तो पाऊस
तो पाऊस
आजही ती आठवण काढली की जीव घाबरायला होतो. तो पाऊस २६ जुलै २००५ चा मुंबईत फक्त दोन तास धो धो कोसळला आणि होत्याचे नव्हते करून टाकले.
मी शाळेतून दुपारी एक वाजता घरी आले. जेवून होतंय तेवढ्यात एकदम अंधारून आले. सहा महिन्यांची रात्र झाली म्हणतो तशा प्रकारे. हां हां म्हणता एवढा जोराचा पाऊस पडला की, मोठ मोठाल्या धारा कोसळत होत्या आणि समोरचं सगळं धुरकट दिसत होेतं. असा कोसळणारा पाऊस कधीच पाहिला नव्हता. त्याच्याकडे पाहताना एक प्रकारची भिती, काळजी वाटू लागली. घरात कोणी नव्हतं. धाकट्या मुलीला ऑफिसमध्ये फोन लावला आणि तेथूनच तिला ताईकडे जायला सांगितले.
ह्या पावसाचा कुणालाच अंदाज बांधता आला नाही. सगळीकडे पाणीच पाणी साचले. वीज, फोन बंद पडले. मोबाईल ही बंद, कुणाशी संर्पक साधता येईना.
सगळीकडे हाहाकार माजला. सारी मुंबई पाण्यात बुडाली. शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये ही पाणी घुसले. काही लोक घरी जाण्यासाठी निघाले होते, ते वाहत्या पाण्यात एकमेकांचा हात धरून, आधार घेत, कंबरभर पाण्यातुन जाऊ लागले.
बस, ट्रेन, टॅक्सी सगळे बंद पडले. लोक बसच्या छप्परावर चढून बसले. ए.सी कार बंद पडल्याने आत बसलेले लोक दारं खिडक्या न उघडू शकल्यामुळे आतल्या आत गुदमरले. असे बऱ्याच लोकांचे ह्या पावसाने प्राण घेतले.
शहाणे समजूतदार लोक आप आपल्या कार्यालयात राहिले. शाळेतली मुले शिक्षक शिक्षिका शाळेतच अडकली. जवळपास राहणाऱ्यांनी त्यांची रात्रीच्या जेवणाची सोय केली. लांब राहणाऱ्यांनी रेल्वे रुळावरून चालत घरी यायचं ठरवलं. बरेच लोक चालत होते. पाऊस कम
ी झाला होता पण माणसे चिंब भिजली होती. संध्याकाळ झाल्याने थोडा अंधार ही वाढला होता. रेल्वेच्या ट्रॅकवरून चालणाऱ्यांचे हाल होत होत. खूप वेळ चालत असल्याने थकवाही आला असेल. माझे चुलत मेहुणे ही सर्वां बरोबर चालत होते. पण नियतिने काय वाढून ठेवले! ते घरी पोचलेच नाही. बरेच जण सकाळी कसेबसे आले तर बरेच जण आलेच नाहीत. मग शोधा शोध सूरू केली. सगळी हॉस्पिटलं पालथी घातली. एकूण एक जागा शोधल्या. शेवटी चार दिवसांनी त्यांचे शव गोरेगांवच्या एका नाल्यात सापडले. ते दहिसरहुन निघालेले होते. असे बऱ्याच लोकांचे बळी ह्या पावसाने घेतले.
झोपडपट्टीत राहणाऱ्यांचेच नाही तर इमारतीत खालच्या मजल्यावर राहणाऱ्यांचे ही दयनिय हाल झाले. पावसाने काही भेदभाव न करता सगळ्यांची दुर्दशा करून टाकली.
जून ते सप्टेंबर पावसाळ्याचे चार महिने म्हटले जात होते. पण ह्या वर्षी पावसाने कहरच केलाय. आला वेळेवर पण आता जायचं नावंच घेत नाही. ऑगस्ट मध्ये आलेल्या अति पावसामुळे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा गावासकट शहरांची वाताहत केली. अजून त्या लोकांना स्वस्थता लाभलेली नाही. गणपती, दसरा अन् दिवाळी सरली तरी अजून हा परतीचा पाऊस जात नाही.
माणसांची करणी आणि निसर्गाचा कोप हे चक्र चालूच राहील. निसर्गापुढे कुणाचेही चालत नाही. आपण निसर्गाच्या नियमानुसार राहिलो तर निसर्ग ही आपल्याला साथ देईल. जर निसर्गाशी स्पर्धा कराल तर नियतीचे काही खरे नाही.
काही ही झालं तरी मी प्रत्यक्ष अनुभवलेला तो २६ जूलै २००५ चा दुपारचा पाऊस मी विसरूच शकणार नाही.