काल थोडेसे पुसटले गेलेले टपोरे स्मोकी आयज मात्र मोठे झाले. आयशॅडो थोडे पापण्यांपासून बाजूला पसरले होते. नुकत्याच झोपेतून उठलेल्या तिच्या गोड चेहऱ्यावर ते अगदी नाजुकशी काजळाची तिट लावावी तस वाटतं होत जणू सकाळच्या किरणांची तिच्या सौंदर्याला नजरच लागेल. रात्रीची धुंदी तिच्या निळ्या डोळ्यावरून अजूनही उतरली नव्हती. धुंदी की जागरणाने का कोण जाणे निळसर डोळ्यांत तांबूस झाक पसरली होती. अचानक ती खुदकन हसली..... गोऱ्या गालांवर लाली उमटली. आपल्या ओंजळीत चेहरा लपवून ती कितीतरी वेळ हसतच होती. " किती वेडी आहे मी..... निकत तर कधीच निघून गेला.... माझ्या अंगावर मात्र त्याचाच शहारा आहे अजुन.... मूर्ख.... वेडी... प्रेमात असलेली विरहिणी..." 


स्वतःवरच खळाळून हसत ती तशीच अनावृत्त आरश्यासमोर स्वतःला न्याहाळू लागली. देवाने अगदी सौंदर्याची मुक्त हस्ताने उधळण केली होती तिच्यावर. गोऱ्यापान नितळ रंगावर केवळ तिळाचेच काय ते गालबोट. बाकी तीच संपूर्ण अंग म्हणजे कोरीवकाम. प्रत्येक अवयव आणि त्याची गोलाई अगदी प्रमाणबध्द. स्वतःच प्रतिबिंब न्याहाळतच तिने हळुवार आपला हात सर्वांगावर फिरवला. आत दाटणाऱ्या शिरशिरिने तिचे डोळे आपसूक बंद झाले. तिला मानेवर गरम उसासे जाणवले. "उम्म्... " तिच्या मुखातून अस्पष्ट हुंकार निघाला. तिच्या कंबरेवर रेंगाळणारे त्याचे हात जाणवले. " आज गेलाच नाही वाटतं...." ती मनातच उद्गारली. तिला तो स्पर्श हवासा होता. डोळे मिटूनच का होईना ती जाणीव हवीशी होती. तिने डोळे गच्च मिटले. त्याचे हात एव्हाना तिच्या सर्वांगावर फिरत होते. तिच्या पाठीवर त्याच्या शरीराची गरमी चढत होती. तिच्या शरीरावरच्या बाकदार वळणाना तो आपल्या मऊसूत ओठांनी स्पर्शत होता. त्याच्या प्रत्येक चुंबनासरशी तिच्या अंगावर हजारो गुलाब फुलत. ती भान हरपून जाई. तिच्या मनाचा सर्वांगाचा ताबा आता त्याने घेतला. तिच्या रेशमी तलम कायेवर त्याच्या प्रेमाची प्रतिक उमटत होती. उमटणाऱ्या प्रत्येक खुणेसोबत नकळत तिच्या तोंडून बाहेर पडणारे उसासे त्याला बेहाल करत होते. तिच्या त्या उसास्यांमधे पण एक लयबद्धता होती. परंतु हे प्रणयगीत फक्त तिच्या प्रियकरासाठी होते. त्या गीता मधे ती हरवून गेली होती. तिच्या प्रेमरसात त्याची क्षुधा तृप्त होत होती.


" हे खूप भयंकर आहे...." बाबांनी दोन्ही हात हवेत उंचावत जोरजोरात नकारार्थी मान हलवली. बैठकीच्या खोलीत तिचे आई वडील एका बाबांसोबत बसले होते. मागच्या काही दिवसांपासून तिचं बदललेल वागणं बोलणं त्यांना काळजीत टाकत होत. दर अमावास्येनंतर तिच्या चेहऱ्यावर उमलणार प्रणयतेज त्यांना अजुनच काळजीत टाकत होत. तिच्या शरीरातील बदल देखील आईच्या नजरेतून सुटले नव्हते. आईच्या मायेने आणि काळजीने तिच्या मित्रमैत्रिणीकडून चौकशी केल्यानंतर आणि काही दिवस तिच्यावर पाळत ठेवल्यानंतर त्यांना बरेच धक्कादायक खुलासे झाले. मागच्या काही महिन्यांपासून तीच वागणं संपूर्ण बदललं होत. अमावस्येच्या दोन दिवस आधीपासून ती अशी बेचैन होत असे जसे चातक पावसाची वाट पाहतोय. तिला आपल्या रूमच्या बाहेर देखील यायला फुरसत नसे. जेवणही नको असायचं तिला. कितीही आवाज दिला तरी रूमचा दरवाजा काही उघडायची नाही. तिला रागावून दरडावून आणि प्रसंगी मारूनही झालं पण तीच वागणं काही बदललं नाही. अमावस्येचा प्रभाव असलेले ते तीन चार दिवसच ती विचित्र वागे बाकीच्या दिवशी तिला अगदी त्या तीन चार दिवसांची जाणीवच नसे. नाही नाही त्या शंका कुशंकानी तिच्या आई वडिलांचा मेंदू पोखरून निघाला होता. एखाद्या मुलासोबतचे प्रेमसंबंध एकवेळ सहन केले असते त्यांनी.... पण हे साधंसुधं प्रकरण वाटतं नव्हतं. शेवटी कोणाच्यातरी ओळखीतून बाबांबद्दल माहिती मिळाली आणि बाबा आज त्यांच्या घरात ह्या सगळ्या प्रकारचा छडा लावायचा ध्यान मांडून बसलेले. बाबा आपल्या ध्यानाने त्या बंद दरवाजामागील मांडलेला खेळ पाहू शकत होते. म्हणूनच तिला एका अदृश्य शक्तीसोबत प्रणयाराधनेत मग्न बघून बाबा हैराण झाले. आपल्या ध्यानसाधनेच्या साहाय्याने त्यांनी त्या अदृश्य शक्तीला दृश्य स्वरूपात पहायचा प्रयत्न केला खरा मात्र एका वेगळ्याच लालबुंद तेजाने त्यांच्या दिशेने वेगाने कुच केली. त्यांनी आपल्या मंत्र शक्तीने स्वतःभोवती कवच निर्माण केले. ते लालबुंद तेज अशा वेगाने त्या कवचावर आदळले की त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. त्या प्रकाश झोताची तीव्रता डोळ्यांना सहन न होऊन ते जोराने ओरडले. त्यांच्या उघड्या तांबड्या झालेल्या डोळ्यांत भीती तरळत होती..... एका अमानवीय शक्तीच मानवाशी प्रणय करणं... भविष्यातील असंभाव्य धोका त्यांच्या नजरेसमोर घिरट्या घालू लागला. 


" काय होईल ओ आपल्या पोरीच" तिच्या आईने मुसमुसत डोळ्यांना पदर लावला. तिच्या वडीलांचीही काही वेगळी अवस्था नव्हती. दोघेही हतबुद्धपणे बसल्या जागीच अक्षरशः उन्मळून पडले होते. 


" काळजी करण्यासारखं तर खूप आहे... परंतु असा धीर सोडून काही साध्य नाही होणार " आपल्या धीरगंभीर स्वरात बाबा बोलले. 


"आम्ही कोणाचं काय वाईट केलं होत....?" नकळत आईच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.


" काही गोष्टी प्राक्तन म्हणून स्वीकारायच्या असतात..... का.. कसं... आपल्यासोबत का... कशाची उत्तरं महत्वाची नसतात... त्यातून सहिसलामत बाहेर पडणं फक्त महत्त्वाचं असत...." बाबा त्यांना धीर तर देत होते पण मनात मात्र त्या शक्तीची ताकद आजमावत होते. त्या शक्तीचा प्रभाव त्यांना आसपास जाणवत होता. त्याची झळ त्यांच्या ध्यानस्थ दृष्टीला बसत होती. पण त्या शक्तीला आजमावल्याशिवाय तिच्या विरुद्ध उभ ठाकन शक्य नव्हतं. बाबांनी आपल्या मंत्रसामर्थ्याने अंतचक्षूनी त्या बंद दारापलिकडील अदृश्य अमानवीय शक्तीच दृश्य रूप पाहण्याकरिता पुन्हा एकदा आपल मन एकाग्र केलं. मंत्रसामर्थ्याचा प्रभाव त्या अमानवीय शक्तीची मायावी भिंत दुभंगून आत प्रवेशता झाला. विविध आकाराच्या आणि रंगांच्या गोलांमधून पार होत दृष्टी त्या अदृश्य आकारावर स्थिर झाली. त्या आकारावरून परिवर्तित होणाऱ्या एनर्जीने त्यांच्या मनपटलावर प्रतिबिंब साकारायला सुरुवात केली. एकेका उमटणाऱ्या बिंदू अनुसार त्यांची काळजी कित्येक पटीने वाढत होती. जरी त्यांच्या चर्येवर सूक्ष्म अशी आठी देखील उमटली नव्हती तरी त्यामागे प्रचंड वादळ घोंगावत होते. बाबांच्या अस्तित्वाची जाणीव त्या शक्तीला देखील जाणवली. त्याची प्रणयक्रीडा संपून विसावा घेताना नेमकं बाबांच्या मंत्रशक्तिने त्याला डीवचल होत. भयंकर संतापाने त्याने त्याची नजर त्यांच्या दिशेने वळवली. त्याच प्रतिबिंब रक्ताळून गेलं. त्या रक्तातून फुटणाऱ्या असंख्य लालसर बिंदुनी बाबांच्या दिशेने वाटचाल केली. दुरून बिंदू वाटणारे ते रक्तबिंदू काटेरी बाण बनून त्यांच्यावर बरसत होते. अचानक झालेल्या अश्या विचित्र हल्ल्याला परतवून लावण्याचा विचार करण्याएवढा अवधीपण त्यांना मिळाला नाही. कसबस आपल्या इतक्या वर्षांची तपश्चर्या पणाला लावत त्यांनी तेवढ्या वेळासाठी स्वतःचे प्राण वाचवले. 


" पुढच्या अमावास्येला भेट होईल आता.... हे घोंगवणार वादळ आता कायमच शांत करावं लागेल....." घाईघाईत बोलत बाबा घराबाहेर निघून गेले. निघताना उंबरठयावरुन जळजळीत नजरेनचा एक कटाक्ष पुन्हा एकदा तिच्या रूम वर टाकला. बाबांच्या त्या अवताराने तिचे आई वडील मात्र अजुनच हताश झाले होते. कुठेतरी त्यांना वाटत होत की हे अस काही नसेल. ती आशाही आता संपून गेली. पुढच्या अमावास्येला चमत्काराची वाट पाहायची आणि आपल्या घरात काहीतरी भयंकर शक्तीचा वास आहे आणि त्याच्या कैदेत असलेल्या मुलीला तसच पहायचं काही म्हणजे काही सुचत नव्हतं. 


इकडे रूम मधे ती मात्र त्याच्या बाहुपाशात खळाळून हसत त्याला कवटाळत होती. आत्ताच झालेल्या घमासान युद्धाचा तिला पत्ताच नव्हता. त्याच्या प्रेमबंधात ती गुंतून गेली होती. थोड्या वेळाने तोपण निघून जाईल म्हणून ती त्याला आपल्या मिठीतच घट्ट पकडून ठेवलं होत..... तो नक्की कधी भेटला ते आठवत नव्हतं पण जेव्हापासून तो भेटला तेव्हापासून पिंजऱ्यात असलेलं हृदय धडधडायला लागलं. आपल्याच शरीराची नव्याने ओळख पटली. त्याच्या मिठीत विरघळून जाण काय असतं ते अनुभवलं. त्याच्या विचारात हरवलेल्या तिच्या मिठीतुन तो कधी निघून गेला तिलाच कळलं नाही. आता त्याच्या पुढच्या भेटीपर्यंत असच तळमळत राहायचं. पण त्याच्याबद्दल फार काही आठवतच नाही आपल्याला... त्याचा चेहरादेखील नाही. फक्त पुसटसा स्पर्श आठवतो... अस कस माझं प्रेम.... की त्यालाच आठवू नये..... पण तो नेहमीच का नाही भेटत मला.... महिन्यातून एखाद्या वेळेसच..... तेवढीच भेट अगदी स्वप्नासारखी असते.... त्या काळात बाकी कोनाबद्दलच नाही आठवत..... जणू महिन्याचे ते तीन चार दिवस आपल्या स्मृतीतून पुसले जावे.... कोण आहे तो... का मी ओढली जाते.... हळूहळू ती भानावर आली. आजही ती पुन्हा अस्ताव्यस्त होती. शरमुन तिने चादर अंगाभोवती घट्ट लपेटून घेतली. रूम मधे पसरलेले तिचे कपडे तिला आठवण करून द्यायचा प्रयत्न करत होते. यांत्रिकपणे ती बाथरूम मधे निघून गेली. शॉवर खाली दुःखर शरीर सांभाळत ती आजपण रडली.... स्वतःच्या असहाय्यतेवर.... बाहेर जाऊन आजपण आई वडिलांना तोंड दाखवायला तिला लाज वाटत होती. आपण असे का वागतोय हेच कोड होत तिच्यासाठी. आजकाल तीच अभ्यासातल लक्ष पण उडालेल. एक अनामिक प्रकारच शारीरिक सुख ती उपभोगत होती ज्यामध्ये उत्कट सुख तर होत पण उत्कट प्रेम....?? ज्याचा चेहरा आठवत नाही त्याच्यावर प्रेम...?? स्वप्न होत की सत्य...? शरीरावरच्या खुणा तर ते सत्य आहे याची ग्वाही देत होत्या.... तिलाही सोक्षमोक्ष लावायचा होता... ती ही वाट पाहत होती पुढच्या अमावास्येची......


त्या दिवशी बाबा ज्या संतापाने आणि घाईने घरातून निघाले ते दृश्य त्यांच्या मनात तसेच घिरट्या घालत होते. घड्याळाच्या सरकणाऱ्या काट्यासोबत मनावर भीतीच सावट अजुनच पसरत होत. आपल्या घरात काहीतरी भयंकर वावरतय ह्या विचारानेच त्यांची झोप उडाली. त्यात झालेल्या घटनेमुळे बाबांकडे पुन्हा मदतीसाठी मागणी करायची हिम्मत दोघांमध्येही होत नव्हती. वडील कुठेतरी सगळं गमावल्याच्या भावनेने शून्यात डोळे लावून बसले होते. आईने देवाला पाण्यात ठेवून साकडं घातलं. तहान भूक कशाचीही पर्वा न करता ती कित्येक तास देव्हाऱ्यासमोर बसून होती. तिच्या रूमच दार अजूनही बंदच होते. संपूर्ण घरात शुकशुकाट पसरला होता. आता पुढे काय....? हाच प्रश्न मनात गोंगाट माजवत होता. बाबांनाही कदाचित त्याची जाणीव झाली असावी म्हणूनच की काय त्यांनी दुसऱ्या दिवशी निरोप पाठवून दोघांनाही आपल्या आश्रमात बोलावून घेतलं. त्यांच्या निरोपावर दोघांचेही चेहरे थोडेफार उजळले. अंधारलेल्या जीवनात आशेचा लुकलुकणारा एक छोटासा किरण दिसत होता त्यांना.


बाबांचा आश्रम म्हणजे अगदी पुस्तकात वर्णन केलेली पर्णकुटी. शहरापासून थोड्या दूर अशा भागात त्यांनी आपला छोटासा आश्रम स्थापला होता. बाबा आणि त्यांचे काही निवडक शिष्यगण त्या आश्रमात राहत. आश्रमाभोवती त्यांनी फुललेली थोडीफार शेती आणि बरीचशी फळझाड व फुलझाड दिमाखात डोलत होती. बाबांचं झाडांवर किंबहुना निसर्गावरच अफाट प्रेम होत. म्हणूनच आश्रमाच्या चहूबाजूंनी निरनिराळे वृक्ष दाटीवाटीने पसरले होते. वृक्षांच्या पसरलेल्या बाहुंवर काही वेलीही बिलगल्या होत्या. झाडांच्या दाटीवाटीमुळे परिसरात थंडावा होता. जाई जुई आणि मोगऱ्याच्या सुवासाने तो परिसर दरवळून निघाला होता. पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांच्या फांद्यांमधून फिरणारा वारा, त्या वाऱ्यावर सळसळणार शेत, फुलांवराच्या भुंग्यांचा गुंजारव, फुलपाखरांची नाजुक फडफड, मधूनच एखाद्या कोकिळेची शीळ सगळ्यांचीच कशी मस्त धून तयार झालेली. तिचे आईवडील असा आश्रम पाहत होते. भान हरपून आश्रम पाहताना ते नक्की कशासाठी आले तेच विसरले. त्यांना बघून बाबांच्या एका शिष्याने त्यांचे स्वागत केले. थोडेसे बिचकत... पुढे अजुन काय वाढून ठेवलंय ह्याच्या विचारात... ते बाबांच्या समोर दाखल झाले. बाहेरच्या वातावरणासारखच आतलं वातावरणही प्रसन्न होत. शेणाने सारवलेली जमीन, त्यावर अंथरलेल्या सतरंज्या, समोरच भिंतीवर मोठा आणि सुबक कोरलेला देव्हारा, त्याखाली रचून ठेवलेले विविध ग्रंथ, कोपऱ्यात एका मोठाल्या चौरंगावर मांडून ठेवलेले देव, त्यांच्या समोर तेवणाऱ्या मोठ्या समया आणि त्या खोलीत पसरलेला धुपाचा मंद सुगंध सगळच कसं डोळ्यांना आणि मनाला सुखावत होत. बाजूलाच केशरी वस्त्रावर ध्यान लावून बसलेल्या बाबांच्या चेहऱ्यावर समयीच्या ज्योतीचा मंद प्रकाश पसरला होता. ध्यानस्थ अवस्थेत त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेल समाधान पाहून क्षणासाठी दोघेही आपली व्यथा विसरले. त्यांच्या चाहुलीने बाबांनी डोळे उघडले आणि बसण्याची खूण केली. दोघेही समोरच्या सतरंजीवर बसले. लगोलग एका शिष्याने मोठ्या तांब्यातून थंडगार वाळ्याचे पाणी मोठ्या अदबीने समोर ठेवले. धावत पळत आल्याने त्यांना खरतर खूप तहान लागलेली. समोरचा तांब्या दोघांनीही घटाघट पिऊन एका दमात संपवला. आता कुठे त्यांना थोडा जीवात जीव आल्यासारखं वाटलं. बोलायचं तर खूप होत पण सुरुवात कुठून करायची ते दोघांनाही समजेना. मग बाबांनीच सुरुवात केली. 


" खर तर मी खूप गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी तुम्हाला बोलावलंय. त्या दिवशी ही बोलता आल असत पण तुमच्या घरी बोलण्यासारखं नव्हतं म्हणून इथे बोलावलं. "

खरतर बाबांच्या बोलण्याने थोडाफार धीर आलेला. तरीही मनातल्या शंका चेहऱ्यावर आल्याच. सगळं काही माहीत असूनही मनाची एक वेडी आशा असते की सगळं काही सुरळीत असेल. कपाळावरून ओघळणारा घाम पुसत शेवटी धीर करून वडिलांनीच विचारलं.


"नक्की काय झालंय..... हा काय प्रकार होतोय तिच्यासोबत.... तिला काही होणार तर नाही ना.... ती चांगली होईल ना...??" 


अर्थात हेच सगळं बोलण्यासाठी बाबांनी बोलावलं होत.

