STORYMIRROR

Pranali Kadam

Drama

3  

Pranali Kadam

Drama

अविस्मरणीय क्षण

अविस्मरणीय क्षण

3 mins
2.1K


ऑनलाईन ओळख, दोघे तासंतास बोलत असायचे. सुरूवातीला संकोच, भिती अशा मनात भावनांचा कल्लोळ झालेलं होतं. दोघे एकमेकांची आवड, कपड्यांचा रंग, खाणं, हे सर्व ते विचारतात. रात्री उशिरापर्यंत गप्पा, दिवसा फोनवर बोलणं चालू. तिला सुरूवातीला त्याच्या विषयी विशेष काही वाटत नाही, पण त्याच्या मनात ती भरलेली असते. तो तिला भेटायला बोलावतो तेंव्हा हिच्या मनांत धडधडी भरते, तिचं मन घाबरून जातं, तिला कळत नव्हतं की काय उत्तर द्यायचे. तो खूपच तिला आग्रह करतो, 

"एकदा तरी मला भेट, पुढे मग बघू." 

ती तयार झाली भेटायला, तिच्या मनात धाकधूक, चलबिचल असं तिला वाटत होती, पण भीती नव्हती . ती फक्त एकदाच त्याला भेटणार होती आणि मग पुन्हा भेटायचं नाही असं तिने ठरवलं होतं.

तो दिवस उजाडला, भेटायची वेळ जवळ आली होती. दोघे विरूद्ध दिशेला राहणारे होते. ती वेस्टर्न, तर तो सेंट्रल मध्ये राहत होता. दोघांनी मग दादरला, शिवाजी पार्क येथे भेटायचं असं ठरवलं. म्हणजे दोघांनाही सोयीस्कर असे होते. तो तिला म्हणाला की, 

"तू जिथे राहतेस, तिथे मी येतो तुला भेटायला".

 पण हिला ते नको होते, कोणी पाहिले तर! ही भीती मनात होती.

म्हणून मग दादरला भेटायचं ठरलं. ती घरातून निघाली तेव्हा तिने त्याला तसं मेसेज करून कळवलं. दोघे दादर स्टेशनला आले, कुठे आहे हे फोनवरून विचारून ते दोघे एकमेकां समोर आले. तिच्या पाठी एक जाड बाई होती, त्याला वाटलं 

"हिच आहे का ती" 

तिने पाठी वळून बघितलं तेव्हा दोघांची नजरानजर झाली. तिला पाहताच त्याला घाम फुटला, कारण ती कमालीची सुंदर होती. म्हणजे त्याने तसा विचार केलाच नव्हता की जिला आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत ती एवढी सुंदर असेल. दोघे एका होटेल मध्ये चहा पिण्यासाठी गेले, चहा घेता घेता गप्पा होतील हा त्यामागचा उद्देश होता. 

दोघे एका टेबलवर येवून बसले, वेटरने पाण्याचे दोन ग्लास दोघांच्या समोर आणून ठेवले. त्याने लगेच पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि तो गटागटा पाणी पिऊ लागला. तिने तिचा ग्लास पण त्याच्या पुढे केला. त्याने तो ग्लास सुध्दा रिकामा केला. ती म्हणाली,

" येवढा काय घाबरला आहेस, मीच आहे. वास्तविक मी घाबरायल

ा हवी होती, पण तूच घाबरला आहेस, शांत हो". 

त्यांनी चहाची ऑर्डर दिली, आणि मग त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. अधुनमधून तो रुमालाने घाम पुसत होता आणि ती त्याचं निरीक्षण करत होती. स्वभावाने तिला तो, खूप साधा, आणि सच्चा वाटला. त्यादिवशी ते पहिल्यांदाच भेटत होते, ऑनलाईन मध्ये कोणी खरे फोटो लावत नाही. पण तिला प्रत्यक्ष भेटून तो खूप खुश झाला. त्याला ती खूप आवडली होती. तिचं बोलणं, हसणं सगळं त्याला वेड लावणारं होतं. 

ती अजूनही त्याच्याकडे बघत होती, त्याच्या बोलण्याचे हावभाव डोळ्यात साठवत होती. तिलाही तो आवडला होता, पण अजूनही तिचा निर्णय पक्का झाला नव्हता. 

होटेल मधून बाहेर पडल्यावर ते दोघे शिवाजी पार्क मध्ये आले. तिथे एका बेंचवर बसून राहिले, कोणीच काही बोलत नव्हतं, फक्त ते दोघे बसले होते. येणारे जाणारे लोक बघत होते हे तिला आवडलं नाही. म्हणून तिने निघायचं ठरवलं. 

जाताना तिने त्याचा निरोप घेतला आणि ती तिच्या मार्गाने निघाली. पण तिच्या डोळ्यात सतत त्याचा बालिश चेहरा डोळ्यांसमोर येत होता. कुठे तरी त्याने तिच्या हृदयाचा ताबा घेतला होता, हे तिला जाणवत होते, पण मन मानायला तयार नव्हते. 

घरी आली तरी त्याचेच विचार डोक्यात चालू होते. नंतर वारंवार ते दोघे भेटू लागले आणि दोघांचे प्रेमबंध जुळू लागले होते. असेच दिवस जात होते, दोघे भेटत होते, गप्पा होत होत्या. मग तिनेही कबूल केलं की, तिचं त्याच्यावर प्रेम आहे. त्याने त्याच्या प्रेमाची कबुली सुरूवातीलाच दिली होती. त्याला आता तिच्या कडून कबुली हवी होती. पण त्याने कधी तिला जबरदस्ती नाही केली किंवा घाई केली नाही. त्याने तिला वेळ देवू केला होता. 

आता तो क्षण आला होता, ज्याची तो आतुरतेने वाट बघत होता आणि तिने तिच्या प्रेमाची कबुली जवाब दिला होता. काही दिवसांनी दोघांनी लग्न केलं, त्यांचा संसार सुखाचा चालू होता. आज दोघे एक सुखी जोडपं आहे. पण अजूनही तिच्या डोळ्यांसमोर तो क्षण तरळत असतो, ज्या दिवशी ते दोघे भेटले होते, 'तो क्षण.' तिच्यासाठी तो क्षण अविस्मरणीय क्षण होता, कारण त्या क्षणां नंतर तो तिचा कायमचा झाला होता. आयुष्यातला खूप मोठा दिवस होता, ज्यामुळे ते दोघे एकत्र आले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama