ती एक रात्र
ती एक रात्र


कथा
भयरस:
शिर्षक - ती एक रात्र
गावातली ती भयाण शांतता, अंधारलेली रात्र. गाव असतो घाबरून, रोज अनेक झाले गायब.
कोणास ना हे कळले, कधी, कुठे आणि कसे?
अनामिक भीती मनात उमटत, एक शिरशिरी जायची. भीतीचा मायाजाल पूर्ण गावाला वेढा घातला होता. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच एक अनामिक भीती वाटत होती.
गाव तसं हे चांगलं, पण हे विपरीत असे का घडते?. असे कितीतरी प्रश्न होते, ज्यांची उत्तरे सापडत नव्हती. अनेक प्रश्नांचा बांध मनात राहतो कोंडून, कोणालाच काहीच कळत नव्हते.
अमावस्येची रात्र, भयानक शांतता, कुत्र्यांचं ते विव्हळणं, त्या आवाजाने काळीज जातो फाटून. मनाचा थरकाप उडून जातो, आज कोणाचा नंबर आहे अशी भीती मनात येवून जाते. पिंपळझाडाच्या झावळ्यात गुरफटलेली
ती विहीर, त्याची ती सावली, खूप भयाण वाटत होती. मध्येच पक्ष्यांचं तो विचित्र येणारा आवाज, कुत्र्यांचं भुंकणं सगळं काही मनाचा थरकाप उडवणारं होतं. अशा वेळी संपूर्ण गाव निपचित पडून राहायचा. लहान मुलं घाबरून जायची, दर अमावास्येला ती यायची. तिची वेळ ठरलेली असायची. ती यायची, अशाच एका रात्री. ती रडायची, त्या आवाजाने कानठळ्या बसायच्या. छाती बडवत ती रडायची, का रडायची ती, हे कोणालाच माहीत नव्हते. तिला कोणी पाहिले नव्हते. ती तिच्या वेळेला यायची, रडायची आणि मग, एक भयाण किंकाळी कानावर पडायची. ती किंकाळी कोणाची, हे कोणालाच माहित नव्हते. भीतीने कोणीच बाहेर पडायचे नाही. कोणी उठायचं पण नाही, जीव मुठीत घेऊन ते तसेच पडून राहायचे. दुसऱ्या दिवशी त्यांना समजायचं आपल्यातलं एक कमी आहे. संपूर्ण गाव जमायचा, डोक्याला हात लावून बसायचा. कोणाला काही सुचवायचं नाही. यातून आपली सुटका कशी होईल, हे काही त्यांना कळायचं नाही. मग तो रडण्याचा आवाज अन् ती भयाण शांतता. नेहमीच असं घडायचं, प्रत्येक महिन्याच्या, प्रत्येक अमावस्येला हे असं घडायचं.
पुढल्या अमावस्येच्या वेळी मी शोध घ्यायचं ठरवलं. लपून बसलो मी आणि ती येण्याची वाट पाहू लागलो. आली ती, तिच्या वेळेला, डोक्यावर पदर, एका नवी नवरी सारखी ती
सगळा शृंगार करून आलेली होती. तिच्या पायातल्या घुंगरूंचा आवाज, शांतता चिरत होती. ती आता एका घरासमोर थांबली होती
आणि मग तिने रडायला सुरुवात केली. जोडीला तो कुत्र्यांचा आवाज, माझं अंग थंड पडलं, मी थरथर कापू लागलो. ती पुढे काय करते ते पाहू लागलो, आणि मी बघतच राहिलो. तो दरवाजा आपोआप उघडला गेला
ती आत गेली आणि एका व्यक्तीला घेऊन बाहेर आली. ज्याला तिने आणलं होतं, तो माझा मित्र होता. ती आता त्याचं काय करते ते बघू लागलो. ती आता माझ्या दिशेने वळली आणि तोच तिने, तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला केला. आता तिचा चेहरा मी बघू शकत होतो. ती कोण आहे हे मला समजणार होतं. ती आता मध्यभागी आली आणि तिचा चेहरा मला दिसला. तिचा तो चेहरा बघून, माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो. दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा मी घरी होतो. मी घरी कसा, कोणी आणलं मला इथे. मी स्वप्न तर पाहिलं नाही ना, पण नाही मला बाहेरून आरडाओरड आणि रडण्याचा आवाज येत होता. म्हणजे रात्री जे घडलं ते सत्य होतं. अजूनही तो चेहरा आठवला की, संपूर्ण अंगाला घाम फुटतो. माझी वाचाच बंद होवून जाते
एक अनामिक भीती, माझ्या मनात घर करून जाते.
प्रणाली कदम,
कल्याण, जिल्हा ठाणे