"खर सांगायचं तर माझ्या बघण्यात यापूर्वी बरेच प्रकार आलेत अशा प्रकारच्या शक्तिंबद्दल. बऱ्याच मुलींना पाहिलं देखील आहे आणि सोडवायचा प्रयत्नही केला पण... तुमच्या मुलीच्या बाबतीत प्रकारच काही वेगळा आहे... आतापर्यंत जेवढ्या प्रकारच्या अश्या शक्तीबद्दल आपल्याला माहीत आहे त्या कोणत्याही प्रकारात तिला वश करणाऱ्या शक्तीचा उल्लेख नाहीये"


" म्हणजे....हे सगळं आपल्या आवाक्याबाहेरच आहे का???... अस कस होईल..?"


" माहितेय... तुम्हाला सत्य पचवणं थोड जड जाईल.... आपल्याला माहीत नाही म्हणजे त्या शक्ती अस्तित्वात नाहीत अस नसतं ना.... कदाचित त्या शक्तीनी कधी आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली नसेल. आजपर्यंतच्या केसेस मध्ये मी अशा प्रकारच्या शक्तींना वैतागलेल्या बायका पहिल्यात. ज्यांचं अक्षरशः जगणं मुश्किल झालेल होत. त्या शक्ती त्यांना उपभोगतात आणि हाल हाल करतात. पण ती..... तिच्यासोबत अस काहीही झालेल नाहीये. उलट ती तर त्या शक्तिसोबत अशी रममाण होते जसं खरंच तो तिचा प्रियकर आहे... अशी जवळीक त्यांच्यातच असते ज्यांना एकमेकांची ओढ असते ..जर ती त्या शक्तीच्या प्रभावाखाली आहे असं म्हणायला गेलं तर तिच्या विचारांवर, व्यक्तिमत्त्वावर त्या शक्तीचा इतका प्रभाव आहे की ती स्वतःच्या मनाने विचार करण्यास असमर्थ ठरतेय......माझ्या मते तरी ही शक्ती खूप सामर्थ्यवान आहे. त्या शक्तीच उद्दिष्ट तर मी जाणु शकलो नाही अजुनपर्यंत... परंतु जे काही असेल ते तुमच्या मुलीसाठी घातक आहे. " बाबांच्या वक्तव्यावर आश्रमाच्या त्या छोट्याश्या खोलीत शांतता पसरली. प्रत्येक जण आपापल्या विचारात बुडाला 


" अहो पण अशा शक्तीपासून वाचण्याचा मार्ग असेल ना....." आईने डोळ्याच्या कडा पुसत विचारलं.


" वाचते... साधारणपणे एखादीच नशीबवान कोणीतरी वाचते अश्या शक्तीच्या तावडीतून.... नाहीतर ह्या शक्ती त्या माणसाचा जीव घेऊनच त्याला सोडतात.. त्याला कारण एकच ह्या शक्तीचा मानवाच्या विचारावरचा प्रभाव.... आधी मनुष्याच्या मनाचा आणि नंतर शरीराचा ताबा घेऊन त्या त्याला कळसूत्री बाहुलीसारखी नाचवतात..... बहुतेक वेळा त्या वश केलेल्या व्यक्तीला खूप त्रास देतात अगदी शारीरिक शोषण पण करतात... दिवस रात्र त्या व्यक्तीसोबत शारीरिक सुख उपभोगतात.... अश्या अमानवीय शक्तीसोबतचा भोग आपलं मानवी शरीर सहन नाही करू शकत अशावेळी त्या व्यक्तीचं मन बंड करून उठतं.... ते प्रतिकार करू पाहत... त्या शरीराला सुटका हवी असते.... कोणतीही शक्ती मानवी सुप्त मनाला वश नाही करू शकत...परंतु प्रत्येक वेळी सुप्त मन जागृत नसतं.... मनाचा तेवढा भाग त्या शक्तीचा विरोधक असतो..... तेव्हा सुप्त मनाच्या साहाय्याने व मंत्रशक्तीने शरीरातील सकारात्मक ऊर्जा कार्यरत करता येते.... पण जेव्हा त्या व्यक्तीच सुप्त मन जागृतावस्थेत नसेल अथवा त्याने मानवी शरीराची हेळसांड मान्य केली असेल..... तर कोणीच त्यांना मदत नाही करू शकत. जेथे मनाची सकारात्मकता संपते तेथे नकारात्मक शक्ती आपला ताबा मिळवते.... मदत करणारे आम्ही तरी कोण आहोत... आम्हाला फक्त काही मंत्र येतात... आता मंत्र तरी काय करतात.. तुमच्यामधे आधीच असलेल्या सकारात्मक लहरी कार्यान्वित करतात. प्रत्येक माणूस स्वतःच स्वतःचा रक्षक असतो. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं असतं. आम्ही फक्त तेच मार्गदर्शन करतो. तीच ह्या परिस्थितीतून बाहेर येणं सर्वस्वी तिच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. फक्त आणि फक्त तीच मन स्थिर असेल, तिच्या मनावर काही कालावधीसाठी का होईना त्या शक्तीच वर्चस्व नसेल तरच आपल्या प्रयत्नांना यश येईल.... तीच मन स्थिर करण्यासाठी मात्र आपण काही प्रयत्न करू शकतो.. परंतु..... "


"पण काय बाबा..?"


"मी बोललो ना हा प्रकार वेगळा आहे. इथे जर त्या दोघांमध्ये त्या काळात प्रेमभावना असेल तर आपले उपाय...... " बाबांनी हताशपणे नकारार्थी मान हलवली.


"आता काय करायचं..?"


"तिच्या मनात सुटकेची भावना निर्माण झाली पाहिजे. अशा प्रेमकथा फक्त पुस्तकात शोभतात. आणि जर का त्या शक्तीच काही वेगळं उद्दिष्ट असेल तर तिचा नाहक बळी जाईल.... काहीही असो पण तीच मन वळवण गरजेचं आहे."


"आम्ही बोलू तिच्याशी... नाही ऐकली तर समजावतो.." 


" खूप गरजेचं आहे तिच्याशी बोलणं. आपल्या प्रत्येक कृतीचं यश फक्त आणि फक्त तिच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे."


त्यांना काही उपासना करायचं सांगून बाबांनी पुन्हा आपलं लक्ष त्या शक्तीला जाणन्यासाठी केंद्रित केलं. ध्यानात दृष्टीने त्यांना आधीच जाणवलं की तिला अशा कोणत्यातरी शक्तीने वश केलेलं जी काही कालावधीसाठी प्रचंड ताकदीनिशी जागृत होत असे आणि बाकीच्या काळात अमानवीय रूपात कोणत्यातरी शक्तीची उपासना करत असते. त्या उपासनेचे रक्तरंजित तेज बाबांनी स्वतः बघितले होते. परंतु विचार करण्यासारखी गोष्ट अशी होती की त्या शक्तिसोबतचा समागम ती मनमुराद उपभोगत होती. ती शक्ती फक्त ठराविक काळात आणि ठराविक वेळेत तिला शारीरिक किंवा मानसिक इजा न करता प्रणयाचा आनंद देत होती. त्यात तीलादेखील त्या शक्तीला समर्पित होण्याची विलक्षण ओढ होती. कदाचित हे अस्मानी प्रेम असेल अथवा त्या आड एखाद्या अज्ञात शक्तीचा विध्वंसक कट.... 


बाबांच्या भेटीनंतर तिच्या आईवडिलांची चिंता अजुनच वाढली. एकुलत्या एका पोरीवर अस काही संकट यावं की तिला वाचायचीही संधी मिळू नये. आता बाबांच्या म्हणण्याप्रमाणे तिची इच्छाशक्ती तिच्या ताब्यात असं सर्वात गरजेचं होत. आणि त्यासाठी तिला बोलत करणं. कदाचित तिला समजल्यावर तरी काहीतरी मार्ग निघेल म्हणून तिच्याशी बोलून काही गोष्टी जाणून घ्यायचा देखील प्रयत्न केला. परंतु तीच वागणं नेहमीप्रमाणेच होत..... जस काही तिच्या स्मृतितून त्या अमावस्येच्या आठवणी कायमच्या पुसल्या गेल्या असाव्यात. पुन्हा पुन्हा विचारून पण तीच उत्तर एकच होत " मला नाही आठवत मला काय होत... मी तुमच्याशी कशी वागते, कॉलेजला जाते की नाही, कोणासोबत असते काही काही आठवत नाही. फक्त पुसटसा कोणाचातरी स्पर्श आठवतो.... आणि आठवल्यावर हवा हवासा वाटतो. तो स्पर्श माझ्या मित्रमैत्रिणीच्या स्पर्शासारखा नाहीये. खूप मृदू आहे.... मोरपीस फिरवल्यागत... आई मी खर सांगते मला ना नाही करायचं ग हे सगळं...मला मनातून सारखं वाटतं की मी काहीतरी चुकीचं करतेय आणि ते काहीतरी भयानक आहे.... मी कोणासाठी तरी का बेचैन होते जो मला आठवत देखील नाही.. खरंच नाही आठवत त्याचा चेहरा पहिल्याच... फक्त स्पर्शाची जाणिव होते... मग मी माझी नाही राहत ग.... मी फक्त त्याचीच होऊन जाते..... अचानक खूप अस्वस्थ वाटत... सारखं काहीतरी हरवल्याची जाणिव होते..... अस वाटत की कोणाशी बोलू नये, फक्त कोणाच्यातरी विरहात झुरत बसावं.... आणि मी विसरून जाते वर्तमान.... कोणीतरी आहे जे फक्त जाणवत.... जे मला डोळ्यांनी दिसत नाही... पण बंद डोळ्याआड त्याच अस्तित्व आहे....जे खूप हवस वाटतंय पण नकोय ते..... त्याच्यापासून खूप दूर जावस वाटतं... आणि ते जवळ आल की त्याला समर्पित व्हावस वाटतं..... मला बाहेर पडायचंय... मला हे नकोय.... मला सोडावं ना...आई... प्लिज...."


दर वेळी प्रमाणे आताही दोन दिवस आधीपासून ती बेचैनीने तडफडत होती.... त्याला शोधत होती... त्याच्या विरहात झुरत होती... स्वतःच्या मनाला आवरण तिला अशक्य होत होतं. आणि पुन्हा एकदा ती त्या शक्तीला शरण गेली. पण आज तिला त्याचा तोच चिरपरिचित गंध जाणवत नव्हता... त्याचा स्पर्श जाणवत नव्हता.... पाण्याविना तडफडणाऱ्या मासोळी सारखी ती तडफडत होती..... पण तो कुठे होता....???? 


...........................................................


इकडे दुपारपासूनच सगळ्यांचा जीव वरखाली होत होता. बाबा सोडले तर बाकी सगळ्यांचे चेहरे भयंकर चिंताक्रांत होते. बाबांना मदत म्हणून त्यांचे दोन शिष्यगणदेखील आले होते. बाहेर बाबांनी पूजेची तयारी मांडली. त्यांच्यासोबत त्यांचे दोन शिष्य जमिनीवर कसलीशी यंत्रे रेखाटत होते. वेगवेगळी वर्तुळे आणि हळदी कुंकवाने भरलेले बरेचसे आकार..... त्या विचित्र आकारात रेखाटलेल्या रांगोळ्या, त्यावर ठेवलेल्या सुपाऱ्या, लिंबू , भाताचे गोळे सगळच कसं जरा विचित्र वाटत होत. मनातील भिती, समोरची पूजेची तयारी आणि अमावस्येच वातावरण....भरीस भर म्हणून आज घरात जाणवणारा कोंदटपणा बाबा आल्यावर त्यांनीच संपूर्ण घराचा ताबा घेतला. तिचे आई वडील सांगितल्याप्रमाणे ते एका कोचावर बसून होते. आई केव्हापासून फक्त जगनीयंत्या परमेश्वराच स्मरण करत होती. त्या ईश्वराला दया आली तर सुटका होणार होती. आईच्या कानात बाबांचे त्या दिवशीचे शब्द घुमत होते...' ईश्र्वरावर विश्वास ठेवा.... आपला संघर्ष अशा शक्तीशी आहे ज्यापासून सुटका मिळतच नाही... परंतु स्वतःच्या मनाची शक्ती जागृत करा... मन ताब्यात ठेवा.... जोपर्यंत तुमचं मन ताब्यात आहे कोणतीच शक्ती तुमचं काहीही वाकड नाही करू शकत...... त्या ईश्र्वरावर भरोसा ठेवा तो सहाय्य करेल.' 


सफेद वस्त्र परिधान करून बाबा मधल्या गोल रिंगणात बसले. तिच्या परिवारासाठी आता तेच तारणहार होते. त्यांचे दोन्ही शिष्य त्यांच्या सोबतच्या रिंगणात पद्मासनात बसले. तिच्या आई वडिलांभोवती हळद,कुंकू,भस्म मिश्रित संरक्षक कवच रेखाटण्यात आले. त्या कवचामध्ये कितीही बलाढ्य शक्ती प्रवेश करण्यास असमर्थ होती. तिच्या रूमचा दरवाजा अपेक्षेप्रमाणे बंदच होता. सगळ्यांची तयारी तर झाली होती परंतु तीच काय...? ती मनाने त्या शक्तीचा सामना करण्यासाठी तयार होती का नाही हे ह्याक्षणी तीदेखील सांगू शकत नव्हती. पण परमेश्वरावर भरोसा ठेवून सगळे आपापली भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले. 


अमावस्येचा मुहूर्त चालू होण्यास काही अवधी बाकी होता. बाबांनी दीर्घ श्वास घेऊन हातानेच शिष्यांना इशारा केला. इशारा समजुन त्यातील एक जण काहीतरी पुटपुटायला लागला. ते पुटपुटणे अस्पष्ट होते तरीही त्याच्या उच्चाराने मात्र वातावरण गढूळ होऊ लागले. वातावरणातला सूक्ष्म बदल बाबांच्या नजरेने पटकन टिपला. हा बदल त्या शक्तीच घरातील आगमन सूचित करत होता. स्वतःवरचा विश्वास हेच त्यांचं शस्त्र होत. आणि त्या शस्त्राने ते अकल्पित अशा दुष्मनाशी दोन हात करणार होते. 


थोड्याच वेळात घराचे रंगरूप पालटून गेले. वातावरणातील हवेचा दाब बघता बघता अचानक कमी होत होता. मंद मंद थंडगार झोंबणारा वारा वाहू लागला. प्रत्येक झोताबरोबर तापमान कमी होऊ लागले. वाऱ्याच्या झोताने खिडक्यांचे पडदे हवेवर फडफडून आपटत होते. सोफा कव्हर कधीच उडून इकडे तिकडे फरफटत होते. हवेचा कमी दाब आणि बोचणारी थंडी यामुळे आता तिथे बसलेल्या सर्वानाच श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. पण मनातील हिम्मत कायम होती. काहीही झालं तरी आत्मविश्वास गमवायचा नव्हता म्हणून मंत्र म्हणणाऱ्या शिष्याला धाप लागत असतानाही तो मोठ्याने मंत्र म्हणत होता. मोठा श्वास भरून घेऊन पुढचा मंत्र म्हणायला त्याला प्रचंड कष्ट करावे लागत होते मग त्याला साथ देण्यासाठी दुसऱ्या शिष्याने थोड्या अजुनच मोठ्याने मंत्रोच्चार चालू केले. 


मंत्राचा आवाज वाढताच वातावरणाने आपला रंग पालटला. आतापर्यंत सौम्य वाटणार वातावरण रौद्र रूप धारण करत होत. अति थंडीने खिडकीत लावलेली शोभेची झाड उभ्या उभ्या करपू लागली. भिंतीच्या कडेवर पांढरट थर जमा होऊ लागला. बोचणाऱ्या थंडीच्या जोडीला चित्र विचित्र, समजू न येणारे ध्वनी निर्माण झाले. आवाजासोबत वातावरणात कंपन निर्माण होत होती. त्या आवाजाची तीव्रता क्षणाक्षणाला वाढत होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून शिष्यांना आपले मंत्र अजुन मोठ्याने म्हणावे लागत होते. मायावी आवाजाची आणि मानवी आवाजाची जुगलबंदी चालू होती. 


आवाजाची वाढती तीव्रता मानवी शरीर सहन करणं अशक्य होत. ते सहन न होऊन तिची आई बेशुध्द होऊन बसल्या जागी कोसळली. अति थंडीने तीच शरीर पांढरफट पडलं होत. हातावरच्या शिरा फुगून उठून दिसत होत्या. केस पिंजराले जाऊन राठ झालेले. शरीरावर जागोजागी रक्तप्रवाह गोठल्यासारखा वाटावा असे काळसर निळे डाग दिसत होते. कमी अधिक फरकाने बाकीच्यांचीही तीच अवस्था झालेली. हाड गोठवणाऱ्या थंडीत दातावर दात आपटत असल्याने मंत्र म्हणणं जिकरीच होत होतं. जोराच्या हवेने हळदी कुंकवाचे रिंगण, सुरक्षा कवच, पूजेचं साहित्य कधीच उधळल गेलं होत. पडदे आदळून फडफडून अक्षरशः फाटून गेले होते. त्याची लक्तर वाऱ्याच्या झोताबरोबर इतस्तः हेलकावे खात होती. शेल्फवरच्या वस्तू कधीच जमिनीवर आदळून तुटून गेल्या होत्या. आईच्या बाजूलाच वडीलदेखील श्वास घ्यायला त्रास होऊन बेशुद्धावस्थेत पडले. बाबा आणि शिष्यांची कातडीदेखील पांढरी होऊन खरखरीत बनली. त्याला खाज येत होती. मंत्र कधीच बंद झालेले. बोलणार तरी कसे.... आतून गोठून गेल्याने शरीराची हालचाल होत नव्हती. त्यांच्या जाणीवाच बधीर झाल्या..... नाही म्हणायला फक्त अर्धवट उघडझाप होणारे डोळे समोरच मृत्यूच तांडव भेदरलेल्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत होते. एका शिष्याने मोठ्या कष्टाने बाजूला बसलेल्या बाबांकडे पाहिले. त्याही अवस्थेत बाबा गोठलेल्या हिमालयासारखे भासत होते.....शांत आणि निश्चल..... त्यांचीही चामडी अंगावरच्या कपड्यांसमान सफेद झालेली होती. सर्वांगावर पांढरा थर जमा होत होता. सर्व काही संपल्यातच जमा होत. शिष्यांनी पण आता हर मानली होती. शेवट समोर बघून त्यांनी आपले डोळे मिटले.



भिंतीच्या पलीकडल्या ती... त्याच्या विचारात तळमळत होती..... काळजात कसलीशी हुरहूर दाटत होती. ही कसली बेचैनी होती देव जाणे... डोळे बंद करून ती आपल्या बेडवर दोन्ही हात पसरून त्याची वाट पाहत होती. त्याच्या प्रेमात चिंब चिंब भिजण्यासाठी ती व्याकुळ झाली होती. पण आज तीच प्रेम काही नेहमीसारखं उफाळून येत नव्हतं. त्याच्या आठवणीत अंगावरुन हात फिरताना आज मोरपीस उमलेना..... त्याच्या ओठांच्या नाजुक स्पर्शाच्या कल्पनेने अंगभर शहारा उमटेना.... तिच्या गोऱ्यापान कायेत भान हरपून जाणाऱ्या त्याला रिझवण्यासाठी ती तयार होती. तिचा अनावृत्त, बांधेसूद, प्रणयाच्या मादक सुगंधाने दरवळणारा देह त्याला मोहवण्यासाठी आतुर होता. परंतु त्याच अस्तित्व जाणवणारा तो गंध काही दरवळत नव्हता. लालसर सोनेरी किरणांच्या आडून तिला भुरळ घालत येणारा तो आज..... कुठे होता.....????


.............................................................


बाहेरच वातावरण अक्षरशः भयाण झाल होत. उधळलेल आणि सर्वत्र पसरलेल पूजेचं साहित्य, अस्ताव्यस्त पडलेल्या आणि चक्काचूर पावलेल्या वस्तू, बेशुध्द होऊन पडलेले तिचे आईवडील आणि त्यांच्याच बाजूला बसलेल्या अवस्थेत मरणाची वाट पाहणारे बाबांचे शिष्य...... सर्व काही संपल्यात जमा होत. त्या शक्तीने निर्माण केलेलं मायावी जालही आपल्या विजयाच्या उन्मादात गुरगुरत होत. पण त्याच्यात आता आवेश नव्हता.


अचानक बाबांनी आपल्या खड्या आवाजात काही मंत्र उच्चारायला सुरुवात केली. मंत्राच उच्चारण होता क्षणीच वातावरण पुन्हा ढवळल. जणू त्या मायावी शक्तीला टक्कर देण्यासाठी दैवी शक्ती अवतरली होती. एकेका मंत्राच्या आवर्तनासोबत थंडीची तीव्रता जानवण्या इतपत कमी होत होती. मंत्रशक्तीसमोर राक्षशी आवाज कमी पडत होते. अंगातील गोठलेले स्नायू हळूहळू सैलावत होते. जरा सावरल्यावर बाबांनी समोरच्या उधळल्या गेलेल्या यज्ञकुंडात समिधा टाकल्या. मंत्राच्या उच्च गजरात अग्नी देवतेला आवाहन केलं. बाबांचा आवेश पाहून शिष्य मनाताच खजील झाले. क्षणभरासाठी बाबांवरचा विश्वास डळमळला म्हणून स्वतःलाच कोसत होते. परंतु आता ही वेळ त्या शक्तीला निर्वाणीची टक्कर द्यायची होती म्हणूनच दोघांनीही सर्व शक्तिनिशी मंत्रोच्चार प्रारंभ केले. 


मायावी शक्तीला हा बसलेला एक हादरा होता. शक्य तेवढ्या प्रयत्नांनी त्या शक्तीला कमजोर पाडणं गरजेचं होत. मंत्रोच्चाराने ती शक्ती नामोहरम होतेय असं वाटतं असतानाच बाबांना जाणवलं की त्यांचा श्वसनासाठी अडथळा येतोय. विचित्र अपरिचित असा उग्र वास सुटलाय. बाबांनी परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी आपले डोळे किंचित उघडले. परंतु डोळ्यांना दिसला तो काळपट फेर धरलेला धूर. तो धूर नाकातोंडात जाऊन त्यांची हालचाल बंद झाली. ना श्वास घेता येत होता ना मंत्र उच्चारण होत होते. जिंकू वाटणारा खेळ क्षणात पालटला. मायावी शक्तीला आव्हान दिल्यानंतर ती पेटून उठली होती. जरीही त्या शक्तीच स्वरूप डोळ्यांनी पाहता येत नव्हतं. तरीही तो संताप वातावरणातून जाणवत होता.


अचानक अग्निकुंडातून प्रचंड धुराचा झोत त्यांच्या मस्तकाभोवती दाटला. श्वास घेताना त्यांची दमछाक होऊ लागली. नाकपुड्या फुलवून तांबड्या लाल झाल्या. डोळे रक्त उतरल्यासारखे तांबूस झाले. गळ्यावरच्या नसा ताठरल्या. घशातुन खोकल्याची उबळ दाटून येत होती. तरीही हार न मानता त्यांना मंत्रोच्चार चालू ठेवायचा होता.


बाबांच्या भोवतीचे मायावी वलय इतर कोणालाही दिसून येत नव्हती. परंतु अचानक त्यांची अशी घायाळ अवस्था पाहून शिष्यांचे मात्र धाबे दणाणले. त्यात हे मंत्र अनाकलनीय होते. आजवरच्या कालावधीत बाबांकडून कधीही या मंत्रांचा ना उल्लेख आलेला ना कधी त्यांना उच्चारताना ऐकले होते. त्यामुळे ते दोघेही मंत्रोच्चार करू शकत नव्हते.... सगळच अशक्य होऊन बसलं. दोन्ही शिष्यांनी केविलवाण्या चेहऱ्याने एकमेकांकडे पाहिलं...हा हरलेला क्षण होता... परिस्थितीपुढे हार.... चांगल्याची वाईटासमोर हार... गुरूची शिष्यांच्या मदतीअभावी हार... नाही.....


दोन्ही शिष्यांच्या डोळ्यात पाणी भरले होते. आपल्या गुरूची अशी अवस्था आणि डोळ्यासमोर होत असलेला पराभव पाहून काळजात असंख्य कळा मारत होत्या. मनात मात्र देवाचा धावा चालू होता. दोघेही एकटक बाबांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. काही वेळापूर्वी तेजस्वी वाटणारा त्यांचा चेहरा काळवंडून गेला होता. कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. अतीश्रमाने धाप लागत होती. 


अचानक एका शिष्याच्या मनात काहीतरी विचार चमकला. त्याच्या डोळ्यात एक चमक दाटली. हा शेवटचा उपाय होता त्याच्या गुरूला वाचवायचा. त्याने दुसऱ्या शिष्याकडे पाहिलं. तो मात्र अजूनही संभ्रमावस्थेत कधी बाबांच्या तरी कधी मित्राच्या चेहऱ्याकडे पाहत होता. मित्राच्या डोळ्यातील लकाकी पाहून तोदेखील क्षणभर अचंबित झाला. पण त्याला खात्री होती की अशी डोळ्यात चमक फक्त काहीतरी उत्तर सापडल्यावर येते. त्यानेही किंचित हसून प्रतिसाद दिला. आता फक्त तो पहिल्या शिष्याच अनुकरण करणार होता. पहिला शिष्य पद्मासनात बसला. आपले हात ताठ ताणून जुळवले. एका हाताने गळ्यातील रुद्राक्ष माळेला स्पर्श करून काहीतरी मंत्र म्हणायला सुरुवात केली. दुसऱ्याने पण त्याचे अनुकरण केले परंतु नक्की कोणता मंत्र म्हणायचा हे माहीत नसल्याने फक्त आपले मन जास्तीत जास्त शांत ठेवण्यावर त्याने भार दिला. बाबांनी सांगितलच होत जेव्हा सगळे उपाय संपतील तेव्हा मन शांत ठेवा. हरल्याची भावना तुमचा पराजय करते. शांत मनावर कोणतीही भावना कोणतीही शक्ती आरूढ होऊ शकत नाही... तो शिष्य मनाशीच हसला. त्याला दुसऱ्याकडे पहायचं होत परंतु मन शांत असण गरजेचं होत म्हणून त्याने मोह आवरला. बंद डोळ्यांसमोर लाखो काजवे चमकल्याचा भास झाला. त्या प्रकाशाची दीप्ती अंतरंग व्यापून गेली. कुठेतरी लांब पैलतीरावर जाऊन पोचला तो. डोळे. न उघडण्याइतके गच्च मिटून गेले. त्याच्या कानावर आता मंत्रोच्चाराचा आवाज पडत होता... बाबांचा आवाज होता तो... एक फिकट विजयी हास्य त्याच्या पांढरूटलेल्या चेहऱ्यावर पसरलं. त्याच शरीर आणि मन शांत होत होतं.


मंत्राच्या शेवटच्या ओव्यांचे उच्चारण चालू झाले. मागच्या काही तासांपासून मंत्र बोलून खरतर आता बाबांचा घसा कोरडा पडला होता. अंगाची कातडी खरखरीत होऊन सर्वांगाला खाज येत होती. धुरामुळे डोळे चुरचुरत होते. नाकातोंडात धूर जाऊन छातीत जळत होत. प्रबळ इच्छशक्ती काय असते ते बाबांकडे पाहून समजले असते पण बघायला कोणीच शुद्धीत नव्हते. आता बाबांची ताकद संपुष्टात आली मंत्राच्या शेवटच्या ओळीसोबत ते ही भान हरपले. जमिनीवर पडताना त्यांच्या डोळ्यांसमोर एक अक्राळविक्राळ आकार उमटला, रक्तळलेला नारिंगी रंगाचा तो आकार बदलणारा महाकाय पुसट होत नाहीसा झाला. 


ती तशीच आपल्या नैसर्गिक अवस्थेतील देहावर त्याला चाचपडत होती. त्याचा मनावर मोहिनी घालणारा गंध आपल्या श्वासात भरून घेण्याचा प्रयत्न करत होती. सैरभैर झालेल तीच मन त्याच्या शोधात वेडपीस होऊन तडफडत होत. पण तोच परिचित सुगंध आपोआप हळू हळू फिका पडत गेला. तो जाताना ती बेचैन व्हायची आणि आज तर त्याचा संगच लाभला नव्हता. त्याच्या अस्तित्वाची जाणीव हरवल्याने ती त्याला वेड्यासारखी शोधत होती. पण त्याची जाणीव त्याच्या गंधासारखीच विरून गेली. आणि तो धक्का सहन न होऊन ती जमिनीवर कोसळली. 


............................................................


आज लग्नानंतरची तिची पहिली रात्र... दुखर अंग सावरत ती कशीतरी बाथरूममध्ये गेली.... आजही रडली ती... आज तिच्या शरीराला झालेला स्पर्श नाजुक नव्हता. आज तिच्या ओठांना गुलाबाच्या पाकळ्या समजुन चुंबल नव्हतं. नवरा नावाच्या मानवीय ताकदीने तिला ओरबडल होत.... शॉवरच्या आवाजात तिचा आवाज दबला गेला. तिने आपल सर्वांग चाचपडलं. वेदनेचा डोंब उसळत होता. 


" बाबा बोललेले की ती अमानवीय ताकद तुला त्रास देईल. तुझा शारीरिक छळ करेल. पण प्रणयसुख, प्रेम सगळ मिळालं मला त्याच्यासोबत.... आणि मानवी प्रेम... ते तर लचके तोडत होत माझे काही वेळापूर्वी.... "


तिच्या डोळ्यासमोर तो दिवस आला. ते बाबांच्या पूजेचं सामर्थ्य होत की त्याच्या प्रेमाची हार.... बाबांच्या सांगण्यावरून ती त्याच्या आठवणीत तळमळत होती. त्याला आपल्यात सामावून जाण्यासाठी आवाहन करत होती. आज तिला त्याच्यापासून कायमची सुटका पाहिजे होती. आणि कुठेतरी आत मनात त्याच्या मिठीत हरवून जायलादेखील ती आतुर होती. मात्र तो.... तो तिच्यापासून दूर राहून तिला न्याहाळत होता. तिच्या प्रेम बरसणाऱ्या त्या प्रियकराच आज वेगळच रूप तिच्यासमोर होत.... वेगळं रूप होत की हेच रूप आजपर्यंत जाणवलं नव्हतं.... बंद डोळ्याआड त्याला जाणवत राहण्यापेक्षा एकदाच डोळे भरून त्याला पाहून घ्यावं असं वाटतं असतानाच अचानक तिला त्याचा स्पर्श जाणवला.आज त्या स्पर्शात खूप जास्त काळजी वाटत होती.... जशी आजपर्यंत आई वडिलांच्या स्पर्शात जाणवत असते. आई वडिलांच्या आठवणीने तिला बाबांचे शब्द आठवले. मन दोलायमान स्थितीत डुलत असतानाही माप आई वडिलांच्या बाजूने पडलं. तिने मनात मंत्रोच्चार सुरू केले. त्याला त्या मंत्रोच्चाराचा त्रास होऊ लागला. त्याच्या विव्हळण्याने होणारा त्रास तिला कळत होता. परंतु त्याची मिठी अजुनच घट्ट झाली. कित्येक वेळ ती तशीच त्याच्या मिठीत होती. त्याच्या मिठीतील ऊब ती साठवून घेत होती. त्याच्या नाजुक तलम ओठांचा स्पर्श तिला स्वतःच्या कपाळावर जाणवला. ओलसर उबदार स्पर्श.... पण तिने मंत्रोच्चार थांबवला नाही. त्याच विव्हळण कित्येक पटीने वाढल आणि सुटणाऱ्या मिठीसोबत कमी कमी होत गेलं. त्याच्या मिठीतुन ती सुटली....... कायमची.


सगळं आठवून तिचे डोळे पुन्हा भरून आले. आज तिला कळलं की नक्की काय सुटलं.... चूक कोणाची होती... तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या त्या अदृश्य शक्तीची..? ते प्रेम समजू न शकणाऱ्या तिची..? की अमानवीय शक्तीपासून सुटका होण्यासाठी मदत करणाऱ्या तिच्या आई वडिलांची आणि बाबांची...? चूक कोणाचीच नव्हती... चूक म्हणावी तर ती नियतीची होती....


ती तशीच शॉवरखाली भिजत राहिली. कुठून तरी एक परिचित असा गंध दरवळला. तिचे डोळे आपोआप बंद झाले. पाण्याचे ओघळ तिच्या सर्वांगावर ओघळत होते. कुठूनतरी हलकीशी थंडगार झुळूक तिला स्पर्शून गेली. मऊशार उबदार स्पर्श तिला कपाळावर जाणवला. सुखाची गोड शिरशिरी अंगावर लहरत गेली. तिच्या भिजल्या ओठावर हसू रुंदावल होत...



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror